Source :- BBC INDIA NEWS

ब्लॅक मांबा हा जगातील सर्वात प्राणघातक साप आहे.

फोटो स्रोत, Getty Images

विषारी सापांच्या चाव्यानं मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जगभरात मोठी आहे.

सर्पदंशावरील औषध म्हणून ओळखलं जाणारं प्रतिविष (अँटिव्हेनम) जगभरात तितक्या सहजतेनं उपलब्ध होत नाही. त्यातच प्रत्येक विषारी सापाच्या चाव्यासाठी वेगवेगळं औषध लागतं. त्यामुळे अनेकदा योग्य ते औषध नसल्यानं अनेकांचा जीव जातो.

अशावेळी एका माणसानं मानवतेसाठी काम करण्याच्या हेतूनं प्रेरित होत तब्बल 200 वेळा स्वत:ला सापाचा चावा घेऊ दिला आणि एक अफलातून रोगप्रतिकारशक्ती विकसित केली. त्या व्यक्तीच्या कामाबद्दल, त्यांच्या रक्तापासून नवं अँटिव्हेनम कसं विकसित झालं आणि त्याचे फायदे काय असणार याबद्दल जाणून घेऊया.

एक अमेरिकन माणूस ज्यानं जवळपास दोन दशकं जाणूनबुजून स्वत:लाच सापाचं विष टोचून घेतलं, त्याच्या रक्तापासून एक ‘अतुलनीय’ अँटिव्हेनम म्हणजे सर्पदंशावरील औषध तयार झालं असल्याचं, वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. त्या माणसाचं नाव टिम फ्रीडे आहे.

टिम यांच्या रक्तात आढळणाऱ्या अँटिबॉडीज विविध प्रजातींच्या प्राणघातक डोसपासून संरक्षण करतात, असं प्राण्यांवरील चाचण्यांमध्ये सिद्ध झालं आहे.

तर सध्याच्या उपचार पद्धतींमध्ये कोणत्याही व्यक्तीला विषारी साप चावल्यानंतर त्यावरील औषध त्या विशिष्ट प्रजातींशी जुळणं आवश्यक आहे.

मात्र, फ्रीडे यांचं 18 वर्षांचं हे अद्भूत मिशन, सर्पदंशावर सार्वत्रिक म्हणजे सर्व सापांच्या दंशावर लागू होणारं अँटिव्हेनम शोधण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.

सर्पदंशामुळे दरवर्षी जवळपास 1,40,000 लोकांचा मृत्यू होतो. तर याच्या तिप्पट लोकांना सर्पदंशामुळे शरीराचं एखादं अंग गमवावं लागतं किंवा कायमचं अपंगत्व येतं.

एकूणच, फ्रीडे यांनी 200 हून अधिक सर्पदंश सहन केले आहेत. तसंच जगातील काही सर्वात प्राणघातक सापांपासून बनवलेल्या 700 हून अधिक विषाच्या इंजेक्शनचा सामना केला आहे. यात मांबा, कोब्रा, तैपन्स आणि क्रेट्स यासारख्या सापाच्या अनेक विषारी प्रजातींचा समावेश आहे.

अँटिव्हेनम

फोटो स्रोत, Getty Images

सर्पदंशावरील उपचारपद्धती विकसित करण्याचे फ्रीडे यांचे प्रयत्न

सुरुवातीला फ्रीडे यांना साप हाताळताना स्वत:चं संरक्षण करण्यासाठी सर्पदंशाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करायची होती. त्यांनी युट्युबवर त्यांच्या या कामाचं दस्तऐवजीकरणही केली होतं.

फ्रीडे हे पूर्वी एक ट्रक मेकॅनिक होते. ते म्हणाले की, सुरुवातीला जेव्हा लागोपाठ दोन वेळा कोब्रानं चावा घेतला, तेव्हा ते कोमामध्ये गेले होते. त्यांनी स्वत:ची ‘पूर्णपणे वाईट अवस्था’ करून घेतली होती.

“मला मरायचं नव्हतं. मला माझं एकही बोट गमवायचं नव्हतं. मला माझं काम बंद पडू द्यायचं नव्हतं,” असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

फ्रीडे एका आंतरिक प्रेरणेनं हे काम करत होते. त्यांना सर्पदंशाच्या बाबतीत जगासाठी एक चांगली उपचारपद्धती विकसित करायची होती.

ते म्हणतात, “सर्पदंश करून घेणं ही माझी जीवनशैली बनली. माझ्यापासून 8,000 मैल अंतरावर असलेल्या आणि सर्पदंशानं मरणाऱ्या लोकांसाठी शक्य होईल तितके प्रयत्न मी नेटानं करत राहिलो.”

‘तुमचं थोडंसं रक्त घ्यायला मला आवडेल’

सध्या घोड्यासारख्या प्राण्यांमध्ये सापाच्या विषाचे छोटे डोस टोचून त्यापासून अँटिव्हेनम बनवलं जातं. या प्राण्यांची रोगप्रतिकारशक्ती शरीरात अँटिबॉडिज तयार करून या विषाशी लढते. याच अँटिबॉडीज मग उपचारांसाठी गोळा केल्या जातात.

मात्र सर्व सर्पदंशांसाठी एकच अँटिव्हेनम उपयोगाचं नसतं. सापाचं विष आणि त्याचा होणारा परिणाम प्रत्येक प्रजातीनुसार बदलतो. त्यामुळे विष आणि अँटिव्हेनम जुळलं पाहिजे.

इतकंच काय एकाच प्रजातीच्या सापांच्या विषामध्येही खूप वैविध्य असतं. म्हणजेच भारतातील एखाद्या सापाच्या प्रजातीपासून बनवलेलं अँटिव्हेनम श्रीलंकेतील त्याच प्रजातीच्या सापाच्या विषाविरोधात कमी प्रभावी असतं.

टीम फ्रीडे (मध्यभागी) सर्पदंशाला बळी पडलेल्या लोकांसाठी चांगल्या उपचार पद्धती विकसित करण्यासाठी मदत करू इच्छित होते.

फोटो स्रोत, Jacob Glanville

संशोधकांच्या एका टीमनं एका विशिष्ट प्रकारच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याला ब्रॉडली न्युट्रलायझिंग अँटिबॉडिज म्हणजे व्यापकपणे निष्क्रीय करणाऱ्या अँटिबॉडिज म्हणतात.

ते सापाच्या विषाच्या विशिष्ट भागाला म्हणजे ज्यामुळे त्या सापाचं विष इतरांपेक्षा वेगळं ठरतं, त्या भागाला लक्ष्य करण्याऐवजी, सर्व सापांच्या विषांमध्ये सामाईक असणाऱ्या भागाला लक्ष्य करतात.

तेव्हाच, सेंटीव्हॅक्स या बायोटेक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जेकब ग्लॅनविले यांची टिम फ्रीडे यांच्याशी भेट झाली.

“मला लगेचच वाटलं की ‘जर या जगात कोणी त्या ब्रॉडली न्युट्रलायझिंग अँटिबॉडिज विकसित केल्या असतील, तर अशी व्यक्ती हीच असेल’ आणि मी लगेच त्यांच्याशी संपर्क साधला,” असं डॉ. जेकब म्हणाले.

“पहिल्याच कॉलच्या वेळेस मी त्यांना म्हटलं, तुम्हाला हे कदाचित विचित्र वाटेल, पण मला तुमचं थोडसं रक्त घ्यायला आवडेल.”

फ्रीडे त्यासाठी तयार झाले आणि या कामाला नैतिक परवानगी घेण्यात आली. कारण या अभ्यासात फ्रीडे यांना आणखी विष टोचण्याऐवजी त्यांचं फक्त रक्त घेतलं जाणार होतं.

फ्रीडे यांच्या रक्ताचा वापर करून असं झालं संशोधन

विषारी सापांच्या दोन गटांपैकी एका गटावर म्हणजे इलापिड्सवर हे संशोधन केंद्रित करण्यात आलं. उदाहरणार्थ कोरल साप, मांबा, कोब्रा, तैपन्स आणि क्रेट्स.

इलापिड्सच्या विषात प्रामुख्यानं न्युरोटॉक्सिन असतात. त्यामुळे हे साप ज्यांचा चावा घेतात त्या प्राण्यांना अर्धांगवायू होतो. त्यामुळे जेव्हा श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेल्या स्नायूंची क्रियादेखील थांबते तेव्हा हे विष प्राणघातक ठरतं.

जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्ल्यूएचओ) पृथ्वीवरील सर्वात प्राणघातक सापांमध्ये ज्यांचा समावेश केला आहे, अशा 19 इलापिड्स म्हणजे सापांची निवड संशोधकांनी केली.

त्यानंतर त्यांनी या सापांच्या विषाच्या विरोधातील संरक्षण व्यवस्थेसाठी फ्रीडे यांच्या रक्ताचा बारकाईनं अभ्यास करण्यास सुरुवात केली.

या संशोधनाची तपशीलवार माहिती सेल या मासिकात दिली आहे. या अभ्यासात दोन ब्रॉडली न्युट्रलायझिंग अँटिबॉडीजची ओळख पटवण्यात आली, जे न्युरोटॉक्सिन विषाच्या दोन वर्गांवर प्रभावी ठरू शकतात.

युनिव्हर्सल अँटिव्हेनम विकसित करण्यासाठी काम करत असलेले संशोधक

फोटो स्रोत, Jacob Glanville

यात संशोधकांनी एक औषध मिसळलं जे त्यांचं अँटिव्हेनम कॉकटेल किंवा मिश्रण तयार करण्यासाठी तिसऱ्याला लक्ष्य करतं.

यासाठी उंदरांवर प्रयोग करण्यात आला. या औषधामुळे विषारी सापांच्या 19 प्रजातींपैकी 13 प्रजातींच्या प्राणघातक डोसपासून हे प्राणी बचावले. विषारी सापांच्या उर्वरित 6 प्रजातींपासून उंदरांचा मर्यादित स्वरूपाचा बचाव झाला.

सापाच्या विषापासून संरक्षणाचं हे ‘अतुलनीय’ व्यापक स्वरूप आहे, असं डॉ. ग्लॅनविले यांना वाटतं. ते म्हणाले, “सध्या कोणतंही अँटिव्हेनम उपलब्ध नसलेल्या इलापिड्स सापांच्या संपूर्ण गटाच्या विषापासून हे औषध संरक्षण करतं.”

संशोधकांची टीम अँटिबॉडिजमध्ये आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करते आहे. या औषधात आणखी चौथा घटक जोडल्यामुळे इलापिड्स सापांच्या विषापासून संपूर्ण संरक्षण मिळू शकतं. याची चाचपणी ते करत आहेत.

सापांचा दुसरा वर्ग म्हणजे वायपर्स. या सापांचं विष न्युरोटॉक्सिन्सपेक्षा रक्तावर हल्ला करणाऱ्या हिमोटॉक्सिन्सवर अधिक अवलंबून असतं.

एकूण पाहता सापाच्या विषाचे जवळपास एक डझन व्यापक प्रकार असतात. ज्यामध्ये थेट पेशींना मारणाऱ्या सायटोकॉक्सिनचा देखील समावेश आहे.

“मला वाटतं, पुढील 10 किंवा 15 वर्षांमध्ये आपल्याकडे सापाच्या प्रत्येक प्रकारच्या विषाविरोधात काहीतरी प्रभावी असं असेल,” असं प्राध्यापक पीटर क्वाँग म्हणाले. ते कोलंबिया विद्यापीठातील एक संशोधक आहेत.

अँटिव्हेनमच्या क्षेत्राला मिळणार नवी दिशा

फ्रीडे यांच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये सापाच्या विविध विषांवरील अँटिव्हेनमसाठीचा शोध सुरू आहे.

“टिम यांच्या अँटिबॉडिज खरोखरच असामान्य आहेत. त्यांनी सापाचं विष खूप व्यापकपणे ओळखणारी आणि त्याविरोधात बचाव करणारी रोगप्रतिकारशक्ती विकसित केली आहे,” असं प्राध्यापक क्वाँग म्हणाले.

यासंदर्भातील अंतिम आशा अशी आहे की, सर्व सापांच्या विषावर एक अँटिव्हेनम असावं जे पूर्णपणे प्रभावी असेल किंवा इलापिड्स सापांच्या गटासाठी एक इंजेक्शन असावं आणि वायपर सापांच्या गटासाठी एक इंजेक्शन असावं.

अँटिव्हेनम

फोटो स्रोत, Getty Images

प्राध्यापक निक केसवेल लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमधील सेंटर फॉर स्नेकबाईट रिसर्च अँड इंटरव्हेंशन्सचे प्रमुख आहेत.

ते म्हणाले की, सर्वप्रकारच्या विषाविरोधातील नोंदवलेलं संरक्षण ‘निश्चितच नवीन’ आहे आणि हा एक व्यवहार्य दृष्टीकोन असल्याचा ‘एक भक्कम पुरावा’ त्यातून मिळतो.

ते म्हणाले, “यात कोणतीही शंका नाही की या संशोधनामुळे हे क्षेत्र एका रोमांचक दिशेनं पुढे जाईल.”

मात्र त्यांनी सावधगिरीचा इशारा दिला की, यासंदर्भात अजून ‘बरंच काम करण्याचं बाकी आहे’ आणि अँटिव्हेनमचा वापर लोकांमध्ये करण्यापूर्वी त्याची व्यापक चाचणी करण्याची आवश्यकता आहे.

फ्रीडे यांना मात्र, या टप्प्यापर्यंत संशोधन पोहोचल्यानं ‘खूपच छान वाटतं आहे.’

“मी मानवतेसाठी काहीतरी चांगलं काम करतो आहे आणि ते माझ्यासाठी खूपच महत्त्वाचं होतं. मला या गोष्टीचा अभिमान आहे. हे खूपच छान आहे,” असं फ्रीडे म्हणतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC