Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रासह भारतात बहुतांश ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
त्यानुसार देशात दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत 105 टक्के पावसाची शक्यता आहे. लडाख, तमिळनाडू आणि ईशान्य भारत वगळता इतर राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.
महाराष्ट्रात कोकणातला किनारी भाग, मराठवाड्याचा काही भाग तसंच विदर्भातील काही ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता बरीच जास्त आहे.

फोटो स्रोत, IMD
मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो
मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या तीन गोष्टी आहेत :
1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला ‘एल-निनो’ असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.

फोटो स्रोत, Getty Images
यंदा IOD न्यूट्रल राहील. तसंच सध्या ENSO न्यूट्रल अवस्थेत असून मान्सूनच्या काळात एल निनोची स्थिती तयार होण्याची शक्यता नाही.
त्याशिवाय तसंच उत्तर गोलार्धात युरेशियाच्या भागात यावेळी कमी हिमवृष्टी झाली आहे.
या सर्व गोष्टी पाहता यंदा मान्सूनच्या काळात भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
हवामानाचा हा अंदाज संपूर्ण मोसमासाठीचा आणि संपूर्ण देशासाठीचा असून पुढच्या काही आठवड्यांतील निरीक्षणांनी त्यात आणखी अचूकता येईल.
याचा अर्थ असा, की हा दीर्घकालीन अंदाज केवळ एकूण किती पाऊस पडेल आणि कुठे जास्त पावसाची शक्यता आहे, याचं चित्र दर्शवतो. पण त्या पावसाचं वितरण कसं असेल, पावसाळी दिवसांची संख्या काय असेल, हे स्पष्ट होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.
तसंच यंदा मान्सूनचं आगमन कधी अपेक्षित आहे, याविषयीचा अंदाज हवामान विभाग मे महिन्याच्या सुरुवातीला वर्तवण्याची शक्यता आहे. तर मे महिन्याच्या अखेरीस मोसमासाठीचं भाकित जाहीर केलं जाईल.

फोटो स्रोत, Getty Images
दरवर्षी साधारण 1 जूनच्या सुमारास मान्सून केरळमध्ये म्हणजे भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होतो आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत भारतातून माघार घेतो.
भारतात दरवर्षी साधारणपणे सरासरी 87 सेंटीमीटर (870 मिलीमीटर) पाऊस पडतो. त्यातला 70 टक्के पाऊस जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात पडतो.
त्यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.
जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.
मान्सूनआधी उष्णतेच्या लाटा
दरवर्षी उन्हाळ्यात भारताच्या मुख्य भूमीचं तापमान वाढत जातं, त्यातून वाऱ्यांची दिशा बदलते आणि मान्सूनची निर्मिती होते.
पण मान्सून येण्याआधीच्या काळातल्या या उष्णतेच्या लाटांची तीव्रता यंदा जास्त जाणवेल अशीही शक्यता आहे.
यंदा एप्रिल आणि जूनमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या वाढेल, असं भाकीत हवामान विभागानं याआधीच केलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC