Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Social Media
मध्य प्रदेशमधील भिंड शहराची एक गोष्ट खूप प्रसिद्ध आहे. एकदा तिथे भीषण दुष्काळ पडला होता. तिथल्या रामपूर गावातील सगळी उभी पिकं पाण्याअभावी वाळून गेली होती.
अचानक एक दिवस त्या गावात आठ बैलगाड्या आल्या. बैलगाड्यांमधील त्या पोत्यांमध्ये गहू होता. गाडीवानाने तो गहू रामपूरच्या लोकांपर्यंत पोहोचवला आणि ‘मानसिंहच्या वतीने’ असा एक साधा संदेश दिला.
केनेथ अँडरसन आपल्या ‘टेल्स ऑफ मानसिंह, किंग ऑफ इंडियन डॅकॉईट्स’ या पुस्तकात लिहितात, “त्यावेळी भारत सरकारने मानसिंहला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी 15,000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
मानसिंहवर सुमारे 200 खून आणि दरोड्याचे असंख्य आरोप होते. तरीही त्याला पकडता आलं नव्हतं. कारण त्याची माहिती देण्यासाठी कोणीही पुढं येत नव्हतं.”
पोलिसांनी त्या बैलगाडी चालकांची कसून चौकशी केली. त्यांना एवढंच समजलं की, एका व्यक्तीने एक आठवड्यापूर्वी त्याच्याशी संपर्क साधून त्यांना 40 मैल दूर असलेल्या रेल्वे स्टेशनवर जाण्यास सांगितलं होतं, जिथे मालगाडीच्या एक डब्यात रामपूरमध्ये पोहोचवण्यासाठी धान्यानं भरलेली काही पोती ठेवलेली होती.
या कामासाठी त्यांना प्रति बैलगाडी 20 रुपये, याप्रमाणे 160 रुपये देण्यात आले होते.

फोटो स्रोत, Rupa Publications
केनेथ लिहितात, “त्या व्यक्तीने गाडीवानाच्या कानात मानसिंहचे नाव घेतलं होतं आणि असंही सांगितलं होतं की, जर त्यांनी एका आठवड्याच्या आत काम पूर्ण केलं नाही, तर पुढच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ते सूर्याचं दर्शनही घेऊ शकणार नाहीत. त्यामुळं त्यांनी सहाव्या दिवशीच तो माल रामपूरला पोहोचवला होता.”
टाइम मॅगझीननेही घेतली दखल
टाइम मासिकाने 5 सप्टेंबर 1955 च्या अंकात ‘इंडिया : डेड मॅन’ या शीर्षकाखाली लेखात लिहिलं होतं, “दिल्लीच्या दक्षिणेकडील चार राज्यांमध्ये कोणत्याही व्यक्तीला डाकू मानसिंह याच्याइतका सन्मान आणि प्रतिष्ठा मिळाली नव्हती.”
“त्याच्या नातवाच्या लग्नानिमित्त देण्यात आलेल्या मेजवानीला त्या भागातील अनेक राजे आणि जमीनदार उपस्थित होते.”

फोटो स्रोत, Getty Images
1952 मध्ये सरकारनं तयार केलेल्या ‘मुरैना क्राइम इनक्वायरी कमिटी’नंही आपल्या अहवालात मानसिंहमध्ये कोणतेही ‘वैयक्तिक दोष’ नसल्याचं म्हटलं होतं.”
असं असूनही, मध्य भारतातील त्या पोलीस फाईल्सकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नव्हतं, ज्यामध्ये मानसिंहने 27 वर्षांत शेकडो खून आणि हजारो दरोडे टाकल्याची नोंद आहे.
टाईम मॅगझिनने आपल्या लेखात लिहिलं आहे, “मानसिंहबद्दल आदरासोबतच सर्वसामान्यांच्या मनात भीतीही होती, ही एक विचित्र गोष्ट होती. रॉबिन हूडप्रमाणेच मानसिंहही एके काळी सभ्य व्यक्ती होता. पण त्याच्यावर झालेल्या अन्यायानं त्याला बंडखोर बनवलं होतं.”
चार राज्याचे पोलीस होते शोधात
मानसिंहबद्दल असं म्हटलं जातं की, चार राज्यांतील 1700 पोलिसांनी 15 वर्षे 8000 चौरस मैल परिसरात त्याचा पाठलाग केला. पोलिसांशी झालेल्या सुमारे 80 चकमकींमध्ये पोलिसांना अपयशच आलं.
त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्या काळी दीड कोटी रुपये खर्च केले, जी त्यावेळी खूप मोठी रक्कम होती.
मुरैना गुन्हे अन्वेषण समितीनं आपल्या अहवालात लिहिले होतं, “लोक मानसिंहच्या गोष्टी सांगतात की, त्यानं खबरे आणि पोलिसांची हत्या तेव्हाच केली जेव्हा ते त्याच्या मागे लागले.”
“ज्यांच्याकडं भरपूर पैसा होता, अशाच लोकांचं त्यानं अपहरण केलं. त्यानं शाळेच्या इमारतीसाठी पैसे गोळा करण्यासाठी जमीनदारांवर जबदरस्ती केली.”

फोटो स्रोत, Sheikh Mukhta
केनेथ अँडरसन लिहितात, “मानसिंहबद्दल असं म्हटलं जातं की, तो दारू पीत नव्हता आणि पूर्ण शाकाहारी होता. तो अतिशय धार्मिक प्रवृत्तीचा होता. पहाटेच तो नदीमध्ये स्थान करत असत.
अंघोळ झाल्यावर तो कालीच्या मंदिरात जाऊन तिची पूजा करत असे. त्यानं अनेक मंदिरं बांधली होती, ते बांधण्यासाठी आलेला पैसा श्रीमंतांच्या लुटीतला होता.”
मानसिंहनं अनेक मंदिरांमध्ये पितळी घंटा लावल्या होत्या. ज्यावर त्यांचं नाव होतं. बटेश्वरनाथ मंदिरात होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात मानसिंह नेहमीच सहभागी होत असत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी मंदिराला चारही बाजूंनी वेढा घातला. परंतु, तरीही मानसिंह वेशांतर करुन तेथे पोहोचला होता.
फिल्मी डाकूसारखा होता रुबाब
मानसिंहचा जन्म 1890 साली आग्रा जवळच्या राठौर खेडा गावात झाला होता. त्याच्या वडिलांचं नाव बिहारीसिंह होतं आणि ते गावाचे प्रमुख होते. ते एक सधन कुटुंबातून आले होते आणि नवाबसिंह आणि मानसिंह या आपल्या दोन मुलांसोबत राहत होते.
त्याच्या वडिलांनी खूप लहान वयातच मानसिंहचा विवाह एका सुंदर युवतीशी लावून दिला होता. त्याला चार मुलं झाली होती, जसवंतसिंह, सुभेदारसिंह, तहसीलदारसिंह आणि धुमनसिंह. याशिवाय त्याला एक मुलगीही होती, जिचं नाव त्यांनी राणी ठेवलं होतं.

फोटो स्रोत, ANI
जेव्हा मानसिंह फक्त 24 वर्षांचा होता, तेव्हा त्याला त्याच्या गावाचा प्रमुख आणि आग्रा जिल्हा मंडळाचा सदस्य म्हणून निवडलं होतं. त्याच्या उंचपुऱ्या शरीरयष्टीनं, मनमिळावू स्वभावानं आणि तारुण्यापणापासूनच राखलेल्या दाढीमुळे तो प्रसिद्ध झाला होता.
दरोड्याबद्दल खोटी तक्रार
मानसिंहचे वडील बिहारीसिंह यांचा जमिनीबाबत तल्फी राम या व्यक्तीशी काही वाद झाला होता. तोपर्यंत मानसिंहचा मोठा भाऊ नवाबसिंह आपलं कुटुंब सोडून जंगलात राहू लागला होता.
तेव्हा अचानक त्यांच्या गावावर एक दरोडा पडला. दरोडेखोरांनी गावातील सावकाराच्या घरावर हल्ला करून त्याला चाकूनं भोसकलं.
केनेथ अँडरसन लिहितात, “तल्फी रामनं पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली की, मानसिंहचा मोठा भाऊ नवाबसिंहचा या दरोड्यात हात आहे. त्याला त्याच्या वडिलांनी आश्रय दिला आहे. सावकार तल्फी रामचा मित्र असल्यामुळंच त्यानं त्याच्या घरी दरोडा टाकला.”
“नवाबसिंहचा भाऊ, मानसिंहला या दरोड्याची माहिती होती आणि त्यानंही या दरोड्यामध्ये मदत केली होती, असंही त्यानं म्हटलं.”
बिहारीसिंह यांनी ही घटना आपल्या कुटुंबाचा अपमान म्हणून घेतली. ते आणि त्यांचा मुलगा मानसिंहने तल्फी रामला धडा शिकवण्याचं ठरवलं. मानसिंह आपल्या चार मुलांना घेऊन जंगलातील भाऊ नवाबसिंहला जाऊन मिळाले.
मुलगा जसवंतसिंहचा पोलीस चकमकीत मृत्यू
एका रात्री मानसिंहने त्याच्या साथीदारांसह तल्फी रामच्या घरावर हल्ला केला. मानसिंहच्या हल्ल्यात तल्फी राम बचावला. पण त्याचे अनेक साथीदार मारले गेले.
पोलिसांनी या प्रकरणी मानसिंहला अटक केली. परंतु, त्याचा मोठा भाऊ नवाबसिंह, मानसिंहचा सर्वात मोठा मुलगा जसवंत सिंह आणि पुतण्या दर्शनसिंह हे तेथून निसटले.
एकेदिवशी नवाबसिंह हा जसवंत आणि दर्शनबरोबर आपल्या वडिलांच्या घरी थांबला होता. तल्फी रामनं काही लोकांना घेऊन त्यांच्या घरावर हल्ला केला.

फोटो स्रोत, Getty Images
केनेथ अँडरसन लिहितात, “त्याचवेळी तल्फी रामनं अतिशय हुशारीनं पोलिसांची मदत घेतली. पोलीस शस्त्रांसह घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तल्फी राम त्या ठिकाणाहून गायब झाला होता.”
“नवाबसिंह आणि त्याच्या दोन साथीदारांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी त्यांना वेढा घातला आणि त्याचा मुलगा जसवंत आणि पुतण्या दर्शन यांना ठार केलं. त्यांनी नवाबसिंहला अटक केली. त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.”
मानसिंहने बदला घेतला
दुसरीकडे, आधीच 10 वर्षांची शिक्षा भोगत असलेला मानसिंह सुडाच्या आगीत जळत होता. त्याच्या चांगल्या वर्तणुकीमुळं सरकारनं 1938 मध्ये त्याला तुरुंगातून मुक्त करण्याचा निर्णय घेतला.
4 जुलै 1940 रोजीच्या रात्री मानसिंहनं आपल्या वाचलेल्या तीन मुलांसह प्रामाणिक राहिलेल्या रूपाबरोबर तल्फी राम आणि खेमसिंहच्या घरावर हल्ला केला. दोन महिलांना सोडून त्यानं तल्फी रामच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची हत्या केली.

फोटो स्रोत, ANI
तेव्हापासून मानसिंहचं डाकू म्हणून आयुष्य सुरू झालं. 15 वर्षांच्या आत त्याची गणना भारतातील सर्वात मोठ्या डाकूंमध्ये केली जाऊ लागली.
मध्य भारतात त्याला ‘दस्यू सम्राट’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्याच्या टोळीतील सदस्यांमध्ये त्याची तीन जिवंत राहिलेली मुलं सुभेदार सिंह, तहसीलदार सिंह, धुमन सिंह यांच्यासोबतच चरणा, लाखन सिंह, अमृतलाल आणि त्याचा दूरचा नातेवाईक रूपा यांचा समावेश होता.
छोट्या डाकूंनी खंडणी देण्यास केली सुरुवात
स्थानिक लोक मानसिंहबद्दल आदराने बोलायचे. तो गरीब आणि वंचित लोकांना त्रास देत नसे. त्याचे लक्ष्य मुख्यतः जमीनदार, श्रीमंत व्यापारी आणि सावकार असायचे, असं ते सांगत.
जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सरकारने अनेक गुन्हेगार आणि दोषी व्यक्तींना तुरुंगातून मुक्त केलं. याच संदर्भात मानसिंहचा मोठा भाऊ नवाबसिंहचीही तुरुंगातून सुटका करण्यात आली.
तुरुंगातून बाहेर येताच, नवाबसिंह त्याच्या जुन्या गावी गेला, त्याने एक बंदूक उधार घेतली आणि तल्फी रामच्या दोन जिवंत वाचलेल्या नातेवाईकांना गोळ्या घातल्या. यानंतर तो त्याचा भाऊ मानसिंह याला बीहडमध्ये जाऊन भेटला.

फोटो स्रोत, Getty Images
जेव्हा चंबळ परिसरात मानसिंहचं वर्चस्व वाढलं, तेव्हा सरकारनं त्याला पकडण्यासाठी लष्कराचे जवान बोलावले.
परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली की, तेथील छोट्या डाकूंनी मानसिंहला आपला नेता म्हणण्यास सुरुवात केली आणि नियमानुसार त्याला त्यांच्या उत्पन्नातील 10 ते 25 टक्के खंडणी म्हणून देणे सुरू केले.
यामुळे फक्त मानसिंहच्या संपत्तीतच वाढ झाली नाही, तर त्या परिसरात त्याचा प्रभाव आणि दबदबा देखील वाढला.
मदतीसाठी लष्कराला बोलावलं
1951 मध्ये एका पोलीस गुप्तहेराला बातमी मिळाली की, मानसिंहच्या टोळीतील एक महत्त्वाचा सदस्य चरणा आपल्या पत्नीला गावात भेटायला जात आहे. पोलिसांनी चरणाला पकडण्यासाठी सापळा रचला.
याची काहीच माहिती नसलेला चरणा आणि त्याचे काही मित्र गावात दाखल झाले. घरात घुसेपर्यंत पोलिसांनी काहीही केलं नाही. त्यानंतर 60 पोलिसांनी त्या घराला घेराव घातला. घराच्या वरच्या मजल्यावरून दरोडेखोरांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला.
पुढचे 24 तास डाकू आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू होता. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या मदतीसाठी आणखी 400 जवानांना बोलावलं.

फोटो स्रोत, Getty Images
केनेथ अँडरसन लिहितात, “पुढील 3 दिवस, 460 पोलीस कर्मचाऱ्यांनी 15 डाकूंना घेरलं. त्यांच्या मदतीसाठी लष्कराच्या डोगरा रेजिमेंटलाही पाचारण करण्यात आलं. डाकूंच्या घरावर पॉइंट ब्लँक रेंजमधील दोन तोफगोळे डागण्यात आले.”
“संपूर्ण इमारत कोसळली. पोलीस आरडाओरड करत आत शिरले. इमारतीच्या आत 15 मृत डाकूंचे मृतदेह सापडले पण चरणा पळून जाण्यात यशस्वी झाला होता.”
मानसिंहच्या वैयक्तिक समस्या
पण दोन वर्षांनंतर झालेल्या 10 तासांच्या प्रदीर्घ पोलीस चकमकीत चरणा फारसा नशीबवान ठरला नाही. जेव्हा गोळ्या थांबल्या, तेव्हा चरणा आपल्या 9 साथीदारांसह मृत आढळून आला.
चरणा मानसिंहचा सर्वात धाडसी आणि खास साथीदार तर होताच, पण तो त्याचा सर्वात खास रणनीतीकारही होता.
केव्हा आणि कोठे हल्ला करायचा आणि कधी हल्ला करू नये हे त्याला ठाऊक होते. यात चरणाचं प्रभुत्व होतं.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, मानसिंहला वैयक्तिक अडचणीतून जावं लागलं.
केनेथ अँडरसन लिहितात, “मानसिंहनं आपल्या मुलीचं लग्न त्याच्याच टोळीतील लाखनसिंह याच्याशी करून दिलं होतं. परंतु, त्याची मुलगी पतीशी प्रामाणिक नव्हती. ती मानसिंहच्या टोळीतील दुसऱ्या एका डाकूच्या प्रेमात पडली.”
“यामुळं मानसिंह इतका दुखावला गेला की, त्यानं आपल्या मुलीच्या प्रियकरावर गोळ्या झाडल्या. पण त्यानंतर मानसिंहचा जावई लाखनसिंहही टोळीतून निघून गेला.”
“मानसिंहला त्याच्या अखेरच्या दिवसांत आराम, शांतता आणि कुटुंबाची गरज होती. त्यानं सरकारला पत्र लिहून सांगितलं की, तो स्वत:हून डाकू आणि खुनी बनलेला नाही. नशीब आणि परिस्थितीनं त्याला असं व्हायला भाग पाडलं होतं.”
“एक खरा भारतीय या नात्यानं मला गोव्याला परकीय राजवटीतून मुक्त करायचं आहे. तिथल्या पोर्तुगीजांना समुद्रात फेकून द्यायचं आहे,” अशी इच्छा त्यानं व्यक्त केली.
भारत सरकारनं त्याच्या पत्राला कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं मानसिंह निराश झाला, त्याचे साथीदारही हताश झाले.
गोरखा सैनिकांची कंपनी तयार केली
एक-एक करून त्याचे साथीदार पकडले जाऊ लागले, जखमी झाले किंवा मारले गेले. अखेर त्याच्यासोबत फक्त 18 डाकू शिल्लक राहिले. त्यात त्याचा मोठा भाऊ नवाबसिंह, दुसरा मुलगा सुभेदारसिंह आणि रूपा यांचा समावेश होता.
नोव्हेंबर 1954 मध्ये मध्य भारताचे गृहमंत्री नरसिंहराव दीक्षित यांनी म्हटलं की, जर मानसिंहला एका वर्षाच्या आत पकडलं नाही, तर ते त्यांच्या पदाचा राजीनामा देतील.
या मोहिमेला मदत करण्यासाठी त्यांनी गोरखा जवानांची एक विशेष कंपनी तयार केली. मानसिंहने पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी एका गावात त्याच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता असलेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर अफवा पसरवण्यात आली की, एका आजारामुळं मानसिंहचे अचानक निधन झाले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले.
पण काही दिवसांनंतर मानसिंहने पुन्हा दरोडे टाकण्यास सुरुवात केली. पोलीस आणि गोरखा कंपनी हात धुवून त्याच्या मागे लागले.
मानसिंहचा मृत्यू
मानसिंह भिंडला पळाला. तिथे त्याने कुँवारी नदी ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नदीला पूर आलेला होता, त्यामुळे तो नदी ओलांडू शकला नाही. मग तो विजापूर गावात पोहोचला.

फोटो स्रोत, Getty Images
जमादार भंवर सिंहच्या नेतृत्वाखाली एक गोरखा पलटणही त्याच्या मागे लागली होती. दोघांमध्ये चकमक सुरू झाली आणि हजारो गोळ्या झाडल्या गेल्या. पण मानसिंहचा शेवटचा क्षण नजीक आला होता. गोळ्या लागल्यानं आतापर्यंतचा सर्वात मोठा दरोडेखोर जमिनीवर पडला.
शेवटी मानसिंहला आणखी गोळ्या लागू नये म्हणून त्याचा मुलगा सुभेदार सिंहने त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रयत्नात त्यालाही गोळ्या लागल्या आणि त्याचाही तिथे मृत्यू झाला.
मानसिंहचा साथीदार रुपा त्याचा मोठा भाऊ नवाब सिंहला वाचवण्यात यशस्वी झाला.
मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही
गृहमंत्री दीक्षित यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला नाही. त्वरीत याची माहिती पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत आणि काँग्रेस अध्यक्ष यू. एन. ढेबर यांना टेलिग्रामद्वारे देण्यात आली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. संपूर्णानंद यांनी घोषणा केली की, “एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूवर आनंद व्यक्त करणं चांगली गोष्ट नाही, मानसिंह मरण पावला. मानसिंहनं ज्या लोकांना त्रास दिला ते आता सुटकेचा नि:श्वास घेऊ शकतील.”

फोटो स्रोत, OfficialPageBSF/Facebook
मानसिंह आणि त्याच्या मुलाचे मृतदेह खाटांना बांधून भिंड येथे आणण्यात आले. लोकांना त्याला पाहता यावे म्हणून खाटा उभ्या ठेवण्यात आल्या होत्या.
त्यांचे पार्थिव पाहण्यासाठी जवळपास 40 हजार लोक आले होते. काही लोक कुतूहलाने तिथे आले होते. काही लोकांनी त्याच्या निधनावर आनंद व्यक्त केला, तर अनेक जण अश्रू पुसतानाही दिसले.
त्यानंतर मानसिंहचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी ग्वाल्हेरला नेण्यात आले. मानसिंहची विधवा पत्नी आणि मुलगा तहसीलदार सिंह यांनी सरकारला अंतिम संस्कारासाठी मानसिंहचा मृतदेह त्यांच्याकडे सोपवण्याची विनंती केली, पण सरकारने दोघांचंही ऐकलं नाही.
सीमा सुरक्षा दलाचे माजी महासंचालक के. एफ. रुस्तमजी यांनी त्यांच्या ‘द ब्रिटिश, द बँडिट्स अँड द बोर्डरमेन’ या पुस्तकात लिहिलं आहे की, “गुज्जर असूनही मानसिंहने एका ब्राह्मण रूपा आणि एका ठाकूर लाखनला आपल्या टोळीत विशेष स्थान दिलं, हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं.”
“पण जसजसा मानसिंह वृद्ध होत गेला, त्याच्यासोबत 10 वर्षांपासून असलेल्या त्याच्या साथीदारांनी त्याची साथ सोडून आपापल्या टोळ्या तयार करायला सुरुवात केली. मानसिंहचा अंत झाला, पण दरोडेखोरीची समस्या मात्र संपली नाही.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC