Source :- ZEE NEWS

Pakistan Violates Ceasefire: भारत-पाकिस्तानदरम्यान मागील 86 तासांपासून सुरु असलेलं युद्ध शनिवारी 5 वाजता संपलं होतं. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीसाठी सहमती दर्शवल्यानंतर 5 वाजल्यापासून सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्यात आले. मात्र शस्त्रसंधी झाल्यानंतर फक्त 3 तासांतच पाकिस्तानने उल्लंघन केलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा एकदा हल्ले केले जात आहेत. शनिवारी रात्री, पाकिस्तानने अनेक भागात युद्धबंदीचे उल्लंघन केलं आणि जोरदार गोळीबार केला, तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात एका संशयित ड्रोनमुळे स्फोट झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, अखनूर, राजौरी आणि आरएसपुरा आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून तोफांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आले आहेत. याशिवाय बारामुल्ला येथे एका ड्रोनच्या सहाय्याने हल्ला झाला. पाकिस्तानच्या जम्मू येथील पलनवाला सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे भारतीय सैन्यांना सडेतोड उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारने बीएसएफला पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाला उत्तर देण्यास सांगितलं आहे. या सर्व घडामोडींनंतर जम्मूच्या अनेक भागात ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. बारमुल्ला येथेही ब्लॅकआऊट केला आहे. श्रीनमगरमधील अनेक भागात वीज गायब झाली आहे. 

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत शस्त्रसंधीचं नेमकं काय झालं? श्रीनगरमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू येत आहेत असं सांगितलं. यानंतर व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे की, “ही काही शस्त्रसंधी नाही. श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या हवाई संरक्षण तुकड्या नुकत्याच सुरु झाल्या आहेत.”.

याशिवाय राजस्थानच्या पोखरण येथेही मोठ्या संख्येने ड्रोन दिसले आहेत. तसंच राजौरीतही गोळीबार केला जात आहे. 

भारत-पाकिस्तानात झाली होती शस्त्रसंधी

भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत दोन्ही देशांनी थेट चर्चा केली होती. पाकिस्तानच्या डीजीएमओने आज दुपारी फोन केला आणि त्यानंतर चर्चा झाली. या चर्चेअंती सामंजस्य करार झाला. इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मिस्त्री यांनी दिली होती

पाकिस्तानच्या डीजीएमओने दुपारी 3.30 वाजता चर्चेसाठी पुढाकार घेतल्यानंतर भारताच्या डीजीएमओशी बोलणं झालं. या चर्चेत दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारचे हल्ले रोखण्यावर सहमती झाली होती. 

SOURCE : ZEE NEWS