Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Meenakshi Raghavan
मीनाक्षी राघवन या फक्त 82 वर्षांच्या आहेत. ‘फक्त 82 वर्षांच्या’ असं म्हणण्याला विशेष कारण आहे.
वयाच्या या टप्प्यावर अनेकजण थकून जातात. मात्र, मीनाक्षी राघवन तंदुरुस्त तर आहेतच, सोबत जे काम त्या करतायेत, त्यातून निवृत्तीचा साधा विचारही त्यांना अद्याप शिवला नाहीय.
कलारीपयाट्टू या प्राचीन भारतीय मार्शल आर्ट्समध्ये त्या तरबेज आहेत.
“मी कदाचित माझ्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कलारीचा सराव करेन,” असं मीनाक्षी राघवन म्हणतात.
कलारीपयाट्टूमधील कलारी म्हणजे युद्धभूमी आणि पयाट्टू म्हणजे लढाई.
या कलेचा जन्म केरळमध्ये किमान 3,000 वर्षांपूर्वी झाल्याचं मानलं जातं. याला भारतातील सर्वात जुनी मार्शल आर्ट मानलं जातं.
कलारीपयाट्टूचा वापर फक्त लढाईसाठीचं केला जात नाही, तर शिस्त बाणवण्यासाठी, शक्ती निर्माण करण्यासाठी आणि स्व-संरक्षणाची कौशल्यं विकसित करण्यासाठीदेखील केला जातो.
मीनाक्षी राघवन केरळमधील वडाकारा इथं राहतात. तिथं त्यांना ‘मीनाक्षी अम्मा’ या नावानं ओळखलं जातं. मल्याळम भाषेत अम्माचा अर्थ आई असा होतो.
हे शहर उन्नियारचा, अरोमल चेकावर आणि थचोली ओथेननसारख्या प्रसिद्ध कलांचंदेखील घर आहे.
मीनाक्षी अम्मा कधीकधी इतर शहरातदेखील कलारीपयाट्टू सादर करतात. मात्र प्रामुख्यानं त्या त्यांची स्वत:ची कलारी शाळाच चालवतात. या शाळेची स्थापना त्यांच्या पतीनं 1950 मध्ये केली होती. त्यांचा दिवस अतिशय व्यग्र असतो. कारण पहाटे पाच वाजल्यापासून ते दुपारपर्यंत त्यांचे वर्ग चालतात.
“मी दररोज जवळपास 50 विद्यार्थ्यांना शिकवते. माझ्या चार मुलांना, मी आणि माझ्या पतीनं कलारीपयाट्टूचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शिकण्यास सुरुवात केली होती,” असं मीनाक्षी अम्मा सांगतात.
कलारीपयाट्टूचे टप्पे
कलारीपयाट्टूचे चार टप्पे असतात. ही कला शिकण्यासाठी संयमाची आवश्यकता असते.
कलारीपयाट्टूच्या प्रशिक्षणाची सुरुवात मेयपट्टूनं होतं. यात शरीराची तेलानं मालिश करून नंतर व्यायामानं शरीर तयार केलं जातं.
जवळपास दोन वर्षानंतर विद्यार्थी कोलथारी (काठीची लढाई), नंतर अंगथारी (शस्त्राची लढाई) आणि शेवटी वेरुमकाई या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रगती करतात. यात नि:शस्त्र लढाईचाही समावेश असतो.
कलारीपयाट्टूमध्ये तरबेज होण्यासाठी साधारणपणे पाच वर्षांचा कालावधी लागतो.

फोटो स्रोत, Meenakshi Raghavan
विनोद कडांगल कलारीपयाट्टूचे आणखी एक शिक्षक आहेत. त्यांच्या मते, कुंग फूनं श्वासोच्छवासाची तंत्र आणि मर्मशास्त्र (ऊर्जा प्रवाह अनुकूल करण्यासाठी शरीरातील महत्त्वाच्या बिंदूंना उत्तेजित करणं) सारखी तत्वं कलारीपयाट्टूमधून घेतलेली आहेत असं मानलं जातं.
अशी आख्यायिका आहे की, साधारण 6 व्या शतकाच्या सुमारास भारतातील बौद्ध भिक्खू बोधिधर्म यांनी शाओलिन भिक्खूंना ही तंत्र शिकवली. त्याचा प्रभाव प्रसिद्ध चिनी मार्शल आर्ट्सवर देखील पडला.
75 वर्षांपूर्वी मीनाक्षी अम्मांची सुरुवात
मीनाक्षी अम्मा यांनी 75 वर्षांपूर्वी कलारीमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. ती गोष्ट त्यांना अजूनही आठवते. कलारी म्हणजे लाल मातीचा आखाडा जिथे या कलेचा सराव केला जातो.
“मी सात वर्षांची होते आणि चांगलं नृत्य करायचे. त्यामुळे माझे गुरु, व्ही. पी. राघवन यांनी माझ्या वडिलांना सूचवलं की, मी कलारीपयाट्टू शिकलं पाहिजे. नृत्याप्रमाणेच कलारीपयाट्टूमध्ये देखील तुम्ही लवचिक असण्याची आवश्यकता असते,” असं मीनाक्षी अम्मा म्हणतात.
त्या केरळच्या थिया समुदायातील आहेत. मीनाक्षी अम्मा यांचे गुरु 15 वर्षांचे असताना त्यांनी आणि त्यांच्या भावांना ते खालच्या जातीतील असल्यामुळे कलारी शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे त्यांची स्वत:ची कलारीपयाट्टू शाळा सुरू केली होती.
“कलारी शाळेत मुलींच्या बाबतीत कोणताही फरक केला जात नव्हता. किंबहुना त्यावेळेस केरळमधील सर्व शाळांमध्ये शारीरिक शिक्षण सक्तीचं होतं. मात्र आम्ही तारुण्यात आल्यावर ते थांबाव असं अपेक्षित होतं,” असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Meenakshi Raghavan
इतरांप्रमाणे न करता, मीनाक्षी अम्मा यांच्या वडिलांनी त्यांना किशोरावस्थेतदेखील कलारीचं प्रशिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिलं. वयाच्या 17 व्या वर्षी त्या राघवन यांच्या प्रेमात पडल्या आणि लवकरच त्यांनी लग्न केलं. त्या दोघांनी एकत्रितपणे शेकडो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं, अनेकदा मोफतच.
“त्यावेळेस अनेक मुलं गरीब कुटुंबातील असायची. राघवन यांनी फक्त दक्षिणा किंवा शिक्षकांना मानधन म्हणून दिले जाणारे पैसेच स्वीकारले,” असं मीनाक्षी अम्मा म्हणतात.
देणग्यांमुळे शाळा सुरू राहिली. नंतर राघवन अतिरिक्त उत्पन्नासाठी शिक्षकाची नोकरी करू लागले. 2007 मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर मीनाक्षी अम्मा यांनी औपचारिकपणे शाळेची जबाबदारी घेतली.
भविष्यात मोठा मुलगा घेणार जबाबदारी
सध्यातरी त्यांची निवृत्त होण्याची कोणतीही योजना नाही. मात्र, त्यांना आशा आहे की, एक दिवस त्या त्यांचा थोरला मुलगा, संजीवकडे या शाळेची जबाबदारी देतील.
संजीव 62 वर्षांचे आहेत. तेदेखील शाळेत प्रशिक्षक आहेत. ते म्हणतात की, ते नशीबवान आहेत की त्यांनी कलारीचं प्रशिक्षण सर्वोत्तम शिक्षकाकडून म्हणजे त्यांच्या आईकडून घेतलं आहे.
मात्र, मीनाक्षी अम्मा यांचा मुलगा असल्याचा त्यांना कोणताही फायदा होत नाही. ते म्हणतात की, अजूनही त्यांच्या आई याच त्यांच्या सर्वात मोठ्या स्पर्धक आहेत.
मीनाक्षी अम्मा या स्थानिक पातळीवर एक सेलिब्रिटी आहेत. आमची मुलाखत सुरू असताना तीन राजकारणी त्यांना पुरस्कार समारंभासाठी आमंत्रण देण्यासाठी आले होते.
“अम्मा तुम्ही तुमच्या उपस्थितीनं आम्हाला आशिर्वाद द्यावा,” अशी विनंती त्यातील एकानं हात जोडून केली.
“मला आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद, मी समारंभाराला उपस्थित राहीन,” असं उत्तर मीनाक्षी अम्मांनी दिलं.
त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्याबद्दल “प्रचंड आदर” आहे. अनेकांनी राज्यभरात स्वत:च्या कलारी शाळा सुरू केल्या आहेत. मीनाक्षी अम्मांसाठी ती प्रचंड अभिमानाची बाब आहे.
“सर्व महिलांसाठी त्या प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवणाऱ्या त्या एक दुर्मिळ व्यक्ती आहेत. मात्र त्याचबरोबर कलारीच्या बाबतीत त्या कडक शिस्तीचं पालन करतात,” असं मीनाक्षी अम्मांचे माजी विद्यार्थी के एफ थॉमस म्हणतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC