Source :- BBC INDIA NEWS
अपडेटेड 9 मिनिटांपूर्वी
इस्रायलच्या मंत्रिमंडळाने गाझामध्ये युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी हमाससोबतच्या कराराला मान्यता दिली. हा करार रविवारपासून (19 जानेवारी) लागू होणार आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने आणि हमासने काही तासांपूर्वीच कराराचा मसुदा अंतिम झाला आहे, असे सांगितले.
पहिल्यांदा बुधवारी (15 जानेवारी) अमेरिका आणि कतारने या कराराची घोषणा केली होती.
यानंतर गुरुवारी (16 जानेवारी) इस्रायलचे मंत्रिमंडळ या कराराला मंजुरी देणार होते, परंतु इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळाचे मतदान पुढे ढकलले. तसेच हमासने करार बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
शुक्रवारी (17 जानेवारी) पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने दोहा येथील इस्रायलच्या समितीने कराराला अंतिम स्वरूप दिल्याची घोषणा केली.
हमासने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, कराराच्या अटींबाबत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर सोडवण्यात आल्या आहेत.
या कराराचे तीन टप्पे
या कराराची माहिती देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या कराराचे तीन टप्पे असल्याचं नमूद केलं. ते म्हणाले होते की, पहिला टप्पा सहा आठवड्यांसाठी असेल आणि त्यात ‘पूर्ण युद्धबंदी’ असेल.
दुसऱ्या टप्प्याचा उद्देश हे ‘युद्ध कायमचं थांबवणं’ हा असेल.
तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात गाझाच्या पुनर्बांधणीवर भर देण्यात येईल, असं बायडन यांनी सांगितलं होतं.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 1200 लोकांचा मृत्यू झाला आणि 251 लोकांना हमासने ओलीस ठेवले.
यानंतर इस्रायलने हमासच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले.
हमास संचालित आरोग्य मंत्रालयाच्या मते, इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 46,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
दरम्यान, इस्रायलने दिलेल्या माहितीनुसार, 251 ओलिसांपैकी 94 अजूनही हमासकडे आहेत आणि त्यापैकी 34 जणांचा मृत्यू झाला आहे.
या संघर्षादरम्यान, 23 लाख नागरिक विस्थापित झाले आहेत. गाझामध्ये भयंकर विनाश पाहायला मिळाला. इथल्या संघर्षामुळं अन्न, इंधन, औषध आणि निवारा यांची तीव्र टंचाई निर्माण झाली.
अमेरिकेकडून स्वागत
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी एका निवेदनात म्हटलंय, अमेरिकेच्या अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर इजिप्त आणि कतारच्या सहकार्यानं इस्रायल आणि हमास या करारापर्यंत पोहचले आहेत.
“आम्ही या बातमीचे स्वागत करत असताना त्या सर्व कुटुंबांची आठवण करतो ज्यांचे नातेवाईक हमासच्या 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात मारले गेले आणि त्यानंतर झालेल्या युद्धात अनेक निष्पाप लोक मारले गेले,” असं निवेदनात म्हटलं आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयानंही एक निवेदन जारी केलं आहे. यात ओलिसांच्या सुटकेसाठी आणि इस्रायलला ओलिसांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे दुःख दूर करण्यासाठी मदत केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
या कराराचा तपशील अंतिम झाल्यानंतर बेंजामिन नेतन्याहू अधिकृतपणे त्याची घोषणा करतील, असं इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे.
नेतान्याहू यांनी आधी फोन कॉल करत अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मावळते अध्यक्ष जो बायडन यांना करार करण्यात मदत केल्याबद्दल आभार मानले.
‘शांतता हे सर्वोत्तम औषध आहे’
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसुस यांनी एक्सवर युद्धविराम कराराविषयी आनंद व्यक्त केला. तसेच शांतता हे सर्वोत्तम औषध असल्याचं नमूद केलं.
ते म्हणाले, “गाझा युद्धविराम आणि बंधकांच्या सुटकेचा करार स्वागतार्ह आणि उत्साहवर्धक आहे. खूप जीव गमावले आहेत आणि अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागला आहे. आम्हाला आशा आहे की, सर्व पक्ष या कराराचा आदर करतील आणि चिरस्थायी शांततेसाठी कार्य करतील.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC