Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, NCERT
एनसीईआरटीची (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग) सातव्या इयत्तेसाठी समाजशास्त्र (सोशल सायन्स) विषयासाठी नवीन पाठ्यपुस्तकं आली आहेत. त्या पुस्तकांमध्ये मुघल आणि दिल्ली सल्तनतचा कोणताही उल्लेख नाही.
आतापर्यंत याच पाठ्यपुस्तकात मुगल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतवर थोडक्यात धडे होते.
मात्र 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी समाजशास्त्र विषयाचं जे नवीन पुस्तक आलं आहे, त्यातून हे धडे पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत.
एनसीईआरटीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा किंवा नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क (एनसीएफ) अंतर्गत नवीन पाठ्यपुस्तकं तयार केली आहेत. इतर इयत्तांसाठीची पाठ्यपुस्तकं अद्याप आलेली नाहीत.
पाठ्यपुस्तकांमधून वगळला मुघल आणि सुलतानांचा इतिहास
सातव्या इयत्तेच्या समाजशास्त्रसाठीच्या नव्या पाठ्यपुस्तकात 5 थीमवर 12 धडे आहेत.
यातील पहिली थीम आहे – ‘इंडिया अँड द वर्ल्ड: लँड अँड द पीपल’ म्हणजे भारत आणि जग: भूमी आणि लोक. यात तीन धडे आहेत. भारताचं भौगोलिक वैविध्य, भारताचं हवामान आणि पर्यावरणाचं आकलन.
दुसरी थीम आहे, ‘भूतकाळाचे टप्पे’. या भागात इतिहासाची माहिती देण्यात आली आहे.
यातील धडे असे आहेत, नवीन सुरुवात: नगर आणि राज्य, साम्राज्यांचा उदय, पुनर्रचनेचा काळ, गुप्त काळ: अथक सर्जनशीलतेचा काळ
समाजशास्त्राच्या या पाठ्यपुस्तकातील पुढील धडे आहेत, ‘आपला सांस्कृतिक वारसा आणि ज्ञानाच्या परंपरा’, ‘शासन आणि लोकशाही’ आणि ‘आपल्या चारी बाजूंचं आर्थिक ज्ञान’.
एनसीईआरटीच्या या पाठ्यपुस्तकातून मुघल आणि दिल्ली सल्तनतचे धडे काढून टाकण्यात आले आहेत. तर त्याचबरोबर त्यात दक्षिण भारतातील राजांचा समावेश करण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त या पाठ्यपुस्तकात मौर्य साम्राज्याच्या स्थापनेची माहिती देण्यात आली आहे. यात चंद्रगुप्त मौर्य आणि सम्राट अशोक यांच्या उदयाचा उल्लेख आहे. तसंच या कालखंडातील जीवनशैलीची माहितीदेखील देण्यात आली आहे.
पुस्तकातील पुढील धडा ‘पुनर्रचनेचा काळ’ असा आहे. यात शुंग, सातवाहन, येदि, चोल, चेर, पांड्य आणि कुषाण राजवटींचा उल्लेख आहे. या पाठ्यपुस्तकात एक धडा गुप्त राजवटीवरदेखील आहे.
पुस्तकातील तिसरी थीम आहे – आपला सांस्कृतिक वारसा आणि ज्ञानाच्या परंपरा. यात एक धडा आहे, भूमी पवित्र कशी झाली.
पुस्तकाच्या या धड्यात धार्मिक स्थळं, तीर्थयात्रा आणि पवित्र स्थळांच्या महत्त्वाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या धड्यातील एक भाग कुंभमेळ्यावर आहे. या धड्यात म्हटलं आहे की, यावर्षी म्हणजे 2025 मध्ये कुंभमेळ्यात 66 कोटी लोक आले होते.
याआधीच्या शैक्षणिक वर्षात एनसीईआरटीच्या सातव्या इयत्तेच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात दिल्लीच्या राजवटींवर एक सविस्तर धडा होता.
यात खिलजी आणि तुघलक वंशांच्या राजवटी, राज्यव्यवस्थांचा उल्लेख होता. मुघलांच्या राज्यकारभारावर देखील एक धडा होता.
मुघलांवरील या धड्यात मुघलांच्या वंशाचा इतिहास आणि मुघलांच्या लष्करी मोहिमांची सविस्तर माहिती देण्यात आली होती.
अर्थात हे धडे या पाठ्यपुस्तकाच्या दुसऱ्या भागात होते. आतापर्यंत समाजशास्त्राच्या या पाठ्यपुस्तकाचा फक्त पहिलाच भाग किंवा खंड प्रकाशित झाला आहे. एनसीईआरटीनं म्हटलं आहे की इतर कालखंडांवरील भाग येणार आहे.
पाठ्यपुस्तकातील बदलांबद्दल सरकार काय म्हणालं?
काही वृत्तांमध्ये अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दावा करण्यात आला आहे की, या पाठ्यपुस्तकाचा दुसरा भाग पुढील काही महिन्यात येणार आहे.
मात्र एनसीईआरटीकडून हे सांगण्यात आलेलं नाही की पाठ्यपुस्काचा जो दुसरा भाग येणार आहे, त्यात मुघल आणि दिल्लीच्या सुलतनांवरील धड्याचा समावेश असेल की नाही.
संजय आचार्य उत्कल विद्यापीठातील माजी प्राध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, “अजून सर्व पाठ्यपुस्तकं आलेली नाहीत. जेव्हा सर्व पाठ्यपुस्तकं प्रकाशित होतील, तेव्हाच धडे काढून टाकण्यात आले आहेत की नाहीत यावर चर्चा केली जाऊ शकते.”
तर केंद्र सरकारचे शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजूमदार यांना एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात करण्यात आलेले बदल आणि मुघल कालखंडावरील धडे काढून टाकण्याबद्दल विचारण्यात आलं.
त्यावर ते म्हणाले की, पाठ्यपुस्तकातून मुघल कालखंड काढून टाकण्यात आलेला नाही, फक्त ज्या माहितीची पुनरावृत्ती झाली होती, तीच काढून टाकण्यात आली आहे.

फोटो स्रोत, ANI
एनडीटीव्हीनुसार, सुकांत मजूमदार म्हणाले, “धडे काढून टाकण्यात आलेले नाहीत. फक्त माहितीची पुनरावृत्ती काढून टाकण्यात आली आहे. पुनरावृत्ती व्हायला नको. मुघल कालंखड भारतीय इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र जे इतर कालखंड आहेत त्यांनादेखील तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे.”
“मुघल कालखंड हा भारतीय इतिहासातील सर्वात वाईट कालखंड मानला जातो. त्याबद्दल शिकवलं गेलं पाहिजे, मात्र बिगर महत्त्वाच्या माहितीची पुनरावृत्ती होता कामा नये. संतुलित दृष्टीकोनातून इतर राजवंश आणि साम्राज्यांच्या इतिहासाला देखील महत्त्व दिलं गेलं पाहिजे”, असं मत सुकांत मजूमदार यांनी व्यक्त केलं.
इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मुघल राजवटीला अधिक जागा दिली जाते आणि इतर साम्राज्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, असा प्रश्न भारतात उपस्थित केला जात राहिला आहे.
चित्रपट अभिनेते आर माधवननं उपस्थित केले प्रश्न

चित्रपट अभिनेता आर माधवन यानं अलीकडेच पाठ्यपुस्तकाबद्दल एक वक्तव्यं केलं आहे.
त्यात त्यानं म्हटलं आहे की, तो शाळेत इतिहासाची जी पुस्तकं शिकला, त्यात दक्षिण भारताच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. दक्षिण भारताच्या इतिहासाला अधिक जागा देण्यावर त्यानं भर दिला.
एका मुलाखतीत आर माधवन म्हणाला, “असं बोलल्यामुळे मला त्रास होऊ शकतो. मात्र तरीदेखील मी म्हणेन. मी जेव्हा शाळेत इतिहास शिकत होतो, तेव्हा मुघलांवर आठ धडे होते. दोन धडे हडप्पावर होते आणि दोन धडे मोहेंजोदडो संस्कृतीवर होते.”
“ब्रिटिश राजवट आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर चार धडे होते. मात्र चोल वंश, पंड्या, पल्लवा आणि चेरा या दक्षिण भारतातील साम्राज्यांवर फक्त एकच धडा होता.”
आर माधवन म्हणाला की चोल राजवंश 2400 वर्षे जुना आहे. तर मुघल आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांनी एकूण 800 वर्षे राज्य केलं होतं.
आर माधवननं इतिहासच्या पाठ्यपुस्तकांमध्ये दक्षिण भारतातील इतिहासाला कमी जागा देण्यात येत असल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात एनसीईआरटीच्या जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये मुघल आणि दिल्ली सल्तनतवर एक-दोन धडे होते. हडप्पा संस्कृतीवर एक धडा होता. तर ब्रिटिश राजवटीवर अनेक धडे होते.
जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये दक्षिण भारतातील राजवंशांना कमी जागा देण्यात आली होती.
इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांवर प्रश्न उपस्थित करत आर माधवन म्हणाला की, “चोल वंशाच्या राजवटीत स्पाइस रूट (मसाल्यांचा व्यापारी मार्ग) रोमपर्यंत जायचा. ते सागरी वाहतुकीचे प्रणेते होते.”
“मात्र आमच्या इतिहासात याचा उल्लेख कुठे आहे? अंकोरवाटपर्यंत आपल्या मंदिरांची निर्मिती होती, त्याचा आणि आमच्या शक्तीशाली नौदलाचा उल्लेख कुठे आहे?”
अर्थात अलीकडच्या वर्षांमध्ये भारतातील शालेय पाठ्यपुस्तकांमधून मुघल कालखंड हटवण्यात येतो आहे. आता सातव्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात बदल करण्यात आले आहेत. त्यात दक्षिण भारतातील राजवंशांचा समावेश करण्यात आला आहे.

याआधी 2023 मध्ये एनसीईआरटीनं बारावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधून मुघलांशी संबंधित धडे काढून टाकले होते.
‘थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री’ (भारतीय इतिहासातील काही विषय) या शीर्षकानं हे पुस्तक होतं. ते तीन भागांमध्ये प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाच्या दुसऱ्या भागातील, राजा आणि इतिहास, मुघल दरबार हा 9 वा धडा आता पुस्तकातून काढून टाकण्यात आला आहे.
त्यावेळेस मुघल कालखंड पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यावरून प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्यावर एनसीईआरटीनं युक्तिवाद केला होता की विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार कमी करण्यासाठी असं करण्यात आलं आहे.
पाठ्यपुस्तकांमध्ये बदल होत आले आहेत. 1998 मध्ये केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आलं होतं. त्यावेळेस देखील नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2000 अंतर्गत पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आले होते.
2002-2003 या शैक्षणिक वर्षासाठी 7वी आणि 8वी च्या पाठ्यपुस्तकांमधून मुघल साम्राज्याची माहिती कमी करण्यात आली होती.
मध्ययुगातील भारताबद्दलच्या धड्यांमध्ये बदल करण्यात आला होता. पाठ्यपुस्तकात हिंदू राजांचा समावेश करण्यात आला होता.
त्यावेळेस 11 वी आणि 12 वी च्या पाठ्यपुस्तकांमधून मुघलांवरील धडे काढण्यात आले नव्हते. मात्र त्यांचा सूर किंवा मांडणी बदलण्यात आली होती.
उदाहरणार्थ, मुघल बादशाह औरंगजेबला मंदिरांवर हल्ले करणारा राज्यकर्ता म्हणून दाखवण्यात आलं होतं. अर्थात पाठ्यपुस्तकात औरंगजेबाच्या प्रशासकीय व्यवस्थेचा देखील उल्लेख करण्यात आला होता.
सरकार पाठ्यपुस्तकात करत असलेल्या बदलांवर, 2021 मध्ये इतिहासकार रोमिला थापर आणि इरफान हबीब म्हणाले होते की भारतीय इतिहासाची मोडतोड करण्याचा हा प्रयत्न आहे.
टीकाकार यासंदर्भात म्हणत आले आहेत की मुघल राज्यकर्त्यांची माहिती पाठ्यपुस्तकातून काढून टाकणं म्हणजे, भारताच्या इतिहासातील ज्या कालखंडानं भारतीय कला, संस्कृती आणि जीवनशैलीवर महत्त्वाचा प्रभाव टाकला, असा महत्त्वाचा भाग काढून टाकण्यासारखं आहे.
आता पुन्हा एकदा पाठ्यपुस्तकातून मुघलांची माहिती काढून टाकल्यामुळे ‘अभ्यासक्रमाच्या भगवेकरणाबद्दलची चर्चा’ सुरू होऊ शकते.

फोटो स्रोत, NCERT
इतिहासकार प्राध्यापक मृदुला मुखर्जी म्हणतात, “सातव्या इयत्तेच्या पाठ्यपुस्तकात जो बदल करण्यात आला आहे तो अंतिम असेल आणि जर मुघल, सुलतानांची माहिती पाठ्यपुस्तकातून काढण्यात आली असेल, तर ते चुकीचं आहे. कारण इतिहासाचा एक भाग असाच काढून टाकला जाऊ शकत नाही.”
प्राध्यापक मृदुला म्हणतात, “जर या पुस्तकाचा दुसरा भाग किंवा खंड आला आणि त्यात मुघल, सुलतानांची माहिती समाविष्ट करण्यात आली तर हे देखील पाहावं लागेल की त्यांना किती जागा देण्यात आली आहे. मध्ययुग हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याला इतिहासातून असंच पुसून टाकता येणार नाही.”
“मला वाटतं की इतिहासातील कालखंड म्हणजे तो प्राचीन इतिहास असो की मध्ययुग असो, त्याला पुस्तकात पुरेशी जागा देण्यात आली पाहिजे. इतिहासाची जुनं पुस्तकं खूपच सक्षम इतिहासकारांनी लिहिली होती. त्यात सर्व धर्म, साम्राज्यं आणि राजवंशांना स्थान देण्यात आलं होतं.”
इतिहासातील एक भाग काढून टाकण्यात आल्याच्या प्रश्वावर मृदुला म्हणतात, “आम्ही फक्त अंशत: किंवा अपुरा इतिहास मुलांना शिकवणार आहोत का? विद्यार्थी फक्त इतिहासातील विशिष्ट भागच शिकतील का? इतिहास, इतिहास असतो आणि त्याच्याशी याप्रकारे छेडछाड केली जाऊ शकत नाही.”
तर एनसीईआरटीचे माजी संचालक प्राध्यापक जे एस राजपूत म्हणतात की, पुस्तकांमधून मुघलांचा इतिहास वगळण्यात येतो आहे, हा आरोप चुकीचा आहे.
प्राध्यापक राजपूत म्हणतात, “ही टीका अज्ञानातून केली जाते आहे. नवीन सत्य समोर येईल तेव्हा पुस्तकांमध्ये बदल तर केलाच जाईल. हे चुकीचं आहे की मुघलांचा इतिहास काढून टाकण्यात येतो आहे.”
“मुघलांना इतिहासातून काढून टाकलं जाऊ शकत नाही, इच्छा असूनही असं केलं जाऊ शकत नाही.”
प्राध्यापक राजपूत म्हणतात, “आता ज्याप्रकारचे आरोप केले जात आहेत, तशाच आरोपांना मी माझ्या कार्यकाळात देखील तोंड दिलं आहे. हे पाठ्यपुस्तक तीन भाग किंवा खंडात येणार आहे. जेव्हा पुस्तकाचे सर्व भाग प्रकाशित होतील तेव्हाच टीका करण्यात यावी.”

मुघलांचा इतिहास काढून टाकला जाण्याच्या प्रश्नावर, प्राध्यापक राजपूत म्हणतात, “मुघलांना इतिहासात ज्याप्रकारे दाखवण्यात आलं पाहिजे, त्याच प्रकारे दाखवलं जाईल. हे सर्वांनाच माहित आहे की एनसीईआरटीनं तीस-पस्तीस वर्षे एका विचारधारेनं प्रभावित होत काम केलं आहे.”
“आता जेव्हा अभ्यासक्रमात दुरुस्ती केली जात आहे, तेव्हा हे आरोप करण्यात येत आहेत. ज्या लोकांचा इतिहास काढून टाकण्यात आला होता, त्यांचा समावेश करण्यात येतो आहे. ईशान्य आणि दक्षिण भारताच्या इतिहासाचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला नव्हता. तो आता करण्यात येतो आहे.”
प्राध्यापक राजपूत पुढे म्हणतात, “एनसीईआरटी हा काही राजकीय पक्ष नाही. ती एक राष्ट्रीय संस्था आहे आणि राष्ट्रहिताचं काम करते आहे. पुस्तकात जे बदल आवश्यक असतील ते केले जातील.”
धर्मेंद्र प्रधान काय म्हणाले होते?

फोटो स्रोत, Getty Images
विरोधी पक्ष आणि टीकाकारांनी याआधी देखील नरेंद्र मोदी सरकारवर पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप केला आहे. सरकारनं मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान एका जुन्या वक्तव्यात म्हणाले होते की इतिहासाच्या पुस्तकांमधून काही काढून टाकण्याची कोणतीही योजना नाही. ते म्हणाले होते की भारतीय इतिहासाच्या अभ्यासाला फक्त मुघल आक्रमकांच्या विजयी मोहिमांपर्यंतच मर्यादित ठेवलं जाऊ शकत नाही.
भारतात हिंदुत्ववादी संघटना, इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हिंदू राजांना पुरेसं स्थान न दिलं गेल्याबद्दल प्रश्न उपस्थित करत आल्या आहेत.
अलीकडेच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर ‘छावा’ हा चित्रपट आला होता.
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी मुघल बादशाह औरंगजेब याची कबर हटवण्याची मागणी केली होती.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अलीकडेच एक वक्तव्यं दिलं होतं.
त्यात ते म्हणाले होते की, “आमच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये औरंगजेबासारख्या क्रूर आणि निर्दयी राज्यकर्त्याचा देखील गौरव करण्यात आला आहे. या विकृत इतिहासामुळेच काहीजण औरंगजेबाला देखील नायक म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतात.”
SOURCE : BBC