Source :- BBC INDIA NEWS

'राडा' झाल्यावर प्राडाची माघार, 85,000 रुपयांना मिळणार कोल्हापुरी पायताण

फोटो स्रोत, Getty Images

10 मिनिटांपूर्वी

ग्लोबल ब्रँड प्राडनं कोल्हापुरी चपलांसारखी फुटवेअरची नवी रेंज आणण्याची घोषणा केली आहे.

कोल्हापुरी चपलांचं डिझाइन चोरल्याचा आरोप झाल्यावर प्राडावर चहूबाजूंनी टीका झाली होती. आता काही महिन्यांचा काळ गेल्यावर प्राडानं ही घोषणा केली आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, प्राडा हा इटालियन ब्रँड महाराष्ट्र आणि कर्नाटकात चपलांचे 2000 जोड बनवेल. त्यासाठी दोन सरकारमान्य संस्थांबरोबर त्यांनी करार केला आहे.

प्राडाचे कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हेड लॉरेंजो बर्टेली म्हणाले, “आम्ही याच्या मूळ निर्मात्यांनी तयार केलेली गुणवत्ता आणि आमच्या उत्पादन तंत्राचा मेळ घालू.”

या चपलेचा जोड 939 डॉलर एवढ्या किमतीचा असेल असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार त्याची किंमत 85,000 रुपये असेल.

करार काय सांगतो?

जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झालेला आहे.

मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली – भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

चपलांच्या कलेक्शनच्या माध्यमातून भारतीय कारागिरीचा ‘प्राडा मेड इन इंडिया- इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स’ प्रकल्पाचा आराखडा, अंमलबजावणी आणि त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे या करारात नमूद करण्यात आली आहेत.

'राडा' झाल्यावर प्राडाची माघार, 85,000 रुपयांना मिळणार कोल्हापुरी पायताण

फोटो स्रोत, Getty Images

या चपला फेब्रुवारी 2026 मध्ये प्राडाच्या 40 विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पारंपरिक कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कुशल कारागिरांच्या साहाय्याने या चपला भारतात बनवल्या जातील.

पारंपरिक कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातील चार जिल्हे (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर) आणि कर्नाटकातील चार जिल्हे (बेळगाव, बागलकोट, धारवाड, बिजापूर). या आठ जिल्ह्यांमध्ये बनवल्या जातात.

2019 मध्ये कोल्हापुरी चपलांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅग देण्यात आल्याने त्यांची अस्सलता जपली गेली आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.

जून महिन्यात काय झालं होतं?

23 जून 2025 इटलीत मिलान फॅशन वीक या फॅशन जगतातल्या महत्त्वाच्या सोहळ्यात प्राडा या इटालियन फॅशन हाऊसनं त्यांचं ‘मेन्स स्प्रिंग समर 2026 कलेक्शन’ सादर केलं होतं.

त्यात एका मॉडेलनं घातलेल्या चपला आपल्या कोल्हापूरी चपलांसारख्या दिसतायत, असं काही भारतीयांनी सोशल मीडियावर नमूद केलं.

काहींनी कोल्हापुरी चप्पल आता ग्लोबल झाली अशी प्रतिक्रिया दिली. पण बहुतेकांना या शोमधनं कोल्हापूरचा आणि अगदी भारताचाही उल्लेखच टाळणं खटकलं.

कोल्हापुरी किंवा भारतीय चपला न म्हणता काही पाश्चिमात्य लोकांनी या चपलांचा उल्लेख टो रिंग सँडल्स म्हणून केला, तेही अनेकांना रुचलं नाही.

जून महिन्यात काय झालं होतं?

फोटो स्रोत, Getty Images

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्राडा कंपनीशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली.

त्यांना दिलेल्या उत्तरात फॅशन शोमध्ये घालण्यात आलेली चप्पल ही भारतीय परंपरागत चपलेवरून प्रेरणा घेऊनच तयार करण्यात आल्याचं प्राडानं मान्य केलं .

तेव्हा लॉरेन्झो बर्टेली म्हणाले होते, “सध्या हे कलेक्शन केवळ डिझाईनच्या पातळीवर आहे आणि यातल्या कोणत्याही वस्तू व्यावसायिकरीत्या बाजारात उतरवायच्या की नाही, याचा निर्णय अजून झालेला नाही.”

प्राडा आपल्या डिझाईनच्या बाबतीत जबाबदार पावलं उचलण्यासाठी कटीबद्ध आहे आणि या संदर्भात भारतीय कारागिरांसोबत चर्चा करण्यासाठीही आम्ही तयार आहोत, असंही बर्टेली म्हणाले होते.

कोल्हापुरी चपलांचा इतिहास

कोल्हापुरात चपलेऐवजी ‘कोल्हापुरी पायताण’ म्हणून याची खास ओळख आहे.

चामड्यापासून बनवलेली आणि कधीकधी नैसर्गिक रंगात रंगवलेली ही चप्पल आकारानं मजबूत आणि महाराष्ट्रातल्या उष्ण, खडकाळ वातावरणातही बराच काळ टिकणारी.

सपाट चप्पल, लाकडी तळ, अंगठा, पट्टा आणि अंगठ्याला जोडणारी पट्टी असा आकार. काही चपलांना चामड्याची वेणी, चामड्याच्या चकत्या, जर आणि गोंडा लावूनही सजवलं जातं.

हा साधा, सुबक, नक्षीदार आकार ही कोल्हापुरीची खास ओळख आहे.

या चपलेचा उगम नेमका कुठे आणि कधी झाला, याबद्दल ठोस पुरावे नाहीयेत. पण साधारण तेराव्या शतकापासून कोल्हापुरी चपलेचे संदर्भ सापडतात.

'राडा' झाल्यावर प्राडाची माघार, 85,000 रुपयांना मिळणार कोल्हापुरी पायताण

फोटो स्रोत, Getty Images

चालुक्य राजवटीचा तो काळ होता आणि कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमाभागात तेव्हापासून या चपलांचा वापर व्हायचा. आधी या चपला कापशी, अथनी, अशा वेगवेगळ्या गावांच्या नावांनी ओळखल्या जात. कारण तिथले कारागीर या चपला बनवायचे.

पण शाहू महाराजांच्या काळात या चपलेला कोल्हापुरी चप्पल म्हणून खास ओळख मिळाली, असं इतिहासकार इंद्रजित सावंत सांगतात.

“या चपलेला एक प्रतिष्ठेचं स्थान मिळावं म्हणून शाहू महाराज स्वत: ही चप्पल आवर्जून घालायचे.”

ते माहिती देतात की कोल्हापूर शहरातील जवाहरनगर आणि सुभाषनगर इथं महाराजांनी हा व्यवसाय वाढवण्यासाठी तरतूद केली. चर्मकार समुदायाला जमिनी दिल्या. चपलेसाठी लागणारे चामडे कमवण्यासाठी विशेष व्यवस्थाही केली.

त्यानंतर कोल्हापूरचं नाव या चपलेशी जोडलं गेलं आणि ही चप्पल कोल्हापूरची ओळख बनली. अलीकडेच या चपलेला जीआय मानांकनही मिळालं.

या चपला कशा तयार होतात?

कोल्हापूरच्या गावांतील चर्मकारांनी परंपरेनुसार हातानं ही चप्पल तयार करण्याची खास पद्धत जपली आहे.

त्याची सुरुवात म्हशीच्या कातड्यापासून होते. बाभळीची साल आणि चुन्यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून म्हशीच्या कातड्यावर प्रक्रिया (tanning) केली जाते.

दुसऱ्या टप्प्यात कातड्याला हवे त्या आकारात कापले जाते. तिसऱ्या टप्प्यात सुती किंवा नायलॉन धाग्यांनी सर्व भाग हाताने शिवले आणि विणले जातात.

चौथ्या टप्प्यात पारंपरिक नक्षी, छिद्रकाम यांचा समावेश होतो. शेवटी नैसर्गिक तेलांचा वापर करून चपलांना चमक आणि लवचिकता दिली जाते.

अलीकडच्या काळात यातल्या काही कामांसाठी मशीनचा वापर केला जातो आहे. पण बहुतांश कामं आजही हातानेच केली जातात.

महाराष्ट्रात पारंपरिक पोशाखासोबत ही चप्पल हमखास घातली जाते. तर रोजच या चपलांचा वापर करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC