Source :- BBC INDIA NEWS
साधारण 2001 च्या सुमारास अशाच घोटाळ्यासाठी केतन पारेखला अटकही झाली होती. आता पुन्हा एकदा सेबीनं केतन पारेख आणि त्याच्या नेटवर्कवर कारवाई केली आहे. हे नवं प्रकरण नेमकं काय आहे आणि त्यात काय कारवाई झाली आहे, त्याविषयी जाणून घेऊयात.
सेबी म्हणजे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ही संस्था भारतातील शेअर बाजाराचं नियमन करते. सेबीनं काही दिवसांपूर्वी केतन पारेखसह आणखी तीन जणांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. या सर्वांवर ‘फ्रंट-रनिंग’ घोटाळ्याचा आरोप आहे.
सेबीचं म्हणणं आहे की, या लोकांनी बेकायदेशीरपणे किंवा गैर मार्गानं 65.77 कोटी रुपयांचा नफा कमावला.
केतन पारेख याच्याभोवती फास आवळण्यासाठी सेबीनं नवीन पद्धतींचा वापर केला. केतन पारेखनं हा घोटाळा करताना त्याची ओळख लपवण्यासाठी वेगवेगळ्या फोन नंबर आणि नावांचा वापर केला होता.
मात्र सेबीनं सर्व धागेदोरे जुळवत हा घोटाळा उघडकीस आणला आहे. हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊयात.
परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणुकदार जेव्हा भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करतात, तेव्हा अनेकदा त्यांना त्यासाठी फॅसिलिटेटर म्हणजे स्थानिक सहाय्यकाची आवश्यकता असते.
परदेशी गुंतवणुदार जेव्हा शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करतात तेव्हा त्यात कोट्यवधींची रक्कम असते. त्यामुळे हे व्यवहार चांगल्या किमतीवर व्हावेत ही त्या परदेशी गुंतवणुकदारांची अपेक्षा असते. स्थानिक सहाय्यक किंवा फॅसिलिटेटरचं काम हेच असतं की, त्यानं स्वत:चं कौशल्य वापरून हे सौदे चांगल्या किमतीवर करून द्यावेत.
रोहित साळगावकर देखील असेच एक फॅसिलिटेटर आहेत. ते टायगर ग्लोबल या अमेरिकास्थित कंपनीबरोबर काम करायचे. शेअर बाजारात सौदे चांगल्या किमतीला व्हावेत हे पाहणं त्याचं काम असायचं.
सेबीचं म्हणणं आहे की, केतन पारेखनं रोहित साळगावकरांशी हातमिळवणी केली आणि फ्रंट-रनिंगचा एक प्लॅन बनवला.
फ्रंट-रनिंग काय असतं?
फ्रंट-रनिंग ही शेअर बाजारात होणारी एकप्रकारची फसवणूक आहे. यामध्ये एखाद्या ब्रोकर किंवा ट्रेडरला शेअर्सच्या सौद्यांची किंवा व्यवहारांची आधीच माहिती असते. ही माहिती म्हणजे जे ग्राहक किंवा गुंतवणुकदार ज्या शेअर्समध्ये सौदा करणार असतात त्या शेअर्सची माहिती. या माहितीच्या आधारे तो त्या शेअर्समध्ये आधीच सौदा किंवा व्यवहार करतो.
म्हणजेच तो आपल्या ग्राहकांच्या सौदा किंवा गुंतवणुकीच्या माहितीचा गैरवापर करत स्वत:च त्याचा फायदा घेतो.
ही बाब एका उदाहरणानिशी समजून घेऊया. एका अमेरिकन कंपनीला भारतीय शेअर बाजारात शेअर्सचा व्यवहार म्हणजे सौदा करायचा होता. रोहित साळगावकर यांना त्याबद्दल माहिती असायची. कारण हा सौदा त्यांनाच घडवून आणायचा असायचा.
रोहित साळगावकर यांना हे माहित असायचं की, त्या अमेरिकन कंपनीला शेअर्स विकायचे आहेत की खरेदी करायचे आहेत? त्यांना हे शेअर्स कोणत्या किमतीला विकत घ्यायचे आहेत? हा व्यवहार किंवा सौदा कधी होणार आहे?
अमेरिकेतील ग्राहकाची ही महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवण्याऐवजी रोहित साळगावकर ती माहिती केतन पारेखला द्यायचे. त्यानंतर ‘या खेळात’ केतन पारेख आणि त्याच्या सहकाऱ्यांचं काम सुरू व्हायचं.
समजा त्या अमेरिकन कंपनीला भारतीय शेअर बाजारातील एखाद्या कंपनीचे 1 लाख शेअर्स 100 रुपये प्रति शेअर या दराने विकत घ्यायचे आहेत.
आता ही माहिती आधीच मिळाल्यावर केतन पारेख आणि त्याचे सहकारी या अमेरिकन कंपनीचा सौदा व्हायच्या आधीच तेच शेअर्स 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमतीला विकत घ्यायचे.
मग अमेरिकन कंपनी त्यांच्या नियोजनानुसार ते 1 लाख शेअर्स विकत घ्यायची. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी होते, तेव्हा साहजिकच त्या शेअर्सच्या किमतीत वाढ होते.
समजा त्या शेअर्सच्या किमतीत वाढ होऊन तो शेअर 100 रुपयांवरून 106 रुपयांवर जायचा. मग अशावेळी त्या वाढलेल्या किमतीचा फायदा घेत केतन पारेख आणि त्याचे सहकारी त्यांनी खरेदी केलेले शेअर्स विकायचे. अशा प्रकारे फार थोड्या अवधीत ते प्रत्येक शेअरमागे 6 रुपयांचा नफा कमवायचे.
खूप मोठ्या प्रमाणात शेअर्सची खरेदी-विक्री याप्रकारे होत असल्यानं त्यातील एकूण रक्कम किती मोठी असेल याचा अंदाज करता येतो.
केतन पारेखनं कसं तयार केलं नेटवर्क?
सेबीनं दिलेल्या माहितीनुसार, केतन पारेखचं नेटवर्क बरंच पसरलेलं होतं. यात अशोक कुमार पोद्दारसह अनेक जणांचा सहभाग होता.
हे लोक कोलकातामधील जीआरडी सिक्युरिटिज ही स्टॉक कंपनी आणि सालासर स्टॉक ब्रोकिंगसाठी काम करतात. हे सर्वचजण यात सहभागी होते. ज्या शेअर्सचा व्यवहार टायगर ग्लोबल ही कंपनी करणार असेल त्याच शेअर्सचा व्यवहार केतन पारेख आणि त्याचं नेटवर्क करायचं.
हा सर्व गैरप्रकार करण्यासाठी अनेक मोबाईल नंबरचा वापर केला जात होता. प्रत्यक्षात हा घोटाळा केतन पारेख करत होता. आपल्या सहकाऱ्यांसह केतन पारेखनं फ्रंट रनिंगच्या माध्यमातून 65 कोटी रुपयांहून अधिकची कमाई केली होती.
केतन पारेखपर्यंत सेबी कशी पोहोचली?
अर्थात अद्याप ही बाब पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही की, कशाप्रकारे किंवा कोणत्या माहितीच्या आधारे सेबीनं केतन पारेखच्या नेटवर्कचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.
केतन पारेखचं नेटवर्क शोधणं सोपं काम नव्हतं. शेअर बाजारातील हजारो सौदे आणि त्यांचे खरेदी-विक्रीचे पॅटर्न तपासल्यानंतंर सेबी केतन पारेखच्या नेटवर्कपर्यंत पोहोचू शकली. सेबीनं शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे पॅटर्न पाहिले, कॉल रेकॉर्ड्सचा शोध घेतला आणि मोबाईलवरील संदेशांवर देखील लक्ष ठेवलं.
सेबीनं दिलेल्या माहितीनुसार, केतन पारेख 10 विविध मोबाईल नंबरच्या माध्यमातून त्याच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहायचा. यातील कोणताही मोबाईल नंबर केतन पारेखच्या नावावर नव्हता.
ज्या लोकांशी केतनचं बोलणं व्हायचं, त्यांनी चलाखीनं त्यांच्या मोबाईलमध्ये केतन पारेखचं नाव जॅक, जॉन, बॉस, भाभी अशा वेगवेगळ्या नावांनी सेव्ह केलेलं होतं.
सेबीनं केलेल्या तपासात दिसून आलं की, यातील एक मोबाईल नंबर केतन पारेखच्या पत्नीच्या नावावर आहे. हा नंबर त्याच 10 मोबाईल नंबरपैकी होता, ज्याच्या माध्यमातून केतन पारेख त्याच्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहायचा.
मग सेबीनं सर्व धागेदोरे जोडण्यास सुरुवात केली आणि हा गैरप्रकार उघडकीस आणल्याचा दावा केला.
सेबीच्या तपासातून आणखी एक रंजक बाब समोर आली. संजय तापडिया नावाच्या एका संशयितानं ‘Jack Latest’ ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. केतन पारेखचा वाढदिवसदेखील त्याच दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीलाच असतो.
त्याच्या पॅनकार्डवर हीच तारीख देण्यात आलेली आहे. यानंतर केतन पारेख आणि त्याच्या नेटवर्कवरील सेबीचा संशय आणखी पक्का झाला.
सेबीनं आदेशात काय म्हटलं आहे?
सेबीनं केतन पारेख, रोहित साळगावकर आणि अशोक कुमार पोद्दार या तिघांना सेबीमध्ये नोंदणी झालेल्या कोणत्याही मध्यस्थाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संपर्क करण्यास तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे.
केतन पारेख, साळगावकर आणि पोद्दारसह 22 फर्मना सेबीनं कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. त्यात सेबीनं म्हटलं आहे की, या व्यवहारांमधील पैशांची वसूली, बंदी आणि दंड आकारण्यासह त्यांच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये.
सेबीनं म्हटलं आहे की, या फर्मना हा आदेश मिळाल्याच्या तारखेपासून 21 दिवसांच्या आत सेबीकडे त्यांची उत्तरं सादर करावी लागतील.
188 पानी अंतरिम आदेशात सेबीनं म्हटलं आहे की, रोहित साळगावकर आणि केतन पारेख यांनी ‘फ्रंट-रनिंग’ च्या माध्यमातून मोठ्या ‘ग्राहकां’शी संबंधित एनपीआय (बिगर-सार्वजनिक माहिती) द्वारे गैरमार्गानं नफा कमावण्याची योजना बनवली.
सेबीनं पुढे म्हटलं आहे की, फ्रंट-रनिंगच्या गैरप्रकारातील एक सूत्रधार असल्याची बाब पोद्दारनं मान्य केली आहे.
अर्थात केतन पारेख आणि त्याच्या सहकाऱ्यांवर बंदी घालण्याचा सेबीचा आदेश अंतरिम स्वरुपाचा आहे.
सेबी या आदेशात बदल करू शकते. म्हणजेच सेबी हा आदेश मागे घेऊ शकते किंवा अंतिम निर्णयात हा आदेश कायम देखील ठेवू शकते. कारण हे सर्व प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी सेबीला काही काळ लागू शकतो.
दरम्यानच्या काळात केतन पारेख आणि त्याच्या सहकाऱ्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा पर्याय खुला असेल. ते सेबीचा अंतरिम आदेश आणि त्यांना पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसला न्यायालयात आव्हान देऊ शकतात.
केतन पारेख कोण आहे?
2000 च्या सुमारास केतन पारेख हे नाव भारतीय शेअर बाजारात खूपच प्रसिद्ध होतं.
शेअर बाजारातील त्यांच्या प्रत्येक व्यवहारावर ट्रेडर्स लक्ष ठेवून असायचे.
त्याकाळी केतन पारेखनं कोलकाता स्टॉक एक्सचेंजमध्ये स्वत:चा वेगळा दबदबा निर्माण केला होता. 1999 ते 2000 या काळात जगभरात टेक्नॉलॉजी बबलचा बोलबाला होता. तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत जबरदस्त तेजी होती. त्याच वेळेस भारतातील शेअर बाजारातील देखील तेजीचे वारे वाहत होते.
त्याचवेळेस केतन पारेखचा घोटाळा उघड झाला होता.
सेबीच्या तपासातून समोर आलं होतं की, केतन पारेखनं बँक आणि कंपन्यांच्या प्रमोटर्सच्या पैशांचा वापर शेअर्सच्या किमतीत बेकायदेशीररित्या वाढ करण्यासाठी केला होता.
मार्च 2001 मध्ये केतन पारेखला अटक करण्यात आली होती आणि 50 दिवसांहून अधिक काळ केतन पारेख तुरुंगात होता.
यानंतर शेअर बाजारातील सर्व उणीवा, त्रुटींना दूर करण्यात आलं होतं. ट्रेडिंग सायकल (शेअरची खरेदी किंवा विक्री पूर्ण होण्याचं चक्र) एक आठवड्याहून कमी करत एका दिवसावर आणण्यात आली.
तसंच उधारीच्या किंवा कर्जाऊ पैशांवर करण्यात येणाऱ्या शेअर ट्रेडिंगला म्हणजे ‘बदला ट्रेडिंग’ला बंद करण्यात आलं. त्याशिवाय केतन पारेखवर शेअर बाजारात 14 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC