Source :- BBC INDIA NEWS

24 अकबर रोडवरील काँग्रेसचं मुख्यालय

फोटो स्रोत, Getty Images

हा एक टाईप-7 श्रेणीतील बंगला. काँग्रेसचे आंध्र प्रदेशचे तत्कालीन खासदार जी. वेंकटस्वामी यांना देण्यात आला होता.

1978 साली म्हणजे आणीबाणीनंतर अनेक नेते इंदिरा गांधींना सोडून गेले, पक्षही फुटला, तेव्हा तेव्हा काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी इंदिरा गांधीना साथ देण्याचा निर्णय घेतला होता, अशा मोजक्या जी. वेंकटस्वामी हे होते.

1977 मध्ये निवडणूक हारल्यानंतर इंदिरा गांधींकडे राहण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. कारण निवडणुकीत हरल्यामुळे त्यांना कोणतंही अधिकृत निवासस्थान मिळणार नव्हतं.

अशा परिस्थितीत एकेकाळचे त्यांचे सहकारी मोहम्मद युनूस यांनी ’12, विलिंग्टन क्रीसेंट’मधील त्यांचा बंगला इंदिरा गांधींना राहण्यासाठी दिला होता, तर स्वत: मोहम्मद युनूस दक्षिण दिल्लीतील एका घरात राहण्यास गेले होते.

विलिंग्टन क्रिसेंटमध्ये इंदिरा गांधींबरोबर त्यांचे मोठे पुत्र राजीव गांधी, त्यांच्या पत्नी सोनिया गांधी आणि त्यांची दोन मुलं राहुल आणि प्रियंका, तसंच इंदिरा गांधीचे धाकटे पुत्र संजय गांधी आणि त्यांची पत्नी मेनका गांधी असा सर्व परिवार राहत होता.

या सर्वांसाठी ती जागा इतकी अपुरी होती की, तिथे कोणतंही राजकीय स्वरुपाचं कामकाज करणं शक्यच नव्हतं.

राशिद किडवई यांनी ’24, अकबर रोड’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 12 विलिंग्टन क्रीसेंट या निवास्थानात लोकांची मोठी दाटी झाली होती. त्यामुळेच 24, अकबर रोडला काँग्रेसचं नवं मुख्यालय करण्यात आलं होतं.

या बंगल्याच्या समोर हवाईदलाच्या प्रमुखांचं घर होतं. या बंगल्यात एकूण पाच खोल्या, एक ड्रॉईंग रुम, एक डायनिंग हॉल आणि एक गेस्ट रुम होती.

लाल रेष
लाल रेष

किडवई लिहितात, या घराचं एक वैशिष्ट्यं असं होतं की, यातील एक गेट त्याला 10, जनपथ बंगल्याशी जोडायचं. त्या काळी ते युवक काँग्रेसचं मुख्यालय होतं. नंतर हा बंगला आधी विरोधी पक्षनेते म्हणून राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांना देण्यात आला होता.

आंग सान सू यांचं घर

या घराचा आणखी एक रंजक इतिहास आहे. 1911 ते 1925 दरम्यान हा बंगला सर एडविन ल्युटेन्स यांनी बांधला होता. 1961 पासून दोन वर्षे म्यानमारच्या (तेव्हाचं बर्मा) आणि शांततेसाठी नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू ची देखील इथे राहिल्या होत्या.

त्यांची आई डॉ. खिन कि या म्यानमारचे नेते आंग सान यांच्या पत्नी होत्या. पतीच्या मृत्यूनंतर त्यांना भारतात म्यानमारच्या राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं.

24 अकबर रोडमधील दृश्य

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. खिन यांचा विशेष दर्जा लक्षात घेऊन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या बंगल्याला ‘बर्मा हाऊस’ असं नाव दिलं होतं.

आंग सान सू ची यांचे चरित्रकार जस्टिन विंटेल यांनी ‘द पर्फेक्ट होस्टेज’ हे पुस्तक लिहिलं आहे.

त्यात त्यांनी लिहिलं आहे की, “इथे राहत असताना सू ची ‘इकेबाना’ ही जपानी फुलांची सजावट करण्याची कला शिकल्या होत्या. इथल्या वास्तव्यातच त्यांनी कॉव्हेंट ऑफ जीजस अॅंड मेरी स्कूल मध्ये शिक्षण घेतलं होतं. नंतर त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लेडी श्रीराम महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. हे महाविद्यालय त्यावेळेस दरियागंजमध्ये होतं.”

काँग्रेसचं मुख्यालय ठेवण्यासाठी समर्थन

1959 मध्ये इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्यानंतर ‘7, जंतर मंतर’ रोडवरील बंगल्याला काँग्रेसचं मुख्यालय बनवण्यात आलं होतं. 1969 मध्ये काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर मोरारजी देसाई यांचं नेतृत्व मानणाऱ्या गटानं हा बंगला ताब्यात घेतला होता.

त्यामुळे इंदिरा काँग्रेसचं कार्यालय 5 राजेंद्र प्रसाद रोडवर हलवण्यात आलं होतं.

1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्यावेळेस 7 जंतर मंतर रोडवरील जुन्या काँग्रेस मुख्यालयावर दावा करण्यात त्यांनी रस दाखवला नाही.

इंदिरा गांधी

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणाल्या होत्या, “मी एकदा नाही तर दोनदा पक्षाला शून्यातून उभं केलं आहे. मला वाटतं की काँग्रेसचं नवं मुख्यालय येणाऱ्या दशकांमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि उत्साह निर्माण करत राहील.”

24 अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात जेव्हा त्यावेळचे इंदिरा गांधींचे जवळचे सहकारी असलेल्या बुटा सिंह आणि ए आर अंतुले यांनी प्रवेश केला होता, तेव्हा बंगल्यात साधं किरकोळ फर्निचरसुद्धा नव्हतं. बंगल्याच्या सर्वात मोठ्या खोलीचं रुपांतर काँग्रेस अध्यक्षाच्या कार्यालयात करण्यात आलं होतं.

भगत यांनी काँग्रेस पक्षाची पाटी बनवली

त्यावेळेस इंदिरा काँग्रेसचे सरचिटणीस असलेल्या बुटा सिंह यांना एका बेडरुममध्ये बसण्याची जागा देण्यात आली होती.

24 अकबर रोडवर येण्याच्या काही काळ आधीपर्यंत इंदिरा काँग्रेसचे नेते आधी एम चंद्रशेखर यांच्या 3 जनपथ वरील निवासस्थानी आणि नंतर कमलापती त्रिपाठी यांच्या बंगल्यावर बसायचे.

राशिद किडवई लिहितात, “कमलापती त्रिपाठी एक धर्मनिष्ठ हिंदू होते. त्यांच्याकडे नियमितपणे होणारं होमहवन आणि पूजा या गोष्टी काँग्रेस नेत्यांना फारशा रुचल्या नाहीत. अजित प्रसाद शर्मा हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते ब्राह्मण असूनदेखील असं म्हणाल्याचं सांगितलं गेलं की ते मंदिरासारख्या वातावरणात काम करण्यास सक्षम नाहीत.”

“त्यावेळेस वेंकटस्वामी त्यांना दिलेल्या बंगल्यात एकटेच राहायचे. म्हणून मग बुटा सिंह यांनी वेंकटस्वामी यांना पक्षासाठी घर देण्यास राजी केलं होतं.”

काँग्रेस मुख्यालय

फोटो स्रोत, Getty Images

दिल्ली काँग्रेसचे एक बडे नेते हरकिशन लाल भगत यांनी त्यांच्याकडे असलेले स्त्रोत वापरून एक लाकडी फलक किंवा पाटी बनवली होती. ज्यावर लिहिलं होतं, अखिल भारतीय काँग्रेस (इंदिरा). ही पाटी 24, अकबर रोडच्या मुख्य गेटवर लावण्यात आली होती.

बेकायदेशीरपणे खोल्या बनवण्यात आल्या

अकबर रोडच्या बंगल्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. राशिद किडवई लिहितात, “आता खोल्यांची संख्या वाढून 34 झाली आहे. बंगल्याच्या मुख्य भागात काँग्रेस अध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष यांच्या खोल्या आहेत. नरसिंहा राव यांच्या कार्यकाळात बंगल्याच्या मागील भागात एक डझनहून अधिक खोल्या बनवण्यात आल्या होत्या.”

“यातील बहुतांश खोल्या बेकायदेशीरपणे बनवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर जेव्हा-जेव्हा काँग्रेसचं सरकार आलं, तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांची निष्ठा सिद्ध करण्यासाठी बंगल्यातील कामांच्या बाबतीत कायदे-नियमांचं कठोरपणे पालन केलं नाही.”

राजीव गांधी

फोटो स्रोत, KEYSTONE/GETTY IMAGES

1985 मध्ये राजीव गांधी यांची इच्छा होती की, एका आधुनिक बंगल्यात किंवा इमारतीत काँग्रेसचं मुख्यालय असावं. त्यांनी अनेक ठिकाणांहून वर्गणी घेतली. या कामासाठी काँग्रेसच्या खासदारांना देखील एक महिन्याचं वेतन देण्यास सांगण्यात आलं होतं. जेणेकरून राजेंद्र प्रसाद रोडवर एक नवीन इमारत बांधता यावी.

मात्र, 1991 मध्ये राजीव गांधी यांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर सर्वकाही बदललं आणि त्या इमारतीत राजीव गांधी फाऊंडेशनचं कार्यालय सुरू करण्यात आलं.

मुख्यालयासाठी चार एकर जागा

2009 मध्ये शहर विकास मंत्रालयाच्या नियमांनुसार, दोन्ही सभागृहामधील काँग्रेसच्या खासदारांची संख्या लक्षात घेता चार एकर भूखंडावर इमारत बांधण्याची परवानगी देण्यात आली होती.

यातील रंजक बाब अशी की जेव्हा भारतीय जनता पार्टीप्रमाणेच काँग्रेस पक्षाला देखील त्यांचं कार्यालय बनवण्यासाठी जागा देण्यात आली, तेव्हा त्यांना कोटला रोड आणि दीनदयाल उपाध्याय रोडच्या कोपऱ्यात जागा मिळाली होती.

भारतीय जनता पार्टीची वैचारिक भूमिका मांडणाऱ्या नेत्याचं नाव असलेल्या रस्त्यावर काँग्रेस पक्षाला त्यांचं मुख्यालय बनवण्यास संकोच वाटत होता. त्यामुळेच त्यांनी मुख्यालयाचं प्रवेश द्वार कोटला रोडकडून ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

वादळात झाड पडलं

मे, 1999 मध्ये फक्त 10 मिनिटं आलेल्या वादळामुळे 24, अकबर रोडमधील एक मोठं झाड पडलं. या घटनेत एका आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. यामुळे पक्षाच्या मुख्यालयाच्या परिसरात बांधण्यात आलेलं एक तात्पुरत्या स्वरुपाचं मंदिर देखील नष्ट झालं होतं.

ही घटना पक्षासाठी मोठा अपशकुन असल्याचं मानली गेली. जेव्हापासून काँग्रेसचं मुख्यालय 24, अकबर रोडमध्ये हलवण्यात आलं होतं, तेव्हापासून हे झाड तिथे होतं. कर्नाटकातील एका व्यक्तीनं पक्षाचं तिकिट मिळाल्यानंतर हे मंदिर बांधलं होतं.

तिकिटासाठी इच्छूक असलेल्या बहुतांश उमेदवारांना वाटत होतं की या मंदिरात प्रार्थना केल्यामुळे लोकांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण होतात.

सीताराम केसरी यांना हटवून सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षा झाल्या

1996 मध्ये काँग्रेसच्या हातातून सत्ता गेल्याचा साक्षीदार 24, अकबर रोड झाला. अर्थात काँग्रेसच्या हातून जरी सत्ता गेली तरी देखील काँग्रेसनं आधी एच डी देवगौडा आणि नंतर इंदर कुमार गुजराल यांना बाहेरून पाठिंबा देत भारतीय जनता पार्टीला सत्तेत येऊ दिलं नाही, ही वेगळी बाब आहे.

यादरम्यान सीताराम केसरी काँग्रेसचं अध्यक्ष झाले. 24 मार्च 1998 ला 24, अकबर रोडमध्येच सीताराम केसरी यांना अध्यक्षपदावरून हटवत सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

सीताराम केसरी (टोपी परिधान केलेले)

फोटो स्रोत, Getty Images

5 मार्च 1998 ला काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांनी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत जितेंद्र प्रसाद, शरद पवार आणि गुलाम नबी आझाद यांनी सीताराम केसरी यांना सल्ला दिला की, सोनिया गांधी यांना पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात यावी.

सीताराम केसरी यांनी असं करण्यास नकार दिला. त्याचबरोबर हा सल्ला देणाऱ्या नेत्यांवर त्यांच्याविरोधात कारस्थान करण्याचा आरोप केला.

सीताराम केसरी यांच्या नावाची पाटी हटवण्यात आली

त्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपल्याची घोषणा सीताराम केसरी यांनी केली.

प्रणब मुखर्जी यांनी ‘द कोएलिशन इयर्स’ नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे, “कार्यकारिणीची बैठक संपल्याची घोषणा केल्यानंतर देखील काँग्रेस कार्यकारिणीतील सर्व नेते तिथून हलले नाहीत. मी त्यांच्यात सर्वात ज्येष्ठ नेता होतो. त्यामुळे मला बैठकीचं अध्यक्ष होण्यास सांगण्यात आलं.”

“बैठकीत मी एक प्रस्ताव मांडला आणि कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी तो एकमतानं मंजूर केला. या प्रस्तावात काँग्रेस कार्यकारिणीनं सोनिया गांधी यांना अध्यक्षपद देण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष सीताराम केसरी यांचे आभार मानले.”

“प्रस्तावात सीताराम केसरी यांचे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्याबद्दल सुद्धा आभार मानण्यात आले. यानंतर कार्यकारिणीचे काही सदस्य या प्रस्तावाची एक प्रत घेऊन सोनिया गांधी यांच्याकडे गेले आणि त्यांना काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली.”

सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

सोनिया गांधी यांनी ती विनंती मान्य केली. सीताराम केसरी ओरडून या प्रस्तावाला विरोध करत म्हणाले की ते अजूनही काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र पक्षाचे उपाध्यक्ष जितेंद्र प्रसाद यांनी मोठ्या गदारोळात घोषणा केली की आता सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष आहेत.

राशिद किडवई लिहितात, “काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर सीताराम केसरी खोलीतून बाहेर पडले. त्यांच्या मागे तारिक अनवर देखील गेले. जेव्हा ते खोलीबाहेर पडले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांच्या नावाची पाटी तिथून काढण्यात आली आहे. त्या जागी एक कॉम्प्युटर प्रिंट आऊट लावलेली होती आणि त्यावर लिहिलेलं होतं, ‘सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष’. “

सोनिया गांधींनी मनमोहन सिंहांना केलं पंतप्रधान

एका वर्षानंतर ’24, अकबर रोड’वर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर यांनी परदेशी मूळ असण्याच्या मुद्द्यावरून सोनिया गांधींच्या विरोधात बंड केलं.

सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र या नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर सोनिया गांधींनी त्यांचा राजीनामा मागे घेतला.

याच बैठकीनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष सीताराम केसरी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्या कारचं नुकसान करण्यात आलं. त्यानंतर सीताराम केसरी यांना त्यांचा फाटलेला सदरा बदलण्यासाठी घरी जावं लागलं होतं.

मनमोहन सिंह

फोटो स्रोत, Getty Images

सीताराम केसरी यांना ही वर्तणूक देण्यात आली, कारण बंड करण्यांमध्ये तारिक अन्वर हे एक नेते होते आणि ते केसरी यांच्या जवळचे होते. 2004 च्या निवडणुकीनंतर आठ वर्षांनी काँग्रेसच्या हाती पुन्हा सत्ता आली.

त्यावेळेस असं वाटत होतं की, सोनिया गांधी याच देशाच्या पंतप्रधान होतील. मात्र, सोनिया गांधींनी मनमोहन सिंह यांना भारताचा पंतप्रधान करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC