Source :- BBC INDIA NEWS

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल

फोटो स्रोत, Getty Images

दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. अटक होणारे ते दक्षिण कोरियातील पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत.

या अटकेबरोबरच गेल्या आठवडाभरापासून पोलीस अधिकारी आणि यून यांच्या सुरक्षा रक्षकांमध्ये सुरू असलेली रस्सीखेच आणि संघर्ष संपला आहे.

डिसेंबर 2024 मध्ये यून यांनी दक्षिण कोरियात मार्शल लॉ लावत सर्वांनाच धक्का दिला होता. मात्र मार्शल लॉ लावण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर देशभरात अशांतता निर्माण झाली.

त्यानंतर जनतेत उद्रेक झाला आणि राष्ट्राध्यक्ष यून यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता. सध्या यून यांच्या विरोधात देशद्रोहावरील आरोपांचा तपास सुरू आहे.

घटनात्मक न्यायालयानं महाभियोगाद्वारे यून यांना राष्ट्राध्यक्षपदावरून हटवले जाणं वैध असण्याबाबत किंवा ते कायदेशीर असण्याबाबत अद्याप आदेश दिलेला नाही. त्यामुळेच तांत्रिकदृष्ट्या यून सुक सोल अजूनही दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत.

असं असलं तरी यून यांची अटक नाट्यमय ठरली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी यून यांना अटक करण्यासाठी प्रचंड थंडीत राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात प्रवेश करण्यासाठी शिड्या आणि काटेरी तारा कापण्यासाठीच्या अवजारांचा वापर केला.

दुसऱ्या बाजूला यून यांची अटक रोखण्यासाठी प्रेसिडेन्शियल सिक्युरिटी सर्व्हिस (पीएसएस) म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅरिकेड्स म्हणजे अडथळे उभे केले होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

अटक होण्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांचा संदेश

राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांनी त्यांच्या अटकेपूर्वी देशाला संबोधित करत एक व्हिडिओ संदेश जारी केला.

64 वर्षांच्या यून यांनी या व्हिडिओत म्हटलं आहे की रक्तपात थांबवण्यासाठी ते उच्चपदस्थांचा समावेश असलेल्या समितीसमोर करप्शन इन्व्हेस्टिगेशन ऑफिस म्हणजे सीआयओमध्ये चौकशीसाठी जाण्यास तयार आहेत.

त्यांचा हा व्हिडिओ तीन मिनिटांचा आहे. त्यात यून म्हणाले की त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या चौकशीला ते सहकार्य करतील. त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप मात्र त्यांनी फेटाळले आहेत.

ते सातत्यानं म्हणत आले आहेत की त्यांच्या अटकेसाठी जारी करण्यात आलेला वॉरंट कायदेशीर नाही.

राष्ट्रपतींना अटक करण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी कुंपण कापून निवासस्थानात प्रवेश केला.

फोटो स्रोत, Reuters

यून म्हणाले की त्यांनी पाहिलं की पोलीस अधिकारी कसं आग शमवण्याच्या उपकरणांनिशी त्यांच्या निवासस्थानात शिरले.

ते म्हणाले, “मी सीआयओसमोर हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात ही चौकशी बेकायदेशीर आहे. मात्र कोणत्याही प्रकारचा रक्तपात रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC