Source :- BBC INDIA NEWS
“मेरा कल्चर, लोगो से कुछ नही बढकर
पूरी दुनिया केहती है उनको महापुरुष
पर हम बहुजनको भगवान से भी बढकर आंबेडकर”
हे शब्द आहेत एमटीव्हीच्या ‘हसल’ या रॅप शो मधील 99 side या रॅपरचे.
‘हसल’ रॅप शोमध्ये आपल्या विविध गाण्यांच्या माध्यमातून 99 side हा मुंबईकर रॅपर प्रकाश झोतात आला आहे.
आपल्या विविध रॅप साँगच्या माध्यमातून आपली आणि आजूबाजूची सामाजिक परिस्थिती मांडत 99 side या रॅपरने सध्या संगीत क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे.
99 side हे स्टेज नेम वापरणाऱ्या या तरुणाचं खरं नाव यश दांडगे आहे. तो विलेपार्ले येथील बामणवाडा वस्तीत राहणारा मराठी मुलगा आहे.
तो शालेय जीवनापासून ‘रॅप’ची कला जोपासतो. कॉलेज सोडून तो आता पूर्णवेळ रॅप करतो.
आई-वडील आणि एक भाऊ असा त्याचा परिवार आहे.
आई गृहिणी आहे तर वडील रिक्षा चालवतात तसेच ते विमानतळावर मेंटेनन्सचेही काम करतात. भाऊ दहावीत शिकतोय.
कोरोना काळामध्ये यशला रॅपिंगची अधिक आवड लागली. यानंतर या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांचा आणि विविध शैलींचा त्याने अभ्यास केला.
पुढे रॅपिंग क्षेत्रातल्या अनेकांचे रॅप ऐकत स्वतः देखील लिहायला लागला. त्यातून त्याने पुढे अनेक रॅप बॅटल स्पर्धेमध्ये सहभाग घेतला असून तिथे तो स्पर्धा जिंकत गेला.
अंडरग्राउंड रॅपिंग क्षेत्रामध्ये त्याच नावलौकिक झालं. यातच यशला अलिजन या रॅपिंग क्रू ची सोबत मिळाली. त्यातून तो पुढे या ग्रुप सोबत रॅप गाणे गाऊ लागला.
पुढे एके दिवशी ग्रुप मधील समीर इनामदार उर्फ रॅपचर या सहकारी मित्राने त्याला रॅप हसल शो बद्दल ऑडिशन सुरू असल्याच कळवत सहभागी होण्यासाठी सांगितले.
त्याने या ऑडिशनमध्ये सहभाग घेतला आणि तो निवडला गेला. हसल रॅप शोमध्ये विविध गाण्यांच्या माध्यमातून यशला अधिक प्रसिद्धी मिळाली.
‘प्रॅक्टिस आणि प्रयत्न’ यामुळे इथवर पोहोचला
आपल्या प्रवासाबद्दल बोलताना यश दांडगे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाला की, “लहानपणी मित्रांकडून मला रॅपबद्दल कळलं आणि मी त्याकडे वळलो. रॅप हे माझं जीवन आहे. या कलेचा संस्कृतीचा मी अधिक अभ्यास केला. सातत्याने प्रॅक्टिस आणि प्रयत्न यामुळे आज मी या ठिकाणी पोहोचलो.”
पाया खुद को खुद मैने खोकर,
उमर बीस बहुत खाये ठोकर,
मा बोली कुछ नही रोकर,
बाप बोला कर मेहनत इतनी के बन जाये सपने तेरे नौकर.
यश दांडगे आपल्या गाण्यांच्या माध्यमातून सभोवतालची आणि स्वतःची परिस्थिती मांडतो. बामणवाडा सारख्या विलेपार्ले येथील वस्तीत यश मोठा झाला आहे.
बामणवाडा या परिसरामध्ये सर्व धर्मीय लोक राहतात मात्र यश राहत असलेल्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा समाज अधिक आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांचा प्रभाव त्याच्यावर खूप आहे.
यशला रॅप करत असताना सुरुवातीला अडचणी आल्या. यशला सुरुवातीला त्याचे वडील रॅपसाठी प्रोत्साहन द्यायचे मात्र आई काळजीपोटी नकार द्यायची. मात्र मनात जिद्द आणि या कलेची भूक आवड असल्यामुळे यश रॅप करत गेला.
‘आता मला लोकांना तो काय करतोय हे सांगावं लागत नाही’
यश दांडगेच्या या प्रवासाबद्दल आई विमल दांडगे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या की, “यश सुरुवातीला जे करत होता ते मला आवडत नव्हतं. त्यात त्याने कॉलेज सोडलं तेव्हा मला लोक सांगायचे की यामुळे लोक वाया जातात. आत्ता तो सध्या ज्या मुक्कामावर ते पाहून तो काय करतो हे मला लोकांना सांगावं लागत नाही. उलट तेच त्याचं कौतुक माझ्यासमोर करतात.”
रॅप साँग लिहिण्याबद्दल यश दांडगे म्हणाला की, “रॅप हे एक जगणं आहे, जे गाण्यांमध्ये आम्ही बोलतो ते आयुष्य मी जगतो. माझ्यासाठी आणि माझ्या सगळ्या ग्रुप मेंबर साठी रॅप ही एक जीवनशैली आहे. मी तेच लिहितो जे मी बघतो आणि मी तेच लिहितो जे मला बदलायचे आहे.
“बामणवाडा माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण प्रत्येक गाणं लिहिताना मला इथल्या लोकांनी सर्वांनी मदत केली आहे, त्यामुळे अनेकदा माझ्या गाण्यांमध्ये सर्वांचा उल्लेख असतो.
“महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेब माझ्यासाठी एक प्रेरणा आहेत, त्यांनी ज्याप्रमाणे समाजासाठी काम केलं त्याप्रमाणेच मला देखील करायचे. अनेक रॅपर आपली परिस्थिती मांडतात त्यानुसार मी देखील आपली आणि समाजाची परिस्थिती मांडतो,” यश सांगतो.
कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना
तेरी चमक है गेहना
मेरी चमक है जो शब्द मे केहता
जिसे तू जान है केहता, वही तेरे लिये जानलेवा
सन्मान है मिलता , पैसे से जैसे समान मिलता
पर बदला वक्त बदला ये जमाना
हे शब्द आहेत यश दांडगे याच्या ‘कलासूर’ या गाण्यातले. आपल्या रॅपच्या माध्यमातून त्याला जे म्हणायचं आहे तो शब्दांत मांडून रॅप सादर करतो. यामुळेच यश दांडगे यांनी आतापर्यंत अनेक गाणी लिहिली आहेत.
हसल रॅप शो मध्ये त्यांनी एकूण नऊ गाणी सादर केली. हे सर्व गाणी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय झालेली आहेत.
गोंधळ, चौक पे, सुबह-सुबह, दू बक्कल, कलासुर, बता दे तू, मै हु डॉन अशी अनेक गाणी यश दांडगे यांनी गायली आहेत. या सर्व गाण्यांना लाखो मिलियन व्हिव सोशल मीडियावर आहेत.
यश दांडगेचं ’99 side’ नाव का पडलं ?
यश दांडगे हा सुरुवातीला भारतीय रॅपर हनी सिंग, बादशाह, रफ्तार, ईक्का, डिवाइन, इमिवे यांना लहानापासून ऐकत आलाय.
कोरोना काळामध्ये आंतरराष्ट्रीय रॅपर्सला यशने ऐकलं आणि तो रॅपच्या प्रेमातच पडला.
यशचं नाव 99 Side कसं पडलं याची गोष्ट त्याने सांगितले. कोरोनाच्या काळात त्याने मॉब-डीप या द्वयीला ऐकलं होतं. या दोघांना ’41 side’ असं देखील म्हटलं जायचं. कारण 41 म्हणजे ते ज्या न्यूयॉर्कच्या भागात राहत होते तिथला हा पिनकोड होता. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन यशने तो ज्या भागात राहतो तेथील पिनकोडचे शेवटचे दोन शब्द घेत त्याचे स्टेज नेम 99 side ठेवले आहे.
मॉब-डीप, टूपॅक, लीलविन, कॅन्ड्रीक लामार हे आंतरराष्ट्रीय रॅपर यशचे प्रेरणास्थान आहेत.
आंतरराष्ट्रीय पातळीवर रॅप सादर करायचे आहेत
हे क्षेत्र उत्पन्नाचं साधन होऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना यश सांगतो, “मी स्वतः एक अपकमिंग रॅपर आहे. प्रयत्न करत राहायचे, कुठेही कोणत्याही अडथळ्यामुळे कोणीही थांबू नये.”
“मला कधीच वाटलं नव्हतं मला एक असा शो मिळेल आणि मी लोकप्रिय होईल. मी गाणी करत असताना कधीच मला लेबल मिळेल अशी अपेक्षा ठेवली नाही मी आवड जपत गेलो.”
“तुम्हाला कलेची किती भूक आहे यावरून आपलं पुढचं करिअर ठरलेलं असतं. समजा एखाद्याला प्रायोजक मिळाले नाही, तर अनेक सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे आपण आपली गाणी सादर करू शकतो. आपल्या गाण्यात दम असेल तर कधी ना कधी आपल्याला चांगली संधी मिळेलच. प्रसिद्धी मिळण्यापूर्वी आपण काय करतो हे फार महत्त्वाचं आहे.”
“मी सुरुवातीला काहीच नव्हतो. तेव्हा एलिजन या आमच्या ग्रुपच्या माध्यमातून रॅप करत होतो. छोट्या-मोठ्या रॅप बॅटल स्पर्धा करून बक्षीस जिंकत होतो. आम्हाला स्वतः कुठे प्लॅटफॉर्म मिळत नव्हता त्यामुळे आम्ही आमचं स्टेज निर्माण केलं. आपल्यात करण्याची जिद्द असली की सगळं होतं. त्यातूनच उत्पन्नाचं देखील साधन निर्माण होतं.”
‘मै ना चाहता मेरे बस्ती के
बच्चो की गिनती हो जाये ऐसो मे.
मे देखना चाहता नया आंबेडकर, तेंडुलकर
मेरे हर एक बस्ती के बच्चे में’
आपल्या मै हू डॉन या रॅपच्या ओळी गात तो पुढे म्हणतो, “मी ज्या परिसरातून येतो अशा अनेक परिसरातून अनेक रॅपर उदयाला यायला हवेत. आता मला फक्त भारतात गाणी सादर नाही करायची, मला आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले रॅप सादर करायचे आहेत.”
कॅन्ड्रीक लामार यांच्याबरोबरही मला स्टेज शेअर करायचा आहे. जेकॉल, फिफ्टी सेंट यांना मला भेटायचं आहे. मला माझा अलिजन ग्रुप हा आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायचं आहे. मला हिंदी आणि मराठी रॅप कल्चर शो आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करायचा आहे.
धिंगाणा हे रॅप साँग कसं बनलं?
यशच्या प्रवासात विलेपार्ले-बामणवाडा या त्याच्या वस्तीचा मोठा वाटा आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये वस्त्यांमध्ये रस्त्यावर अनेक लोक लहान मुलांपासून वयोवृद्ध मोठ्या कष्टाने जगत राहत आहेत. त्यामुळे हे सर्व पाहून यशला लिहिण्याची ताकद मिळते असं तो सांगतो.
हिपहॉप रॅप हे त्याच्यासाठी एक माध्यम आहे, त्यामुळे आपलं कल्चर तो त्यात मिसळून गाणी बनवतो. विशेषता बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर अनुयायी या संदर्भात अनेक गाण्यात उल्लेख करतो.
आपल्या गाण्यातून जनजागृती व्हावी आणि लोकांची परिस्थिती मांडली जावी हा त्याचा नेहमी प्रयत्न असतो.
त्यातूनच आपल्या वस्तीवर साजरी होणारी आंबेडकर जयंती आणि गणेश चतुर्थी यात जल्लोषपूर्ण वातावरण यावरून धिंगाणा सारखा लोकप्रिय रॅप साँग त्याने बनवले.
अन् हसल या रॅप शोमध्ये त्याने तो सादर केला. भरभरून प्रतिसाद या गाण्याला सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.
याबाबत यश सांगतो, “मी ज्या परिसरामध्ये राहतो तिथे गणेश चतुर्थी 14 एप्रिल असे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. 14 एप्रिलला तर एकच जल्लोष सर्वत्र पाहायला मिळतो. त्यातूनच धिंगाणा सारखा एक जोश आणि उत्साह आणणार गाणं मी लिहिलं.”
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी कायम प्रेरणादायी आहेत. लहानपणापासून आई-वडील आणि आजूबाजूच्या लोकांकडून मी बाबासाहेबांबद्दल खूप ऐकलं. बाबासाहेब होते त्यामुळे आम्ही आहोत. माझ्यासाठी माझे अनुभव लिहिणे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी ते गाण्यात लिहितो. पुढे देखील जसजशी परिस्थिती बदलत जाईल, त्याप्रमाणे मी अशाच प्रकारे लिहित जाईल”, असं यश सांगतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC