Source :- BBC INDIA NEWS
1 तासापूर्वी
भारतीय क्रीडा क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरच्या पाचव्या पर्वासाठी आज (16 जानेवारी) नॉमिनीजची घोषणा केली जाणार आहे.
या अवॉर्डच्या माध्यमातून 2024 मध्ये भारतीय क्रीडा क्षेत्रातील महिला खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान केला जाणार आहे.
बीबीसीच्या कोणत्याही भारतीय भाषांच्या वेबसाइट्सवर किंवा बीबीसी स्पोर्ट वेबसाइटवर जाऊन तुमच्या आवडत्या ‘इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर’ला तुम्ही व्होट करू शकता.
बीबीसीनं निवडलेल्या पॅनेलनं पाच भारतीय महिला क्रीडापटूंची यादी तयार केली आहे. या ज्युरीमध्ये देशभरातील काही नामांकित क्रीडा पत्रकार, तज्ज्ञ आणि लेखकांचा समावेश आहे.
1 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कॅलेंडर वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच भारतीय महिला क्रीडापटूंना या ज्युरीनं नॉमिनेट केलं आहे.
ज्या महिला क्रीडापटूला सर्वाधिक व्होट्स मिळतील, ती खेळाडू बीबीसी ‘इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर’ ठरेल आणि त्याचा निकाल बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाइट्स आणि बीबीसी स्पोर्ट वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.
व्होटिंग 31 जानेवारी 2025, 18:00 जीएमटीपर्यंत (23:30 आयएसटी) सर्वांसाठी खुले राहील. या स्पर्धेचे विजेते 17 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्ली येथे होणाऱ्या एका समारंभात जाहीर केले जातील. याबाबतचे सर्व नियम आणि अटी तसेच गोपनीयतेचे धोरण वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
या समारंभात, बीबीसी ज्युरींनी नॉमिनेट केलेल्या इतर तीन महिला क्रीडापटूंचा देखील सन्मान करणार आहे.
युवा खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेणारा ‘बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर’ अवॉर्ड, भारतीय क्रीडा क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ महिला खेळाडूला ‘बीबीसी लाइफटाइम अचिव्हमेंट’ अवॉर्ड आणि दिव्यांग श्रेणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूला ‘बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर’ अवॉर्ड दिला जाईल.
या पुरस्कार सोहळ्याशिवाय, बीबीसी चॅम्पियन्स चॅम्पियन्सच्या थीमवर एक विशेष डॉक्युमेंटरी आणि वृत्तांत प्रसिद्ध करणार आहे. ज्यामध्ये क्रीडा चॅम्पियन्स घडवणाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले जाईल.
यंदाचे हे पाचवे पर्व आहे. महिला क्रीडापटूंच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी बीबीसीने 2019 मध्ये ‘इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर’ अवॉर्ड सुरु केला होता. पहिल्या पर्वात तत्कालीन केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यावेळी भारतातील अव्वल बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही. सिंधूला विजेते घोषित करण्यात आले होते.
2020 च्या पर्वाची विजेती जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोनेरू हम्पी होती. तर वेटलिफ्टर मीराबाई चानूने 2021 आणि 2022 चा बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला.
क्रिकेटपटू शेफाली वर्मा आणि शूटर मनू भाकर हे इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर अवॉर्डचे मानकरी ठरले. ॲथलीट पीटी उषा, अंजू बॉबी जॉर्ज, वेटलिफ्टर कर्नम मल्लेश्वरी आणि हॉकीपटू प्रीतम सिवाच हे लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराचे विजेते ठरले होते.
मागील पर्वात बीबीसी इंडियन पॅरा-स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड कमिटमेंट आणि विविधतेचा भाग म्हणून सादर करण्यात आला. त्या अवॉर्डची पहिली विजेती टेबल टेनिसपटू भावना पटेल होती.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC