Source :- BBC INDIA NEWS

मुअम्मर गद्दाफी

फोटो स्रोत, Getty Images

लिबिया म्हटलं की कर्नल मुअम्मर गद्दाफी असंच समीकरण गेल्या दशकांमध्ये झालं होतं. लिबियाचे हुकुमशहा म्हणून ते जगाला परिचित होते. त्यांनी लिबियाला अरब देशांमध्ये एक वेगळं स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न केला. ते एका बंडाद्वारे लिबियाच्या सत्तेत आले होते.

अरब स्प्रिंगच्या बंडात फक्त गद्दाफी यांची सत्ताच संपुष्टात आली नाही, तर त्यांना जीवदेखील गमवावा लागला.

लिबियाच्या कर्नल मुअम्मर गद्दाफींचा उदय आणि अस्ताची माहिती देणारा हा लेख.

16 जानेवारी 1970 ला मुअम्मर गद्दाफी लिबियाचे पंतप्रधान झाले होते. त्यावेळेस त्यांच्या ध्यानीमनीदेखील नसेल की पुढील 42 वर्षे लिबियात त्यांची सत्ता असेल आणि त्याची परिणती कशात होईल.

त्यांच्या राजवटीत त्यांना झालेला प्रत्येक विरोध त्यांनी अतिशय निर्दयीपणे चिरडून टाकला.

बहुधा यामुळेच त्यांच्याविरोधात कोणतंही नेतृत्व उभं राहू शकलं नाही.

2011 मध्ये ट्यूनिशियातून सुरू झालेल्या ‘अरब स्प्रिंग’च्या वादळानं कर्नल मुअम्मर गद्दाफी यांनादेखील वाहून नेलं. 20 ऑक्टोबर 2011 ला मुअम्मर गद्दाफी बंडखोरांकडून मारले गेले.

गद्दाफी लिबियातील बद्दू टोळीतील एका शेतकऱ्याचा मुलगा होता. एका गावातून सुरूवात झालेले गद्दाफी पुढे अरब जगतातील प्रभावशाली नेते कसे बनले?

सैन्यात भरती आणि झपाट्यानं प्रगती

एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकानुसार, मुअम्मर गद्दाफी यांचा जन्म 1942 मध्ये झाला होता. त्यांचे वडील एक बद्दू शेतकरी होते.

शालेय शिक्षण घेतल्यानंतर मुअम्मर गद्दाफी बेनगाझी मध्ये विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेले होते.

गद्दाफी यांचा राजकारणाकडे असलेला कल आणि त्यांची विचारधारा यामुळे 1961 मध्ये त्यांना विद्यापीठातून काढण्यात आलं होतं.

यादरम्यान मुअम्मर गद्दाफी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ लिबियातून कायद्याची पदवी घेतली. तिथे त्यांना लिबियाच्या सैन्यात भरती होण्याची संधी मिळाली.

मुअम्मर गद्दाफी यांचे वडील एक बद्दू शेतकरी होते

फोटो स्रोत, Getty Images

सैन्यात नोकरी करत लिबियात चांगलं शिक्षण घेता येत होतं. सैन्याकडे एक चांगला आर्थिक पर्याय म्हणून पाहिलं जात होतं. म्हणूनच बहुधा उच्च शिक्षण घेण्यासाठी गद्दाफी सैन्यात भरती झाले होते. त्यांच्या या निर्णयामुळे ते सत्तेच्या वर्तुळात पोहोचले होते. तारुण्यात मुअम्मर गद्दाफी इजिप्तचे जमाल अब्दुल नासिर आणि त्यांच्या धोरणांचे समर्थक होते.

1956 मध्ये इजिप्तनं सुएझ कालव्याचं राष्ट्रीयीकरण केल्यानंतर ब्रिटन, फ्रान्स आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्याच्या विरोधात अरब जगतात जी निदर्शनं सुरू झाली होती, त्यात मुअम्मर गद्दाफी यांनी भाग घेतला होता.

लिबियामध्ये लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गद्दाफी यांना 1965 मध्ये प्रशिक्षणासाठी ब्रिटनला पाठवण्यात आलं होतं.

लिबियाच्या सैन्यात मुअम्मर गद्दाफी यांनी अतिशय झपाट्यानं प्रगती केली, वरच्या पदांवर गेले. याचदरम्यान ते शाही कुटुंबाच्या विरोधात बंड करण्याची योजना बनवू लागले होते.

लिबियात शाही कुटुंबाच्या राजवटीविरोधात बंड करण्याची योजना लष्करी प्रशिक्षणाच्या काळापासूनच मुअम्मर गद्दाफी यांच्या मनात होती. शेवटी 1969 मध्ये ब्रिटनमध्ये प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बेनगाझी शहराला केंद्र बनवत लष्करी बंड केलं. हे बंड संपलं तेव्हा गद्दाफी लिबियाचे राष्ट्राध्यक्ष झाले होते.

लाल रेष
लाल रेष

बंड आणि कच्चे तेल

1 सप्टेंबर 1969 ला कर्नल मुअम्मर गद्दाफी यांच्या नेतृत्वाखाली सैन्यानं लिबियातील राजेशाही उलथवत सत्ता हाती घेतली.

स्वत: गद्दाफी लष्कराचे कमांड इन चीफ झाले आणि त्याचबरोबर क्रांती परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून देशाचे राष्ट्राध्यक्ष देखील झाले. मात्र तरीही त्यांनी लष्करातील कर्नल हा दर्जा स्वत:च्या नावापुढे राहू दिला.

सत्ता हाती येताच गद्दाफी यांनी अमेरिकन आणि ब्रिटिश लष्करी तळांना संपवत 1970 मध्ये इटालियन आणि ज्यू लोकांना देखील देशाबाहेर हुसकावून लावलं.

1973 मध्ये कर्नल गद्दाफी यांनी देशातील कच्च्या तेलाच्या सर्व केंद्राचं राष्ट्रीयीकरण केलं. तसंच त्यांनी लिबियात दारू आणि जुगारावर देखील बंदी आणली.

मुअम्मर गद्दाफी यांनी त्यांच्या राजवटीत दारू आणि जुगारावर बंदी घातली होती

फोटो स्रोत, Getty Images

याचदरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आव्हान देत म्हटलं होतं, “जे लोक पाच हजार वर्षांपर्यंत तेलाशिवाय जिवतं राहिले, ते त्यांच्या अधिकारांच्या संघर्षासाठी आणखी काही वर्षेसुद्धा तेलाशिवाय जिवंत राहू शकतात.”

त्यांनी दिलेल्या आव्हानाचा योग्य तो परिणाम झाला. त्यानंतर स्वत:च्या देशात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या उत्पादनाचा मोठा भाग ताब्यात घेण्यात यशस्वी होणारा लिबिया हा पहिला विकसनशील देश बनला.

इतर अरब देशांनी देखील या उदाहरणातून लवकरच धडा घेत 1970 च्या दशकात अरब पेट्रोल बूम म्हणजे अरब देशांमध्ये कच्च्या तेलाच्या क्रांतीचा पाया घातला.

याप्रकारे ‘काळ्या सोन्याचा’ म्हणजे कच्च्या तेलाचा फायदा घेण्याच्या चांगल्या स्थितीत लिबिया आला होता. कारण आखाती देशात कच्च्या तेलाचं जितकं उत्पादन होत होतं, तितकंच ते लिबियात देखील होत होतं. मात्र या आफ्रिकन देशाची एकूण लोकसंख्या फक्त 30 लाख होती.

याप्रकारे कच्च्या तेलामुळे लिबिया लवकरच खूप श्रीमंत झाला.

इस्रायलशी चर्चा करून मार्ग काढण्याला कर्नल गद्दाफी यांचा तीव्र विरोध होता. त्यामुळेच इजिप्त आणि इस्रायलमधील शांतता करार अमान्य असणारे अरब जगतातील नेते म्हणून ते उदयाला आले.

गद्दाफी यांची भूमिका

1970 च्या सुरूवातीला गद्दाफी यांनी ‘ग्रीन बुक’ नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचा राजकीय दृष्टीकोन, राजकीय धोरण लोकांसमोर मांडलं. त्यांच्या धोरणानुसार इस्लामी समाजवादाला प्राधान्य देण्यात आलं, तसंच आर्थिक किंवा वित्तीय संस्थांचं राष्ट्रीयीकरण जाहीर करण्यात आलं.

या पुस्तकानुसार समाजाच्या समस्यांचं निराकारण लोकशाही किंवा इतर कोणत्याही व्यवस्थेत नव्हतं. लोकशाही म्हणजे सर्वात मोठ्या पक्षाची हुकुमशाही असं गद्दाफींचं म्हणणं होतं. गद्दाफींच्या मते, सरकार अशा समित्यांद्वारे चालवलं गेलं पाहिजे ज्या सर्वच गोष्टींना जबाबदार असतील.

1979 मध्ये गद्दाफी यांनी औपचारिकरित्या लिबियाचं नेतृत्वं सोडलं. त्यांनी दावा केला की आता ते फक्त क्रांतीकारी नेते आहेत. मात्र लिबियातील सत्ता आणि ताकद त्यांच्याच हाती राहिली.

गद्दाफी यांच्या सरकारवर अनेक जीवघेण्या घटनांचा आरोप होता

फोटो स्रोत, Getty Images

आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्नल गद्दाफी आणि त्यांचं सरकार त्यांच्या अनपेक्षित निर्णयांमुळे प्रसिद्ध झालं.

कारण त्यांनी जगभरातील अनेक संघटनांना पैसे पुरवले. यामध्ये अमेरिकन ब्लॅक पॅंथर्स आणि नेशन ऑफ इस्लाम सारख्या संघटनांचाही समावेश होता. उत्तर आयर्लंडमधील आयरिश रिपब्लिकन आर्मी (आयआरए) या संघटनेलाही त्यांनी पाठिंबा दिला.

लिबियाच्या गुप्तहेरांवर परदेशात टीका होत राहिली. त्याच काळात अनेक जीवघेण्या घटनांचा आरोपदेखील गद्दाफी सरकारवर झाला. मग 1986 मध्ये एक अशी घटना घडली, जी सर्वात महत्त्वाची ठरली.

हे प्रकरण जर्मनीतील होतं. जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिनमध्ये एका क्लबमध्ये स्फोट झाला. या क्लबमध्ये अमेरिकन सैनिक जात असत. या स्फोटामागे लिबियाचे गुप्तहेर असल्याचा आरोप झाला.

कार्ड

त्यावेळेस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन होते. दोन सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी त्रिपोली आणि बेनगाझीवर हवाई हल्ले करण्याचा आदेश दिला. या हल्ल्यांमुळे लिबियाचं मोठं नुकसान झालं आणि त्यात अनेक नागरिक मारले गेले.

जे लोक मारले गेले त्यात कथितरित्या कर्नल गद्दाफी यांची मानलेली मुलगी देखील होती. मात्र स्वत: गद्दाफी यात हल्ल्यात बचावले.

यानंतर 1988 मध्ये ‘पॅन अॅम’ या अमेरिकन हवाईसेवा कंपनीचं विमान स्कॉटलंडमधील लॉकरबी या शहरात कोसळलं. त्यात 270 जणांचा मृत्यू झाला.

हे विमान कोसळण्यामागेदेखील लिबियाचा हात असल्याचा आरोप झाला.

लॉकरबी करार

लॉकरबी स्फोटातील दोन संशयित आरोपींना स्कॉटलंडच्या ताब्यात देण्यात सुरूवातीला गद्दाफी यांनी नकार दिला होता.

यानंतर लिबियावर निर्बंध आणि वाटाघाटींची एक मालिकाच सुरू झाली होती. 1999 मध्ये अखेर गद्दाफी यांनी त्या दोन संशयित आरोपींना स्कॉटलंडच्या ताब्यात दिल्यानंतर हे सर्व थांबलं.

त्यातील एकाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली तर दुसऱ्याची सुटका करण्यात आली होती.

ऑगस्ट 2003 मध्ये लिबियानं संयुक्त राष्ट्रसंघाला एक पत्र लिहिलं होतं. त्यात लिबियानं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती आणि या घटनेची झळ पोहोचलेल्या लोकांना जवळपास 2.7 अब्ज डॉलरची नुकसान भरपाई दिली होती.

त्याबदल्यात सप्टेंबर 2003 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं लिबियावर लावलेले निर्बंध हटवले होते.

यानंतर 1989 मध्ये नष्ट झालेल्या फ्रान्सच्या एका प्रवासी जहाजाबरोबरच बर्लिन क्लबमधील स्फोटाची झळ पोहोचलेल्या लोकांना लिबियानं नुकसान भरपाई दिली.

कर्नल गद्दाफी टीव्हीवर अनेकदा तंबूत राहताना दिसायचे

फोटो स्रोत, Getty Images

लॉकरबी करार किंवा तडजोड झाल्यानंतर आणि लिबियामध्ये गुप्तपणे आण्विक आणि रासायनिक कार्यक्रम सुरू असल्याचं कर्नल गद्दाफी यांनी मान्य केल्यानंतर आणि तो कार्यक्रम थांबवत असल्याचं गद्दाफी यांनी जाहीर केल्यानंतर पाश्चात्य देशांशी लिबियाचे संबंध चांगले होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

आंतरराष्ट्रीय निर्बंध संपल्यावर लिबियाचं आंतरराष्ट्रीय राजकारणात पुनरागमन झालं.

यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेयरसह अनेक बडे नेते गद्दाफी यांच्या आलिशान महालातील त्यांच्या बद्दू तंबूत दिसले.

कर्नल गद्दाफी जेव्हा युरोप, अमेरिकेसह इतर आंतरराष्ट्रीय दौरे करायचे, तेव्हा हा तंबू त्यांच्यासोबतच असायचा. या काळात युरोपातील शस्त्रास्त्रं बनवणाऱ्या कंपन्या आणि तेल कंपन्यांबरोबर लिबियानं अनेक करार केले.

कर्नल गद्दाफी नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी किंवा पद्धतींसाठी प्रसिद्ध होते. ते त्यांच्या तंबूत राहत असल्याचं अनेकदा टीव्हीवर दिसायचं.

असं म्हटलं जायचं की त्यांच्या खासगी सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या अधिक होती.

अरब जगतातील बदल

फेब्रुवारी 2011 मध्ये ट्युनिशिया आणि इजिप्तमध्ये सर्वसामान्य लोकांनी केलेल्या निदर्शनांमुळे जैनुल आबेदीन आणि हुस्नी मुबारक यांची प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली सत्ता संपुष्टात आली. त्याचबरोबर लिबियामध्ये मुअम्मर गद्दाफी यांच्या विरोधात देखील निदर्शनं सुरू झाली.

देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांना नियंत्रणात आणण्यासाठी गद्दाफी यांच्या सरकारनं बळाचा वापर केला. पोलीस आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्या संस्थांनी निदर्शकांवर गोळीबार केला.

निदर्शकांच्या विरोधात लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सचा देखील वापर करण्यात आला.

लिबियाच्या सरकारनं उचललेल्या या पावलांचा आंतरराष्ट्रीय समुदाय आणि मानवाधिकार संघटनांनी देखील निषेध केला.

दुसऱ्या बाजूला कर्नल गद्दाफी यांच्या सरकारमधील वरिष्ठ अधिकारी देखील या स्थितीमुळे नाराज झाले. यातूनच कायदा मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि अनेक राजदूतांनी देखील सरकारवर टीका केली.

बंड झालेलं असूनदेखील त्रिपोलीवर गद्दाफी यांचंच नियंत्रण होतं

फोटो स्रोत, Getty Images

22 फेब्रुवारीला कर्नल गद्दाफी यांनी सरकारी वाहिनीवर भाषण दिलं. त्यात त्यांनी राजीनामा देण्यास नकार देत, निदर्शक ‘देशद्रोही’ असल्याचं म्हटलं.

त्यांनी दावा केला की विरोधी पक्षाला अल-कायदाचं संरक्षण आहे आणि निदर्शक अंमली पदार्थांचा वापर करत आहेत. गद्दाफींनी त्यांच्या समर्थकांना सांगितलं की त्यांनी निदर्शकांपासून त्यांचं रक्षण करावं.

मात्र हळूहळू गद्दाफी यांची सत्तेवरील पकड सुटत चालली होती आणि फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत त्यांच्या विरोधकांनी लिबियातील मोठ्या प्रदेशावर ताबा मिळवला होता.

यानंतर त्रिपोलीमध्ये देखील मोर्चेबांधणी करत वेढा घालण्यात आला. तिथे गद्दाफी एकटे पडले होते. राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावरील दबाव वाढत चालला होता.

28 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं गद्दाफी सरकारवर नवे निर्बंध लागू केले. त्यांच्या कुटुंबाची संपत्ती देखील गोठवली.

28 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केलं की कर्नल गद्दाफी यांच्याशी संबंधित 30 अब्ज डॉलरची संपत्ती गोठवण्यात आली आहे.

त्या दिवशी कर्नल गद्दाफी यांनी पाश्चात्य प्रसारमाध्यमांना एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी दावा केला की अजूनही जनतेचं त्यांच्यावर प्रेम आहे.

त्यांच्या सरकारनं निदर्शकांविरोधात बळाचा वापर केला, या आरोपांचं त्यांनी खंडन केलं.

त्यांनी असाही दावा केला की त्यांच्या विरोधकांना अल कायदाचं संरक्षण आहे.

कार्ड

कर्नल गद्दाफी यांच्या लष्करानं देखील आश्चर्यकारकरित्या बराचसा प्रदेश बंडखोरांच्या ताब्यातून परत घेतला. अशात जेव्हा लिबियाचं सैन्य बेनगाझीकडे पुढे सरकत होतं, तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेनं 17 मार्चला लिबियात लष्करी हस्तक्षेप करण्यास परवानगी दिली.

त्यानंतर ‘नाटो’कडून लिबियात हवाई हल्ले करण्यात आले आणि त्यामुळे कर्नल गद्दाफी यांच्या सैन्याचं मोठं नुकसान झालं.

मार्च अखेरीस दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बाजू बदलली आणि बंडखोरांना सामील झाले. त्याचा कर्नल गद्दाफी यांच्या सरकारला मोठा धक्का बसला. मात्र त्रिपोलीवर गद्दाफी यांचं नियंत्रण होतं. त्यांनी जाहीर केलं की ते बंडखोरांना सर्वप्रकारे विरोध करतील.

30 एप्रिलला नाटोच्या हवाई दलानं त्रिपोलीतील गद्दाफी यांच्या बाब अल-अजीजिया वर हल्ला केला. त्यात गद्दाफी यांचा धाकटा मुलगा सैफ अल-अरब आणि तीन नातू मारले गेले. हा हल्ला गद्दाफी यांच्यावरच करण्यात आला होता, मात्र ते त्यातून बचावले.

कर्नल गद्दाफी यांचा मृत्यू

27 जूनला कर्नल गद्दाफी, त्यांची मुलं आणि गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले.

त्यानंतर ऑगस्टमध्ये बंडखोर लिबियाची राजधानी असलेल्या त्रिपोलीमध्ये शिरले. 23 ऑगस्टला गद्दाफी यांच्या बाब अल-अजीजिया हे मुख्यालय बंडखोरांनी ताब्यात घेतलं.

मात्र स्वत: गद्दाफी मात्र कुठेतरी गायब झाले होते. त्यांनी अनेक ऑडिओ संदेश देत लिबियातील जनतेला बंडखोरांच्या विरोधात लढा देण्याचं आवाहन केलं.

गद्दाफी यांची माहिती देणाऱ्याला बंडखोरांकडून 11.7 लाख डॉलरचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं.

या सर्व परिस्थितीत किनारपट्टीवरील सिएर्त नावाच्या शहराला वेढा घालण्यात आला. काही सूत्रांनुसार कर्नल गद्दाफी यांनी त्यांच्या काही समर्थकांसह हा वेढा तोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.

गद्दाफी यांचा आरोप होता की त्यांच्या विरोधकांना अल-कायदाचं संरक्षण मिळालेलं आहे

फोटो स्रोत, Getty Images

गाड्यांमध्ये असलेले कर्नल गद्दाफी आणि त्यांचे सहकारी बंडखोरांच्या सैन्याशी लढत तिथून निसटण्याचा प्रयत्न करत होते.

गाड्यांच्या या ताफ्यात कर्नल गद्दाफी यांच्या सैन्याचे प्रमुख अबू बकर युनूस आणि गद्दाफी यांचे पुत्र मोतसिम देखील होते. त्याचवेळेस नाटोच्या लढाऊ विमानानं या ताफ्यावर हल्ला केला.

नाटोच्या या हल्ल्यात पंधरा हत्यारबंद गाड्या नष्ट झाल्या. मात्र कर्नल गद्दाफी आणि त्यांचे काही सहकारी या हल्ल्यातून बचावले.

त्यानंतर गद्दाफी ड्रेनेज म्हणजे सांडपाण्याच्या दोन मोठ्या पाईपांमध्ये लपले. काही वेळातच बंडखोर सैनिक देखील तिथे पोहोचले.

सालिम बकेर नावाच्या एका बंडखोर सैनिकानं नंतर रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं, “आधी आम्ही अॅंटी एअरक्राफ्ट गनद्वारे कर्नल गद्दाफी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गोळीबार केला. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही.”

“मग आम्ही पायी गद्दाफी यांच्याकडे गेलो. कर्नल गद्दाफी आणि त्यांचे सहकारी जिथे लपले होते, त्या जागेच्या जवळ जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा अचानक गद्दाफी यांचा एक सैनिक हवेत बंदूक हलवत बाहेर आला. त्यानं मला पाहताच माझ्यावर गोळीबार करण्यास सुरूवात केली.”

सालिम बकेर म्हणाले, “त्या सैनिकानं ओरडून सांगितलं की माझे मालक इथे आहेत. माझे मालक इथे आहेत आणि ते जखमी आहेत.”

कार्ड

सालिम बकेर यांचं म्हणणं होतं की, “आम्ही कर्नल गद्दाफी यांना बाहेर निघण्यास भाग पाडलं. त्या वेळेस ते म्हणाले की हे का होतं आहे.”

एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की गद्दाफी दिसताच त्यांना 9 एमएम गनमधून गोळी मारण्यात आली. त्यानंतर अतिशय गंभीररित्या जखमी अवस्थेत असलेल्या कर्नल गद्दाफी यांना अटक करण्यात आली.

अल-जजीरा या वृत्तवाहिनीवर जे फुटेज दाखवण्यात आलं, त्यात गद्दाफी गंभीररित्या जखमी अवस्थेत होते. बंडखोर सैनिक जखमी अवस्थेतील गद्दाफी यांना मारहाण करत होते.

यानंतर जे घडलं त्याबद्दलचं चित्र स्पष्ट नाही.

मात्र लिबियाच्या हंगामी राष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधान महमूद जिब्रिल यांनी नंतर पत्रकारांना सांगितलं की कर्नल गद्दाफी यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार त्यांचा मृत्यू गोळ्या लागल्यामुळे झाला.

महमूद जिब्रिल म्हणाले होते, “कर्नल गद्दाफी यांना जिवंत पकडण्यात आलं होतं आणि त्यांनी कोणताही विरोध केला नव्हता. मात्र जेव्हा त्यांना गाडीतून तिथून नेण्यात येत होतं, तेव्हा ती गाडी दोन्ही बाजूनं सुरू असलेल्या गोळीबारात सापडली आणि एक गोळी कर्नल गद्दाफी यांच्या डोक्याला लागली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.”

‘खिलाफतचं स्वप्न’

कर्नल गद्दाफी एक हुकुमशहा होते. त्यांनी चार दशकं लिबियावर राज्य केलं. कच्चे तेल आणि इतर अनेक व्यवसायांमुळे त्यांचं कुटुंब श्रीमंत झालं. असं म्हटलं जातं की, कर्नल गद्दाफी यांचं धोरण निष्ठा खरेदी करण्याचं होतं. त्यासाठी त्यांनी संपत्तीचा वापर केला.

दुसऱ्या बाजूला गद्दाफी यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. त्यातील एका प्रकल्पाअंतर्गत लिबियाच्या उत्तर भागात पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

आपल्या पोशाखाबरोबरच गद्दाफी त्यांच्या वक्तव्यांसाठी देखील प्रसिद्ध होते. एकदा त्यांनीच असंच वक्तव्यं केलं होतं की, पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांचा एकच देश झाला पाहिजे, त्यांचं एकत्रीकरण झालं पाहिजे, कारण दोन वेगवेगळे देश होऊ शकतील इतकी जमीन तिथे नाही.

गद्दाफी स्वत:ला आफ्रिकेच्या 'बादशाहांचे बादशाह' म्हणत असत

फोटो स्रोत, Getty Images

अरब लीगच्या बैठकांमध्ये ते सिगारचा धूर सोडायचे आणि स्वत:ला आफ्रिकेतील ‘बादशाहांचा बादशाह’ म्हणायचे.

काळानुसार गद्दाफी यांच्या विचारसरणीत, धोरणात देखील बदल होत गेला. सुरुवातीला त्यांनी अरब राष्ट्रांना एकत्र आणण्याची घोषणा दिली. स्वत:ला जमाल अब्दुल नासिर यांच्यासारख्या अरब राष्ट्रवादी नेत्यासारखं सादर केलं.

मात्र, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, हे स्वप्न पूर्ण होणं कठीण आहे. तेव्हा त्यांनी आफ्रिकेकडे लक्ष वळवण्यास सुरूवात केली. मग त्यांनी स्वत:ला आफ्रिकेचा नेता म्हणून सादर करायला सुरूवात केली.

मग एक वेळ अशी आली की त्यांनी इस्लामी जगतावर लक्ष देण्यास सुरूवात केली. ते असंही म्हणाले की, उत्तर आफ्रिकेत सुन्नी आणि शिया यांच्यातील मतभेद संपवण्यासाठी दुसरी फातमी खिलाफत स्थापन करण्यात यावी.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC