Source :- BBC INDIA NEWS
महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या यशानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली. पण मंत्रिमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटप चांगलाच लांबला होता. हे पार पडल्यानंतर पालकमंत्रिपदाची प्रतिक्षा करावी लागली.
पालकमंत्रिपदावरून महायुतीच्या तिन्ही पक्षांत चांगलीच रस्सीखेच दिसून आली. अखेर 18 जानेवारीला रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आणि सगळ्या चर्चांचा शेवट झाला.
आता पालकमंत्रिपदाच्या यादीतील नावांचा विचार करता यातून राजकीय बरेच राजकीय अर्थ निघत असल्याचं पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोली जिल्हा स्वतःकडं ठेवला आहे. त्याचवेळी बीड जिल्ह्यात मुंडे बंधू-भगिणींऐवजी अजित पवारांवर जबाबदारी टाकली आहे, तर मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईची जबाबदारी एकनाथ शिंदेंवर टाकण्यात आली आहे.
पालकमंत्रिपद हे एखाद्या जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. शासकीय आणि राजकीय अशा दोन्ही दृष्टीने या पदावरील व्यक्तीकडे येणारे अधिकार जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतात. त्यामुळंच याकडं लक्ष लागलेलं होतं.
पण त्याचबरोबर शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीचा विचार करता, राजकीय दृष्टीकोनातूनही विचार करून निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहेत.
या यादीतील नावांचा विचार करता काही प्रमुख राजकीय गोष्टी समोर आल्या आहेत.
1) बीडचा निर्णय दुहेरी धक्कादायक
बीडच्या केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि केले जाणारे आरोप पाहता, धनंजय मुंडेंचा पत्ता कट होणार अशी शक्यता आधीच वर्तवली जात होती. तेच पालकमंत्रिपदाची यादी पाहता, झालेलं दिसून येतंय.
मात्र, त्याचवेळी धनंजय मुंडे नसले तरी बीड जिल्ह्याची जबाबदारी पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडं जाईल, असंही म्हटलं जात होतं. या शक्यतेलाही छेद मिळाला. त्यामुळे हा निर्णय दुहेरी धक्कादायक ठरला.
बीडची जबाबदारी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी स्वतःकडं ठेवली, तर पंकजा मुंडे यांच्यावर जालना जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
एकूणच बीडच्या पालकमंत्रिपदावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही बाजूला ठेवण्यात आलं आहे.
एकीकडं याद्वारे लोकभावनेचा सन्मान करत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न आहे.
त्याचवेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात सगळं काही आलबेल असलं आणि महायुतीत ते एकत्र असले तरी पंकजांना बीडपासून दूर ठेवत एकप्रकारे त्यांना पुन्हा जिल्ह्यात शक्ती वाढवण्याच्या संधीपासून दूर ठेवणं ही त्यामागची रणनिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीडच्या पालकमंत्रिपदी अजित पवार यांचं नाव समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अजित पवारांचं अभिनंदन करत म्हटलंय की, “बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता आदरणीय मुख्यमंत्री महोदय व आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय यांना मी स्वतः बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद आदरणीय अजितदादांनी स्वीकारण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार दादांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले, याचा मला आनंद वाटतो.”
तसंच, “सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको, अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री महोदयांचे आभार! मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील,” असंही धनंजय मुंडे म्हणाले.
2) रायगडमध्ये तटकरेच, गोगावलेंची निराशा
रायगडचं पालकमंत्रिपद अखेर राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना आणि आता महायुतीच्या सरकारमध्येही सातत्यानं भरत गोगावले यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद देण्यास विरोध दर्शवला होता.
रायगडमधील शिवसेनेचे आमदार जाहीरपणे भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्रिपद देण्याची मागणी करत होते. पण अशातही आदिती तटकरे यांनी रायगडचं पालकमंत्रिपद पुन्हा एकदा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवलं आहे.
अजित पवार गटानं याठिकाणीही माघार घेण्यास नकार देत, त्यांना हवे असलेले जिल्हे ते त्यांच्या पदरात पाडून घेण्यात यश मिळवलं आहे.
भरत गोगावले हे कॅबिनेट मंत्री असूनही, त्यांच्याकडे एकाही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं नाहीय.
त्याचवेळी कोकणात सिंधुदुर्गात नारायण राणेंचे पुत्र आणि मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नितेश राणे यांच्या खांद्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळं भाजपनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न या माध्यमातूनही केल्याचं दिसतं.
पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पालकमंत्रिपदाची यादी धक्कादायक असल्याचं म्हटलं.
गोगावले म्हणाले, “मी वरिष्ठांना फोन केला होता. मात्र, याबाबत माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. हा निर्णय मला धक्कादायक वाटतो. आम्हाला ही अपेक्षा नव्हती. पालकमंत्री म्हणून माझी निवड व्हावी असं संपूर्ण रायगड जिल्ह्यात वातावरण झालेलं होतं.”
“परंतु, ठीक आहे. आता आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल,” असंही गोगावलेंनी नमूद केलं.
3) कुणाची सरशी तर कुणाची माघार
काही मतदारसंघांमध्ये अगदी थेट चर्चा किंवा आरोप प्रत्यारोप सुरू असले तर, अशा प्रकारे दोन पक्षांचा दावा असलेले अनेक जिल्हे होते. त्याठिकाणी काय होणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं.
मुंबईपासून सुरुवात करायची झाल्यास भाजप आणि शिवसेना यांच्यात यासाठी रस्सीखेच होती. त्यात शिंदेंकडं मुंबई ठेवत भाजपनं उपनगरांची जबाबदारी घेतली.
तसंच एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळं ठाण्याकडंही लक्ष होतं. तिथंही शिंदेंनी बाजी मारली. तर गणेश नाईक यांच्याकडे पालघरची जबाबदारी देण्यात आली आहे.
याशिवाय पुण्यातही पालकमंत्रिपदासाठी अजित पवार आणि भाजपचे चंद्रकांत पाटील दोघांचेही दावे असल्याच्या चर्चा होत्या. पण अजित पवारांनी पुण्यावरील ताबा कायम ठेवला आणि चंद्रकांत पाटलांना इथं माघार घ्यावी लागली.
गिरीश महाजनांनाही जळगावचा मोह सोडावा लागला. त्याठिकाणी शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांवर जबाबदारी देण्यात आली. तर महाजनांकडे नाशिकचं पालकत्व आलं.
4) चार मंत्री असलेला सातारा जिल्हा
राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये यावेळी सातारा जिल्ह्याचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळालं. या जिल्ह्यातील चार आमदारांना राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलं.
शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील यांचा त्यात समावेश होता. त्यामुळं या चौघांपैकी कुणाकडं ही जबाबदारी जाणार याची चांगलीच चर्चा रंगली होती.
अखेरीस शिवसेनेच्या शंभूराज देसाईंनी या शर्यतीत बाजी मारली आहे. साताऱ्याचे पालकमंत्रिपद शंभूराज देसाईंकडे आलं आहे.
एकूणच एकनाथ शिंदेंनी आपलं मूळ गाव असलेला सातारा जिल्हा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं आहे.
5) जिल्ह्यांची अदलाबदली
अनेक नेत्यांना त्यांची कर्मभूमी असलेले जिल्हे सोडून इतर जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
यात महत्त्वाचं नाव म्हणजे पंकजा मुंडेंना जालन्याचं, तर शिवेंद्रसिंह भोसले साताऱ्याचे असताना, त्यांना लातूरचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.
ठाण्याच्या प्रताप सरनाईक यांना धाराशिवचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर छत्रपती संभाजीनगरच्या अतुल सावेंना नांदेडचं पालकत्व मिळालं आहे.
तसंच नरहरी झिरवाळ यांना हिंगोली, तर हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना नंदुरबार, तर जळगावच्या गिरीश महाजनांना नाशिक देण्यात आलंय.
6) तीन जिल्ह्यांत सह-पालकमंत्री
महायुतीच्या सरकारमध्ये सह-पालकमंत्र्यांची संख्या वाढलेली दिसून येते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वीकारलं असलं, तरी तिथं आशिष जयस्वाल यांनाही सहपालकमंत्री करण्यात आलं आहे.
कोल्हापूरचं पालकमंत्रिपद शिवसेनेचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना देण्यात आलं असलं, तरी तिथं राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना सहपालकमंत्री करण्यात आलं आहे.
मुंबई उपनगराचं पालकमंत्रिपद भाजपच्याच दोन नेत्यांना देण्यात आलं आहे. आशिष शेलार हे पालकमंत्री, तर मंगलप्रभात लोढा हे सह-पालकमंत्री असतील.
7) पालकमंत्रिपदाच्या यादीवर कुणाचा दबदबा
पालकमंत्रिपदाच्या यादीवर भाजपचं वर्चस्व दिसून येत आहे. त्याखालोखाल एकनाथ शिंदे आणि त्यानंतर अजित पवार यांचा क्रमांक लागतो.
कुणाकडे किती पालकमंत्रिपदं :
- भाजप – 21 (19 पालकमंत्रिपदं आणि 2 सह-पालकमंत्रिपदं)
- शिवसेना (शिंदे गट) – 10 (9 पालकमंत्रिपदं आणि 1 सह-पालकमंत्रिपद)
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 08
नागपूरचं पालकमंत्रिपद सोडून देवेंद्र फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वीकारलं आहे. नागपूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवण्यात आलंय.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं ठरणारं मुंबईचं पालकमंत्रिपद एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे राखण्यात यश मिळवलंय, तर पुण्याचं पालकमंत्रिपद पुन्हा अजित पवारांकडे गेलंय.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद महायुतीतल्या कुठल्या पक्षाकडे गेलंय, हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली यादी वाचा.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद कोणत्या पक्षाकडे?
भाजप – 21 (19 पालकमंत्रिपदं आणि 2 सह-पालकमंत्रिपदं)
पालकमंत्री :
- गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
- अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे-पाटील
- सांगली – चंद्रकांत पाटील
- नाशिक – गिरीश महाजन
- पालघर – गणेश नाईक
- मुंबई उपनगर – ॲड. आशिष शेलार
- धुळे – जयकुमार रावल
- जालना – पंकजा मुंडे
- नांदेड – अतुल सावे
- चंद्रपूर – अशोक उईके
- लातूर – शिवेंद्रसिंह भोसले
- सोलापूर – जयकुमार गोरे
- भंडारा – संजय सावकारे
- सिंधुदुर्ग – नितेश राणे
- अकोला – आकाश फुंडकर
- वर्धा – डॉ. पंकज भोयर
- परभणी – मेघना बोर्डीकर
सह-पालकमंत्री :
- मंगलप्रभात लोढा
- माधुरी मिसाळ
शिवसेना (शिंदे गट) – 10 (9 पालकमंत्रिपदं आणि 1 सह-पालकमंत्रिपद)
पालकमंत्री :
- ठाणे – एकनाथ शिंदे
- मुंबई शहर – एकनाथ शिंदे
- जळगाव – गुलाबराव पाटील
- यवतमाळ – संजय राठोड
- रत्नागिरी – उदय सामंत
- सातारा – शंभूराज देसाई
- छत्रपती संभाजीनगर – संजय शिरसाट
- धाराशिव – प्रताप सरनाईक
- कोल्हापूर – प्रकाश आबिटकर
सह-पालकमंत्री :
- ॲड. आशिष जयस्वाल
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 08
- पुणे – अजित पवार
- बीड – अजित पवार
- वाशिम – हसन मुश्रीफ
- रायगड – आदिती तटकरे
- नंदुरबार – माणिकराव कोकाटे
- हिंगोली – नरहरी झिरवाळ
- बुलढाणा – मकरंद जाधव (पाटील)
- गोंदिया – बाबासाहेब पाटील
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC