Source :- BBC INDIA NEWS
“महायुती सरकारमध्ये नाराजीनाट्य संपत नसल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून आपल्या गावी गेले आहेत. शिंदेंची गरज भाजपसाठी संपली आहे का? उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना आणलं, तसं शिंदे गटात नवीन ‘उदय’ पुढे येईल.”
महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (20 जानेवारी) हे वक्तव्य केलं आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, त्यातून दोन पालकमंत्रिपदं स्थगीत करण्याची नामुष्की, एकनाथ शिंदे यांनी अचाकन साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी जाऊन राहणं, अशा सर्व पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांच्या वक्तव्याला आणखीच बळ मिळालं.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं खरं, पण मुख्यमंत्रिपदाची निवड, मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप आणि आता पालकमंत्रिपदं, अशा सगळ्या टप्प्यांवर महायुतीत रस्सीखेच आणि नाराजीनाट्य दिसून आलं.
आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट गावीच जाऊन बसल्यानं आणि जी दोन पालकमंत्रिपदं स्थगीत आहेत, तिथं शिंदेंच्या शिवसेनेचाच दावा असल्यानं, एकनाथ शिंदे नाराज असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय आणि राजकीय वर्तुळातही तशीच चर्चा सुरू झालीय.
किंबहुना, आता थेट ‘शिवसेनेत नवीन ‘उदय’ पुढे येईल’ असाही दावा करण्यात आल्याने महायुतीतल्या या नाराजीचे काय पडसाद उमटतील आणि शिवसेना शिंदे गटात नेमकं काय चाललंय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
दोन पालकमंत्रिपदं स्थगीत करण्याची नामुष्की
खरंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा आणि रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. परंतु, एवढ्या दिवसांनंतर पालकमंत्री जाहीर केल्यानंतरही दोन जिल्ह्यांच्या नियुक्त्या स्थगीत करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली.
रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांचं नाव जाहीर केलं गेलं. परंतु, यावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
नाराजी व्यक्त करताना गोगावले म्हणाले की, “मी वरिष्ठांना फोन केला होता. मात्र, याबाबत माझी त्यांच्याशी काही चर्चा झालेली नाही. हा निर्णय मला धक्कादायक वाटतो. आम्हाला ही अपेक्षा नव्हती. पालकमंत्री म्हणून माझी निवड व्हावी असं संपूर्ण रायगड जिल्ह्यात वातावरण झालेलं होतं.”
त्याचवेळी गोगावले असेही म्हणाले होते की “परंतु, ठीक आहे. आता आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल.”
तसंच, उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पालकमंत्र्यांच्या यादीत गोगावले यांचं नाव नसणं हे आमच्या सर्वांसाठीच धक्कादायक होतं, अशी प्रतिक्रिया दिली होती.
तर शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांनीही “दादा भुसे आणि भरत गोगावले यांची पालकमंत्री नियुक्ती करायला हवी होती” असं म्हटलं.
या अशा जाहीर वक्तव्यांमुळे महायुतीत पालकमंत्रिपदांवरून ताळमेळ नसल्याचंच चित्र स्पष्ट झालं.
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून जाहीर नाराजी व्यक्त होऊ लागल्यानंतर अदिती तटकरे यांनी सावध भूमिका घेतली.
आदिती तटकरे म्हणाल्या की, “भरत गोगावले माझे सहकारी मंत्री आहेत. मला जबाबदारी दिली असली तरी भरत गोगावले हे सुद्धा अनेक वर्षांपासून काम करत आहेत. यामुळे आम्ही समतोल राखून जिल्ह्यासाठी काम करू. कार्यकर्त्यांमध्ये स्वाभाविकपणे नाराजी राहत असते करण प्रत्येक पक्षाला वाटतं त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळायला हवी. मी माझ्यावतीने महायुतीतील तिन्ही नेतृत्त्व आणि स्थानिक आमदार यांच्यासमवेत काम करेन.”
मात्र, तरीही त्याच रात्री उशिरा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्या स्थगीत करण्यात आल्या.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे काल (20 जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे म्हणाले की, “मुख्यमंत्री राज्याच्या हिताच्या दृष्टीने दावोसला गेलेले असताना असा प्रश्न उद्भवला हे योग्य नाही. पण राजकारणात काही वेळेला अशा गोष्टी घडत असतात. आम्ही सुसंस्कृत आहोत. यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला सुसंस्कृत राजकारणाची दिशा दाखवलेली आहे. यामुळे आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ.”
एकनाथ शिंदे नाराज?
पालकमंत्रिपदावरून नुकतीच समोर आलेली नाराजी असो किंवा सत्तास्थापनेनंतर मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप यांवरून झालेली रस्सीखेच असो, हे सर्व पाहता महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचं दिसत नाही. किंबहुना, राजकीय वर्तुळात तशा चर्चांनाही उधाण आलंय.
यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी जाऊन बसले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी दरे या आपल्या गावी माध्यमांशी बोलतानाही याचा उल्लेख केला.
शिंदे म्हणाले की, “मी गावी आलो की, लोक म्हणतात मी नाराज झालो. मी गावी आलोय, नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे. याचं काम मी करतोय. पाटण ते प्रतापगड हा मोठा परिसर आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी काम सुरू आहे. मला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेकवेळा गावी यावं लागेल.”
तर भरत गोगावले यांच्या नाराजीच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, “पालकमंत्रिपदाची अपेक्षा ठेवणं किंवा मागणी करणं, यात गैर काय आहे? यावरही मार्ग निघेल. आतापर्यंत मंत्रिमंडळापासून सगळ्यावर आम्ही मार्ग काढला आहे. यावरही निघेल.”
शिवसेनेत नवीन ‘उदय’चा अर्थ काय?
महाविकास आघाडीतले नेते मात्र महायुती सरकारमधील नाराजीवर वारंवार बोट ठेवताना दिसत आहेत.
काँग्रेसने ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याचं म्हटलं आहे. तसंच, महायुतीला प्रचंड बहुमत मिळून देखील या सरकारमध्ये धुसफूस सुरूच आहे, असंही ते म्हणाले.
वडेट्टीवर म्हणाले की, “आधी मंत्रिमंडळ विस्तार, त्यानंतर पालकमंत्री नेमण्यात आणि आता नेमलेले पालकमंत्र्यांना स्थगिती देण्याची वेळ आली, यावरून या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. आज पालकमंत्री बदलतील, उद्या मंत्री, उपमुख्यमंत्री बदलतील. ही परिस्थिती पाहून जनतेलाच या सरकारला स्थगिती द्यावी लागेल.”
वडेट्ट्वार इथवरच थांबले नाहीत, तर शिवसेनेत नवीन ‘उदय’ होतोय, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.
वडेट्टीवारांचा इशारा उदय सामंत यांच्या नावाकडे होता, हे स्पष्ट आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही उदय सामंत यांच्यासोबत काही आमदार असल्याचा दावा केला.
यावर मंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून प्रतिक्रिया दिली.
सामंत म्हणाले, “मी दावोसला पोहोचल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया पाहिली. संजय राऊतांनी केलेलं विधान पूर्णपणे खोटं आहे. हा राजकीय बालिशपणा आहे. एकनाथ शिंदेंनी जो राजकीय उठाव केला, त्यावेळी मी त्यांच्यासोबत होतो आणि त्यामुळे मला दोनदा राज्याचं उद्योगमंत्रिपद मिळालं, याची मला जाणीव आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसारख्या मोठ्या नेत्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजकारणात घडवण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत, ते मी कधीही विसरु शकणार आहे.
“माझे आणि एकनाथ शिंदेंचे संबंध राजकारणापलिकडचे आहेत. त्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा प्रयत्न केला, तर तो यशस्वी होणार नाही.”
तसंच, विजय वडेट्टीवार हे देवेंद्र फडणवीस यांना किती वेळा भेटले, याचीही माहिती आपल्याकडे आहे, असं म्हणत सामंत यांनी वडेट्टीवारांना प्रत्युत्तर दिलं.
सामंत म्हणाले, “विजय वडेट्टीवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे. एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य कुटुंबीयातून मोठे झालेले आहेत. मी देखील सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेलो आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातील मोठे झालेले आहात. त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र आपण ठेवू नका, कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटला? त्याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे.”
महायुतीतील नाराजीचे काय पडसाद उमटू शकतात?
महायुतीला राज्यात विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळालं हे जरी खरं असलं, तरी महायुतीत तीन पक्ष आहेत, ज्याचे नेतृत्व तीन मोठे नेते करत आहे.
यात दोन प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांच्याकडे आपल्याच पक्षात बंड करून नव्याने पक्षाचं नेतृत्व पदाची जबाबदारी आहे. शिवाय, आपल्या पक्षातील नेते, मंत्री त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा, पक्ष संघटन अशी मोठी जबाबदारी युतीतील दोन्ही मित्रपक्षांच्या नेतृत्त्वाच्या खांद्यावर आहे.
यामुळे महायुतीत भाजप क्रमांक एकचा पक्ष असला, तरी आपल्या पक्षाला डावललं जाऊ नये किंवा तसं संदेश पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात जाऊ नये याचीही खबरदारी दोन्ही नेत्यांना सहाजिकच घ्यावी लागत आहे. परंतु, हा समतोल कितपत शक्य आहे? असाही प्रश्न आहे.
यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, “बहुमत असलं तरी सहमतीने निर्णय घेणं किती गरजेचं आहे हे या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालं आहे. महायुतीला मिळालेले आकडे पाहता अजीर्ण झालेलं आहे, अशी परिस्थिती असल्याने मुख्यमंत्रीपद, खातेवाटप, पालकमंत्रिपद यावर तीन पक्ष एकत्र असताना वारंवार असे प्रश्न उपस्थित होत आहे. तरी पक्षातल्या लोकांना गृहीत धरून कारभार रेटू शकत नाहीत हे सुद्धा यामुळे स्पष्ट होत आहे. याची जाणीव वारंवार मित्र पक्षांकडून केली जात आहे. पर्याय नसला तरी वाटेल त्या तडजोडी होणार नाही असाही संदेश मित्रपक्षांकडून दिला जात आहे.”
“आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राजकीय संघर्षाचं चित्र दिसेलच. राजकीय व्यासपीठावर हे मतभेद दिसतीलच. आघाडी सरकारमध्ये हे दिसलं होतं. यामुळे हे नवीन आहे अशातला भाग नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय संघर्ष दिसत असताना राज्याच्या सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होणार नाही,”
सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यात आहेत. यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतल्यानंतर पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवताना काय तोडगा काढतात? यात कोणाच्या बाजूने निर्णय होईल किंवा दोन्ही मित्र पक्षांतील नेत्यांचं समाधान करता येईल का? हे येणारा काळच सांगेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC