Source :- ZEE NEWS

Gold Facts Mansa Musa the richest man in the wold : भारतात सोन्याच्या किमती उच्चांक गाठताना दिसत आहेत. तिथं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयतशुल्कासंदर्भातील निर्णयानं सारं जग बुचकळ्यात पडलेलं असतानाच जागतिक अर्थव्यवस्थेवर या निर्णयाचे होणारे परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. गुंतवणुकदारांना शेअर बाजारावर घोंगावणारं संकट पाहता घाम फुटला आहे. तर, सोन्याचे गगनाला भिडणारे दरही अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. 

जगभरात सोन्याच्या दरात आलेली ही उसळी पाहता याच सोन्यानं एकाद देशाच्या अर्थव्यवस्थेलाच सुरूंग लावल्याचा किस्सा विसरता येत नाही. त्यासाठी इतिहासाच डोकावावं लागेल. आफ्रिकेतील माली या देशाचं नाव तुम्ही ऐकलच असेल. आजच्या घडीला हा देश जगातीर गरिब देशांपैकी एक असला तरी, कधीकाळी हाच माली देश आफ्रिकेतील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. 

मनसा मुसा आणि त्याची श्रीमंती… 

आफ्रिकेच्या माली देशाचा राजा हा त्या काळात तेव्हापासून आतापर्यंत साधारण 700 वर्षे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अग्रस्थानी विराजमान होता. 1280 मध्ये जन्मलेल्या या राजाचं नाव मनसा मुसा. 1312 पर्यंत मालीवर मनसा मुसाच्या मोठ्या भावाचं राज्य होतं. पण, भाऊ ज्यावेळी एका मोठ्या प्रवासावर गेला तेव्हा मनसा मुसाला त्याचं स्थान मिळालं. 1312 पासून 1337 पर्यंत इथं राज्य केलं. त्यावेळी माली हा देश जगातील सोन्याच्या उत्पादनासाठीचा एक मोठा देश असून, इजिप्त, पर्शिया, वेनिस या देशातून व्यापारी इथं येत. 

हा तोच काळ होता जेव्हा सोन्याची मागणी जास्त असून जगातील जवळपास निम्मं सोनं या मनसा मुसाकडे होतं. हा राजा त्या काळात 415 अब्ज डॉलर इतक्या अगणित संपत्तीचा मालक होता. मात्र त्याच्या देशाची मात्र जगभरात ओळख नव्हती. 1324 मध्ये मनसा मुसानं हज यात्रेची सुरुवात केली. इजिप्तहून तो मक्केसाठी रवाना झाला. अरब इतिहासकारांच्या माहितीनुसार त्याच्या ताप्यात हजारो लोक आणि कैक उंट होते. प्रत्येक उंटावर तेव्हा 136 किलो सोनं लादण्यात आलं होतं. 

असं म्हणतात की मनसा मुसा जेव्हा इजिप्तची राजधानी कैरो इथं पोहोचला तेव्हा त्याच्या लोकांनी तिथं पाण्यासारखं सोनं तेथील लोकांना दिलं. श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाच्या वाट्याला हे सोनं आलं. पण, याच सोन्यानं इजिप्तचा घात केला. तिथं पुढील 12 वर्षे सोन्याचे दर कोसळू लागले. इजिप्तमधील नागरिकांनी काम करणं सोडून दिलं. इथं नागरिकांकडे सोनं होतं मात्र त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी काहीच नव्हतं, कारण इथं कुणीच काम करत नव्हतं. महागाई गगनाला गवसणी घालू लागली आणि इजिप्त आर्थिक मंदीच्या लाटेत गटांगळ्या खाऊ लागला. तब्बल 12 वर्षे या देशानं आर्थिक संकटाचा सामना केला. 

हजवरून परतल्यानंतर मनसा मुसानं त्याच्या देशातील शहरांना नवं रुप देण्यास सुरुवात केली. जगाच्या नकाशावर त्याचा माली हा देश नवी ओळख प्रस्थापित करू लागला होता तितक्यातच 1337 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मनसा मूसाचं निधन झालं. ज्यानंतर त्याच्या मुलाकडे साम्राज्याची धुरा सोपवण्यात आली मात्र त्यांना ही जबाबदारी सांभाळता आली नाही आणि या साम्राज्याचे तुकडे झाले. आजच्या घडीला तेव्हाचं धनाढ्य माली एक गरीब राष्ट्र म्हणून गणलं जातं हेच दुर्दैव. 

SOURCE : ZEE NEWS