Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Sudhir Rajbhar/Rahul Ransubhe
डिसेंबर 2024 ला अमेरिकेतील ‘डिझाईन मायामी’ या शोमध्ये आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाचे एका लाल खुर्चीवर बसलेले फोटो व्हायरल झाले.
त्यानंतर रिहानाच्या त्या फोटोंची चर्चा सुरू झाली आणि एक नाव सातत्याने चर्चेत राहू लागलं, ते म्हणजे ‘चमार स्टुडिओ’.
‘चमार’ हा शब्द भारतात एका विशिष्ट जातीसाठी वापरला जातो. मराठीत त्याला ‘चांभार’ म्हणतात. मग, या नावाचा ब्रँड कोणी सुरू केला, असा प्रश्न अनेकांना पडला.
‘चमार स्टुडिओ’ हा एक आंतरराष्ट्रीय फॅशन ब्रँड आहे. याचे संस्थापक आहेत सुधीर राजभर. सुधीर यांनी 2018 ला या ब्रँडची सुरुवात केली.
चमारचा स्टुडिओ नवी मुंबईतील खारघर इथं आहे. इथेच त्यांचं डिझाईनचं प्रमुख काम चालतं, तर त्यांचं वर्कशॉप धारावी आणि तळोजा इथं आहेत.
चमार स्टुडिओ हा ब्रँड तर आहेच, पण सोबतच ती एक चळवळही असल्याचं सुधीर सांगतात.
“आम्ही भारतीय मार्केटचा विचार करत नाही. आमचा उद्देश जास्त उलाढाल व्हावी असा नाही. आम्ही इथे काही तरी बदलण्यासाठी आलो आहोत. लोकांनी चमार या शब्दाकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. कारागिरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हाच आमचा उद्देश आहे,” असं सुधीर राजभर म्हणतात.
मूळचे उत्तरप्रदेशातील जौनपूरचे असलेल्या सुधीर यांचं संपूर्ण शिक्षण मुंबईतील वसई विकासनी इथं झालं. सुधीर यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्यानं त्यांनी त्यातच शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर ते काही मोठ्या कलाकारांबरोबर काम करू लागले. मात्र, तिथे त्यांच्या कलेला वाव मिळत नसल्याचं त्यांना जाणवलं. कामाचं कौतूक व्हायचं. परंतु त्यांचं नाव कुठेही नसायचं.
राजभर यांना त्याठिकाणी समाजातील दोन वर्गांमध्ये (क्लास) असलेल्या फरकाचा अनुभव आला. म्हणजे चांगलं इंग्रजी बोलता येत नसेल, चांगले कपडे नसतील, तर तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.
सुधीर सांगतात, “आम्ही अजूनही गावाकडे गेलो तर लोकं आमच्याकडं भर किंवा चांभार म्हणूनच पाहतात. आमच्या गावाकडे चांभार या शब्दाला अपमानास्पद किंवा कलंक अशा अर्थानं पाहिलं जातं.”
“त्या शब्दाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन आपण कसा बदलू शकतो, या विचारात मी होतो. हीच संकल्पना घेऊन मी चमार हा ब्रँड बनवला.”
“जसे परदेशात अनेक लक्झरी ब्रँड आहेत तसे भारतामध्ये आपण का करू शकत नाही? लोकांनी त्याला कलंक म्हणून नव्हे, तर ब्रँड म्हणून बघावं, हाच त्यामागचा उद्देश आहे.”
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

भारतात बीफ बॅन झालं तेव्हा लेदर कारागिरांना मोठ्या प्रमाणात चामड्याची कमतरता जाणवू लागली. त्या वेळी चमार स्टुडिओची कल्पना सुचल्याचं राजभर सांगतात.
“2015 मध्ये बीफ बॅन झालं, तेव्हा लेदर इंडस्ट्रीमध्ये जी कमतरता आली त्याला बघून आम्ही लेदरला एक पर्याय बनवला. तो रिसायकल रबरपासून बनलेला होता.”
“टायर आणि ट्यूबचे जे वेस्ट शीट असतात त्याला आम्ही ग्राईंड करून प्रोसेस करून शीटच्या फॉर्ममध्ये आणतो. मग त्याला कट आणि स्टीच करून पूर्णपणे हातानं उत्पादनं तयार केली जातात. यात मशीन वापरतच नाही. चामड्याला (लेदर) हा पर्याय आहे,” असं ते म्हणाले.
झिरो वेस्ट असेलेलं हे प्रोडक्ट लवकरच लोकांच्या पसंतीस पडलं. याला चामड्याप्रमाणे प्रोसेस करावं लागत नाही. चामड्याच्या वस्तू बनवण्यासाठी चामड्यावर अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. शिवाय त्याचा वासही असह्य असतो.
पण, या रबरवर काम करणं कारागिरांना सोपं वाटू लागलं. त्यामुळं त्यांचाही बराच ताण कमी झाला, असंही सुधीर म्हणाले.

फोटो स्रोत, Twitter/Rahul Gandhi
सुधीर यांच्या स्टूडिओला काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भेट दिली होती. या भेटीत त्यांनी सुधीर यांच्या कामाची संपूर्ण माहिती घेतली. या भेटीचं एक ट्वीटही त्यांनी केलं होतं.
सुधीर चमार स्टुडिओच्या माध्यमातून जे कारागिर आहेत त्यांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत.
आम्ही कारागिरांना काम देताना सुरुवातीलाच 10 टक्के पैसे देऊन टाकतो, असं ते म्हणाले.
विक्रीतून जो काही पैसा येतो त्यातील 50 टक्के रक्कम ही चमार फाऊंडेशनमध्ये जाते. चमार फाऊंडेशनच्या माध्यमातून सुधीर गरीब कारागिरांना त्यांचा आर्थिक स्तर वाढवण्यास मदत करतात.
चमार स्टुडिओच्या माध्यमातून लेडीज पर्स, खुर्च्या, शूज, चप्पल अशा अनेक वस्तू बनवल्या जातात. त्यांची किंमत ही 6000 ते 30000 पर्यंत आहे.

फोटो स्रोत, Rahul Ransubhe/BBC
सुधीर सांगतात “आज चमार स्टुडिओचं जगभरात नाव झालं आहे. माझ्याकडे विविध देशातील कलाकार काम शिकण्यासाठी येतात. परंतु एवढं होऊन सुध्दा भारतात लोकं माझी जातच शोधतात. ते सर्च करतात ‘हु इज सुधीर राजभर’. ते माझं काम बघत नाहीयेत.”
“ते हे नाही बघत आहेत की आता चमार स्टूडिओची जगभरात दखल घेतली जातीये. युरोपमध्ये लोक प्रोत्साहनपण देत आहेत. पण इथे भारतात लोक जात पाहातात. जर इथल्या लोकांनी माझी जात न पाहाता माझं काम पाहिलं तर मी त्यांच्या खूप खूप आभारी राहिल.”
सुधीर यांना एक अशी कार्यशाळा बनवायची आहे जिथे कलाकार त्यांच्या कलेला हवा तेवढा वेळ देऊ शकेल. तिथे कसलीच बंधनं नसतील.
ते सांगतात, “आपल्याकडे विशिष्ट जातीला त्यांची काम करण्याची बंधनं आहेत. कुंभार म्हटलं तर त्याने मातीचेच काम करावे, चांभार म्हटलं तर त्याने चामड्याशी संबंधीतच काम करावे. जरी त्याला इतर गोष्टी करण्याची इच्छा असली तरी त्याला ते करता येत नाही. तसंच कला क्षेत्रातही आहे.”
“चित्रकाराने फक्त चित्रंच काढावीत, शिल्पकाराने फक्त शिल्पचं घडवावीत. त्यांना इतर क्षेत्रात जाण्याची जास्त मुभा नसते. मला प्रश्न पडतो एक कलाकार का दुसऱ्या कलेमध्ये भाग घेऊ शकत नाही. भारतात ही बंधनं खूप आहेत.”
“मी जेव्हा पॅरिसला गेलो होतो, तेव्हा तिथे ही असली बंधनं मी पाहिली नाहीत. तिथे कोणालाही कोणत्याही कलाप्रकारामध्ये काम करण्याचं स्वातंत्र्य आहे. हाच विचार मनात घेऊन मी राजस्थानमध्ये ‘चमार हवेली’ या प्रोजेक्टवर काम करत आहे.”
चमार स्टूडिओ हा एक ब्रँडसोबतच एक चळवळही असल्याचं सांगत ते म्हणाले, “आम्ही भारतीय मार्केटचा विचार करत नाही. आमचा उद्देश मार्केटमध्ये जास्त उलाढाल व्हावी असा नाही. आम्ही इथे काही तरी बदलण्यासाठी आलो आहोत. लोकांनी चमार या शब्दाकडे पाहाण्याचा दृष्टिकोन बदलावा. कारागिरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवा हाच आमचा उद्देश आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC