Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Pranay Modi
जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नसतात असं म्हटलं जातं. त्यातही मृत्यू आणि मोक्ष याबद्दल शतकानुशतकं भारतीय लोक वेगवेगळ्या दृष्टीकोनातून पाहत आले आहेत. जन्मावर जरी कोणाचंच नियंत्रण नसलं तरी जैन धर्मात मृत्यू मात्र स्वेच्छेनं निवडला जातो.
जैन धर्मात संथाराची परंपरा आहे. ही परंपरा नेमकी काय आहे, यात मृत्यू कसा होतो, जैन धर्मीय त्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतात? जाणून घेऊयात.
सायर देवी मोदी 88 वर्षांच्या होत्या. सर्व्हायकल कॅन्सर झाल्याचं कळाल्यानंतर तीन आठवड्यांनी त्यांनी उपचार न करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी त्यांनी ‘मरणव्रत’ म्हणजे संथारा हा पर्याय निवडला.
सायर देवी यांचे नातू प्रणय मोदी म्हणाले, “25 जूनला त्यांचा बायोप्सी रिपोर्ट आला. त्यात त्यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. 13 जुलै 2024 ला त्यांनी प्रार्थना केली आणि सूप प्यायल्या. पुढच्याच दिवशी त्यांनी आम्हाला संथारा घेण्याच्या इच्छेबद्दल सांगितलं.”
संथारा ही जैन धर्मातील एक प्रथा आहे. त्यात व्यक्ती मृत्यूची इच्छा बाळगतो. याला समाधी-मृत्यू, इच्छा-मृत्यू किंवा संन्यास-मृत्यू असंही म्हटलं जातं. हा एक धार्मिक स्वरुपाचा संकल्प असतो.
संथाराला ‘सल्लेखना’ असं देखील म्हटलं जातं. जैन धर्मातील काहीजण या परंपरेला मानतात. यात अन्नपाण्याच्या त्याग करून मृत्यूची निवड केली जाते.
अर्थात जैन धर्मात ही प्रथा सक्तीची किंवा बंधनकारक नियम नाही. मात्र प्रसारमाध्यमांमधून आलेल्या बातम्यांनुसार दरवर्षी जैन धर्मातील 200 ते 500 जण मृत्यूसाठी हा मार्ग निवडतात.

फोटो स्रोत, Getty Images
काहीजण या परंपरेला विरोध करतात. ते याला आत्महत्या म्हणतात. संथारावर बंदी घालण्यासाठीची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित देखील आहे.
अहिंसा हे जैन धर्माचं मूळ तत्व मानलं जातं. हा जवळपास 2,500 जुना धर्म आहे. या धर्मात कोणताही देव नाही. मात्र जैन धर्मीयांचा शुद्ध, स्थायी, वैयक्तिक आणि सर्वज्ञ आत्म्यावर विश्वास असतो.
जवळपास सर्वच जैन धर्मीय शाकाहारी असतात. ते नैतिक मूल्यांचा अंगिकार करण्यावर आणि संसारी सुविधांचा त्याग करण्यावर भर देतात.
भारतात जैन धर्माचं पालन करणाऱ्यांची संख्या जवळपास 50 लाख आहे.
अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटरच्या एका अहवालानुसार जैन धर्मीय लोक चांगले शिक्षित किंवा उच्च शिक्षित असतात.
या संशोधनानुसार, दर नऊ भारतीयांपैकी एकाकडे विद्यापीठाची पदवी असते. तर दर तिसऱ्या जैन धर्मीयाकडे विद्यापीठाची पदवी असते. बहुतांश जैन धर्मीय आर्थिकदृष्ट्या देखील सधन असतात.
भारतीय समाजात जैन गुरूंना सन्मान दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील जैन गुरूंचा आशिर्वाद घेतला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
जैन गुरू आचार्य विद्यासागर यांचं निधन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं होतं, “देशाचं कधीही भरून न येणारं नुकसान झालं आहे.”
मृत्यूव्रताच्या तीन दिवसांनंतर वयाच्या 77 व्या वर्षी आचार्य विद्यासागर यांचं निधन झालं होतं.
त्यांच्या अंत्ययात्रेत हजारो लोक सहभागी झाले होते.
जैन धर्मीय म्हणतात की मृत्यूव्रत किंवा संथाराची तुलना इच्छा-मरणाशी किंवा आत्महत्येशी करायला नको.
कोलोरॅडो डेनवर विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक स्टीव्हन एम वोज आणि जैन धर्माच्या एका तज्ज्ञानं बीबीसीला सांगितलं, “संथारा किंवा सल्लेखना ही आत्महत्येपेक्षा वेगळी असते. कारण यामध्ये कोणतीही वैद्यकीय मदत घेतली जात नाही. तसंच यामध्ये जीवाला अपायकारक असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचं इंजेक्शन देखील घेतलं जात नाही.”
प्राध्यापक वोज म्हणतात की शरीराचा त्याग करण्याची परंपरा खूप प्राचीन आहे आणि सहाव्या शतकातदेखील याचे पुरावे मिळतात.
ते म्हणतात की कर्म, आत्मा, पुनर्जन्म आणि मोक्ष यामध्ये विश्वास असणं ही संथाराची मुख्य मूल्यं असतात.
जैन धर्मीय संथाराची निवड कधी करतात?
सायरा देवीसारखे काही जैन धर्मीय या पद्धतीची निवड तेव्हा करतात जेव्हा त्यांच्या हे लक्षात येतं की आता त्यांचा मृत्यू जवळ आहे किंवा त्यांना एखादा असाध्य रोग होतो.
सायर देवी यांच्या मृत्यूव्रताच्या काळात त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यातून हे लक्षात येतं की त्यावेळेस त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी घातली होती. त्यांचा चेहरा एका कापडानं झाकलेला होता.
त्याबद्दल आठवण करत प्रणय मोदी म्हणाले, “त्या खूपच शांत होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत बोलत होत्या.”
प्रणय मोदी म्हणतात की आजीच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या वडिलोपार्जित घरात उत्सवी वातावरण होतं. कारण तिथे खूप जण आले होते.
ते म्हणाले, “ही अजिबात अशी जागा वाटत नव्हती की इथे एखाद्याचा मृत्यू होणार आहे. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी आणि अनेक अनोळखी लोकांनी त्यांचा आशिर्वाद घेतला.”
शेवटच्या दिवशीदेखील सायर देवी यांच्यामध्ये इतकी ऊर्जा होती की त्यांनी जवळपास 48 मिनिटं जैन धर्माशी संबंधित प्रार्थना केली.
प्रणय म्हणाले, “मला माहित आहे की औषधं थांबवल्यानंतर त्यांना खूप वेदना होत असणार. मात्र त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. त्या खूपच शांत होत्या.”

फोटो स्रोत, Pranay Modi
सायरा देवी यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी त्यांचा मृत्यू होताना पाहिलं.
प्रणय पुढे म्हणाले, “त्यांना मरताना पाहणं ही माझ्यासाठी खूप वेदनादायी गोष्ट होती. मात्र मला माहित होतं की त्या एका चांगल्या ठिकाणी जात आहेत आणि आम्ही त्यांच्या निर्णयाचा मान ठेवला.”
संथारामुळे नेहमीच शांततामय मृत्यू होत नाही. प्राध्यापक मिकी यांनी याच विषयावर पीचएडी केली आहे. त्या संशोधनाच्या काळात त्यांनी अनेक उपवास किंवा मृत्यूव्रत पाहिले.
विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक असलेले आणि जैन धर्माशी निगडीत विभागाचे प्रमुख चेज म्हणाले, “एक व्यक्ती ज्यांना टर्मिनल कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं, त्यांनी संथाराची निवड केली. त्यांना खूप वेदना होत होत्या.”
“मात्र त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या या निर्णयाचा अभिमान होता. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची साथ दिली. अर्थात त्यांच्या या मृत्यूव्रताच्या संघर्षामुळे त्यांना खूप त्रासदेखील झाला.”
आणखी एका प्रकरणाचा उल्लेख करत प्राध्यापक चेज म्हणतात की आणखी एका महिलेला टर्मिनल कॅन्सर झाला होता. संथाराची निवड केल्यानंतर त्या खूपच शांत झाल्या.
ते म्हणाले, “त्यांच्या सुनेनं मला सांगितलं की कुटुंब म्हणून त्यांना प्रोत्साहन देणं हे एक जबाबदारीचं काम होतं. कारण त्यांच्यासाठी धर्माशी निगडीत गाणी गाता यावीत.”
प्राध्यापक वोज यांना वाटतं की मृत्यूव्रत किंवा संथाराच्या काळात थोडाफार संघर्ष तर होतोच.
ते म्हणाले की “एखाद्या उपासमारीनं मरताना पाहणं ही गोष्ट कधीही सुखद असू शकत नाही. शेवटचे क्षण तर खूपच वेदनादायी असतात. त्या व्यक्तीचं शरीर वाचण्यासाठी संघर्ष करत असतं.”
” त्यामुळे ते शेवटच्या क्षणांमध्ये पाणी किंव अन्न मागण्याची शक्यता असते. मात्र त्यांना अन्नपाणी दिलं जात नाही आणि त्याकडे शेवट म्हणून पाहिलं जातं.”
संथाराची निवड करणाऱ्यांमध्ये महिला अधिक का असतात?
या प्रकारे मृत्यू निवडणाऱ्या दिगंबर साधूंच्या सोशल मीडियावर असलेल्या फोटोवरून लक्षात येतं की त्यांचे गाल बसलेले असतात. त्यांची हाडं दिसत असतात. ही स्पष्टपणे भुकेची चिन्हं असतात.
संथाराची निवड करणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या अधिक असते. प्राध्यापक वोज म्हणतात की असं होण्यामागचं कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक क्षमतावान किंवा शक्तीशाली मानलं जातं.
प्राध्यापक चेज म्हणतात की जैन समाज संथाराकडे एक अद्भूत अध्यात्मिक यश म्हणून पाहतो.
प्रकाश चंद महाराज यांचा जन्म 1929 मध्ये झाला होता. ते जैन समाजाच्या सर्वात वरिष्ठ साधूंपैकी एक आहेत. 1945 मध्ये ते साधू झाले. त्यांचे वडील आणि छोटे भाऊ देखील जैन साधू झाले. त्यांनी संथाराची निवड केली.
ते म्हणाले, “मी माझ्या वडिलांना आणि भावाला पाहून दु:खी झालो नाही. मी पूर्णपणे अलिप्त किंवा संन्यस्त झालो होतो. मला असं वाटलं नाही की मी अनाथ होतो आहे किंवा माझ्या जीवनात रितेपणा येणार आहे.”
95 वर्षांचे प्रकाश चंद उत्तर भारतातील गोहाना शहरात राहतात. ते फोन किंवा लॅपटॉपचा वापर करत नाहीत. त्यांचे एक सहाय्यक आशीष जैन यांच्या माध्यमातून ते आमच्याशी बोलले.

फोटो स्रोत, Kamal Jain
ते म्हणाले, “या जीवनाचा आदर्श शेवट आणि पुढील जीवनाची आदर्श सुरुवात म्हणून याकडे पाहिलं जातं. हे माझ्या तात्विक, अध्यात्मिक आणि धार्मिक सिद्धांतावर आधारलेलं आहे.”
संथाराचे अनेक टप्पे असतात. ते अचानक मिळू शकत नाही. त्यासाठी कुटुंबातील एखादा सदस्य किंवा धर्मगुरूच्या परवानगीची आवश्यकता असते.
संथाराच्या पहिला टप्प्यात स्वत:च्या दोषांचा स्वीकार करावा लागतो. त्यानंतर त्यासाठी माफी मागावी लागते.
प्रकाश चंद म्हणतात, “उपवास करणं आणि मृत्यूचा स्वीकार करणं म्हणजे शरीर आणि आत्म्याची शुद्धी करणं आहे. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या चांगल्या जीवनासाठी तुमच्या वाईट कर्मांना कमी करतात.”
ते म्हणतात, ” ही जीवन आणि मृत्यूच्या चक्रातून आत्म्याची मुक्ती आहे.”
संथारासंदर्भातील कायदेशीर आव्हानं
2015 मध्ये राजस्थान उच्च न्यायालयानं संथारावर बंदी घातली होती. मात्र नंतर सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली होती.
माजी सिव्हिल सर्व्हंट डी. आर मेहता अशा लोकांपैकी एक आहेत, ज्यांना संथारा परंपरेचं संरक्षण करायचं आहे.
ते म्हणाले, “जैन याकडे मृत्यूच्या सर्वोत्तम प्रकाराच्या रुपात पाहतात. संथारा म्हणजे शांततेनं मृत्यूचा स्वीकार करणं. आत्मशांती हा यामागचा मुख्य उद्देश आहे.”
2016 मध्ये हैदराबादला राहणाऱ्या 13 वर्षांच्या मुलीनं संथाराची निवड केली आणि त्यात तिचा मृत्यू झाला. तिनं 68 दिवस उपवास केला. त्यानंतर या प्रथेला विरोध होण्यास सुरुवात झाली. अर्थात अलीकडच्या काही वर्षांमध्ये संथाराची निवड वृद्ध लोकांनीच केली आहे.
प्रकाश चंद यांनी 2016 मध्ये सल्लेखनाची निवड केली होती. ही संधाराच्या आधीची प्रक्रिया असते. त्यांनी आधी त्यांचं जेवण दहा गोष्टींपुरतं मर्यादित केलं. आता त्यांनी जेवण फक्त दोन गोष्टींपुरतंच मर्यादित केलं आहे. यात पाणी आणि औषधाचा समावेश आहे. मात्र ते अजूनही सक्रिय आहेत.
आशीष जैन म्हणतात, “त्यांना कधीही अशक्तपणा जाणवला नाही किंवा आजारी असल्यासारखं वाटलं नाही. ते नेहमीच आनंदी असतात, मात्र फारसं बोलत नाहीत.”
प्रकाश चंद म्हणतात, “त्यांच्या जीवनशैलीचा या मार्गात उपयोग झाला आहे आणि त्यांना आतून खूप आनंदी वाटतं आहे.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC