Source :- BBC INDIA NEWS

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

1 तासापूर्वी

“आठवीतल्या पोराला आयपीएलमध्ये खेळताना पाहिलं, दमदार पदार्पण.”

हे कौतुकाचे शब्द आहेत गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचे.

सुंदर पिचाई यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशींचं कौतुक केलं आहे.

अगदीच शाळकरी वयात असणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून पदार्पण केलं आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना पहिल्याच बॉलवर लॉन्ग ऑफला खणखणीत षटकार खेचून वैभवने पदार्पण केलं आहे.

अनुभवी गोलंदाज शार्दूल ठाकूरला पहिल्याच बॉलवर सिक्स खेचणाऱ्या वैभवने अतिशय आक्रमक फलंदाजी केली. वैभवने त्याच्या पहिल्याच सामन्यात 20 बॉल्समध्ये 3 षटकार आणि 2 चौकार खेचत 34 धावा केल्या.

लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्ससमोर 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. शेवटी राजस्थान रॉयल्सचा 2 धावांनी पराभव झाला असला, तरी सगळ्यात जास्त चर्चा ही आयपीएलमध्ये पदार्पण केलेल्या सगळ्यात तरुण खेळाडूची म्हणजेच वैभव सूर्यवंशीची होत आहे.

त्याच्या पहिल्या सिक्सनंतर राजस्थानच्या डगआउट मध्ये बसलेल्या राहुल द्रविड आणि विक्रम राठोड यांच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव होते. आणि ज्या संजू सॅमसनला दुखापत झाल्यामुळे वैभवला संधी मिळाली त्या संजूच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. संजू सॅमसनला दुखापत झाल्यामुळे वैभव ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून संघात आला होता.

पहिल्या तीन बॉलमध्ये दोन षटकार

शार्दूल ठाकूरला वैभवने पहिल्याच बॉलवर षटकार खेचला आणि त्यानंतर गोलंदाजीला आलेल्या आवेश खानला देखील वैभवने त्याच्या तिसऱ्याच बॉलवर षटकार खेचला.

वैभवने पाचवा बॉलदेखील षटकार खेचण्याच्या निर्धाराने फाटकावला होता पण मिडविकेटवर उभ्या असलेल्या लखनौच्या प्रिन्स यादवने त्याचा झेल सोडला. त्यानंतर लखनौने फिरकीपटू दिग्वेश राठीला गोलंदाजीला बोलावलं.

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

फिरकी गोलंदाजीसमोर वैभवने अतिशय संयमी खेळ केला. पण एखादा आखूड टप्प्याचा किंवा अगदीच पायातला बॉल आला तेव्हा वैभव मागे राहिला नाही. रवी बिष्णोईने असाच आखूड टप्प्याचा बॉल टाकला आणि वैभवने त्याचा तिसरा षटकार खेचला.

एडन मार्करमच्या गोलंदाजीवर आउट होण्यापूर्वी वैभवने चांगली फलंदाजी केली.

आयपीएल सुरु झालं तेव्हा वैभवचा जन्मही झाला नव्हता

अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 27 मार्च रोजी वैभवने त्याचा 14वा वाढदिवस साजरा केला आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात वैभव फलंदाजी करत होता तेव्हा समालोचक म्हणत होते की, ‘आयपीएल स्पर्धेची सुरुवात झाली तेव्हा वैभवचा जन्मही झालेला नव्हता.”

मागच्या वर्षी आयपीएलच्या लिलावात राजस्थान रॉयल्सने वैभवची खरेदी केली तेव्हा तो अवघ्या 13 वर्षांचा होता. राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपये देऊन वैभवला खरेदी केलं होतं. आयपीएल लिलावाच्या 17 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या तरुण खेळाडूला खरेदी करण्यात आलं होतं.

वैभव सूर्यवंशीला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांमध्ये बोली लावण्याची स्पर्धा लागली होती. अखेर राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सने 1 कोटी 10 लाख रुपयांची बोली लावून 13 वर्ष 8 महिने वयाच्या वैभवला त्यांच्या संघात घेतलं. वैभवची मूळ किंमत 30 लाख रुपये होती.

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, Getty Images

राहुल द्रविडने वैभवचं कौतुक केलं तेव्हा

वैभव सूर्यवंशीबाबत अलीकडे राहुल द्रविड म्हणाला होता, “तो (वैभव) चांगला सराव करत आहे, आणि तो खरोखरच एक चांगला आणि प्रतिभावान खेळाडू वाटतो आहे. आणि संघात इतरही चांगले खेळाडू आहेत. आणि आमच्यावर वैभवला घडवण्याची जबाबदारी आहे. या वातावरणात मिसळण्यासाठी त्याला वेळ दिला पाहिजे, इतर खेळाडूंसोबत त्याने सराव केला पाहिजे. त्यामुळे त्याला थेट प्रेक्षकांसमोर नेण्याआधी त्याला या गोष्टी कराव्या लागतील. अर्थात संधी मिळाली तर आम्ही त्याला खेळवण्यास घाबरणार नाही.”

वैभवला खरेदी केल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेक लश मॅक्क्युलम म्हणाले की, “आमच्या नागपूरच्या हाय परफॉरमन्स सेंटरमध्ये वैभव आला आहे. तिथे त्याने चाचणी दिली आणि आम्हा सगळ्यांनाच प्रभावित केलं. त्याच्याकडे अचाट क्षमता आहे आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देखील त्याच्याकडे आहे.”

कोण आहे वैभव सूर्यवंशी?

तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना महेंद्रसिंग धोनीने मुंबईच्या वानखेडे मैदानावर मारलेला खणखणीत षटकार नीट आठवत असेल.

भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात धोनीने भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. मात्र, या विजयाच्या पाच दिवस आधी म्हणजेच 27 मार्च 2011 रोजी वैभव सूर्यवंशीचा जन्म झाला.

वैभवने बिहार संघातर्फे वयाच्या 12 व्या वर्षी पदार्पण केलं. पदार्पणानंतर अल्पावधीतच वैभवने त्याची चुणूक दाखवून दिली.

19 वर्षाखालील खेळाडूंच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना वैभवने 58 बॉल्समध्ये शतक झळकावलं होतं. युवा कसोटीमध्ये भारताकडून खेळताना वैभवने सर्वाधिक वेगवान शतक झळकावलं.

वैभवने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, “वैभव 9 वर्षांचा असताना त्याला बिहारच्या समस्तीपूरमधल्या क्रिकेट क्लबमध्ये दाखल केलं. तिथे दोन-अडीच वर्षे सराव केल्यानंतर आम्ही विजय मर्चंट ट्रॉफीसाठी 16 वर्षांखालील संघाच्या ट्रायल्स देण्याचं ठरवलं. त्यावेळी माझ्या वयामुळे मला निवडण्यात आलं नाही.”

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, @IPL/X

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वैभव समस्तीपूरचा आहे. त्याने आतापर्यंत पाच रणजी सामने खेळले आहेत. याचवर्षी वैभवने बिहार विरुद्ध मुंबईच्या सामन्यात रणजी पदार्पण केलं. सध्या वैभव सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळतो आहे. त्याने 23 नोव्हेंबर रोजी राजस्थानविरुद्ध टी-20मध्ये पदार्पण केलं.

वैभवने बिहारमध्ये झालेल्या रणधीर वर्मा अंडर-19 स्पर्धेत एक त्रिशतकही झळकावलं आहे. वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लारा हा वैभवचा आदर्श आहे. भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर वैभवला वेळोवेळी मार्गदर्शन करतो.

क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार वैभवचे वडील संजीव हेदेखील क्रिकेट खेळाडू होते. मात्र, त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते मोठ्या पातळीवर खेळू शकले नाहीत.

वैभव सूर्यवंशी

फोटो स्रोत, BCA

राजस्थान रॉयल्सने वैभवला त्यांच्या संघात घेतल्यानंतर संजीव सूर्यवंशी म्हणाले की, “मी निशब्द आहे. मला काय बोलू सुचत नाहीये. आमच्या कुटुंबासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटत होतं की त्याची निवड होईल पण त्याला संघात घेण्यासाठी एवढी स्पर्धा असेल असं नव्हतं वाटलं.”

वैभवच्या लहानपणाबाबत बोलताना संजीव म्हणाले की, “मला आता सगळ्या गोष्टी आठवत आहेत. मला स्वतःला क्रिकेटचं वेड होतं. पण वयाच्या 19व्या वर्षी मला मुंबईला जावं लागलं. तिथे मी अनेक कामं केली. एका नाईट क्लबमध्ये बाउन्सर म्हणूनही काम केलं. मुंबईत राहत असताना मला अनेकदा वाटायचं की माझं नशीब कधी बदलेल? पण आता माझ्या मुलाने ते शक्य करून दाखवलं आहे. भविष्यात काय होईल हे मला माहिती नाही पण किमान आता मला त्याच्या क्रिकेटसाठी कुणाकडे हात पसरावे लागणार नाहीत.”

राजस्थान रॉयल्सबाबत बोलताना संजीव म्हणाले की, “राजस्थान रॉयल्सने अनेक तरुण खेळाडूंना घडवलं आहे. त्यामध्ये संजू सॅमसन, ध्रुव जुरेलसारखे खेळाडू राजस्थानने तयार केले. मला असं वाटतं वैभवही तसाच घडेल.”

वैभवने आतापर्यंत पाच रणजी सामने खेळले आहेत. मात्र अजूनही रणजीमध्ये तो मोठी खेळी करू शकलेला नाही. पाच सामन्यांमध्ये मध्य प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने सर्वाधिक 41 धावा केल्या आहेत आणि एकूण तो 100 धावाच करू शकला आहे.

शनिवारी (23 नोव्हेंबर)रोजी राजकोटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना, त्याने राजस्थानचा डावखुरा वेगवान गोलंदाज अनिकेत चौधरी याला दोन षटकार खेचले आणि सहा चेंडूंत 13 धावा काढून तो बाद झाला.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC