Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
हळूहळू आणि शांतपणे जेवण करणं ही आरोग्यदायी जीवनशैलीसाठी एक महत्त्वाची आणि चांगली सवय आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण वेगानं जेवतो, मोबाइल, टीव्ही पाहत जेवतो, ज्यामुळं पचनक्रिया बिघडते, वजन वाढतं आणि आरोग्य धोक्यात येतं.
आरोग्य टिकवण्यासाठी जेवताना कोणती काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेणं सध्याच्या काळात खूप महत्त्वाचं आहे.
टीव्ही पाहताना किंवा मोबाइल फोन वापरत असताना जेवण करणं सोपं असतं, पण विज्ञान याची वेगळी बाजू आपल्या समोर मांडते.
विज्ञान सांगतं की, हळूहळू आणि विचारपूर्वक खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
खरं तर, आपण ज्या वेगानं अन्न खातो, त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो.
यामध्ये पचनक्रिया आणि समाधानापासून ते शरीराच्या वजनाचं व्यवस्थापन आणि एकूण आरोग्य यांचा समावेश होतो.
अन्न पचवण्यास सोपं जातं
लिव्हिया हेसेगावा या ब्राझीलच्या साओ पाउलो विद्यापीठात प्रशिक्षित न्यूट्रिशनिस्ट (आहारतज्ज्ञ) आहेत.
त्या सांगतात, “हळूहळू जेवण केल्यामुळं अन्नाचे छोटे-छोटे तुकडे होतात आणि त्यामुळं पचन सोपे होते. मी माझ्या रुग्णांना हे साधं पण महत्त्वाचं वाक्य नेहमी आठवण करून देते, पोटाला दात नसतात. त्यामुळं जेव्हा मोठे-मोठे तुकडे पोटात जातात, तेव्हा आपली पचन प्रक्रिया मंदावते.”
“अन्न अधिक वेळ चावल्याने लाळेमध्ये पचनास मदत करणाऱ्या एन्झाईम्सचं उत्पादन वाढतं. ज्यामुळे पोषक घटक शरीरात अधिक प्रभावीपणे शोषले जातात,” असं त्या म्हणतात.
अन्न व्यवस्थितपणे चावलं गेलं नाही, तर पोटाला खूप कष्ट करावे लागते. ज्यामुळं पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते आणि पचन क्रियाही मंदावू शकते.

हेसेगावा म्हणतात, “म्हणूनच काही लोकांचं जेवण झाल्यानंतर अनेक तासांनी देखील पोट फुगलेलं राहतं आणि त्यांना सुस्ती जाणवू लागते.”
परंतु, एक घास किती वेळा चावला पाहिजे हे मात्र निश्चित नाही.
तज्ज्ञ म्हणतात की, संख्येवर जास्त लक्ष देणं महत्त्वाचं नाही. जेव्हा अन्न पोटात पोहोचते, तेव्हा ते मऊ असावं आणि त्याचं प्रमाण असं असावं की ते सहजपणे पचावं, हे महत्त्वाचं आहे.
हेसेगावा सांगतात, “जेवण करताना लक्ष विचलित होणं, जसं की टीव्ही पाहणं, फोन वापरणं, किंवा बोलणं हे अन्न चावण्यासाठीची क्षमता कमी करतं. यामुळे आपण अन्न लवकर लवकर चावतो आणि आपल्या शरीरात हवा जास्त जाते. परिणामी आपलं पोट फुगतं.”
वजन वाढण्याची समस्या
पचनावर परिणाम होण्यासोबतच वजन वाढण्याची समस्याही निर्माण होते.
सेंडर कर्स्टन या न्यूट्रिशनल सायन्सेस विभागाच्या संचालिका आहेत. त्या न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये श्लेफर फॅमिली प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्या म्हणतात, “जलद अन्न सेवन केल्याने अधिक ऊर्जा खर्च होते. परिणामी, आपण प्रति मिनिट जास्त कॅलरीज वापरतो. संशोधनातून असं दिसून आलं आहे की, वेगाने अन्न खात असताना आपण अधिक अन्न खातो.”

फोटो स्रोत, Getty Images
“हळूहळू अन्न खाल्ल्यामुळे अन्न आपल्या तोंडात जास्त वेळ राहते. यामुळे पचनक्रिया सुरू होण्यासाठी आवश्यक हार्मोन्स सोडण्यास मदत करणारे सिग्नल वाढतात.”
“आपलं पोट भरलेलं आहे, हे सांगणारे हार्मोन्स शरीरात सोडण्यासाठी मेंदूला थोडा वेळ लागतो. जे लोक खूप लवकर अन्न खातात, ते प्रत्यक्षात गरजेपेक्षा जास्त अन्न खातात, कारण पोट भरलं आहे हे संकेत मिळवण्यासाठी शरीराला वेळच मिळत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
याचा परिणाम असा होतो की, आपण जास्त कॅलरी घेतो, ज्याचे शरीरात साठवलेल्या फॅटमध्ये (चरबी) रूपांतर होते.
आरोग्याला धोका
लवकर लवकर जेवल्यामुळं अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस्ट्रायटिस सारख्या पचनाशी संबंधित समस्या आणखी गंभीर होऊ शकतात.
त्याचप्रमाणे, रिफ्लक्सच्या समस्येने पीडित असलेल्या लोकांना वेगानं खाल्ल्यामुळं त्यांच्या अशा लक्षणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते.
हेसेगावा यांच्या मते, “आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेव्हा अन्न मोठ्या तुकड्यांमध्ये आतड्यांपर्यंत पोहोचते तेव्हा ते आतड्यांतील बॅक्टेरियाचे संतुलन बिघडवू शकते, ज्यामुळं संपूर्ण पचन तंत्रावर परिणाम होऊ शकतो.”

फोटो स्रोत, Getty Images
ही सवय कायम राहिली, तर ते लठ्ठपणाचे कारण बनू शकते, असं त्या म्हणाल्या.
विशेषत: जर आपल्या जीवनशैलीत आधीपासूनच काही अनहेल्दी (अनारोग्यकारक) सवयी असतील तर आपले वजन वाढण्याचा धोका असतो.
यामुळं, आपल्या मेटाबॉलिजमशी (चयापचय) संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.
यामध्ये टाईप 2 मधुमेह, फॅटी लिव्हर (यकृत) संबंधित आजार, हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि कोलोरेक्टल, स्तन आणि स्वादुपिंडाचा (पॅन्क्रियाटिक) कर्करोग यांसारख्या विशिष्ट प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे.
खाताना काय काळजी घ्यावी
ज्या लोकांना खाण्याच्या चांगल्या सवयी लावायच्या आहेत, त्यांच्यासाठी हेसेगावांचा पहिला सल्ला आहे की, जेव्हा आपण जेवायला बसतो, तेव्हा चमचा किंवा काटा चमचा (फोर्क) खाली ठेवावा.
“जेवण करताना तुम्ही संपूर्ण वेळ तुमचा चमचा किंवा काटा चमचा पकडून ठेवू नका. कारण, यामुळं तुम्हाला लक्षातही येणार नाही आणि तुम्ही जास्त अन्न खाल.”
त्या म्हणतात, “चमचा टेबलवर ठेवून नंतर प्रत्येक घासापूर्वी तो उचलून जेवणासाठी त्याचा उपयोग करा. हे साधं काम जेवण्याची गती कमी करण्यास मदत करेल. म्हणून, तुमचा चमचा वापरा. एक घास घ्या आणि नंतर दुसरा घास खाण्याआधी चमचा पुन्हा एका बाजूला ठेवा.”
अन्न पूर्णपणे बारीक होईपर्यंत तो घास चावावा. अगदी त्या अन्नाचा लगदा व्हायला हवा, असा सल्ला हेसेगावा यांनी दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
त्या म्हणाल्या की, “जेव्हा अन्न लगद्या इतकं बारीक आणि मऊ होतं, तेव्हा आपण अन्न नीट चघळत आहात याचे हे संकेत देतात. असं केल्याने नैसर्गिकपणे आपल्या खाण्याचा वेग कमी होईल.”
दुसरं म्हणजे, जेवताना आपलं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी टाळणं देखील महत्त्वाचं आहे.
टीव्ही पाहताना किंवा मोबाइल फोन वापरताना अन्न खाल्ल्यास आपण किती आणि वेगानं खात आहात हे विसरून जाऊ शकतो. अशा परिस्थितीत जागरूक राहून, लक्ष देऊन जेवण केल्यास अशा सवयींपासून आपण स्वतःला वाचवू शकतो.
हेसेगावा म्हणतात, “जेवताना जास्त बोलणं टाळण्याचा प्रयत्न करा. बोलण्यामुळे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं आणि नकळत आपण घाईघाईत जास्त अन्न खाऊ शकतो.”
“म्हणूनच, कमी बोलत जेवण केल्यास, आपल्याला अन्नावर, खाण्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC