Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आता रोमन कॅथलिक चर्चला त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड करावी लागणार आहे.
पोप यांची निवड कशा पद्धतीने होती ती प्रक्रिया आपण जाणून घेऊयात.
पोपची निवड पारंपरिकरीत्या “कार्डिनल्स” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ धर्मगुरूंकडून केली जाते.
ही प्रक्रिया अत्यंत गोपनीय असते. पोप यांची निवड करण्यासाठी मध्ययुगीन काळापासून हीच प्रक्रिया चालत आली आहे.
पोप कोण बनू शकतात, त्यांची निवड कोण करतं?
पदावर असलेल्या पोपच्या मृत्यूनंतर किंवा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर (जसं पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी 2013 मध्ये केलं होतं) नवीन पोपची निवड केली जाते.
त्यांच्या उत्तराधिकारींची नेमणूक रोमन कॅथलिक चर्चचे सर्वोच्च धर्मगुरू म्हणून होते.
बाप्तिस्मा घेतलेला कोणताही पुरुष कॅथलिक पोप म्हणून निवडला जाऊ शकतो.
परंतु, ही जबाबदारी नेहमीच कॅथलिक चर्चमधील वरिष्ठ अधिकारी, ज्यांना कार्डिनल्स म्हणतात यांच्याकडेच गेलेली आहे.
तेच लोक नवीन पोपची निवड करत असतात.

फोटो स्रोत, Getty Images
19 फेब्रुवारी 2025 पर्यंत जगभरात 252 कार्डिनल्स आहेत. ते बिशप देखील असतात. यापैकी फक्त 80 वर्षांखालील कार्डिनल्स यांनाच नवीन पोपच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असतो.
या ‘कार्डिनल; मतदारांची संख्या सामान्यपणे 120 वर मर्यादित असते. पण सध्या नवीन पोपची निवड करण्यास पात्र असलेले 138 कार्डिनल्स आहेत. (पोप फ्रान्सिस यांनी डिसेंबर 2024 मध्ये 21 नवीन कार्डिनल्स नेमले होते.)
नवीन पोपची निवड कशी करतात?
जेव्हा नवीन पोप निवडण्याची गरज असते, तेव्हा सर्व कार्डिनल्सना रोममधील व्हॅटिकनमध्ये पेपल कॉन्क्लेवसाठी (पोप परिषद) बोलावलं जातं.
ही एक निवडणूक प्रक्रिया आहे, जी सुमारे 800 वर्षांपासून चालत आलेली आहे. यात आतापर्यंत कोणताच बदल झालेला नाही.
कॉन्क्लेवच्या पहिल्या दिवशी, ते सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये मास (एक ख्रिश्चन उपासना) आयोजित करतात. त्यानंतर ते व्हॅटिकनच्या सिस्टिन चॅपलमध्ये एकत्र जमतात. तिथे, ‘एक्स्ट्रा ऑम्मेस’ (लॅटिन भाषेनुसार ‘प्रत्येकजण बाहेर’) असा आदेश दिला जातो.
त्यानंतर, नवीन पोप निवडले जाईपर्यंत सर्व कार्डिनल्स यांना व्हॅटिकनमध्येच थांबवलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
कार्डिनल इलेक्टर्सला (मुख्य मतदार) कॉन्क्लेव्हच्या पहिल्या दिवशी सिस्टिन चॅपलमध्ये सुरुवातीचे मत देण्याचा पर्याय असतो.
दुसऱ्या दिवशीपासून ते दररोज सकाळी दोन आणि दुपारी दोन मतदान करतात. जोपर्यंत पोप पदासाठीचे उमेदवार एकापर्यंत खाली जात नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालते.
मतदानात, प्रत्येक कार्डिनल इलेक्टर आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे नाव मतदान पत्रावर ‘एलिजिओ इन समम पोंटिफिसम’ या शब्दांच्या खाली लिहितो, त्याचा अर्थ “मी सर्वोच्च पोंटिफ म्हणून निवडतो” असा आहे. मतदान गुप्त राखण्यासाठी, कार्डिनल्सना त्यांच्या सामान्य हस्ताक्षर शैलीचा वापर न करण्याची सूचना दिली जाते.

दुसऱ्या दिवशी मतदानात निर्णायक निकाल लागला नाही, तर तिसरा दिवस प्रार्थना आणि चिंतनासाठी राखीव ठेवला जातो.
त्या दिवशी कोणतेही मतदान घेतले जात नाही. त्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात होते.
पोप म्हणून निवडून येण्यासाठी एका उमेदवाराला कार्डिनल इलेक्टर्सच्या (मुख्य मतदार) दोन-तृतीयांश मतांची आवश्यकता असते.
या प्रक्रियेस काही दिवस किंवा कधी कधी काही आठवडेही लागू शकतात.
पेपल कॉन्क्लेव्हमध्ये काय होतं?
पेपल कॉन्क्लेव्ह किंवा पोपसाठीची परिषद अतिशय गुप्तपणे होते. कार्डिनल म्हणजे कॅथलिक चर्चचे वरिष्ठ पाद्री किंवा पदाधिकारी व्हॅटिकन सिटीतून बाहेर जाऊ शकत नाहीत, रेडिओ ऐकू शकत नाहीत, टीव्ही पाहू शकत नाहीत, वृत्तपत्र वाचू शकत नाहीत किंवा फोनद्वारे बाहेर कोणाशीही संपर्क करू शकत नाहीत.
कार्डिनल्सच्या निवासस्थानांमध्ये बाहेरच्या कोणालाही प्रवेश नसतो. फक्त घरकाम करणारे कर्मचारी, डॉक्टर आणि त्यांचं कन्फेशन ऐकणारे पाद्रीच तिथे जाऊ शकतात. या सर्वांना गुप्ततेची शपथ देण्यात आलेली असते.

फोटो स्रोत, Getty Images
मतदानादरम्यान, कार्डिनल्स ( मतदान करणारे आणि मतदान करण्यास खूप वृद्ध झालेले, असे दोन्ही प्रकारचे) उमेदवाराच्या गुणवत्तेवर चर्चा करतात.
कोणालाही उघडपणे प्रचार करण्याची परवानगी नसते. व्हॅटिकनचं म्हणणं आहे की, कार्डिनल्सना पवित्र आत्म्याकडून मार्गदर्शन केलं जातं. असं असूनदेखील कोणत्याही उमेदवारासाठी पाठिंबा मिळवण्याची प्रक्रिया खूपच राजकीय स्वरुपाची मानली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
कॉन्क्लेव्हच्या काळात दिवसातून दोनदा वापरण्यात आलेल्या मतपत्रिका जाळल्या जातात. व्हॅटिकनच्या बाहेरच्या लोकांना सिस्टिन चॅपेलच्या (छोटं चर्च किंवा प्रार्थनास्थळ) चिमणीतून धूर बाहेर पडत असल्याचं दिसतं.
कागदांवर पांढरा किंवा काळा रंग लावला जातो. काळा धूर दर्शवितो की मतदानातून कोणताही निर्णय झालेला नाही, तर पांढरा धूर म्हणजे नवीन पोपची निवड झाली आहे.
पोपची निवड झाल्यावर काय होतं?
एकदा मतदानातून पोपची निवड झाली की, नवीन पोपला विचारलं जातं, “सर्वोच्च धर्मगुरू म्हणजे पोप म्हणून झालेली तुमची निवड तुम्हाला मान्य आहे का?”
मग नवीन निवड झालेले पोप, ज्या नावानं ते ओळखले जाऊ इच्छितात, त्या नावाची निवड करतात. त्यानंतर ते पोपसाठीची लांब, ढगळ वस्त्रं परिधान करतात.
कार्डिनल्स त्यांना अभिवादन देतात आणि नवीन पोपसाठी आज्ञाधारक राहण्याचं वचन देतात.
त्यानंतर, सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून खाली जमलेल्या गर्दीसमोर एक घोषणा केली जाते. त्यात ‘हॅबेमस पॅपम’ हे शब्द असतात. हे लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘आपल्याला पोप मिळाले’ असा होतो.

फोटो स्रोत, Getty Images
सेंट पीटर्स बॅसिलिका हे व्हॅटिकन सिटीमधील चर्च असून ते पोपचं अधिकृत निवासस्थान आहे. ते ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानलं जातं.
मग नव्या पोपचं नाव जाहीर केलं जातं आणि त्यानंतर स्वत: पोप लोकांसमोर येतात. ते एक छोटेखानी भाषण करतात आणि एक पारंपारिक आशिर्वाद देतात. तो लॅटिनमध्ये असतो. त्याला ‘उर्बी एट ऑर्बी’ असं म्हणतात. त्याचा अर्थ ‘शहराला आणि जगाला’ असा होतो.
नंतर कॉन्क्लेव्हमध्ये झालेल्या मतदानाच्या प्रत्येक फेरीचे निकाल नव्या पोपना दाखवले जातात. मग ते निकाल सीलबंद केले जातात आणि व्हॅटिकनच्या आर्काइव्हमध्ये म्हणजे अभिलेखागारात ठेवले जातात. ते फक्त पोपच्याच आदेशानं उघडले जाऊ शकतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC