Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
1 तासापूर्वी
कॅथलिक समुदायाचे सर्वांत मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं काल सोमवारी 21 एप्रिल रोजी निधन झालं.
त्यांच्या निधनामागचं कारण स्पष्ट करताना व्हॅटिकननं म्हटलं आहे की, ‘स्ट्रोक आल्यानंतर हृदयाची धडधड बंद झाल्याने पोप यांचं निधन झालं आहे.’
कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते.
मृत्यूपत्रात काय व्यक्त केली आहे इच्छा?
पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात पॉलीन चॅपल आणि स्फोर्झा चॅपलमधील भिंतीत त्यांचे समाधी बनवावी, अशी इच्छा व्यक्त करुन ठेवली आहे.
त्यांनी या मृत्यूपत्रात लिहिलंय की, “माझ्या आयुष्यात पादरी आणि धर्मगुरू या रूपात सेवा करताना, मी नेहमीच स्वतःला प्रभू येशूची आई व्हर्जिन मेरीला समर्पित केलं आहे. माझी इच्छा आहे की माझं पार्थिव शरीर सेंट मेरी मेजरच्या चर्चमध्ये (बॅसिलिका) दफन केलं जावं.”

फोटो स्रोत, Getty Images
“नकाशात दाखवल्याप्रमाणे, माझी कबर पॉलीन चॅपल आणि स्फोर्झा चॅपलमधील भिंतीतील जागेत असावी, असं मला वाटतं,” त्यांची समाधी साधी असावी आणि कोणत्याही विशेष सजावटीशिवाय असावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.
निधनाची घोषणा आणि जगभरातील नेत्यांकडून शोक व्यक्त
कार्डिनल केविन फॅरेल यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा केली आहे.
कार्डिनल केविन फॅरेल यांनी घोषणा केली की, “प्रिय बंधू आणि भगिनींनो, मला आपल्या पवित्र फादर फ्रान्सिस यांच्या निधनाची घोषणा अत्यंत दुःखाने करावी लागते. आज सकाळी 7.35 वाजता, रोमचे बिशप फ्रान्सिस, पित्याच्या घरी परतले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रभूच्या आणि त्यांच्या चर्चच्या सेवेसाठी समर्पित होते.”

फोटो स्रोत, Getty Images
पोप फ्रान्सिस हे कॅथलिक चर्चमधील सुधारणांसाठी देखील ओळखले जातात. असे असूनही, पोप परंपरावाद्यांमध्येही लोकप्रिय होते. फ्रान्सिस हे दक्षिण अमेरिका (अर्जेंटिना) मधील पहिले पोप होते.
रविवारीच, पोप फ्रान्सिस यांनी ईस्टर संडेच्या दिवशी व्हॅटिकनमधील सेंट पीटर्स स्क्वेअरवर सर्वांना संबोधित केलं होतं.
त्यांच्या मृत्यूनंतर जगभरातील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी वेन्स, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की, युकेचे पंतप्रधान किएर स्टार्मर आणि व्हाईट हाऊसनंही शोक व्यक्त केला आहे.
नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींनी व्यक्त केला शोक
पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“परमपूज्य पोप फ्रान्सिस यांच्या निधनानं खूप दुःख झाले. या क्षणी कॅथलिक समुदायाबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. पोप फ्रान्सिस यांना जगभरातील लाखो लोक कायम करुणा, विनम्रपणा आणि आध्यात्मिक धैर्याचे प्रतीक म्हणून स्मरणात ठेवतील,” मोदी म्हणाले.
“लहान वयापासूनच त्यांनी येशू ख्रिस्तांच्या आदर्शांप्रती स्वतःला समर्पित केले होते. त्यांनी गरीब आणि वंचित लोकांची तत्परतेनं सेवा केली. दुःखी लोकांना आशा देण्याचं काम त्यांनी केलं,” असं मोदी म्हणाले.
“भारतातील लोकांविषयी असलेलं त्यांचं प्रेम नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, @narendramodi/X
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही पोप फ्रान्सिस यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
त्यांनी ‘एक्स’वर लिहिलंय की, “पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे अतिव दु:खं झालं आहे. ते करुणा, न्याय आणि शांतीचा एक वैश्विक आवाज होते.”
“त्यांनी नेहमीच गरीब आणि उपेक्षित लोकांना आधार दिला. त्यांनी असमानतेविरोधात निर्भयपणे बोलले आणि मानवतेच्या संदेशाने विविध धर्मातील लाखो लोकांना प्रेरित केलं.”
पोप फ्रान्सिस यांचा शेवटचा संदेश
धर्म, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय शांततेचा उपयोग नाही, असं मत पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या शेवटच्या संदेशामध्ये व्यक्त केलं आहे.
पोप फ्रान्सिस यांचा ईस्टर संडेचा संदेश “शांतता आणि इतरांच्या दृष्टीकोनाबद्दल आदर” असा होता.
पोप यांचा हा संदेश त्यांच्या वतीनं त्यांच्या एका सहाय्यकानं वाचून दाखवला. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “धर्म, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याशिवाय जगात शांतता असू शकत नाही. पोप यांनी त्यांनी शेवटच्या भाषणात गाझामधील लोकांचं, विशेषतः तिथल्या ख्रिश्चन समुदायातील लोकांचं स्मरण केलं. कारण युद्धामुळे ‘मृत्यू आणि विनाश’ होतो आणि त्यातून मानवतावादी परिस्थिती दयनीय होते.”
पोप फ्रान्सिस यांनी जगभरात वाढत असलेला ज्यूविरोध ‘चिंताजनक’ असल्याचंही म्हटलं.
“जगाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अनेक संघर्षांमध्ये आपल्याला मृत्यूसाठी, हत्येसाठीची किती प्रचंड तहान दिसते आहे,” असं ते म्हणाले.
“सर्व इस्रायली लोक आणि पॅलेस्टिनी लोकांच्या दु:खांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो. युद्धविराम व्हावा. ओलिसांची सुटका व्हावी आणि शांततामय भविष्याची आकांक्षा असलेल्या उपाशी लोकांना मदत मिळो,” असं त्या संदेशात म्हटलं आहे.
पोप फ्रान्सिस यांनी युक्रेन युद्धाशी निगडीत सर्व पक्षांना (देशांना) “न्याय्य, समान आणि कायमस्वरुपी शांतता साध्य करण्याच्या उद्देशानं प्रयत्न करण्याचं” आवाहन केलं.
काही दिवसांपूर्वी झाला होता न्यूमोनिया
पोप फ्रान्सिस यांना काही दिवसांपूर्वी न्यूमोनिया झाला होता, त्यांच्या दोन्ही फुप्फुसांना संसर्ग झाला होता.
त्यानंतर त्यांना रोमच्या जेमेली रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणीनंतर न्यूमोनियाचं निदान केलं होतं.
त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना संसर्ग झाल्यानं विशेष उपचारांची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पोप फ्रान्सिस यांना बायलॅटेरल न्यूमोनिया असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं होतं.

फोटो स्रोत, Reuters
न्यूमोनियाचा संसर्ग एका फुफ्फुसाऐवजी दोन्ही फुप्फुसांमध्ये पसरतो, तेव्हा त्याला ‘बायलॅटेरल न्यूमोनिया’ म्हणतात. मात्र, सिडनी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, ‘बायलॅटेरल न्यूमोनिया गंभीर असेलच असे नाही.
रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पोप यांना काही दिवस ब्राँकायटिसची लक्षणं दिसत होती. त्यामुळं त्यांनी भाषणं वाचण्यासाठी काही अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली होती.
त्यानंतर काही प्रार्थना सभांमध्येही पोप यांना सहभागी होता आलं नव्हतं.
रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करताना 12 वर्षांच्या काळात पोपना अनेक वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागलं होतं. त्यांनी जीवनातही अनेक वैद्यकीय समस्यांचा सामनाही करावा लागला. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांचं एक फुफ्फुस काढावं लागलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC