Source :- BBC INDIA NEWS

केस गळती थांबवता येते का? डॉक्टर काय सल्ला देतात

फोटो स्रोत, Getty Images

5 मिनिटांपूर्वी

हेअर लॉस म्हणजेच केस गळती ही आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत एक सामान्य समस्या बनली आहे. ही समस्या पुरुषांची असो वा महिलांची, तरुणांची असो वा वयोवृद्धांची, सर्वांनाच याचा सामना करावा लागत आहे. यामुळं केवळ दिसण्यात बदल होत नाही, तर आत्मविश्वासावरही मोठा परिणाम होतो.

कोणत्याही व्यक्तीला केस गळतीचा त्रास होऊ शकतो, मग ती व्यक्ती कोणत्याही लिंगाची, वयाची किंवा वंशाची असो.

केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात, जसं की अनुवंशिकता, वैद्यकीय परिस्थिती, वय वाढणं किंवा अगदी आपली जीवनशैली देखील याला जबाबदार असू शकते.

केस गळतीची कारणं आणि उपाय यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी आम्ही यूके येथे कार्यरत असलेल्या क्लिनिकल डायरेक्टर ट्रायकोलॉजिस्ट एनिटन एगाइडी यांच्याशी संवाद साधला. त्या विविध प्रकारच्या क्लायंट्सना भेटतात, विशेषतः आफ्रो-टेक्सचर्ड केस असलेल्या महिला त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात येतात.

“केस गळतीपासून कोणीही वाचू शकत नाही. अगदी माझाही त्यात समावेश होतो. मला केसांबद्दल बरंच काही माहिती आहे. परंतु, मलाही पूर्वी केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागलं आहे,” असं एनिटन एगाइडी यांनी म्हटलं.

अमेरिकन वैद्यकीय नियतकालिक डर्माटोलॉजिक सर्जरीच्या अहवालानुसार, वयाच्या 18 ते 29 वयोगटातील 16 टक्के पुरुषांना केस गळतीचा अनुभव येतो. हा टक्का 30 ते 39 वयोगटात वाढून 30 टक्के होतो, आणि 40 ते 49 वयोगटात तर निम्म्याहून अधिक पुरुषांना केस गळतीचा अनुभव येतो.

केस गळती (ज्याला वैद्यकीय भाषेत अ‍ॅलोपेशिया म्हटलं जातं) ही समस्या बहुतांश वेळा पुरुषांमध्ये अधिक चर्चेची ठरते. महिलांमध्ये मात्र केस गळती सामान्य आहे.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, सुमारे एक तृतीयांश महिलांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी केस गळतीचा अनुभव येत असतो.

सुरूवातीची केस गळती थांबवता येऊ शकते का?

सर्वप्रथम एखाद्या तज्ज्ञाकडून याबाबत योग्य निदान करून घेणं महत्त्वाचं आहे, असं त्वचारोग तज्ज्ञ डॉ. आंचल पंथ सांगतात. कारण आपल्या दैनंदिन जीवनशैलीत काही बदल करून केस गळतीवर उपाय करता येऊ शकतो.

“चांगल्या केसांच्या वाढीसाठी प्रोटीनयुक्त आहार अत्यंत महत्त्वाचा आहे,” असं डॉ. आंचल पंथ सांगतात. “कोणत्याही प्रकारची पौष्टिक कमतरता असेल, तर ती सर्वप्रथम दूर करणं गरजेचं आहे.”

ज्या लोकांना केस गळत असल्याचं लक्षात येतं, ते लगेच मिनोक्सिडिल किंवा कॅफिन-आधारित उत्पादने असलेल्या केमिकलयुक्त टॉपिकल क्रीम्सचा वापर करण्याचा प्रयत्न करतात.

केस गळती थांबवता येते का? डॉक्टर काय सल्ला देतात

फोटो स्रोत, Getty Images

मिनोक्सिडिल सामान्यतः द्रव किंवा फोम स्वरूपात वापरले जाते. हे केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळं केसांची वाढ होण्यास मदत होऊ शकते.

परंतु, डॉ. पंथ इशारा देतात की, मिनोक्सिडिल “केसांच्या गळतीला कमी करण्यास मदत करेल, पण त्यामुळं नवीन केसांची वाढ होणार नाही.”

विशेषतः पुरुषांसाठी, केस गळतीसाठी केटोकोनाझोल देखील वापरले जाते. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, डँड्रफवर (कोंडा) उपचार करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. कारण डँड्रफमुळे केस गळती आणखी वाढू शकते.

मिनोक्सिडिलच्या तुलनेत, केटोकोनाझोल हे एक अँटीफंगल औषध आहे, जे मुख्यतः स्कॅल्पवरील (टाळू) फंगल संसर्गावर उपचार करण्यासाठी वापरले जाते. काही अभ्यासांनुसार, केटोकोनाझोल डीएचटी (डायहायड्रोटेस्टोस्टेरोन) हार्मोनाचे प्रमाण कमी करू शकते, जे केस गळतीशी संबंधित आहे.

“खूप लोकांना असं वाटतं की, केस गळतीसाठी काही उपचार केल्यावर केस पुन्हा वाढतील आणि नंतर काही करण्याची आवश्यकता भासणार नाही. पण असं नाही,” असं डॉ. पंथ म्हणतात.

जीवनशैलीतील बदल

आपल्या केसांच्या प्रकाराबद्दल शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे.

आफ्रो केसांमध्ये तज्ज्ञ असलेल्या ट्रायकोलॉजिस्ट एगाइडी म्हणतात की, काही हेअरस्टाइल्स, जसं की ताणलेल्या, जड वेणी आणि हिट स्टायलिंग हे कधी कधी सुरूवातीच्या केस गळतीला कारणीभूत ठरू शकतात.

“स्टायलिंग समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुमचे केस आनंदाने सजवा, पण तुम्ही ज्या हेअरस्टाइल्स वापरत आहात, त्या जड आणि ताणलेल्या असतील तर त्याचा मुळांवर दबाव पडू शकतो, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे,” असं त्या म्हणतात.

आणि तुमच्या केसांची मुळंच (फॉलिकल्स) केसांच्या वाढीसाठी जबाबदार असतात, परंतु, तेच तुमच्या टाळूवरील जखमांच्या उपचारांनाही आणि त्वचेमधील पुनरुत्पादन प्रक्रियेस देखील जबाबदार असतात.

“मी काही क्लायंट्सना अत्यधिक स्टायलिंगमुळे ट्रॅक्शन अ‍ॅलोपेशिया आणि दुसऱ्या केस गळतीच्या स्थिती, ज्याला फ्रंटल फायब्रोसिंग अ‍ॅलोपेशिया म्हटलं जातं, याचं एकत्रीकरण पाहिलं आहे,” असं त्या म्हणतात.

केस गळती वाढवू शकणाऱ्या अन्य गोष्टी म्हणजे धूम्रपान, मद्यपान, ताण-तणाव आणि झोपेची कमतरता.

डॉ. पंथ म्हणतात की, धूम्रपानामुळे व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन नावाची स्थिती निर्माण होते, ज्यामुळं तुमच्या अवयवांमध्ये रक्ताभिसरण कमी होतं आणि हे टाळूसाठीही लागू होऊ शकतं.

तुमची टाळू नियमितपणे न धुणं देखील केस गळतीला कारणीभूत ठरू शकतं. जर तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुतले नाहीत तर आंघोळ करत असताना तुम्हाला केस गळत असल्याचे लक्षात येईल.

डॉ. पंथ सल्ला देतात की, “जर तुमच्या टाळूमध्ये तेलाचं प्रमाण जास्त असेल, तर तुम्ही दररोज किंवा प्रत्येक दुसऱ्या दिवशी तुमचे केस धुवू शकता.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, जर तुमचा स्कॅल्प आणि केसांचा प्रकार सामान्य किंवा कोरडा असेल, तर किमान आठवड्यात तीन वेळा ते धुणं आवश्यक आहे.

हेअर ट्रान्सप्लांट (केस प्रत्यारोपण) हा सोपा उपाय आहे का?

हेअर ट्रान्सप्लांट ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे आणि यात शस्त्रक्रियेचा समावेश असतो. लोक प्रामुख्याने त्यांच्या लुकमध्ये (दिसण्यामध्ये) आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट करतात.

भरपूर खर्च हा मुद्दा वगळता हेअर ट्रान्सप्लांट लोकप्रिय आहे. कारण ते तुम्हाला सर्वोत्तम दृश्यात्मक (चांगलं दिसणं) परिणाम देऊ शकतात, असं डॉ. पंथ म्हणतात.

हेअर ट्रान्सप्लंट (केस प्रत्यारोपण) हा सोपा उपाय आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

पण, त्यांचं म्हणणं आहे की काही वेळा हे समजून घेतलं जात नाही की, जर तुम्ही ट्रान्सप्लांट नंतर तुमच्या केसांवरील उपचार करणं थांबवलं, तर पाच ते सहा वर्षांनी तुमच्या नैसर्गिक केसांची गळती होऊ शकते, आणि तुमच्याकडे फक्त तुमचे ट्रान्सप्लांट केलेले केसच शिल्लक राहतील.

ट्रायकोलॉजिस्ट एनिटन एगाइडी यांना वाटतं की, हेअर ट्रान्सप्लांट हा तुमचा शेवटचा उपाय असावा. परंतु हे प्रत्येकाच्या केसगळतीचं उत्तर असू शकत नाही.

याचं वर्णन करताना एनिटन एगाइडी म्हणाल्या की, “हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे मुळात तुम्ही बाहेर जात आहात, थंडी आहे आणि तुम्ही फक्त एक जॅकेट घालता, पण जॅकेटखाली काहीही नसतं.

“मग थोड्या वेळानं तुम्हाला थंडीही वाजू लागेल.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC