Source :- BBC INDIA NEWS

सैनिक

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, माजिद जहांगीर
  • Role, बीबीसी प्रतिनिधी, श्रीनगरहून
  • 22 एप्रिल 2025, 19:00 IST

    अपडेटेड 14 मिनिटांपूर्वी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. बैसरन भागात हा हल्ला झाला असून त्यात काहीजण जखमी झाल्याची बातमी आहे. या हल्ल्यात झालेल्या मृत्यूंबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मंगळवारी (22 एप्रिल) झालेल्या या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला आहे. तसंच वैद्यकीय टीमदेखील घटनास्थळी पोहोचली आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, “या घटनेमुळे मला धक्का बसला आहे. मला यावर विश्वास बसत नाही. आमच्या पर्यटकांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे.”

आणखी एका पोस्टमध्ये ओमर अब्दुल्लाह यांनी लिहिलं आहे, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांची माहिती गोळा केली जाते आहे.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांवर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे.

बीबीसी प्रतिनिधी माजिद जहांगीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांबद्दल अद्याप अधिकृत खातरजमा झालेली नाही. काही जखमींना अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

माजिद जहांगीर यांनी गुजरातच्या एका पर्यटकाशी या हल्ल्याबद्दल संवाद साधला आहे. पर्यटकांच्या ज्या गटावर हल्ला झाला होता, त्या गटामध्येच हा पर्यटकदेखील होता.

या पर्यटकानं सांगितलं की अचानक हल्ला झाल्यामुळे तिथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. प्रत्येकजण ओरडत, रडत तिथून पळू लागला.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममधील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन आपली प्रतिक्रिया देताना मोदी म्हणाले, “जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती मी संवेदना व्यक्त करतो. घटनेतील जखमी झालेले लोकं लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो.”

X पोस्टवरून पुढे जा

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मजकूर उपलब्ध नाही

Xवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

“पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडलं जाणार नाही, योग्य ती कारवाई केली जाईल! त्यांचा दुष्ट अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा संकल्प अढळ आहे आणि तो आणखी मजबूत होईल,” असंही मोदी म्हणाले.

राहुल गांधींची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले, “जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची घटना निंदनीय आणि मन हेलावून टाकणारी आहे.

“आपल्या आप्तजनांना गमावणाऱ्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. घटनेतील जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो.”

राहुल गांधी

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “दहशतवादाविरोधात संपूर्ण देश एकजूट आहे. सरकारनं जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याच्या थापा मारण्यापेक्षा योग्य ते पाऊल उचलून कारवाई करावी. जेणेकरुन अशा घटनांना आवर घालता येईल आणि निर्दोष भारतीयांना आपला जीव गमवावा लागणार नाही.”

हल्ल्याबद्दल अमित शाह काय म्हणाले?

पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमित शाह यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यामुळे मला दु:ख झालं आहे. या हल्ल्यात मारले गेलेल्या लोकांच्या कुटुंबाबरोबर माझी संवेदना आहे.”

अमित शाह म्हणाले की, या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना सोडलं जाणार नाही आणि त्यांना पूर्ण ताकदीनं उत्तर दिलं जाईल.

अमित शाह पुढे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांबरोबर त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली आहे.”

अमित शाह

फोटो स्रोत, Getty Images

जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध करत म्हटलं आहे की, हल्लेखोरांना सोडलं जाणार नाही.

त्यांनी एक्सवर लिहिलं आहे, “पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. हा घृणास्पद हल्ला करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही.”

“माझं डीजीपी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. आर्मी आणि पोलीस दलानं या परिसराला वेढा घातला आहे आणि ते त्यांची कारवाई करत आहेत.”

तर पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनीदेखील या हल्ल्याचा निषेध केला आहे.

त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, “पहलगामध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी कठोर शब्दात निषेध करते. याप्रकारचा हिंसाचार अजिबात स्वीकारार्ह नाही. ऐतिहासिकदृष्ट्या काश्मीरनं पर्यटकांचं मनापासून स्वागत केलं आहे. त्यामुळे या हल्ल्याची ही दुर्मिळ घटना खूपच चिंताजनक आहे.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC