Source :- BBC INDIA NEWS

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विठ्ठल रामजी शिंदे

फोटो स्रोत, Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal

विठ्ठल रामजी शिंदे हे 23 एप्रिल 1873 रोजी, म्हणजे आजपासून 152 वर्षांपूर्वी, कर्नाटकमधील जमखंडी येथे मराठा-ब्राह्मणेतर समाजात आणि कन्नड भाषिक भागामध्ये जन्माला आलेले व्यक्तीमत्व.

एका मराठा कुटुंबात जन्माला येऊनसुद्धा त्यांचं पालन आणि पोषण हे एका लिंगायतधर्मीय परिवारामध्ये झाले होते. परंतु, शिंदे यांची जडणघडण आणि त्यांच्या विचारांचा परिणाम हा कर्नाटकमध्ये न होता, तो महाराष्ट्रमध्ये झाला.

विठ्ठल रामजी शिंदेंनी केवळ लोकमनावर ठसा उमटवला नाही, तर ते बराच काळ महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र राहिले. त्यांनी मोठं जनमत निर्माण केलं. दुर्दैव असं की, या जनमताचा ज्या पक्षाला राजकीय फायदा झाला, तेही त्यांना विसरले.

शिंदेंनी चालवलेल्या आंदोलनाचे परिणाम हे चांगल्या आणि वाईट दोन्ही दृष्टिकोनातून पाहता येऊ शकतात. इतिहासाचा मागोवा घेणे हे काहीवेळा वेदनादायी असतं खरं, परंतु त्यातील चुका दुरुस्त करून पुढे जाणे हे सृजनशीलतेचं लक्षण असतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाच्या कालखंडावर ठसा उमटवणाऱ्या शिंदेंच्या कार्याचा आढावा घेणं आवश्यक आहे.

आपण या लेखातून विठ्ठल रामजी शिंदे यांना शाहू-फुले-आंबेडकरी दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिंदेंच्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंचा अभ्यास करून भूमिका समजून घेणारा असेल.

शेतकरी ते बुद्धिजिवी

ब्रिटिश काळापूर्वी आणि ब्रिटिश काळामध्ये भारतीय समाजामध्ये बुद्धिजीवी कोण आहे, हा प्रश्न दुय्यम असायचा. त्याहीपेक्षा बुद्धिजीवी कोण होऊ शकतात, हा फार महत्वाचा मुद्दा होता आणि ते जन्माधारित ठरत असे.

शेती करणे हे दुय्यमपणाचं लक्षण मानलं जायचं. कारण जमीन कसणे हे शारिरीक कष्टाशी जुळलेली बाब होती. बौद्धिक काम करणे हे श्रेष्ठतेच मानलं जायचं.

या श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पना आजही अस्तित्वात आहेत, परंतु, जातीच्या भिंती हळूहळू तुटताना दिसत आहेत. अशा समाजरचनेत शिंदेंचा जन्म हा ब्राह्मणेतर आणि शेतकरी समाजात झाल्यामुळे शिक्षण घेण्याची परंपरा त्यांना अपघातानेच मिळाली.

ज्याप्रमाणे सयाजी गाकवाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना मुंबई आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिली होती. त्याप्रमाणेच शिंदेंना सुद्धा परदेशात पदवी आणि उच्चशिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती मिळाली. त्यांनी ऑक्सफर्डला जाऊन ‘तुलनात्मक धर्मचिकित्सा’ केली.

सयाजीराव गायकवाड

सयाजीराव गायकवाड यांची इच्छा होती की, शिंदे यांनी परत येऊन बडोद्यामध्येही धर्मचिकित्सा करणारी संस्था उभी करावी, परंतु ते शक्य झाले नाही.

शिंदेंचे धर्मचिकित्सा करणारे लिखाण बघितल्यास त्यांच्या लिखाणावर जर्मन विद्वान मॅक्स मुलर, मिल-स्पेन्सर तसेच बंगालमधील केशवचंद्र सेन, राजा राममोहन रॉय, ब्राम्हो समाज आणि प्रार्थना समाज यांचा प्रभाव दिसतो. त्यांनी विपुल असं धर्म आणि समाज यांवर लिखाण केले, जे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतं.

अस्पृश्यतेविरोधात भूमिका आणि संघर्ष

ब्रिटिश काळामध्ये अनेक भारतीय, विशेषकरून उच्चवर्णीय समाजामधून परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाऊ लागले. हे शिक्षण घेत असताना अनेकजण ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये गेले आणि काहींनी धर्म आणि समाजसुधारणा करण्याला प्राधान्य दिले.

यामध्ये विशेष म्हणजे बडोदा संस्थानाकडून तिघांना बाहेर शिक्षणासाठी जी शिष्यवृत्ती मिळाली ते म्हणजे – शिंदे, केतकर आणि आंबेडकर. तिघांच्या लेखनात खूप फरक असला, तरी एक बाब समान आहे आणि ती म्हणजे जाती आणि धर्मव्यवस्थेवर अध्ययन.

शिंदे आणि आंबेडकर या दोघांबाबत अजून एक बाब समान आहे आणि ती म्हणजे दोघेही परदेशातून परत आल्यानंतर सामाजिक चळवळीत उतरले.

शिंदे यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ची स्थापना केली. त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शाळा आणि वसतिगृहे उभे करण्याचे काम सुरू केले. त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ आणि ‘अनटचेबल इंडिया’ नावाने ग्रंथनिर्मिती करून अस्पृश्यतेचा प्रश्न जोरकसपणे मांडला.

1919 पर्यंत अस्पृश्य निवारण आणि उन्नतीकरीता वाहून घेतलेलं संघटन म्हणून ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’चे नाव घेतले जाऊ लागले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र

महाराष्ट्रात अनेक ब्राह्मणेतर त्या काळी जाती आणि अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये भूमिका घेत होते. त्यांच्यात विशेषत्वाने फुले हे प्रेरणास्थानी होते. मात्र, शिंदे यांची प्रेरणा फुले नव्हते.

शिंदे यांची प्रेरणा ही काँग्रेसची चळवळ, टिळक आणि बंगालमधील उच्चवर्णीय – अभिजन समाजातील चळवळी होत्या. बंगालमधील चळवळींच्या काही मर्यादा होत्या. बदल व्हावा पण तो संपूर्ण समाजव्यवस्थेत नाही, तर फक्त उच्चवर्णीय समाजात व्हावा. याउलट फुले हे शूद्र, अति-शूद्र आणि सर्व जातीवर्णातील स्त्रिया यांच्या बदलाला महत्व देतात. परंतु, शिंदेंना बंगालमधील लोक हे शैक्षणिक आणि बौद्धिकदृष्ट्या महत्वाचे वाटत असत.

विशेष म्हणजे शिंदेंनी जेव्हा काम करायला सुरुवात केली त्याच वेळी आंबेडकरसुद्धा शिक्षण घेत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र लिहिताना बी. सी. कांबळे त्यांच्या पहिल्या खंडामध्ये आपली मते नोंदवतात, ‘मुंबईमध्ये ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज इ. संस्था काम करत होत्या. परंतु, यांपैकी कुणालाच आंबेडकर 10 वी पास झाले याचे का कौतुक नाही वाटले? केळुस्कर आणि बोले, जे स्वतः अनुक्रमे मराठा-कुणबी आणि भंडारी जातींमधून येत होते, त्यांनाच आंबेडकरांचा सत्कार करावा असे का वाटले असावे? विशेष म्हणजे त्याचवेळी शिंदेसुद्धा अस्पृश्यतेच्या प्रश्नावर संस्था स्थापन करत होते, पण त्यांनासुद्धा का नाही वाटले की आंबेडकरांचा सत्कार करावा? बोले आणि केळुस्कर यांच्या प्रेरणेमध्ये फुले यांनी दिलेला आदर्श होता.’

कांबळे पुढे याच ग्रंथात मार्मिक विवेचन करतात की, या सर्व संस्था आणि त्यांच्यामधील प्रेरणा या वेदप्रामाण्यवादी होत्या, त्यामुळेच शिंदेकडून बाबासाहेबांच्या सत्कारसंबंधीची अपेक्षा करणे गैर वाटते.

पुढे जाऊन ते असेही म्हणतात, “मराठा लोकांना ब्राह्मणांचे वर्चस्व नको, मात्र ब्राह्मणांचे वर्चस्व लादणारे वेद हवे आहेत.”

विठ्ठल रामजी शिंदे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, Maharashtra Rajya Sahitya ani Sanskruti Mandal/BBC

विशेष म्हणजे, 1918 ला शिंदे यांनी सयाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनामध्ये टिळकसुद्धा सहभागी झाले होते. यामध्ये जेव्हा अस्पृश्यतेच्याविरोधात ठराव मांडला गेला, तेव्हा टिळकांनी त्यावर सही न करण्यात धन्यता मानली.

त्यांपैकी एक ठराव ज्यावरून मोठा वाद झाला, तो म्हणजे, संस्थनिकांनी अस्पृश्यतेच्या विरोधात पावले उचलावीत. त्याला उत्तर म्हणून केळुस्कर रागामध्ये येऊन म्हणतात, “बडोदे संस्थानासारख्यातसुद्धा अस्पृश्याबद्दल हलगर्जीपणा दिसून येतो.

“एका महार गृहस्थाला (डॉ. आंबेडकर) महाराज सयाजीराव यांनी हजारो रुपये खर्च करून अमेरिकेला शिक्षणासाठी पाठविले, ते महार गृहस्थ एम. ए., पीएच.डी होऊन आले. त्यांना सिडेनहॅमसाहेबांनी इम्पिरियल सर्व्हिसमध्ये मोठी जागा देऊ केली, परंतु त्यांनी महाराज सरकारच्या पदरी नोकरी करणार म्हणून ती नाकारली.

“ते गृहस्थ बडोदे संस्थानात येऊन महाराजांना भेटले. ‘तुमची व्यवस्था दिवाणजीकडे सोपविली आहे’, असे त्यांना महाराजांनी सांगितले. दिवाणजींनी त्यांना दीडशे रुपयाची नोकरी दिली, परंतु त्यांना सगळ्या बडोदे संस्थानात कोठेही राहण्यास जागा मिळेना. विचारे कंटाळून इकडे मुंबईत आले. सध्या ते मुंबईत आहेत. सरकारकडे अर्जावर अर्ज करीत आहेत. परंतु त्यांचा काहीएक उपयोग झाला नाही असा आपला समज आहे.”

जॉ. बाबासाहेब आंबेडकर

फोटो स्रोत, OTHER

पुढे जेव्हा आंबेडकर हे शिक्षण पूर्ण करून आले, त्यावेळेस शिंदे यांचे महत्व हे ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य समाजात मोठ्या प्रमाणात वाढले होते. विलायतेतून शिक्षण, त्यांनी सुरू केलीली कामे यांमुळे शिंदे हे नामांकित गृहस्थ झाले होते.

1919 मध्ये बडोदा संस्थानामधून शिष्यवृत्ती मिळालेले दोन विद्वान साऊथबरो समितीसमोर एकमेकांसमोर उभे झाले. पुढे जो ‘शिंदे आणि गांधी’ विरुद्ध ‘आंबेडकर आणि शाहू’ वादाने महाराष्ट्र ढवळून निघाला, त्या वादाची सुरवात झाली ती साऊथबरो समिती समोर झालेल्या साक्षीने.

समितीद्वारे शिंदे याना आमंत्रित करण्यात आले होते. आंबेडकर हे सरकारी नोकरदार असल्यामुळे त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. शेवटी, आंबेडकरांनी पत्राद्वारे आपली बाजू मांडणे गरजेचे आहे, हे समजावून दिले.

ज्यादिवशी शिंदे यांनी साक्ष दिली, त्याच दिवशी आंबेडकरांनासुद्धा आमंत्रित केले गेले होते. यामध्ये आंबेडकरांनी शिंदे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली. यावरून अनेक विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. आंबेडकरांनी एक भीती व्यक्त केली होती, ती म्हणजे, शिंदे हे ‘को-ऑप्शन’चा प्रस्ताव आणू इच्छितात. त्याद्वारे अस्पृश्यांचे प्रतिनिधी हे स्पृश्य आणि सरकार निवडतील.

शिंदे यांच्यावर लिखाण करणारे सदानंद मोरे, रा. ना. चव्हाणसुद्धा मान्य करतात की, शिंदे यांनी ही मागणी केली होती. परंतु, पवार यांच्या लिखाणानुसार शिंदे यांनी अशी कुठेही मागणी केली नव्हती, तर ती ऐकीव माहिती होती.

आपण जरी मानले की, ती माहिती ऐकीव होती, तरी मग शिंदे यांनी त्याला धरून उत्तर का नाही दिले हा प्रश्न उभा राहतो.

हे खरे आहे की, शिंदे राखीव मतदार संघाचे समर्थक होते, परंतु ते स्वतंत्र मतदार संघाचे समर्थक होते का? याचे उत्तर नकारात्मकच मिळते.

आंबेडकरांसोबतचा शिंदेंचा संघर्ष

समितीमधील संघर्ष हा नंतर मैदानी संघर्ष बनला. त्याच काळामध्ये शाहू महाराज आणि बाबासाहेब एकत्र येत गेले. माणगाव परिषद झाल्यानंतर शाहू महाराज आणि बाबासाहेब यांच्या नेतृत्वात नागपूरला परिषद झाली. त्याला लागूनच त्याच वर्षी शिंदेंनी सुद्धा नागपूर परिषद भरवली.

या परिषदेमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी झाल्या – एक म्हणजे शिंदे हे अस्पृश्यांचे नेते नाहीत आणि दुसरे म्हणजे त्यांच्या नेतृत्वावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडला गेला. इथे शिंदे यांचं नेतृवं संपतं आणि डॉ. आंबेडकर हे नेतृत्व म्हणून पुढे येतात.

नागपूरच्या परिषदेमध्ये ब्राह्मणेतर नेत्यांनी ‘अस्पृश्य’ आणि आंबेडकर यांच्या पाठीशी राहणारी भाषणं केली. त्याला प्रतिसाद म्हणून डिसेंबर 1920 मध्ये शिंदेंनी नागपूरला भव्य अशी परिषद भरवली आणि त्यामध्ये गांधींनाही आमंत्रण होतं. एकूणच भाषण बघितल्यास परिषदेचा रोख हा शाहू आणि आंबेडकर यांच्याकडे होता. शिंदे आणि गांधीसुद्धा ब्राह्मणेतर समाजाला काँग्रेससोबत उभे राहण्याचा उपदेश करत होते.

हे युद्ध इथेच थांबत नाही, तर आंबेडकर जेव्हा त्यांचं अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेले तेव्हा मूकनायकचे काम सांभाळणारे घोलप शिंदे आणि आणि त्यांच्या संस्थेवर शाब्दिक हल्ला चढवत राहिले.

शिंदे यांच्या विरोधात आंबेडकर यांनी केलेली टीका ही एकांगी बघता येणार नाही. या मागे जी प्रमुख कारणे होती, ती समजून घेणे गरजेचं आहे.

शिंदेंनी अस्पृश्यतेच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेबद्दल शंका घेण्याचं कारण नाही, परंतु शिंदे यांची प्रेरणा जरी फुले नसतील आणि प्रार्थना समाज असेल, तरीसुद्धा त्यांची चळवळ ही अस्पृश्य समाजाला काँग्रेसकडे नेणारी होती.

अस्पृश्यांना स्वतंत्र आणि स्वावलंबी अशा फुले-शाहू-आंबेडकर यांना अपेक्षित असलेल्या चळवळीकडे नेणारी नव्हती. शिंदे यांची टिळकांसोबतची जवळीक शाहू आणि आंबेडकरांना दिसत होते आणि म्हणून त्या मार्गावर समाज गेलेला पाहणं त्यांच्यासाठी त्रासदायक होतं.

काही लोक याला मराठा विरुद्ध अस्पृश्य असा वाद म्हणून पाहतात. पण मग प्रश्न असा आहे की, खुद्द शाहू महाराज सुद्धा मराठाच होते आणि तरीसुद्धा त्यांनी शिंदेंना विरोध करून आंबेडकरांना समर्थन का दिले?

शिंदे आणि ब्राह्मणेत्तर

शिंदे स्वतः मराठा-ब्राह्मणेत्तर समाजात जन्मलेले असूनसुद्धा, ते सत्यशोधक किंवा ब्राह्मणेत्तर आंदोलनात शिरले नाहीत. प्रश्न तयार होतो, ते समर्थक तरी होते का? याचे उत्तर नकारात्मक मिळते. तसेच, त्यांना त्यांच्या जातीचा जातभिमान नव्हता, उलट ते स्वतःला दूर ठेवत असत.

1920 ते 1930 च्या दशकात महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर वाद जेव्हा शिगेला गेला होता, तेव्हा या दोन्ही समूहांमधील वाद मिटावा म्हणून शिंदे यांनी 15 मे 1925 रोजी वाई येथील वसंत व्याख्यान मालेत ब्राह्मण-ब्राह्मणेत्तर ऐक्य परिषद भरवली.

परंतु, एक मात्र सांगावे लागेल, ते सतत ब्राह्मणेत्तरांशी संवाद साधत असत. मात्र, हा संवाद ब्राह्मणेत्तरांना काँग्रेसकडे वळवण्यासाठी असायचा. त्यांच्या मते, ब्राह्मणेत्तर पक्ष, शाहू महाराज आणि आंबेडकर हे ब्रिटिशधार्जिणे आहेत. त्यांच्या मते या सर्व लोकांनी काँग्रेसला आपले मानावे आणि राष्ट्रीय प्रवाहात सहभागी व्हावे.

त्यांनी सुरुवातीला टिळक आणि नंतर गांधी यांचे नेतृत्व स्वीकारावे यासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसतात. रा. ना. चव्हाण यांच्या मते, शिंदे यांना ब्राह्मणेत्तर समाजात आणि अस्पृश्य समाजात राष्ट्रीय प्रवृत्ती नाही, असे त्यांचे मत होते.

ब्राह्मणेत्तर पक्ष, शाहू महाराज आणि आंबेडकर यांच्या मते सामाजिक मुक्तीला प्राथमिकता देणे गरजेचे आहे. राष्ट्रीय आंदोलन हे सामाजिक चळवळीला अडथळा बनत आहे, हे त्यांचे मत होते. शिंदे यांनी या दोन्ही समूहांमध्ये राष्ट्रीय प्रवृत्ती निर्माण व्हावी म्हणून राष्ट्रीय मराठा संघ (1931) आणि अँटी-अनटचेबिलिटी लीग स्थापन करून त्यांनी राष्ट्रीय प्रवृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

शिंदे यांचे प्रत्येक सभेतले भाषण बघितल्यास, ते ब्राह्मणेत्तर पक्षाने काँग्रेसमध्ये जावे याची मांडणी करत असल्याचे दिसते. शाहू महाराज जिवंत असताना, शिंदे ब्राह्मणेत्तर समाजातील नेत्यांना पटवून देण्यात अयशस्वी झाले, कारण फुल्यांचा जो मार्ग होता तोच इतरांनी स्वीकारला होता. मात्र, शाहूंच्या मृत्यूनंतर शिंदे यशस्वी होताना दिसतात.

विठ्ठल रामजी शिंदे यांचं चित्र विजय मोहिते यांनी महाराष्ट्रा राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळानं प्रकाशित केलेल्या चरित्रासाठी रेखाटले आहे.

फोटो स्रोत, Maharashtra Rajya Sahitya Ani Sanskruti Mandal

जसा शिंदे विरुद्ध आंबेडकर वादाने महाराष्ट्रात जागा घेतली, तसेच शाहू विरुद्ध शिंदे यांच्यातही वाद होता. शाहूंच्या मते, आंबेडकर हेच अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी आहेत, तर शिंदे यांच्या टिळक आणि काँग्रेससोबत चाललेल्या घडामोडी बघता, अनेक गोष्टींवरून वाद होणे शक्य होते.

शिंदे यांनी मराठा समाजाला स्वतंत्र मतदारसंघ काय, तर राखीव जागाही नसाव्यात अशी भूमिका घेतली, याउलट शाहू आणि सत्यशोधक चळवळ चालवणारी मंडळी या भूमिकेच्या समर्थनात होती.

पुण्यात झालेल्या निवडणुकीत शिंदे आणि शाहू यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. शेवटी शिंदेंना शह देण्यासाठी शाहूंनी काँग्रेस किंवा शिंदे यांना समर्थन न करता स्वतंत्र उमेदवाराला मदत केली. परंतु शाहूंच्या मृत्यूनंतर शिंदे यांचं स्थान ब्राह्मणेत्तर समाजात अधिकच वाढलं.

शिंदे यांनी शेतकरी परिषद भरवून गांधी हेसुद्धा ब्राह्मणेत्तर आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि गांधीसुद्धा आपण ब्राह्मणेत्तर आहोत, हे शिंदे यांच्या माध्यमातून मांडतात.

शिंदे म्हणतात, “काँग्रेस तर सुशिक्षितांची आणि तुम्ही अक्षरशत्रू. काँग्रेस स्वतः श्रीमंतांच्या हाती गेली आहे; आणि जाणे साहजिकच आहे. तुम्ही तर दरिद्री. मला एकदा वाटत होते की, ही सारी काँग्रेसची चळवळ शेतकऱ्यांनीच काबीज करावी.”

आणि हाच मुद्दा नंतर ब्राह्मणेत्तर पक्षालासुद्धा समजावून सांगतात आणि 1931पासून ब्राह्मणेत्तर पक्ष काँग्रेसमध्ये जातो.

जेधे आणि गाडगीळ यांच्यामध्ये झालेला करार आपल्याला माहीत आहे, पण यामागे शिंदे हे प्रेरणा होते, हे फार क्वचित लोकांना माहीत आहे.

1934 साली, शिवाजी मराठा हायस्कूलमधील मराठा विद्यार्थ्यांसमोर शिंदे म्हणतात, “ब्राह्मणेतर पक्ष हा काँग्रेसमध्ये बरखास्त झाला नाही, तर त्याने काँग्रेस व्यापली आहे.”

विशेष म्हणजे हे भाष्य त्यांनी जेधे यांच्यासमोर केले होते. जे जेधे एकेकाळी ब्राह्मणेतरांच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ज्यांची ख्याती होती, ते 1934 नंतर ब्राह्मणेतर चळवळीला काँग्रेसमध्ये बघू लागले होते.

काँग्रेससीकरण आणि दूरगामी परिणाम

शिंदे यांचे अथक परिश्रम 1931 नंतर दिसू लागले. अखेर ब्राह्मणेतर पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला. सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर असे स्वतंत्र आंदोलन संपुष्टात आले. काँग्रेस ही शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी जी ओळख होती, ती पुसली जाऊ लागली.

गांधीसुद्धा ब्राह्मणेतर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस उभी राहत आहे, या मतावर हा पक्ष आणि सत्यशोधक आंदोलन पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन झाले. याला काही अपवादही होते, महात्मा फुलेंचे काही अनुयायी यापासून दूर राहिले.

ब्राह्मणेतर पक्ष केवळ पश्चिम महाराष्ट्रतच नव्हे, तर वऱ्हाड प्रांतातही होता. त्यानेही काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. 1934 च्या सुमारास, जेव्हा सत्यशोधक आणि ब्राह्मणेत्तर काँग्रेसमध्ये पूर्णपणे विलीन झाले होते, तेव्हा पुन्हा अशी परिषद भरवावी अशी मागणी होऊ लागली.

त्यावर शिंदे जो प्रतिसाद देत आहे, त्या वरून त्यांचा सत्यशोधक चळवळी बद्दलचा दृष्टिकोन समजुन घेता येऊ शकतो, शिंदे त्या पारिषेदेला उत्तर देताना अधोरिखित करतात की, “परिषदांची आता गरज राहिली नाही, आम्ही पूर्णपणे काँग्रेसशी एकरूप झालो आहोत.”

याबद्दल सत्यशोधक रा. ना. चव्हाण यांनी त्यांच्या लेखात नोंद करून ठेवली आहे. पुढे चव्हाण लिहितात, शिंदे हे काँग्रेसच्या ब्राह्मणेतरवादीकरणामध्ये विजयी झाले.

1940 मध्ये पुन्हा, काँग्रेसमध्ये व्हिलिन झाल्यानंतरसुद्धा भास्कराव जाधव यांनी सत्यशोधक संमेलन भरवले, मात्र या वेळेला शिंदे यांनी दिलेलं उत्तर काही अंशी वेगळे पण दाखवते. ते म्हणतात, “यात जर राजकारण नसेल तर ठीक आहे.”

सत्यशोधक समाजाची गरज आहे, परंतु राजकारण म्हणून नाही हे त्यांच्या विचारातून अधोरेखित होत आहे.

दुसरीकडे, डॉ. आंबेडकर मात्र यामुळे फार व्यथित झाले होते. आंबेडकरांना सहयोग आणि साथीदार म्हणून जी सत्यशोधक मंडळी सोबत राहायची, ती पूर्णपणे काँग्रेसकडे गेली होती.

लोकशाही आणि सामाजिक परिवर्तनासाठी हा पक्ष असावा, असे त्यांना वाटत होते. त्यांनी जाऊ नये म्हणून मायेची साद घातली, परंतु त्या हाकेला उत्तर आले नाही. त्याचा परिणाम म्हणून आंबेडकरांनी चालवलेल्या मोहिमेलाही खीळ बसली.

बहिष्कृत सभा – माणगाव, नागपूर, दिल्ली, महाड सत्याग्रह असो अथवा नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह असो, सत्यशोधक आणि ब्राह्मणेतरही भाग घेतात. ते आंबेडकरांच्या पाठीशी उभे राहतात. मात्र, पुणे कराराच्या वेळी ही मंडळी द्विधा अवस्थेत जातात.

वैचारिक आणि नैसर्गिक तत्त्वांच्या आधारावर सत्यशोधक मंडळी बाबासाहेब यांच्या पाठीशी उभी राहायला पाहिजे होती, परंतु ती तसे करत नाही. ते गांधी यांनाही समर्थन करू शकत नव्हते, कारण त्यांना बाबासाहेब यांनाही दुखवायचे नव्हते.

भाऊराव पाटील, जैन ब्राह्मणेतर, यांनीही भूमिका घेतली नाही. त्यांच्या मते, हा वाद थांबावा. त्यांनी पुढे ‘युनियन मिशन’ नावाने अस्पृश्य समाजासाठी (संस्था) काढली; ‘युनियन’ म्हणजे गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये झालेला तह. शिंदे हे मुळातच गांधींचे समर्थक असल्यामुळे ते गांधींना भेटायला गेले होते, परंतु बाकी मंडळींची फार गोची झालेली दिसते.

दुसरा परिणाम म्हणजे. जो मराठा, तसेच इत्तर ब्राह्मणेत्तर वर्ग सुद्धा समाज सुधारणा व धर्म सुधारणांच्या कार्यात लागला होता, तो राजकीय कामात गुंतला गेला. येथे राजकीय म्हणजे ब्रिटिशांकडून हक्क-अधिकार बद्दल न बोलता, तर ब्रिटिश सरकारच नको, या राजकीय कामात ते लागले.

परिणामतः पुढे, काँग्रेसमध्ये ब्राह्मणेतर समाजात मराठा समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याला फायदाही झाला. राजकीय ताबा तर मिळवलाच. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री बनले, यातच सर्व काही आले, पण धर्म सुधारणा व सामाजिक सुधारणा थांबल्या.

परंतु, शिंदे यांच्या माध्यमातून झालेला प्रयोग लवकर फसला आणि काही वर्षांमध्ये शेतकरी कामगार पक्ष निघाला. यामध्ये विशेष म्हणजे फुलेंनी सुरू केलेली चळवळ याची संपूर्ण जबाबदारी आंबेडकरांच्या खांद्यावर येत आहे. म्हणून ते नाशिकच्या सभेत म्हणतात, “कुणी (ब्राह्मणेत्तर) कुठेही जावो, आम्ही मात्र फुल्यांच्याच मार्गाने जाऊ.”

परिणामतः त्यांना राजकीय यश मिळालं नाही, परंतु सामाजिक आणि धार्मिक जागृती अनुसूचित जातींमध्ये दिसते, ती आपल्याला इतर कुठल्याही समाज घटकात दिसत नाही.

सत्यशोधक समाजाचं आणि ब्राह्मणेतर पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं, यावरून जेधे आणि जवळकर यांच्यावर टीका होत असते आणि दुःखही व्यक्त केले जाते, परंतु शिंदे यांची भूमिकाही लक्षात घेणे गरजेचं आहे.

काँग्रेस हा शेटजी आणि भटजींपासून बहुजन समाजाचा पक्ष आहे, ही रचना केली गेली, यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचं योगदान आहे. मात्र, काळाच्या ओघात शिंदे हे सगळीकडून तुटले.

ज्यांना असं वाटतं की, विठ्ठल रामजी शिंदेंच्या भूमिका चुकल्या, त्यांनी विसरणं हे समजून घेता येऊ शकते. मात्र, ज्या काँग्रेसला शिंदेंनी मोठं केलं, त्यांनी विसरणं ही दुःखदच बाब आहे .

संदर्भ :

  • मूकनायक (1920), स्वराज्यातील आमचे आरोहण, त्याचे प्रमाण या त्याची पद्धती, दि . 27 मार्च 1920
  • शिंदे, रामजी (1933), भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
  • पवार, गो. मा. (2010), विठ्ठल रामजी शिंदे , जीवन व कार्य
  • कांबळे, बी. सी. (2015), समग्र आंबेडकर चरित्र खंड पहिला, बार्टी
  • चव्हाण, रा. ना. ( 2017), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, एक दर्शन – भाग 1, संपादित – चव्हाण, रमेश
  • चव्हाण, रा ना (2018), महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, एक दर्शन – भाग 2, संपादित – चव्हाण, रमेश
  • साठे, पवन ( 2021), महाराजा सयाजीराव गायकवाड आणि विठ्ठल रामजी शिंदे, महाराजा सयाजीराव गायकवाड संशोधन व प्रशिक्षण संस्था

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC