Source :- BBC INDIA NEWS

कॅथलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरू, नेते असलेल्या पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नवीन पोपची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे

फोटो स्रोत, Getty Images

पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी नव्या पोपची निवड करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे.

त्यानिमित्तानं पोपपदावर महिलांची नियुक्ती का केली जात नाही, त्यामागची कारण कोणती, येशू ख्रिस्ताची शिकवण आणि शिष्य यात महिलांचं स्थान, महिलांच्या चर्चमधील नियुक्तीकडे पाहण्याचा पारंपारिक दृष्टीकोन, त्याबद्दल विविध पोपनी मांडलेली मतं आणि अनेक तज्ज्ञांना काय वाटतं, या महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल जाणून घेऊया.

कॅथलिक चर्चचं नेतृत्व महिला करू शकत नाहीत. कॅथलिक ख्रिश्चन धर्मात महिलांना पाद्री म्हणून स्वीकारलं जात नाही. यामागची पार्श्वभूमी काय आहे?

कॅथलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरू, नेते असलेल्या पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर नव्या पोपची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. कार्डिनल्स म्हणजे वरिष्ठ पाद्रींच्या गटाकडून मतदानाद्वारे नव्या पोपची निवड होईल.

कॅथलिक ख्रिश्चन धर्मानुसार फक्त पुरुषच पोप होऊ शकतात. मात्र फक्त पुरुषच चर्चमध्ये पाद्री का असतात?

आतापर्यंत एकूण 250 हून अधिक पोप झाले आहेत. मात्र त्यापैकी एकही पोप महिला नव्हती.

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या दोन हजार वर्षांपासून जगात एक अखंडपणे, अव्याहतपणे सुरू असलेलं एकमेव नेतृत्व म्हणजे कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू किंवा नेते म्हणजेच पोप.

सेंट पीटर हे येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी एक होते. कॅथलिक ख्रिश्चन धर्माचे ते पहिले नेते किंवा धर्मगुरू मानले जातात. पोप या परंपरेची सुरूवात त्यांच्यापासून होते आणि गेली दोन हजार वर्षे हा प्रवाह अखंडपणे सुरू आहे.

आतापर्यंत एकूण 250 हून अधिक पोप झाले आहेत. मात्र त्यापैकी एकही पोप महिला नव्हती.

कॅथलिक ख्रिश्चन धर्मातील महिलांचं स्थान

कॅथलिक ख्रिश्चन धर्मात महिला पोप होता येत नाही, इतकंच नाही तर त्या पाद्री किंवा बिशपदेखील होऊ शकत नाहीत.

क्लॅडसन झेवियर लोयोला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

पाद्रीपासून पोपपर्यंतची विविध पदं आणि परंपरेबद्दल ते सांगतात, “कॅथलिक धर्मात, अध्यात्मिक नेतृत्वापर्यंत धर्मगुरूच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी विविध टप्पे आहेत. त्यात पहिल्यांदा कॅथलिक असावं लागतं, मग पाद्री व्हावं लागतं. त्यानंतर बिशप होतात, नंतर आर्चबिशप होतात आणि मग कार्डिनल होतात.”

ते पुढे म्हणतात, “कार्डिनलपैकीच एकाची पोप म्हणून निवड केली जाते. या पदक्रमात महिलांना कुठेही स्थान नाही किंवा या पदांवर राहण्याची त्यांना परवानगी नाही. महिला नन्स असू शकतात. त्या पाद्रींना मदत करू शकतात.”

“मात्र त्या स्वत: पाद्री होऊ शकत नाहीत. गेली दोन हजार वर्षे ही परंपरा सुरू आहे. अगदी पोपना जरी वाटलं तरीदेखील ही परंपरा बदलता येत नाही.”

दिवंगत पोप फ्रान्सिस यांनी अनेकवेळा ही गोष्ट स्पष्ट केली आहे. 2016 मध्ये एका दौऱ्यावरून परत येत असताना विमानात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितलं होतं.

त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं होतं की एखादी महिला पोप का होऊ शकत नाही? त्या प्रश्नाला उत्तर देताना पोप फ्रान्सिस म्हणाले होते, “पोप जॉन पॉल द्वितीय यांनी हे स्पष्ट केलं आहे. या परंपरेत बदल करता येत नाही.”

यात कधीही बदल करता येणार नाही का असं पुन्हा विचारल्यावर पोप फ्रान्सिस म्हणाले होते, “पोप जॉन पॉल द्वितीय यांचं घोषणापत्र वाचल्यानंतर तुम्ही असंच म्हणू शकता.”

कॅथलिक ख्रिश्चन धर्मात महिलांना पाद्री म्हणून नियुक्त केलं जात नाही

फोटो स्रोत, Getty Images

पोप फ्रान्सिस ज्या घोषणापत्राचा संदर्भ देत होते, तो 1994 मध्ये तत्कालीन पोप, जॉन पॉल द्वितीय यांनी लिहिलेल्या अपोस्टोलिक लेटर ऑर्डिनेशियो सॅकरडोटॅलिसशी संबंधित आहे.

अपोस्टोलिक पत्र म्हणजे स्वत: पोप यांनी त्यांच्या नावे लिहिलेलं ख्रिस्ताच्या शिकवणीशी संबंधित पत्र.

जॉन पॉल द्वितीय यांनी हे अपोस्टोलिक पत्र कॅथलिक चर्चच्या बिशपना लिहिलं होतं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की पाद्रीपद फक्त पुरुषांसाठीच राखीव आहे आणि त्यामागील कारणंदेखील जॉन पॉल द्वितीय यांनी त्यात दिली होती.

या पत्रात जॉन पॉल द्वितीय यांनी महिला पाद्री का होऊ शकत नाहीत याची विविध कारणं दिली होती.

पहिलं म्हणजे, त्यांनी यासंदर्भातील कॅथलिक चर्चच्या परंपरा, पद्धतीकडे लक्ष वेधलं होतं.

“येशू ख्रिस्तानं त्यांच्या शिष्यांना शिकवण्यासाठी, पवित्र करण्यासाठी आणि विश्वासूंवर प्रशासन चालवण्यासाठीच्या कामांची जबाबदारी देण्यासाठी ज्या पाद्री पदाची नियुक्ती केली आहे, ती कॅथलिक चर्चेमध्ये सुरुवातीपासूनच फक्त पुरुषांसाठीच राखीव ठेवण्यात आली आहे,” असं त्या पत्रात म्हटलं आहे.

पोप पॉल सहावे यांनी डॉ. एफ. डी. कोगन या कँटरबरीच्या आर्चबिशपांना एक पत्र लिहिलं होतं. ते अँग्लिकन ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू होते. त्या पत्रात पोप पॉल सहावे यांनी अँग्लिकन चर्चमध्ये महिलांना पाद्रीपदावर नियुक्त करण्यासंदर्भात लिहिलं होतं.

त्या पत्रात पॉल सहावे यांनी म्हटलं होतं की “पवित्र शास्त्रातील नोंदीनुसार, येशू ख्रिस्तानं फक्त पुरुषांमधूनच त्यांच्या शिष्यांची किंवा प्रेषितांची निवड केली होती.”

पोप जॉन पॉल द्वितीय

फोटो स्रोत, Getty Images

पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांच्या पत्रात याचा संदर्भ दिला होता आणि म्हटलं होतं की पाद्री पदावर फक्त पुरुषांची नियुक्ती केली जाऊ शकते.

पोप जॉन पॉल द्वितीय यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता. त्यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं होतं की “परमेश्वराचा आशीर्वाद लाभलेले व्हर्जिन मेरी, मदर ऑफ गॉड आणि मदर ऑफ द चर्च यांना शिष्यपद किंवा प्रेषितपद किंवा पाद्रीपद मिळाले नव्हते.”

“महिलांना पाद्रीपद दिले जात नाही याचा अर्थ महिलांना कमी प्रतिष्ठा आहे किंवा त्यांच्याविरोधात भेदभाव केला जातो, असा लावता येत नाही. किंबहुना त्याउलट, देवाच्या ज्ञानातून निर्माण झालेल्या योजनेचं विश्वासूपणे केलेलं पालन म्हणून पाहिलं पाहिजे.”

शेवटी, पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांच्या अपोस्टोलिक पत्रात म्हटलं होतं की “चर्चच्या दैवी रचनेशी संबंधित सर्व शंका दूर करण्यासाठी, मी जाहीर करतो की चर्चना पाद्रीपदावर महिलांची नियुक्ती करण्याचा कोणताही अधिकार नाही. या निर्णयाचं चर्चशी प्रामाणिक असलेल्या सर्वांनी काटेकोरपणे पालन केलं पाहिजे.”

या पत्राचा दाखला देत पोप फ्रान्सिस म्हणाले होते की कॅथलिक ख्रिश्चन ध्रमात पाद्रीपदावर महिलांची नियुक्ती करण्याची परवानगी नाही.

मात्र ऑगस्ट 2016 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी सूचित केलं होतं की ते महिलांची डीकन म्हणजे चर्चमध्ये अधिकारीपदावर नियुक्ती करण्याचा विचार करत आहेत.

कॅथलिक धर्मात डिकन्स म्हणजे पाद्रीपूर्व पदावरील नियुक्ती आहे. मात्र त्याचबरोबर पोप फ्रान्सिस यांनी त्यावेळेस हे देखील स्पष्ट केलं होतं की पाद्री पदावर महिलांची नियुक्ती कधीही केली जाणार नाही.

येशू ख्रिस्ताच्या जीवनातील महिलांची भूमिका

सेल्वराज व्हॅटिकनच्या रेडिओच्या तामिळ विभागाचे प्रमुख आहेत. या मुद्द्याबद्दल बीबीसीशी व्हॅटिकनमधून बोलताना, सेल्वराज म्हणतात की, येशू ख्रिस्ताच्या काळापासूनची ही प्रथा आहे.

“पाद्रीपदावर पुरुषांची नियुक्ती करण्याची प्रथा येशू ख्रिस्ताच्या काळापासूनची आहे. येशू ख्रिस्ताच्या काळात जरी त्यांच्या अनुयायांमध्ये महिला होत्या तरी, ख्रिस्तानं फक्त 12 पुरुष शिष्यांचीच निवड केली होती,” असं सेल्वराज म्हणतात.

मात्र बायबलमध्ये, येशू ख्रिस्ताच्या जीवनात अनेक महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती, हे दिलं आहे, असं ग्लॅडसन झेवियर म्हणतात.

ते सांगतात, “विशेषकरून मेरी, येशूच्या आई यांना बायबलमध्ये खूप महत्त्व दिलं आहे. तसंच येशूच्या जीवनकाळात विविध प्रसंगी, मार्था आणि मेरी ऑफ बेथनी यांचा उल्लेखदेखील अनेक धर्मग्रंथांमध्ये करण्यात आला आहे.”

'येशू ख्रिस्ताच्या जीवनकाळात अनेक प्रसंगी मार्था आणि मेरी ऑफ बेथनी यांचा उल्लेख अनेक धर्मग्रंथांमध्ये आढळतो

फोटो स्रोत, Getty Images

महिलांची नियुक्ती पाद्री म्हणून केली जाऊ शकत नाही हे पितृसत्ताक विचारांचं सातत्य आहे, ही वस्तुस्थिती आहे, असं भट्टाचार्य म्हणतात. ते चेन्नईतील विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

प्राध्यापक भट्टाचार्य म्हणतात, “ते म्हणतात की येशू ख्रिस्ताचे सर्व 12 शिष्य पुरुषच होते. येशूचे अनेक शिष्य होते. त्यात महिलादेखील होत्या. मात्र याबाबतीत ते सोयीचा दृष्टीकोन स्वीकारत आहेत. येशू ख्रिस्ताच्या अनुयायांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.”

“येशू ख्रिस्ताबरोबर सर्वाधिक त्रास महिलांना सहन करावा लागला होता. त्यामुळे येशू ख्रिस्ताची शिकवण यात अडथळा येत नाही. येशूचं धर्मशास्त्र यात अडथळा आणत नाही. मात्र ज्या लोकांचे विचार पितृसत्ताक आहेत, ते महिलांना पाद्री होऊ देण्यास विरोध करतात,” असं प्राध्यापक भट्टाचार्य पुढे म्हणतात.

‘महिलांना चर्चमध्ये पाद्री होऊ दिलं पाहिजे’

टी. ए. लुसिया एका माजी नन आहेत आणि आता त्या वकील आहेत. त्या म्हणतात की

हे होण्यामागचं कारण धर्म समाजातील प्रतिगामी पैलू आत्मसात करतात.

लुसिया म्हणतात, “येशू ख्रिस्ताबद्दल बोलायचं तर ते शोषितांसाठी लढले. त्यासाठी त्यांना क्रुसावर चढवण्यात आलं, मृत्यूदंड देण्यात आला. मात्र हे धर्म आजही येशू ख्रिस्ताच्या नावाखाली महिलांवर अत्याचार करत आहेत, त्यांचं शोषण करत आहेत.”

“विशेषकरून रोमन कॅथलिक ख्रिश्चन धर्मात, महिलांचं स्थान पुरुषांच्या स्थानाच्या खाली ठेवलं जातं. महिलांना जर पाद्री होण्याची परवानगी देण्यात आली तर त्या पोप होऊ शकतात.”

“मात्र ते महिलांना पाद्री होण्याची परवानगी देत नाहीत. हे धर्म समाजातील प्रतिगामी विचारसरणी आत्मसात करतात. येशू ख्रिस्तच्या शिकवणीत असं म्हटलेलं नाही. येशू ख्रिस्त फक्त सर्वांना स्वातंत्र्य मिळावं याबद्दल बोलले,” असं टी. ए. लुसिया म्हणतात.

टी. ए. लुसिया हा मुद्दा फेटाळतात की येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांमध्ये महिला नव्हत्या, हे त्यांना पाद्री होऊ न देण्यामागचं कारण आहे.

'येशू ख्रिस्ताला क्रुसावर चढवले जात असताना तिथे महिला उपस्थित होत्या,' असं टी. ए. लुसिया म्हणतात

फोटो स्रोत, Getty Images

लुसिया पुढे म्हणतात, “ते म्हणतात की ते येशूचे अनुयायी आहेत. जे कपडे येशू ख्रिस्त परिधान करायचे तसेच कपडे हे लोक घालतात का? येशूनं चर्च आणि धर्म निर्माण केला का? येशूनं पाद्री आणि सर्व रचना निर्माण केली का?”

“येशूबरोबर 12 नाही तर 72 जण होते. या 72 मध्ये अनेक महिला होत्या. येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रुसावर चढवण्यात आलं, तेव्हा तिथे महिला उपस्थित होत्या. त्यामुळेच येशू ख्रिस्ताकडे बोट दाखवून महिलांना त्यांचे अधिकार नाकारणं हे योग्य नाही.”

फक्त कॅथलिक ख्रिश्चन धर्मातच महिलांना पाद्रीपद नाकारलं जातं का, ख्रिश्चन धर्माच्या इतर शाखांमध्ये काय परिस्थिती आहे?

या प्रश्नाला उत्तर देताना प्राध्यापक भट्टी म्हणतात, “ख्रिश्चन धर्मातील बहुतांश प्राचीन पंथ महिलांना पाद्रीपद देत नाहीत आणि चर्चमध्ये नेतृत्व देत नाहीत. अँग्लिकन ख्रिश्चन धर्म आणि इतर काही पंथांमध्ये महिला पाद्री आणि बिशप असतात.”

ते असंही म्हणाले की एक दशकापूर्वी जेव्हा त्यांनी हा मुद्दा मांडला तेव्हा, त्यांना तीव्र विरोधाला तोंड द्यावं लागलं होतं.

त्यामुळे कॅथलिक ख्रिश्चन धर्माच्या सद्यस्थितीत, महिला नन्स म्हणून काम करू शकतात आणि गटांमध्ये एकत्र काम करू शकतात. ज्या ठिकाणी पुरेसे मिशनरी नाहीत, तिथे पाद्रींना मदत करण्यासाठी ही कामं महिला करतात, असं भट्टी म्हणतात.

त्याशिवाय काही ठिकाणी होणाऱ्या कम्युनमध्ये महिलांना समाजसेवा करण्याची, सेवाभावी काम करण्याची परवानगी असते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC