Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Bhagyashree Raut
“मी घर विकलं, रिक्षा विकली पण काहीच गमावलं नाही. कारण, त्या पैशांतून माझी मुलगी मोठी अधिकारी झालीय. मुलीला आयएएस बनवण्यासाठी मला स्वतःला जरी विकावं लागलं असतं तरी मी स्वतःला विकलं असतं. पण, कधी निराश झालो नसतो.”
हे सकारात्मक ऊर्जा देणारे शब्द आहेत यवतमाळमधील अश्फाक अहमद यांचे.
अश्फाक यांची मुलगी आदिबा यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 142 वा रँक मिळाला आहे. त्यामुळं त्या आयएएस होऊ शकतात.
आदिबा मूळची विदर्भातल्या यवतमाळची रहिवासी. शहरातील कळंब चौकात भाड्याच्या एका घरात त्यांचं कुटुंब राहतं. त्यांना स्वतःचं घर नाही.
आदिबाचे वडील अश्फाक अहमद रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषण करतात. त्याच भरवशावर त्यांनी आदिबाचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं.
अल्पसंख्यक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी आदिबा महाराष्ट्रातील पहिली मुस्लीम महिला आयएएस अधिकारी बनणार असल्याचं म्हणत तिचं अभिनंदन केलं आहे.
‘आयएएस नाही, डॉक्टर व्हायचं होतं, पण…’
आदिबाचं शिक्षण यवतमाळमधल्या उर्दू माध्यमाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून झालं. आयएएस बनायचं स्वप्न तिनं कधी पाहिलंच नव्हतं. कारण, घरची आर्थिक परिस्थिती फारच बेताची आहे.
तिच्या वडिलांनी रिक्षा चालवून तिला शिकवलं. त्यामुळे कसंतरी शिक्षण पूर्ण करायचं आणि कुठेतरी नोकरी मिळवायची हीच आदिबाची इच्छा होती.
सुरुवातीला आपण वैद्यकीय क्षेत्रात जावं अशी तिची इच्छा होती. पण, त्यासाठी सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळणं गरजेचं होतं.
घरची आर्थिक परिस्थिती अशी होती की, खासगी कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेणं शक्यच नव्हतं.
त्यामुळे आदिबानं NEET परीक्षेची तयारी केली. पण, NEET परीक्षेचा निकाल तिला हवा तसा लागला नाही.
आदिबाचा स्कोअर चांगला नव्हता. त्यामुळे काय करायचं असा प्रश्न तिच्यासमोर होता. घरच्या परिस्थितीमुळे शिकून नोकरी मिळवणं तर तिला गरजेचंच होतं.

फोटो स्रोत, Facebook/Rais Shaikh
बीबीसी मराठीनं आदिबाशी बोलून तिचा संघर्ष जाणून घेतला.
ती म्हणाली की, “NEET परीक्षेचा निकाल खूप वाईट आला. त्यामुळं मी काहीशी निराश झाले. पण, यवतमाळमधील सेवा नावाच्या एनजीओनं मला फार मदत केली. त्यांनी मला नागरी सेवेचं महत्व पटवून दिलं.
मी UPSC ची परीक्षा कशी देऊ शकते हे समाजवून सांगितलं. त्यासाठी त्यांनी मला मार्गदर्शन तर केलंच, पण आर्थिक मदतही केली. त्यानंतर मी पदवीचं शिक्षण आणि युपीएससीची तयारी करण्यासाठी पुण्याला गेले”, असं तिनं सांगितलं.
“पुण्यामध्ये खासगी कोचिंग घेतलं. पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. पण, त्यानंतर मुंबईतील हज हाऊसला गेले. तिथून दुसऱ्यांदा परीक्षा दिली. तेव्हाही निराशा पदरी पडली.
त्यानंतर मी दिल्लीला जामिया मिलिया इथं गेले आणि जोमानं अभ्यास सुरू केला. आता चौथ्या प्रयत्नात माझा चांगला निकाल आला. माझा 142 रँक पाहून अम्मी आणि अब्बू यांना खूप अभिमान वाटतोय,” असंही ती म्हणाली.

फोटो स्रोत, Getty Images
“माझ्या या यशात माझ्या पालकांसह मला ज्यांनी मदत केली त्यांची मी खूप आभारी आहे.
माझ्या अम्मी-अब्बूंनी माझ्यासाठी जो त्याग केलाय, त्यासाठी मी त्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहेच.
पण, आता नोकरीत रुजू झाल्यानंतर समाजाप्रती पण माझ्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. सगळ्या जबाबदाऱ्या उत्तमरितीनं हाताळण्याचा प्रयत्न करेन,” असंही आदिबा बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाली.
‘मी स्वतःलाही विकलं असतं’
आदिबाच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळं मुलीच्या शिक्षणासाठी त्यांना राहतं घरही विकावं लागलं. शिवाय स्वतःची रिक्षाही मुलीच्या शिक्षणासाठी विकली.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले की, “मुलीच्या शिक्षणाला एक रुपया कमी पडू दिला नाही. अब्बू मला शिक्षणात या या गोष्टीसाठी पैसे लागतात असा फोन आला की, माझ्याजवळ पैसे आहेच असं मी तिला सांगत होतो.
त्यावेळी माझ्याकडे पैसे नसायचे. पण, मी तिला या गोष्टीची जाणीव होऊ देत नव्हतो. कारण, तिच्या अभ्यासावर परिणाम होऊ नये. मुलीला आयएएस बनविण्यासाठी ज्यावर माझ्या कुटुंबाचं पोटपाणी चालायचं ती रिक्षासुद्धा शेवटी मी विकली.”
“लोकांकडून खूप कर्ज घेतलं. एवढं करूनही मुलीला चांगलं यश मिळालं नाही, तरी निराश झालो नव्हतो. कधीतरी माझी मुलगी आयएएस बनेल असा विश्वास होता आणि तोच धीर आम्ही तिला प्रत्येकवेळी देत होतो,” असं ते म्हणाले.
शेवटी जिगर मुरादाबादी यांच्या एका शेरचा दाखला देत त्यांनी परिस्थिती कशी भोगली आणि त्यातून काय मिळालं हे सांगितलं.
“ये इश्क नहीं आसां इतना ही समझ लीजिए, इक आग का दरिया है और डूब के जाना है,” असं म्हणत त्यांनी भावना मांडल्या.

फोटो स्रोत, facebook/Sanjay Uttamrao Deshmukh
आम्ही कठीण परिस्थिती पार केलेली आहे. मी घर विकलं, रिक्षा विकली पण काहीच गमावलं नाही. कारण, त्या पैशांतून माझी मुलगी मोठी अधिकारी झाली, असं ते म्हणतात.
“मुलीला आयएएस बनवण्यासाठी स्वतःला जरी विकावं लागलं असतं तरी मी स्वतःला विकलं असतं. पण, कधी निराश झालो नसतो,” असं म्हणत आपल्या मुलीचा आपल्याला खूप अभिमान असल्याचं ते सांगतात.
अश्फाक यांना आदिबा हिच्यासह आणखी दोन मुलं आहेत. मोठा मुलगा एमपीएससीची तयारी करतोय तर लहान मुलगा आता बारावीला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC