Source :- ZEE NEWS

Titanic Passenger Letter: पहिल्याच प्रवासात जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिक जहाजासंदर्भातील कैक खुलासे आजवर संपूर्ण जगासमोर करण्यात आले. जहाजातून कोणीकोणी प्रवास केला, जहाजाचा अपघात नेमका कसा झाला, समुद्राच्या तळाशी स्थिरावलेलं हे जहाज सध्या नेमकं कोणत्या अवस्थेत आहे अशा कैक गोष्टी विविध संशोधनांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. प्रत्येकवेळी समोर आलेले संदर्भ पाहणाऱ्यांना भारावून सोडणारे ठरले. याच जहाजातील एका पत्राची चर्चा सध्या संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. 

टायटॅनिक जहाजाला जलसमाधी मिळण्यापूर्वी स्वत:चा जीव वाचवण्यात यशस्वी ठरलेले प्रवासी कर्नल आर्किबाल्ड ग्रेसी यांनी लिहिलेल्या एका पत्राला ब्रिटमध्ये लिलावादरम्यान विक्रमी किंमत मिळाली. हे पत्र विल्टशायरच्या हेनरी एल्ड्रिज अँड सन यांच्याकडून 3 लाख पाऊस म्हणजे साधारण 3.41 कोटी रुपयांना विकण्यात आलं. 60000 पाऊंड इतक्या किमतीला त्याची विक्री होणं अपेक्षित असतानाच पाचपच अधिक बोलीमुळं या पत्रानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. 

असं या पत्रात आहे तरी काय? 

कर्नल ग्रेसी टायटॅनिक जहाजात प्रथम श्रेणी वर्गातून प्रवास करत होते. त्यांनी या भयंकर दुर्दैवी घटनेसंदर्भात ‘ट्रुथ अबाऊट द टायटॅनिक’ या पुस्तकामध्ये बरीच माहिती लिहिली होती. दरम्यान, ग्रेसी यांचं हे पत्र भविष्यसूचक असल्याचं म्हटलं जात असून त्यात त्यांनी लिहिलेलं, ‘हे एक अप्रतिम जहाज आहे, पण मी माझा प्रवास पूर्ण होईपर्यंत त्याबबात काही मतप्रदर्शन करणार नाही.’

केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत लिहिण्यात आलं होतं हे पत्र? 

10 एप्रिल 1912 ला ग्रेसी यांनी हे पत्र साउथम्पटन इथून टायटॅनिक जहाजानं प्रवास सुरू केल्यानंतर त्यांच्या केबिन C51 मधून लिहिलं होतं. जहाजानं 11 एप्रिल रोजी आयर्लंड येथील क्वीन्सटाऊनमध्ये ते पोस्टात टाकलं होतं. हे पत्र त्यांनी लंडनच्या वाल्डोर्फ हॉटेलमध्ये मुक्कामी असणाऱ्या त्यांच्या एका परिचितास पाठवण्यात आलं होतं. 

हेनरी एल्ड्रिज एंड सननं या पत्राला दुर्लभ श्रेणीत गणलं असून, ते म्हणाले ‘हे पत्र टायटॅनिक जहाजावरील सर्वात प्रसिद्ध आणि दुर्घटनेतून बचावलेल्या व्यक्तीनं लिहिलं आहे. ज्यामुळं ते संग्रही ठेवण्याजोगं आहे.’ पत्रात ग्रेसी यांनी एका इतरही जहाजाची प्रशंसा केली होती, त्याचं नाव ओशियानिक असं होतं. त्यांनी ओशियानीक जहाजाची प्रशंसा करत टायटॅनिकची तुलना त्या जहाजाशी केली होती.  

टायटॅनिकमधील प्रवासादरम्यान ग्रेसी यांनी टायटॅनिक जहाजातील महिलांची मदत केली होती. 14 एप्रिल रोजी त्यांनी स्क्वॉश खेळलं, पोहण्याचा आनंद घेतला आणि चर्चमध्ये जाऊन त्यांनी इतरांशी संवाद साधला होता. रात्री 11.40 मिनिटांनी जहाजाचं इंजिन थांबल्यावर जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांनी महिला आणि लहान मुलांना लाईफ बोटीवर जाण्यास मदत केल्याचं सांगितलं जातं. 

टायटॅनिक जहाजाला जेल्हा उत्तर अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली तेव्हा एका उलट्या लाईफबोटचा आधार घेतला. तिथं रक्त गोठवणाऱ्या पाण्यात बुडत्या अनेकांनीच लाईफ बोटीवर येण्यासाठी विनवण्या केल्या. मात्र बोटीवर असणाऱ्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्याविषयी ग्रेसी यांनी लिहिलं, ‘कोणीही मदत न मिळाल्याची तक्रार केली नाही. एकाने तर देव तुमचं भलं करो असंही म्हटलं’. ग्रेसी दुसऱ्या दिवशी सकाळी कार्पेथिया जहाजानं न्यूयॉर्कला पोहोचले आणि तिथं त्यांनी ही आपबिती लिहिली. मात्र अतिथंडी आणि दुखापतींमुळं त्यांची तब्येकत बिघडली. पुढे 2 डिसेंबर 1912 मध्ये ते कोमात गेले आणि दोन दिवसांनंतर मधुमेह बळावल्यामुळं त्यांचं निधन झालं. 

SOURCE : ZEE NEWS