Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Bhaskar Hande
(एप्रिल महिना हा दलित हिस्ट्री मंथ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने बीबीसी मराठी आंबेडकरी विचार आणि दलित इतिहासांचा मागोवा घेत आहे. या लेखात वारकरी परंपरेतील भक्तकवी संत चोखोबा यांच्या जीवनकार्याचा परामर्श घेणार आहोत.)
धांव घाली विठु आतां चालुं नको मंद ।
मज मारिती बडवे कांहीतरी अपराध ॥१॥
विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला ।
शिव्या देऊनी मारा म्हणती देव कां बाटला ॥२॥
विठ्ठलाला धावा घालणारा हा अभंग चोखोबांचा! ‘विठ्ठला, बडवे मला मारत आहेत आणि तुझा हार मी चोरल्याचा आळ माझ्यावर घालून ते मला कुत्र्यासारखी वागणूक देत आहेत. विठ्ठला, तूच आता धाव घे. मला तुझं दर्शन दे. एकदा तरी दे,’ अशा विणवण्या करणारा आणि कधीही विठोबाचं प्रत्यक्ष पोटभरुन दर्शन घेऊ न शकलेला चोखोबा हा तेरावा शतकातला एक तत्कालीन अस्पृश्य समाजातील विठ्ठलभक्त.
चोखोबा विठ्ठलमंदिराच्या महाद्वारापाशी नेहमी तिष्ठत उभा रहायचे.
न जाणो, मला कधीतरी चुकून-माकून विठोबाचं मुखदर्शन का होईना, पण ते मिळेल, अशी भाबडी आशा ठेवणाऱ्या संत चोखामेळांची आता त्याच महाद्वारापाशी समाधी आहे.
कटीवर हात आणि वीटेवर गेली अठ्ठावीस युगे उभा असलेला विठोबा महाराष्ट्रजनांसाठी गेली हजार वर्षे भक्ती आणि सामाजिक क्रांती अशा दोन्हींसाठीही आधारभूत ठरलेला लोकदेव आहे.
हाच विठोबा किमान हजार वर्षे आणि त्याहून कदाचित अधिक वर्षे वर्णभेदाच्या सनातनी कह्यात बंदीस्त होता. या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. पंढरपूरचं वाळवंट हेच वारकरी संतांसाठी विठोबाचा खांदा नि विठोबाची मांडी होती.
त्यावरच ते नाचायचे, खेळ मांडायचे, काला करायचे. संत नामदेव हे या नव्या वारकरी धर्माचे प्रणेते होते. त्यांच्या भक्तीला ज्ञानदेवानं ज्ञानाचं अधिष्ठान दिलं. महार, कुंभार, सोनार, न्हावी, माळी, साळी, कसाई, ब्राह्मण अशा सर्व जाती-जमातीतल्या सवंगड्यांना नामदेवांनी संघटित केलं.
त्यांना आधार दिला. उभं केलं. समतेला मध्यभागी आणून ‘भेदाभेदाचा भ्रम’ फोडू पाहणारी ही कृतीशील चळवळ विठोबाला सनातनी कह्यातून मुक्त करण्यासाठी झटत होती. कोणत्याही वारकरी संतांच्या अभंगातून हाच समतेचा मूल्यआशय डोकावल्याशिवाय राहत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
तत्कालीन अस्पृश्य जातीत जन्माला आलेले चोखोबा त्यावेळी परंपरेनी देण्यात आलेली कामं करायचे. ‘जोहार मायबाप जोहार’ म्हणणारे आणि मेलेली गुरं-ढोरं ओढणारे आणि पडेल ती कामं करणारे चोखोबा हे विषमतेनं ग्रासलेले नि त्रासलेले भक्तकवी.
मंगळवेढ्याला गावचा कूस बांधण्यासाठी जबरदस्तीनं वेठबिगारी करण्यास नेलेल्या अस्पृश्यांमध्ये चोखोबाही होते. तिथे अर्धवट बांधलेला हा गावचा कूस कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या कामगारांमध्ये चोखोबाही गाडले गेले. ही माहिती कळताच नामदेव तिथे गेले आणि त्यांनी चोखोबाची हाडे गोळा करुन ती विठ्ठल मंदिरासमोरच महाद्वाराशी गाडली आणि तिथेच चोखाबांची समाधी उभी केली, अशी अख्यायिका आहे.
चोखोबांची महाद्वाराशी असलेली ही समाधी वारकरी परंपरेतील संतांनी समतेसाठी दिलेल्या लढ्याचं एक महत्त्वाचं प्रतीक आहे. ही समाधी जशी चोखोबाची अस्तित्वदर्शक खूण आहे, त्याहून अधिक काळाच्या पटलावर टिकून राहिलेले त्याचे शब्द त्याच्या आणि त्या काळच्या दलितांच्या अस्तित्वाचं कठोर वास्तव अधिक गडदपणे अधोरेखित करताना दिसतात.
चोखोबा म्हणतात, ऊस डोंगा म्हणजेच वाकडा असला म्हणून त्याचा रसदेखील डोंगा असतो का? नदी डोंगी असली म्हणून तिचं पाणी डोंगं असतं का? अगदी तसंच हा चोखा डोंगा आहे, म्हणून या चोख्याचा भक्तिभाव डोंगा आहे, असं तुम्ही का समजता?
‘का रे भुललासी वरलीया रंगा? असा सवाल चोखोबा त्याच्या अभंगातून करताना दिसतो.
इथं चोखोबानं आपण स्वत: ‘डोंगा’ असल्याचं मान्य करत आपला व्यवस्थेनं लादलेला जन्मजात कमीपणा मान्य केल्याचं दिसून येतं.
थोडक्यात, चोखोबांनी सर्व प्रकारचा छळ सोसला पण धर्मव्यवस्थेची रुढ चौकट मोडली नाही अथवा ते मोडू शकले नाहीत. त्यांनी अन्याय्यी आणि अनिष्ट अशा गोष्टींवर आसूड जरुर ओढले पण त्यांची भाषा आक्रमक नव्हती.

फोटो स्रोत, BBC/Nitin Nagarkar
पण चोखोबांचा मुलगा कर्ममेळा मात्र त्याच्यापेक्षा बंडखोर दिसून येतो. कर्ममेळा फक्त 27 अभंग उपलब्ध आहेत. मात्र, हे अभंग आग ओकणारे आहेत. प्रसंगी ते विठ्ठलाला धारेवर धरणारेही आहेत. एका अभंगात तर कर्ममेळा विठ्ठलाची लाज काढतो.
तो म्हणतो,
आमुची केली हीन याती ।
तुज कां न कळे श्रीपती ॥१॥
जन्म गेला उष्टे खातां ।
लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥
आमचे घरीं भात दहीं ।
खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
कासया जन्म दिला मला ॥४॥
लोकांचं उष्टं खाऊन आमचा जन्म गेला, त्याची लाज तुम्हाला वाटत नाही का? हा सवाल काळाच्या त्या पटलावर किती मर्मभेदी होता, याची कल्पना येऊ शकतो.
आध्यात्मिक जगात आम्हाला सामावून घेण्यात आलेलं असलं तरीही व्यावहारिक जगात आपल्याला कुत्र्याप्रमाणेच वागवलं जातं, याचं शल्यही ते एका अभंगातून मांडताना दिसतो.
तो म्हणतो,
तुझ्या संगतीचे काय सुख आम्हां | तुम्हा मेघयामा न कळे काही ॥
हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी | हीनत्व आम्हांसी देवराया ॥
चोखोबांचं संपूर्ण कुटुंबंच असं भक्तकवी होतं. चोखोबांची बायको सोयरा आणि चोखोबांची बहिण निर्मळा. निर्मळाचा नवरा बंका आणि बंकाची बहिण सोयरा. असं हे साटलोटं. आणि विशेष म्हणजे सगळेच भक्तकवी होते.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या चोखोबांचे 358 अभंग उपलब्ध आहेत. सोयराबाईंचे 62 अभंग उपलब्ध आहेत. त्यानंतर बंका यांचे 41 तर कर्ममेळा आणि निर्मळा यांचे अनुक्रमे 27 आणि 24 अभंग उपलब्ध आहेत.
चोखोबा हे या सगळ्यांचेच प्रेरणास्त्रोत असले तरीही सर्वांचेच अभंग एकसारखे वा एकमेकांचीच पुनरावृत्ती असल्यासारखे अजिबात नाहीयेत.
तेराव्या शतकात वंचित, दलित आणि उपेक्षित समाजाला आपला आवाजच नव्हता. किंबहुना तो कुठे पुसटसाही उमटलेला दिसून येत नाही. दलित मुक्तीची संकल्पनाच ज्या काळात आकाराला आलेली नव्हती, त्या काळात हे भक्तकुटुंब आपल्या रचनांच्या माध्यमातून आपल्या वेदनांना शब्दरुप देत होतं.
हे कुटुंब काळाच्या किती पुढे गेलेलं होतं, हे एका उदाहरणावरुन समजून घेता येईल. जिथं आजच्या काळातही मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोलणं हा टॅबू मानला जातो, तिथे चोखोबांची पत्नी सोयरा त्या काळात मासिक पाळीबद्दल अत्यंत आधुनिक दृष्टीकोन मांडताना दिसतात.
त्या म्हणतात,
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध ॥१॥
देहिंचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ॥२॥
विटाळावाअंचोनी उत्पत्तीचे स्थान ।
कोण देह निर्माण नाही जगीं ॥३॥
हा जातीनं महार असलेल्या देहाला सगळे विटाळ म्हणतात खरे, पण तो सुद्धा विटाळातूनच जन्माला आला आहे, असं त्या काळात म्हणणं किती धारिष्ट्याचं असेल. हे धारिष्ट्य पाहता, चोखोबा आणि त्याच्या कुटुंबीयांचं वादातीत ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होतं.
शिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपूर्वी अस्पृश्य समाजाला चोखोबांशिवाय दुसरा आदर्शच नव्हता. मात्र, हा आदर्श नाकारण्याची भूमिका स्वत: डॉ. आंबेडकरही घेताना दिसतात. त्याचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, DHANANJAY KEER
सदानंद मोरे यांचं ‘संत साहित्य आणि समता’ हे व्याख्यान सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी संपादित केलेल्या ‘जोहार चोखोबा’ या पुस्तकात आहे. त्या व्याख्यानात सदानंद मोरे उहापोह करताना म्हणतात की, “आंबेडकरांनी एके ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणतात की, चोखोबा संत आहेत, ते आम्हाला मान्य आहेत. त्यांचे अभंग आम्ही म्हणतो. भक्त म्हणून तर ते आम्हाला फारच थोर दर्जाचे वाटतात. पण मुद्दा असा आहे की, माणसाला मानण्यासाठी, त्याच्याप्रती प्रतिष्ठा असण्यासाठी, तो भक्तच असला पाहिजे का? तो संतच का म्हणून व्हायला पाहिजे? तो भक्तही नसला किंवा संतही नसला तरी माणूस म्हणून त्याची काही किंमत आहे की नाही?”
डॉ. बाबासाहेबांचा हा प्रश्न निश्चितच महत्त्वाचा आहे. म्हणूनच ते चोखोबाच्या खांद्यावर उभे राहून नवा स्वाभिमान दलितांमध्ये भरु शकले, असं ज. वि. पवार म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांनी ‘रिंगण’ या चोखोबांवरच्या वार्षिकामधील लेखात याबाबत म्हटलंय की, “या (बाबासाहेब आंबेडकर) आदर्शानं चोखोबांच्या खांद्यावर उभं राहून दूरदृष्टीनं समाज बदलायचा कार्यक्रम दिला. हा कृती कार्यक्रम असल्यामुळे त्याला जनआंदोलनाचं स्वरूप आलं. हे आंदोलन उक्तीपुरतं मर्यादित न राहिल्यानं ते कृतीत उतरलं. चोखाबांनी प्रचलित वर्णव्यवस्था अनुभवली. तिचे चटके सहन केले. त्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कुंपण होतं ते विठूच्या नामस्मरणाचं. विठ्ठलचं सर्व दुःखांचा नायनाट करेल, अशी चोखोबांची धारणा होती. बाबासाहेबांनी ही चौकट तोडण्या-फोडण्याचे प्रयत्न केले.”
इथे चोखोबांच्या कामाला कमी लेखणं हा मुद्दा नसून ‘आमच्या अटीनुसार संत झालात तरच प्रतिष्ठा देऊ,’ ही अट बाजूला सारण्याचा मुद्दा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे.
चोखोबा हे आंबेडकरपूर्व अस्पृश्य समाजाच्या वास्तवाचं प्रतीक आहे.
चोखोबांचं जन्मस्थळ आणि त्यांचा जन्म कधी झाला, याबाबत मतमतांतरे आहेत. प्रा. देविदास इथापे यांच्या मते 14 जानेवारी 1268 ला चोखोबांचा जन्म झाला. काहींच्या मते, बुलढाण्यातील मेहुणपुरा इथे चोखोबांचा जन्म झाला तर काहीच्या मते पंढरपुरात झाला आहे.

फोटो स्रोत, Sachin Parab
तर आणखी काही संशोधक चोखोबांचा जन्म मंगळवेढ्यात झाला असावा, असं म्हणतात. वारकरी परंपरेतील निवृत्तीनाथ, नामदेव, ज्ञानदेव, जनाबाई, सोपानदेव, मुक्ताबाई, चांगदेव, गोरा कुंभार, जगमित्र नागा, सावतामाळी, नरहरी सोनार हे चोखोबांचे समकालीन सखेसोबती होते.
हेच चोखोबा आयुष्यभर विठ्ठलाच्या एका दर्शनासाठी महाद्वाराशी आयुष्यभर तिष्ठत उभे राहिले. ते अस्पृश्य समाजाच्या तत्कालीन अवस्थेचं प्रतीक आहेत. अगदी 1948 पर्यंत अस्पृश्यांना विठ्ठलमंदिरात प्रवेश नव्हता.
त्यांना मंदिरात प्रवेश मिळावा, यासाठी साने गुरुजींनी लढा उभा केला. साने गुरुजी महात्मा गांधी अनुयायी. वर्णभेदाच्या कह्यात असलेला विठोबा मुक्त व्हावा आणि सर्वांसाठी खुला व्हावा, यासाठी त्यांनी पंढरपुरातील तनपुरे महाराजांच्या मठात 1 मे 1947 पासून दहा दिवस उपोषण केलं.
त्याआधी संबंध महाराष्ट्रभर फिरून याबाबत जनजागृती केली होती. त्यांच्या या विठ्ठलमुक्तीच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला.

फोटो स्रोत, Sane Guruji Smarak Samiti, Pandharpur
‘जाओ साने भीमापार, नहीं खुलेगा मंदिरद्वार’ या सनातन्यांच्या घोषणेला ‘साने गुरुजी करे पुकार, खोलो विठ्ठल मंदिरद्वार’ या घोषणेनं प्रत्युत्तर देण्यात आलं.
“पंढरपूरचं विठ्ठल मंदिर हरिजनांना मोकळं व्हावं, म्हणून मी मरायला उभा राहिलो आहे. पंढरपूर म्हणजे महाराष्ट्राचं हृदय. महाराष्ट्राच्या जीवनाची किल्ली. पंढरपूरची कळ दाबली, तर महाराष्ट्रभर प्रकाश पडेल. या रूपानं महाराष्ट्रातील सर्व जीवनांतील अस्पृश्यता नष्ट व्हावी, दुष्ट रूढीची कुलपं गळून पडावीत. मी माझ्या प्राणांचं तेल घालण्यासाठी उभा आहे…” राज्यातील जनतेच्या हृदयाला हात घालणारं हे भाषण साने गुरुजी 1946-47 मध्ये गावोगावी जाऊन करत होते.
“विठ्ठलाच्या चरणांचे संतांनी ‘समचरण’ म्हणून वर्णन केले. ते चरण भेदभाव करीत नाहीत. ते सर्वांभूती सम आहेत. परंतु हरिजनांना त्या चरणांवर का बरं डोकं ठेवता येऊ नये?
“पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या व्यवस्थापकांना माझी प्रार्थना आहे की, त्यांनी देवाजवळ सर्व लेकरांस येऊ द्यावे. तशी त्यांनी घोषणा करावी. तोपर्यंत मी उपवास करीत राहीन.”
असं म्हणून साने गुरुजींनी उपोषण सुरू केलं. गुरुजींचं उपोषण यशस्वी झालं आणि अस्पृश्यांच्या आणि पर्यायाने महाद्वाराशी तिष्ठणाऱ्या चोखोबांच्याच प्रवेशाचा मार्ग तब्बल सातशे वर्षांनी मोकळा झाला, असं म्हणता येईल.
चोखोबांवर आजवर दोन सिनेमे आणि काही नाटकंही आली आहेत. ‘जोहार मायबाप’ हा चोखोबांवरचा सर्वांत प्रसिद्ध चित्रपट. व्यंकटेश माडगूळकर यांची कथा आणि ग. दि. माडगूळकर यांची पटकथा, संवाद आणि गीते असलेला हा सिनेमा 1950 साली ‘जोहार मायबाप’ आणि 1981 साली ‘ही वाट पंढरीची’ या नावानं प्रदर्शित झाला.

फोटो स्रोत, Film/Hi Vaat Pandhrichi
या सिनेमात पु. ल. देशपांडे यांनी चोखोबांची तर अभिनेत्री सुलोचना यांनी सोयराबाई यांची भूमिका केली होती. पु. ल. देशपांडेंच्या भूमिकेमुळे हा सिनेमा दखलपात्र ठरला खरा पण यात चोखोबांवर झालेल्या अन्यायाचं विशेष चित्रण दिसून येत नाही.
चोखोबा हा ‘मराठी संस्कृतीच्या पायातला तडा’ आहे, असं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे एकप्रकारे खेदाने म्हणतात.
त्यांनी लेखक स. भा. कदम यांच्या अभंगगाथेच्या दुसऱ्या आवृत्तीला लिहिलेल्या एका प्रस्तावनेत म्हटलंय की, “मंगळवेढ्यात कुसू बांधण्यासाठी पकडून नेलेल्या वेठबिगार महारांमध्ये हा कवीही होता. ‘अंतकाळी मज केले परदेशी’, असे त्याने म्हणून ठेवले आहे. कुसू ढासळून त्याखाली चूर झालेल्या अनेक महारांमध्ये आपला एक थोर नायकही सापडला हे कळताच जन्मभर अस्वस्थ राहिलेल्या अखंड चळवळ्या नामदेवाने पंढरपुरात विठ्ठलाच्या महाद्वारी पायरीशी दिलेली हक्काची जागा सांभाळत सातशे वर्षे चोखा तिथेच राहिला.
“ही दंतकथा ऐतिहासिक असो की नसो, ती आपल्या सामाजिक नैतिकतेचे चिरंतन प्रतीक ठरते. ह्या महाद्वारापाशी चोखा नेहमी गहिवरुन उभा राहात असे, हे त्याने स्वतःच नोंदवलेले आहे. वास्तुस्मारक आणि दस्तऐवज ह्या दोन्ही पुराव्यांनी चोखामेळा आपल्या संस्कृतीच्या पायातच वाढत गेलेला तडा नेहमीच दाखवत राहील. त्यामुळे चोखामेळ्याचा अभ्यास मराठीत नेहमीच एक धडा म्हणून महत्त्वाचा राहील.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC