Source :- BBC INDIA NEWS

कविता वरे

फोटो स्रोत, BBCdipalijagtap

“घरातल्या पुरुषासह महिलांचंही नाव घरावर यावं यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही वर्षभर गावात लोकांमध्ये गेलो. पण याला विरोध होऊ लागला. लोक धावून येऊ लागले. सरपंच बाई काय सांगते? काय चाललंय गावात? अशा काॅमेंट्स ऐकल्या.”

महिला सरपंच म्हणून काम करत असताना येणाऱ्या आव्हानांबद्दल कविता वरे बीबीसी मराठीशी बोलत होत्या.

“काम करत असताना सीआरपी महिलांच्या अंगावर चालून आलेले पुरूष मी पाहिले. दारू पिऊन ग्रामसभांना गोंधळ घालणारे पुरुष मी पाहिले आहेत. रस्त्यामध्ये अडवून मी एकटी असते तेव्हासुद्धा अडवून विरोध करणारे पुरुष पाहिले.

पण या सगळ्याला न जुमानता चळवळीतून आलेली कविता गावपातळीवर टिकवणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं,” बीबीसी मराठीशी बोलताना सरपंच डाॅ. कविता वरे यांनी आपला हा अनुभव सांगितला.

(कर्तृत्ववान सरपंच महिलांच्या यशोगाथांची माहिती देणारी एक मालिका बीबीसी मराठी करत आहे. त्या अंतर्गत डॉ.कविता वरे यांचा प्रेरणादायी प्रवास आपण जाणून घेवूयात.)

डाॅ. कविता वरे या मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील किसळ आणि पारगाव या दोन गावांच्या सरपंच आहेत.

त्यांनी राज्यशास्त्र विषयात एम. ए., एम.फील आणि पीएचडी केली आहे. 34 वर्षीय कविता या आदिवासी समाजातून येतात. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्या विद्यार्थी चळवळीत सक्रिय होत्या.

राज्यशास्त्रात पीएचडी मिळवल्यानंतर त्यांना मुंबईतील नामांकित महाविद्यालयांकडून नोकरीसाठी अनेक संधी आल्या.

पण, त्या संधी नाकारून गावपातळीवर बदल घडवायचा या हेतूनं राजकीय व्यवस्थेत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

कविता वरे

फोटो स्रोत, BBCdipalijagtap

किसळ-पारगाव हे खरं तर त्यांचं सासर. 2019 साली त्या लग्न करून या गावात आल्या.

त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्या निवडूनही आल्या. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

सात महिन्यांच्या गरोदर असताना त्यांनी निवडणूक लढवली. इथपासून ते गावात सामाजिक बदल घडवण्यापर्यंत त्यांना स्थानिक पातळीवर संघर्ष करावा लागला.

महिला सरपंच म्हटल्यावर अनेकदा कारभार पुरुषच पाहतात, अशी अनेक उदाहरणं समोर येत असतात.

पण कविता या केवळ सरपंचाच्या खुर्चीवरच बसल्या नाहीत, तर त्यांनी गावात योजनांसह अनेक मोहिमाही हाती घेतल्या.

महिला सरपंच म्हणून 34 वर्षीय डाॅ. कविता वरे यांच्या संघर्षाची ही कहाणी अनेक महिलांना प्रेरणा देऊन जाते.

आदिवासी गाव ते पीएचडी अन् सरपंच पदापर्यंत

मुंबई, पुण्यासारखं शहर असो वा कुठलंही खेडेगाव. मुलं-मुली अथक मेहनतीनं उच्च शिक्षण घेतात आणि आपलं करिअर घडवतात.

कविता यांनी मात्र महिलांसाठी विशेषतः स्थानिक गावपातळीवर महिलांसाठी अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर असलेला राजकीय आणि सामाजिक व्यवस्थेचा मार्ग निवडला.

भीमाशंकर जवळील दऱ्या खोऱ्यातल्या एका खेडेगावात कविता यांचा आदिवासी कुटुंबात जन्म झाला.

स्काॅलरशिप मिळवत त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम. ए., एम. फील आणि नंतर पीएचडीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.

विद्यापीठातील कमवा-शिका या योजनेसाठीही कविता यांना झगडावं लागलं. याच वैयक्तिक अनुभवातून त्यांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला.

इथूनच राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली असं त्या सांगतात.

कविता वरे गावातील महिलांसोबत

फोटो स्रोत, BBCdipalijagtap

कविता यांनी त्यांच्या या प्रवासाबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना माहिती दिली.

त्या म्हणाल्या, “मी स्टुडंट युनियनमध्ये असल्यानं समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द तिथूनच निर्माण झाली. मी ज्या गावातून येते, तिथं 2022 पर्यंत साधा पूलही नव्हता. हे मी जवळून पाहिलं होतं.

चार महिने जेव्हा आम्हाला ओल्या स्कर्टमध्ये शाळेत बसावं लागत होतं. तेव्हा लक्षात आलं की, मुलींना किती त्रास होत असेल.”

“पावसाचे चार महिने आमच्यासाठी आव्हानात्मक होते. तिथून माझ्या शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. मी आदिवासी महादेव कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करते.

तिथे लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी मिळत असेल तर त्या समाजाकडे मागे वळून पाहिलं पाहिजे असं मला वाटलं,” असंही पुढं त्या सांगत होत्या.

‘लग्न झाल्यावरही वडिलांचं नाव लावते म्हणून विरोध’

गावातल्या महिलांना संपत्तीवर कायदेशीर आपलं नाव लावण्याचा अधिकार आहे, याबाबत कविता यांनी गावात जनजागृती मोहीम सुरू केली.

अनेक महिलांना अनेकदा पतीच्या निधनानंतर किंवा कोणत्याही प्रसंगात न सांगता घराबाहेर काढण्याचे प्रकार घडत असतात.

त्यामुळं महिलांना आपल्या हक्कांची माहिती व्हावी हा यामागचा हेतू होता असं कविता सांगतात.

पण, या दरम्यानही ‘सरपंच बाई हे काय करतेय’ असं म्हणत सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर अनेकांनी संपत्तीत नावच नाही तर घराच्या बाहेरील पाटीवरही पत्नीचं नाव लावलं.

कविता यांचा हा संघर्ष खरं तर निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापासून सुरू झाला होता असं त्या सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, BBCdipalijagtap

सात महिन्यांच्या गरोदर असताना कविता वरे या सरपंच पदासाठी अर्ज भरण्यासाठी गेल्या.

पण तिथं बसलेल्या काही पुढाऱ्यांनी लग्नानंतरही पतीचं नाव न लावता वडिलांचंच नाव कायम ठेवल्याचं सांगत आक्षेप घेतला असं त्या सांगतात.

त्या म्हणतात, “मी माझ्या वडिलांचे नाव लावते त्या कारनाने माझा फॉर्म बाद करण्याच्या चर्चा चालल्या होत्या. मी जर गावात निवडणूक लढवली, तर नवऱ्याचं नाव लावलं पाहिजे. अर्ज छाननीच्या दिवसांमध्ये मी कार्यालयात बसले होते.”

“तिथं जिल्ह्यातील नेते, दोन प्रतिस्पर्धी उमेदवार होते. त्यांच्या मागे अनेक लोक होते. मी एकटी होते. शिकलेली महिला बाहेरून आलेली आहे, विरोध कसा करायचा म्हणून नावाचं कारण दाखवत होते. पण मी म्हटलं की, संविधानाने अधिकार दिला आहे. त्यानंतर समोरचे गप्प झाले.”

गावात पहिली एसटी ते महिला सभा

सरपंच बनल्यानंतर गावात ग्रामसभा घेण्यापूर्वी कविता यांनी महिला सभा, बाल सभा आणि वंचित घटकांची सभा घेतली. यातून आलेल्या मुद्यांवर ग्रामसभा भरवली.

सुरुवातीला महिलांचा प्रतिसाद नव्हता. पण महिलासभेत महिलांनीच गावात एसटी येत नाही, यामुळे बाहेर जाण्यास, काॅलेजला जाण्यास अडचण होते. खाजगी वाहनात पैसे खर्च करावे लागतात अशी समस्या मांडली.

यासाठी ग्रामपंचायतीने सहा महिने एसटी सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला आणि गावात पहिल्यांदा एसटी सुरू झाली असंही त्या सांगतात.

यामुळे आणखी एक बदल घडला. तो म्हणजे महिलांना घराबाहेर पडून आपल्या समस्या सांगितल्या आणि त्या सरकारी कार्यालयापर्यंत पोहचवल्याचा तर त्या सुटतात असा अनुभव आला.

मग गावात महिन्यातून एकदा महिला सभा भरू लागली. दूषित पाण्याची समस्या असो वा घरकुल योजनेची, सरपंचासोबत महिला जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊ लागल्या.

तसंच गावात पर्यावरणपूरक वातावरण असावं यासाठी पर्यावरण कारभारीण उपक्रमही कविता यांनी सुरू केला.

कविता ग्रामस्थांसोबत

फोटो स्रोत, BBCdipalijagtap

तरुण मुलींसाठी मासिक महोत्सव सुरू करण्यात आला. याअंतर्गत मुलींमध्ये मासिक पाळीबाबत जागरुकता, आरोग्य आणि त्यावर उपचार अशा चर्चा झाल्या.

याविषयी बोलताना कविता सांगतात की, “बाल सभा, महिला सभा, वंचित घटकाच्या सभा, पेसा सभा, त्या त्या वस्त्यांमध्ये जाऊन घेणं गरजेचं असतं.

बाल सभेत मुलांनी शाळेत पाणी गळतं यासह रंग काम करून द्या अशा समस्या आणि मतं मांडली. हाच विषय आम्ही ग्रामसभेत घेतला. दोन वर्ष लागले पण आम्ही किमान एका गावच्या शाळेचं काम तरी केलं. तसंच ग्रामसभेत महिलांना बोलण्यासाठी राखीव वेळ ठेवली.”

कविता पुढं म्हणाल्या की, “आम्ही महिलांच्या आरोग्याचं मोजमाप करत आहोत. पर्यावरण कारभारणी या प्रोजेक्टखाली नियोजन केलं होतं. महिलांच्या शरिरावर होणारे परिणाम याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली आहे.

तसंच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून निर्माल्य नदीत टाकलं जायचं ते झाडाच्या बुंद्याजवळ ठेवावं तिथे खड्डा खणावा त्यातून खत निर्मिती होईल, अशीही कामं हाती घेतली.”

‘कधी कधी हरायला होतं पण मग…’

कविता वरे यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. गावात विविध जाती-धर्माचे लोक असून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा मानस असतो, असं त्या सांगतात.

पण, असं करत असताना काही वेळा महिलांकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टीकोन आड येतो.

यातून काही बोललं जातं किंवा विरोध होतो. पण इतर महिलांकडे पाहूनच पुन्हा बळ मिळतं, असंही कविता सांगतात.

कविता गावातील महिलांसोबत

फोटो स्रोत, BBCdipalijagtap

त्या म्हणाल्या की, “त्रास होतो. सहन करावं लागतं. कधी कधी हारते. शांत बसते. रडते, हे सगळं काम करत असताना बऱ्याचदा असं होतं. आपण हे कोणासाठी आणि कशासाठी करत आहोत असंही वाटतं.

पण गावातल्या महिलांकडे पाहूनच पुन्हा कामाला लागते. महिला सन्मानाचा, सहभागाचा बदल अपेक्षित आहे. सामाजिक बदल आणि राजकीय व्यवस्थेची ताकद समजली तर गावातलं मतही विकलं जाऊ नये असं स्वप्न मी पाहते,” असंही कविता पुढं सांगतात.

राजकारणात महिलांसमोर आजही अनेक आव्हानं आहेत. त्यात स्थानिक पातळीवर कोणत्याही महिलेला या आव्हानांचा अधिक जवळून अनुभव येत असतो.

पण याचा सामना करत डाॅ. कविता वरे सरपंच बनून राजकीय क्षेत्रात अनेकांसाठी उदाहरण बनल्या आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC