Source :- BBC INDIA NEWS

मदरसा

फोटो स्रोत, YAHYA

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव वाढला आहे.

भारताच्या एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) पलीकडे असणाऱ्या पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये गुरुवारी (1 मे) एक सरकारी आदेश काढण्यात आला. या आदेशानंतर स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या निरीक्षणाखाली धार्मिक मदरसे बंद करण्यात आले. तसेच या परिसरातील किमान 1000 मदरसे 10 दिवसांसाठी बंद करण्यात आले आहेत.

मदरसे बंद करण्यात आले असले, तरी शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठं मात्र सुरू आहेत.

नियंत्रण रेषा किंवा एलओसीजवळच्या परिसरातील मदरसे बंद ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन काम करत आहे. यासंबंधीच्या सरकारी आदेशात केवळ मदरसे बंद करण्याचाच नाही, तर या भागात पर्यटकांना प्रवेश करण्यास सुद्धा मनाई करण्यात आली आहे.

सध्या, पाकिस्तान प्रशासित काश्मीरच्या भागात, विशेषतः नियंत्रण रेषेजवळील भागात, लोकांना शस्त्रे हाताळण्याचे, स्वसंरक्षणाचे आणि प्रथमोपचाराचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.

अधिकाऱ्यांच्या मते, मुझफ्फराबाद शहरात आपत्कालीन निधीची स्थापना करण्यात आली आहे, तर नियंत्रण रेषेजवळील गावांमध्ये दोन महिन्यांचा अन्न, पाणी आणि वैद्यकीय साहित्याचा पुरवठा पाठवण्यात आला आहे.

मुझफ्फराबाद परिसरातील रेड क्रेसेंटच्या प्रमुख गुलजार फातिमा यांनी रॉयटर्सला सांगितलं की, या परिसरात तणाव दिसून येताच, प्रथमोपचार कर्मचारी आणि इतर कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले.

ते म्हणाले की, भारताने लष्करी कारवाई केल्यास नियंत्रण रेषेच्या आसपासच्या भागातून मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांची संस्था किमान 500 लोकांसाठी मदत छावण्या तयार करत आहे.

मदरसे का बंद करण्यात आले?

पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यातील हाजिरा भागात नियंत्रण रेषेपासून सुमारे 9 किलोमीटर अंतरावर असलेला जामिया मदीना अरेबिया हा धार्मिक मदरसा स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार किमान 10 दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे.

या मदरशात 200 हून अधिक विद्यार्थी धार्मिक शिक्षण घेतात. गुरुवारी, मदरसा प्रशासनाने अचानक या विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या घरी पाठवले.

जामिया मदिना अरेबिया मदरशाचे प्रमुख मौलवी गुलाम शाकीर म्हणाले की, स्थानिक सरकारने त्यांना असामान्य परिस्थितीमुळे मदरसा बंद करण्यास सांगितलं होतं.

गुलाम शाकीर यांनी स्थानिक प्रशासनाला शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत का? अशी विचारणा केली असता त्यांना सांगण्यात आलं की, भारताने कारवाई केली तर पाकिस्तानातील मदरसे हे त्यांचं प्रमुख लक्ष्य असू शकतं.

सीमावर्ती भाग

फोटो स्रोत, YAHYA

गुलाम शाकीर यांनी सांगितलं की, प्रशासनाने हेदेखील सांगितलं की शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणारे बहुतांश विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला मदरशांमध्ये राहणारे बहुतांश विद्यार्थी हे मदरशातच राहतात. त्यामुळे त्यांना अधिक धोका आहे.

ते म्हणाले, “आमचा मदरसा नियंत्रण रेषेपासून थोड्या अंतरावर आहे. 2019 च्या सुरुवातीला झालेल्या चकमकींमध्ये आमच्या मदरशाजवळ बॉम्ब पडले होते, परंतु त्यावेळी आमचं कोणतंही नुकसान झालं नव्हतं.”

ते पुढे म्हणाले, “जर भारतातर्फे सीमेपलीकडून मोठ्या शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला, तर आमच्या मदरशावरही हल्ला होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आम्ही मदरसा बंद करण्याच्या सरकारी आदेशाचं पालन केलं.”

भारतीय सैनिक

फोटो स्रोत, Reuters

काश्मीरच्या पुलवामा येथे 2019 साली, भारतीय निमलष्करी जवानांच्या बसवर आत्मघातकी हल्ला झाला होता. ज्यामध्ये 40 हून अधिक सैनिक मारले गेले होते.

या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या संघटनेने घेतली होती. या संघटनेवर बंदी घालण्यात आली.

या हल्ल्यानंतर, भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी बालाकोट परिसरात हवाई हल्ले केले होते. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि अनेक ‘दहशतवादी’ मारले गेले.

‘गोळीबार सुरू झाला की लोक ‘बंकर’मध्ये जातात’

श्रीनगरपासून फक्त 100 किमी अंतरावर, नियंत्रण रेषेच्या दुसऱ्या बाजूला, चाकोठी सेक्टर आहे, जिथे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता लोकांनी त्यांच्या घरात बंकर बांधले आहेत.

22 वर्षाच्या फैजान इनायत यांनी रॉयटर्सला सांगितलं की, “गोळीबार सुरू होताच लोक बंकरमध्ये जातात.”

मदरसा

फोटो स्रोत, Getty Images

अलीकडच्या काळात दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावानंतर, नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजुंनी गोळीबार सुरूच आहे.

त्याच वेळी, लिपा व्हॅलीच्या तहसील प्रशासनाने त्यांच्या स्वयंसेवकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले आहे जेणेकरून ते कोणत्याही संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असतील.

अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनानंतर अनेकांनी स्वतःला स्वयंसेवक म्हणून घोषित केलं आहे.

यापैकीच एक उमैर मोहम्मद म्हणाले, “आम्हाला माहित आहे की आज नाही तर उद्या, आणि उद्या नाही तर परवा, भारतासोबत युद्ध होईल. हे युद्ध कदाचित नियंत्रण रेषेवर होईल आणि आमच्या क्षेत्रावर त्याचा परिणाम होईल, म्हणून मी माझ्या मित्रांसोबत हे प्रशिक्षण घेण्याचं ठरवलं.”

नीलम व्हॅलीतील पर्यटकांची संख्या रोडावली

पाकिस्तानच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या नीलम व्हॅलीत पर्यटकांची गर्दी जास्त असते, असं मानलं जातं.

मागच्या वर्षी एप्रिलच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला, नियंत्रण रेषेवरील नीलम खोऱ्यातील शेवटचे गाव असणाऱ्या तौबतमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक आले होते.

यावर्षी देखील एप्रिलच्या अखेरीस मोठ्या संख्येने पर्यटक तौबतमध्ये पोहोचले होते, परंतु भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या पर्यटकांना हा परिसर रिकामा करण्यास सांगण्यात आलं.

नीलम व्हॅली

फोटो स्रोत, YAHYA

निसार अहमद आणि त्यांची पत्नी नसरीन अहमद त्यांच्या मुलांसह ब्रिटनहून पाकिस्तानात आले. पाकिस्तान भेटीदरम्यान, त्यांनी त्यांच्या मुलांना नीलम व्हॅली व्यतिरिक्त इतर भागात दौऱ्यावर घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं, पण आता त्यांची निराशा झाली आहे.

निसार अहमद म्हणतात की, 1 मे रोजी नीलम व्हॅलीमध्ये आम्हाला ताबडतोब परत जाण्यास सांगितलं गेलं.

निसार पुढे म्हणाले, “त्यानंतर आम्ही निराश होऊन परतलो. आता मला माहित नाही की, आम्हाला आमच्या मुलांना पुन्हा नीलम व्हॅली दाखवण्याची संधी मिळेल की नाही.”

मोहम्मद याह्या शाह हे तौबत हॉटेल आणि गेस्ट हाऊस असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, तौबत आणि नीलम व्हॅलीतील स्थानिक लोकांसाठी पर्यटन हे उपजीविकेचं मुख्य साधन आहे.

ते म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच येथे मोठ्या संख्येने पर्यटक आले होते, परंतु आता तौबत आणि नीलम व्हॅलीतून पर्यटक गायब झाले आहेत.

मोहम्मद याह्या शाह यांच्या मते, या भागात येणाऱ्या पर्यटकांना थांबवण्यात आल्याची माहिती आहे. ही बंदी तात्पुरती असेल आणि परिस्थिती सुधारताच पर्यटकांना पुन्हा येण्याची परवानगी दिली जाईल.

ते म्हणाले की, मे महिन्यासाठी जवळजवळ सर्व गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स 50 टक्के बुक झाले आहेत, परंतु आता पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी असल्याने पुढे काय होते ते पाहूया.

प्रशासन काय म्हणतंय?

स्थानिक प्रशासनाचे प्रवक्ते पीर मजहर सईद शाह यांनी बीबीसीला सांगितलं की, कोणालाही भारताच्या हल्ल्याची भीती वाटत नाही. लोक कोणत्याही कारवाईला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

ते म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालये खुली आहेत, परंतु भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही मदरसे बंद करण्यात आले आहेत, तर उर्वरित बंद करावेत की नाही याबद्दल चर्चा सुरू आहे. त्याबद्दल लवकरच निर्णय घेतला जाईल.

नीलम व्हॅली

फोटो स्रोत, Getty Images

पीर मजहर सईद शाह म्हणाले की, या भीतीमुळे पर्यटकांना काही दिवस येथे येण्यापासून रोखण्यात आले होते. 27 आणि 28 एप्रिल रोजी सुमारे 1250 पर्यटक नीलम व्हॅलीमध्ये आले होते.

“ही संख्या खूप मोठी आहे, यावरून कोणीही घाबरलेले नाही हे सिद्ध होते. भारताच्या धमक्यांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना थांबवण्यात आले असले, तरी जे आधीच पर्यटनस्थळांवर होते त्यांना बाहेर काढण्यात आलं नाही,” असं पीर मजहर सईद शाह म्हणाले.

या भागातील परिस्थिती पूर्णपणे शांत असल्याचा दावा त्यांनी केला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC