Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, NHPC
9 मिनिटांपूर्वी
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवर असलेलं सलाल धरण आता चर्चेत आलं आहे.
या धरणातूनच चिनाब नदीचं पाणी पाकिस्तानात जातं.
PTI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, सलाल धरणाचा सध्या फक्त एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळे नदीतून पाकिस्तानकडे जाणारं पाणी अडवण्यात आलं आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सलाल धरणाचे दरवाजे बंद करण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
त्यासोबत ते लिहितात, “भारताच्या हिताचे कठोर निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे निर्णय घेऊन ती दाखवली आहे.”
अर्थात या मुद्द्याबाबत सरकारनं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

या धरणाचे दरवाजे बंद करण्यात आल्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या चिनाब नदीतील पाण्याची पातळी खूपच खाली गेल्याचं ANI या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओत दाखवलं आहे.
सलाल धरण प्रकल्प हा एक जलविद्युत प्रकल्प आहे.
या प्रकल्पातून मिळणाऱ्या विजेचा पुरवठा जम्मू-काश्मीरबरोबरच उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, चंदीगड आणि राजस्थानपर्यंत केला जातो.
सलाल धरण जम्मूमधील रियासी जिल्ह्यात आहे. ते जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 23 किलोमीटर अंतरावर आहे.
सलाल धरणातून जवळपास 690 मेगावॅट विजेची निर्मिती होते.
भारत सरकारच्या National Hydraulic Power Corporation (NHPC) या अंतर्गत हा प्रकल्प येतो. वीजनिर्मितीत हा प्रकल्प देशात सर्वात आघाडीवर आहे.
सलाल हे एक रॉकफिल धरण आहे. म्हणजे दगडांचा भराव घालून बांधण्यात आलेलं धरण आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जम्मूमधील रामबन इथं चिनाब नदीवर असलेल्या बगलिहार धरणाच्या खालच्या बाजूला हा प्रकल्प आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानबरोबरचा सिंधू जल करार स्थगित केला.
त्यानंतर, पाकिस्तानात येणारं पाणी भारताकडून इतरत्र वळवलं जाऊ शकतं अशी शंका पाकिस्तानकडून व्यक्त केली जातेय.
काही व्हीडिओ आणि बातम्यांच्या माहितीनुसार बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद केलेले दिसत आहेत.

1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू जल करारात जागतिक बँकेनं मोठी भूमिका बजावली होती.
1965 आणि 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन युद्ध झाली होती. मात्र युद्धांच्या वेळेसदेखील या कराराला हात लावण्यात आला नव्हता.
भारतानं पश्चिमेकडील नद्यांवर जलविद्युत प्रकल्प बांधण्यास सुरूवात केल्यानंतर या करारात पहिल्यांदा अडचणी येण्यास सुरूवात झाली. या प्रकल्पांमुळे पाकिस्तानात येणारं पाण्याचं प्रमाण कमी होईल अशी चिंता पाकिस्तानला वाटत होती.

त्यानंतर दोन्ही देशांमधील तज्ज्ञांनी 1978 मध्ये सलाल धरण वाद चर्चेतून सोडला. त्यानंतर आला बगलिहार धरणाचा मुद्दा.
2005 मध्ये भारतानं बगलिहार वीजनिर्मिती प्रकल्पासाठी एक धरण बांधण्याचा निर्णय घेतल्यानंतर या धरणावरून मोठा वाद झाला होता.
चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाबाबत पाकिस्तानला आक्षेप होता. कारण पाकिस्तानच्या दाव्यानुसार भारत या नद्यांच्या पाण्यावर नियंत्रण मिळवेल.
2007 मध्ये हा वाद जागतिक बँकेच्या तटस्थ मध्यस्थीद्वारे सोडवण्यात आला होता.
किशनगंगा प्रकल्प हा देखील एक वादग्रस्त प्रकल्प होता. या प्रकरणात देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर मध्यस्थी करण्यात आली होती.
त्याचा निर्णय 2013 मध्ये झाला होता. सिंधू आयोगाच्या बैठकांनी हे वाद सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
किशनगंगा ही झेलम नदीची उपनदी आहे. या नद्यांचा संगम जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात होतो. किशनगंगा प्रकल्पदेखील NHPCचा प्रकल्प आहे.

फोटो स्रोत, ANI
भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार बगलिहार-1 प्रकल्प 2008 मध्ये पूर्ण झाला होता. तर बगलिहार-2 प्रकल्प 2015 मध्ये पूर्ण झाला होता.
तर सलाल-1 आणि सलाल-2 प्रकल्प 1987 मध्येच पूर्ण झाले होते. किशनगंगा प्रकल्प 2018 मध्ये पूर्ण झाला.
यातील बगलिहार प्रकल्प हा राज्य सरकारचा प्रकल्प आहे. तर सलाल आणि किशनगंगा प्रकल्प केंद्र सरकारच्या अंतर्गत आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, सिंधू जल करार स्थगित करण्यात भारतानं पहिल्यांदा या कराराअंतर्गत येणाऱ्या धरणावर काही काम सुरू केलं आहे.
1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू जल कराराअंतर्गत दोन्ही देशांमध्ये सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वापराबाबत तडजोड झाली होती. ज्यात झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या नद्यांचा समावेश आहे.
1960 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सिंधू जल करारानुसार सिंधू, झेलम आणि चिनाब नदीचं पाणी पाकिस्तानला देण्यात आलं होतं. तर रावी, बियास आणि सतलज नदीचं पाणी भारताला मिळालं होतं.
यामध्ये हा मुद्दादेखील होता की भारत त्याच्या वाट्याला आलेल्या नद्यांचं पाणी काही अपवाद सोडून विनाअडथळा वापरू शकतो.

फोटो स्रोत, ANI
तर पाकिस्तानच्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या वापराचा काही मर्यादित अधिकार भारताला देखील देण्यात आला होता. उदाहरणार्थ वीज निर्मिती, शेतीसाठी मर्यादित स्वरूपात पाण्याचा वापर करणं.
भौगोलिक रचनेच्या आधारे सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांना पश्चिमेकडील नद्या म्हणून ओळखलं जातं. तर इतर तीन नद्यांना पूर्वेकडील नद्या मानलं जातं.
या सर्वच नद्यांचा उगम हिमालयात होतो. या सर्व नद्या पुढे सिंधू नदीला जाऊन मिळतात. त्यानंतर सिंधूचा प्रवास पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध प्रांतातून होत कराचीच्या दक्षिणेला ती अरबी समुद्राला मिळते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC