Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
भारतात दरवर्षी 11 ते 12 लाख गर्भपात केले जातात, असा सरकारी अहवाल सांगतो, तर ही अधिकृत संख्या प्रत्यक्षातील संख्येच्या 10 टक्के इतकीच आहे, असं अनौपचारिक किंवा अनाधिकृत अहवाल म्हणतं. 90 टक्के गर्भपात गुप्तपणे केले जातात, असंही म्हटलं जातं.
लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, 2015 साली भारतात 15 लाखांहून अधिक गर्भपात करण्यात आले होते. गेल्या 10 वर्षांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
एक अंदाज असा आहे की, एकूण गर्भपातांपैकी फक्त 20 ते 25 टक्केच गर्भपात हे रुग्णालयांमध्ये किंवा तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले जातात.
उर्वरित 75 ते 80 टक्के गर्भपात हे असुरक्षित पद्धतीने केले जातात आणि गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे, या चुकीच्या समजुतीमुळं असे गर्भपात केले जातात.
गर्भनिरोधकांबद्दल जाणून घेण्यासारख्या गोष्टी
गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु, अनेकांना त्याची माहिती नसते आणि ते गर्भपाताचा आधार घेतात. गर्भपाताच्या वेळी स्त्रीला खूप रक्तस्राव होतो, ज्यामुळं त्याचा त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
आपत्कालीन (इमर्जन्सी) गर्भनिरोधक गोळी. तिच्या नावावरूनच लक्षात येते की, ती फक्त इमर्जन्सी परिस्थितीतच घ्यायची असते. परंतु, या गोळीचा वापर महिन्यातून दोन किंवा तीन वेळा केल्यास, अनेक प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
लैंगिक आरोग्याविषयी जागरूकतेचा अभाव, लैंगिक जीवनाबद्दल चर्चा करण्याचा संकोच आणि दुसऱ्यांसोबत या विषयावर चर्चा करण्याच्या संधींचा अभाव यामुळं प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते.
जेव्हा नको असलेली गर्भधारणा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तरुण आणि नवविवाहित जोडपे मानसिक तणावाखाली येतात. काय करावं आणि कोणाशी संपर्क साधावा हे त्यांना कळत नाही.
गर्भधारणा रोखण्याचे अनेक मार्ग आहेत आणि त्याची माहिती घेतल्यास गर्भपात टाळण्यास मदत होऊ शकते.
महिलांना त्यांच्या शरीराचे योग्य प्रकारे ज्ञान आणि समज असावी लागते आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्यासाठी कोणती गर्भनिरोधक पद्धत सर्वोत्तम आहे, हे ठरवावे लागते.
कंडोमचा वापर किती उपयुक्त आहे?
अनेक लैंगिक भागीदार (सेक्स पार्टनर्स) असलेल्या लोकांसाठी कंडोम वापरणं सर्वोत्तम आहे. कारण कंडोम हे एकमेव गर्भनिरोधक आहे, जे एचआयव्ही एड्स, हिपॅटायटीस-बी आणि इतर लैंगिकरित्या संक्रमण होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करते.
हे एका जोडीदाराच्या डिस्चार्जला दुसऱ्या पार्टनरच्या डिस्चार्जमध्ये मिसळण्यापासून प्रतिबंधित करते.

फोटो स्रोत, Getty Images
बाजारात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगवेगळे कंडोम उपलब्ध आहेत. बहुतेक लोकांना पुरुषांचे कंडोम माहिती असतात. जर महिलांना त्यांच्यासाठी कंडोम वापरण्यात अडचण येत असेल, तर बाजारात के-वाय जेल उपलब्ध आहे. याच्या वापराने संभोग करताना जास्त घर्षण रोखण्यास मदत होते.
अर्थात, कंडोमची एक समस्या ही आहे की, जर तुम्ही त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला नाही, तर ते फाटू शकतात. यामुळे गर्भावस्थेची शक्यता निर्माण होते आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला लैंगिक संक्रमित संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो.
म्हणूनच, कंडोम वापरण्यापूर्वी त्याची योग्य माहिती मिळवणं महत्त्वाचं आहे. याव्यतिरिक्त, शुक्राणुनाशक जेली वापरून देखील गर्भधारणा टाळता येऊ शकते.
गर्भनिरोधक गोळी कशी काम करते?
ज्या महिलांना सध्या मूलं नको आहेत, अशा महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करू शकतात. जोपर्यंत या गोळ्या घेतल्या जातात, तोपर्यंत त्या गर्भवती होत नाहीत. गर्भनिरोधक गोळ्या स्त्रियांमध्ये अंडी सोडण्यास प्रतिबंध करतात, ज्यामुळं गर्भधारणा टाळता येते.
या गोळीमध्ये दोन प्रकारचे हार्मोन्स असतात: इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन.
अनियमित मासिक पाळी, अशक्तपणा (रक्ताची कमतरता), मासिक पाळीत जास्त रक्तस्राव, आणि मासिक पाळीपूर्वी (प्रीमेन्स्ट्रूअल सिंड्रोम) चिडचिडेपणा, चिंता असलेल्या महिला या गोळ्यांचा वापर करून या समस्या कमी करू शकतात, ज्यात दोन हार्मोन्सचा समावेश असतो.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम अंतर्गत, सरकार देशातील ग्रामीण भागात माला-एन आणि माला-डी नावाच्या गोळ्या मोफत किंवा खूप कमी किमतीत वितरित करते.
याशिवाय, बाजारात अनेक गोळ्या उपलब्ध आहेत. या सर्व गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधांच्या दुकानातून विकत घेता येतात.
अशी गोळी मासिक पाळी सुरू झाल्यापासून सलग 21 दिवस घेणं आवश्यक असतं. उर्वरित सात दिवस लाल लोहाच्या (आयरन) गोळ्या घ्याव्यात. त्या वेळी, तुमची मासिक पाळी सुरू होईल आणि त्यानंतर तुम्हाला गोळ्यांचा हा नियमित वापर किंवा चक्र पुन्हा सुरू करावे लागेल.
गर्भनिरोधक गोळ्या कोणी घेऊ नयेत?
इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असलेल्या गोळ्या 35 वर्षांहून जास्त वय असलेल्या आणि ज्यांना रक्त गोठण्याचा विकाराचा त्रास आहे, अशा महिलांनी घेऊ नयेत.
त्याचबरोबर धूम्रपान किंवा मद्यपान करणारे, मायग्रेन, कॅन्सर, रक्ताचा कॅन्सर अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या, स्तनपान करणाऱ्या आणि ज्यांना लठ्ठपणाची समस्या आहे, अशांनी या गोळ्या घेऊ नयेत.

फोटो स्रोत, Getty Images
बाजारात विविध प्रकारच्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. त्यांपैकी एक ‘लहान गोळी’ देखील उपलब्ध आहे, ज्यात फक्त प्रोजेस्टेरॉन असते. ही गोळी फक्त स्तनपान करणाऱ्या महिलाच घेऊ शकतात.
सरकारने नुकतीच एक गर्भनिरोधक गोळी तयार केली आहे. ज्यामध्ये हार्मोन्स नसतात आणि ही गोळी प्रत्येक महिला घेऊ शकते. या गोळ्याची नावं ‘सहेली’ आणि ‘छाया’ असे आहे. या गोळ्या प्रत्येक वयोगटातील महिलांना घेता येतात.
ही गोळी पहिल्या तीन महिन्यांमध्ये आठवड्यातून दोन वेळा घ्यावी लागते. त्यानंतर, ती आठवड्यातून एकदा घेणे पुरेसे आहे.
‘आरोग्याशी संबंधित काही समस्या असेल, तर काळजी घ्या’
ज्या महिलांना कोणताही लैंगिक आजार, पीसीओएस किंवा क्षयरोग (टीबी) आहे, त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच गर्भनिरोधक गोळ्या घ्याव्यात.
ज्या महिलांना तोंडावाटे गोळ्या घ्यायच्या नसतील, त्यांच्यासाठी त्वचेवर लावण्यासाठी एक पॅच देखील उपलब्ध आहे. हा पॅच पोटावर, खांद्यावर किंवा पाठीमागे लावता येतो. तो महिन्यातून एका आठवड्यासाठी लावावा.

फोटो स्रोत, Getty Images
इम्प्लांट (रोपण) –
यासोबतच गर्भनिरोधक लससुद्धा उपलब्ध आहेत. ‘अंतरा’ नावाच्या लसीमध्ये डीएमपीए नावाचा हार्मोन असतो. जर तुम्हाला ही लस वापरायची असेल, तर ती दर तीन महिन्यांनी घ्यावी लागते.
ही लस सर्व वयोगटातील महिलांना दिली जाऊ शकते. ही मासिक पाळीच्या वेळी होणारा रक्तस्राव देखील कमी करते. मात्र ज्यांना कॅन्सर, यकृत किंवा मूत्रपिंडाच्या समस्या आहेत, अशा महिलांनी ही लस घेऊ नये. ही लस सरकारकडून मोफत मिळू शकते.
सबडर्मल इम्प्लांट हे हार्मोन सोडणारे इम्प्लांट असतात, जे लहान काड्यांसारखे दिसतात. हे कोपराच्या त्वचेखाली बसवले जाते. याच्या वापरामुळे तीन ते पाच वर्षांपर्यंत गर्भधारणा रोखता येते. त्यानंतर ते काढून टाकणं आवश्यक असतं.
गर्भाशयात बसवले जाणारे साधन (इंट्रायूटरिन डिव्हाइस) –
दोन मुलांमध्ये किमान तीन वर्षांचं अंतर असावं जेणेकरून आई आणि बाळ दोघंही निरोगी राहतील. त्या काळात, गर्भाशयात कॉपर-टी बसवणं हा सर्वोत्तम पर्याय असतो. कॉपर-टी तीन ते पाच वर्षांसाठी प्रभावी असते.
मरिना नावाच्या अशाच एका उपकरणाचा वापर केल्यास गर्भधारणा दहा वर्षांपर्यंत रोखता येते.
कुटुंब नियोजनासाठी नसबंदी किंवा ट्युबेक्टॉमीसारखे ऑपरेशन्स हे सर्वोत्तम उपाय आहेत. पुरुषांची नसबंदी (व्हॅसेक्टॉमी) ही कमी वेळेत बरी होते.
आपत्कालीन परिस्थितीत काय करावं?
ज्या महिलेला गर्भवती व्हायचं नाही, ती महिला आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या घेऊ शकते.
ही गोळी संभोगानंतर 72 तासांच्या आत घ्यावी. मात्र, ही गोळी फक्त आपत्कालीन परिस्थितीतच वापरावी.
त्याच्या वारंवार किंवा सततच्या वापरामुळे मासिक पाळीच्या समस्या, गर्भाशयाच्या समस्या आणि अशक्तपणा (रक्ताचा अभाव) होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images
त्यामुळे, महिलांनी याबद्दल आपल्या जोडीदाराशी चर्चा करावी आणि दोघांनी त्यांनी कोणती गर्भनिरोधक पद्धत निवडायची हे एकत्रितपणे ठरवावं.
या सर्व पद्धती आम्ही तुमच्या सोयीसाठी शोधल्या आहेत.
नैसर्गिक गर्भधारणा टाळण्यासाठी, मासिक पाळीच्या तीन दिवस आधी आणि तीन दिवसांनंतर सेक्स केल्यास गर्भधारणेची शक्यता खूपच कमी असते. परंतु, कंडोम सारख्या पर्यायांचा वापर केल्याने देखील संसर्ग टाळण्यास मदत होऊ शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC