Source :- BBC INDIA NEWS

NISAR

फोटो स्रोत, NASA

NASA आणि ISRO या दोन्ही अंतराळ संस्थांनी आजवर अनेक महत्त्वाच्या आणि यशस्वी अंतराळ मोहिमा पार पाडल्या आहेत. आणि आता या दोन आघाडीच्या अंतराळसंस्था मिळून एका मोहिमेवर काम करतायत. या मोहिमेचं नाव – ‘NISAR’.

काय आहे ही संयुक्त मोहीम? हे मिशन काय काम करेल? आणि यात नासाची भूमिका काय असेल आणि इस्रोची भूमिका काय असेल?

NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Satellite म्हणजेच NASA-ISRO SAR.

हा असणार आहे एक Low Earth Orbit Satellite. म्हणजे खालच्या कक्षेमध्ये असणारा उपग्रह.

नासा आणि इस्रो मिळून हा उपग्रह विकसित करतायत. हा NISAR उपग्रह 12 दिवसांमध्ये अख्ख्या पृथ्वीचं मॅपिंग करू शकेल आणि पृथ्वीवर होणाऱ्या भौगोलिक बदलांची नोंद करेल.

2024 मध्ये हे मिशन लाँच होणार होतं. पण उपग्रह विकसित करताना आलेल्या अडचणींमुळे याला उशीर झाला.

या मिशनसाठी नासा एल-बँड सिंथेटिक अपेर्चर रडार, वैज्ञानिक माहिती आणि डेटासाठीची दळणवळण यंत्रणा, जीपीस रिसीव्हर्स, सॉलिड-स्टेट रेकॉर्डर म्हणजे या उपग्रहामध्ये असणारा हार्डड्राईव्ह आणि पेलोड डेटा सबसिस्टम देतंय.

तर इस्रो उपग्रह लाँच करणारी यंत्रणा, स्पेसक्राफ्ट बस, एस-बँड रडार आणि लाँचसाठीच्या इतर गोष्टींची काळजी घेणार आहे.

या उपग्रहाचे काही भाग अमेरिकेमध्ये असेंबल करून मग भारतात पाठवण्यात आले. म्हणजे या उपग्रहासाठीचा ड्रमच्या आकाराचा 39 फूट लांबीचा रिफ्लेक्टर ऑक्टोबर 2024 मध्ये भारतात पाठवण्यात आला होता.

नासा आणि इस्रोच्या संयुक्त मोहिमेसाठीच्या करारावर सह्या करताना नासाचे अ‍ॅडमिनिस्ट्रेटर चार्ल्स बोल्डन आणि इस्रोचे तेव्हाचे अध्यक्ष के. राधाकृष्णन

फोटो स्रोत, NASA

ही मोहीम करणार काय आहे?

पृथ्वीमध्ये होणाऱ्या तीन महत्त्वाच्या बदलांचा अभ्यास करणं या मोहिमेचं उद्दिष्टं आहे.

जीवसंस्था, पृथ्वीवरील झाडं-जंगलं आणि कार्बन सायकलमध्ये होणारा बदल, पृथ्वीच्या पृष्ठभागात होणारे बदल आणि पृथ्वीवरील गोठलेले भाग आणि त्यांच्यामध्ये होणारे बदल, त्याचा समुद्रपातळीवर होणारा परिणाम यांचा अभ्यास करेल.

तसंच, पाण्याखालच्या खोलीचं मोजमाप (Bathymetry) करण्याचं कामही NISAR करेल.

तर 12 दिवसांमध्ये हा उपग्रह पृथ्वी ग्रहाचं मॅपिंग करेल म्हणजे अगदी बारकाईने निरीक्षण करेल. आणि पृथ्वीवरची जीवसंस्था, बर्फाचं प्रमाण, पृथ्वीवरच्या हिरवळीचं प्रमाण, समुद्रपातळीत होणारे बदल, किनारपट्टयांमध्ये होणारे बदल, किती प्रमाणात धूप होतेय, भूजल पातळीत होणारे बदल यासगळ्यांबद्दलची निरीक्षणं नोंदवली जातील.

भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही अभ्यास केला जाईल. त्यांच्या परिणामांबद्दलची निरीक्षणं नोंदवली जातील. शिवाय, पाण्यावर द्रवस्थितीतलं पेट्रोलियम तेल सांडणं आणि असं झाल्यास ते नेमकं कुठे झालं आहे नोंदवून इतर भागांचं त्यापासून कसं संरक्षण करता येईल याविषयीची माहितीही या NISAR कडून मिळू शकेल.

NISAR

फोटो स्रोत, NASA

या NISAR मध्ये L आणि S अशी ड्युएल बँड रडार असतील ज्यांच्या मदतीने पृथ्वीवरच्या मोठ्या पट्ट्यांमधला हाय रिझोल्युशन डेटा नोंदवता येईल.

ही SAR यंत्रणा असेल इंटिग्रेटेड रडार इन्स्ट्रुमेंट स्ट्रक्चर (IRIS) वर.

IRIS आणि स्पेसक्राफ्ट बस या दोन्हींना मिळून ऑब्झर्व्हटरी म्हटलं जाईल.

या NISAR यंत्रणेमुळे अमेरिका आणि भारताला त्यांच्या देशांसाठी आवश्यक माहिती तर मिळेलच, पण सोबतच जगभरातल्या संशोधकांना पृथ्वीच्या पृष्ठभागांवर होणाऱ्या अगदी लहानात लहान बदलांबद्दलची सखोल माहिती सातत्याने मिळू शकेल.

श्रीहरीकोटामधल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून हे NISAR मिशन GSLV द्वारे लाँच केलं जाईल.

लाँचनंतरच्या पहिल्या 90 दिवसांमध्ये कक्षेमध्ये योग्यरीतीने उपग्रह स्थिरावणं आणि त्यातल्या यंत्रणा कार्यान्वित करणं या गोष्टी होतील. सगळ्या यंत्रणा नीट काम करतायत याची चाचणी होईल आणि ही ऑब्झर्व्हेटरी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी सज्ज केली जाईल. त्यानंतर पुढची तीन वर्षं या मोहीमेद्वारे वेगवेगळी वैज्ञानिक निरीक्षणं आणि अभ्यास केले जातील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC