Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
शरीरातल्या प्रत्येक पेशीसाठी बी-12 जीवनसत्त्व गरजेचं आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक आजार ओढावू शकतात.
तज्ज्ञांच्या मते शाकाहारी जेवणात हे जीवनसत्त्व कमी असतं.
व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे कोणत्या समस्या उद्भवू शकतात? कोणत्या वयात या जीवनसत्त्वाची सगळ्यात गरज जास्त असते? कोणत्या अन्नपदार्थांमध्ये बी-12 मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं?
शाकाहारी लोकांना हे जीवनसत्त्व कसं मिळू शकतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
बी-12 जीवनसत्त्व म्हणजे काय?
बी-12 हे जीवनसत्त्व कोबालामिन म्हणूनही प्रसिद्ध आहे. ‘बी’ समूहातलं हे एक महत्त्वाचं जीवनसत्त्व बहुतेकवेळा प्राणीजन्य आहारातच सापडतं.

फोटो स्रोत, Getty Images
तुम्ही शाकाहारी असाल तर तुमच्या शरीराला आवश्यक असलेलं बी-12 जीवनसत्त्व पूरक औषधांद्वारे आणि बी-12 जीवनसत्त्व असलेल्या अन्नातून मिळू शकेल.
बी-12 जीवनसत्त्व चांगल्या आरोग्यासाठी का महत्त्वाचं?
तमिळनाडूतल्या ओमंदूरार शासकीय रुग्णालयात पोषणतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. मीनाक्षी बजाज सांगतात, “बी-12 जीवनसत्त्व शरीरातल्या लाल पेशींची संख्या नियमित ठेवायला मदत करतं. शरीरातल्या अवयवांकडे ऑक्सिजन घेऊन जायचं महत्त्वाचं काम लाल पेशी करतात.”

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय, तुमच्या शरीरातल्या मज्जासंस्थेचे काम सुरळीत चालू राहावं यासाठी बी-12 ची भूमिका महत्त्वाची असते.
इतकेच नाही तर, “डीएनए तयार होण्यासाठी आणि नुकसान झालेल्या डीएनएवर उपचार म्हणूनही बी-12 जीवनसत्त्वाची मोठ्या प्रमाणात गरज असते,” असंही डॉ. बजाज यांनी पुढे सांगितलं.
कोणत्या वयात किती जीवनसत्त्व लागतं?
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेने 2020 मध्ये जाहीर केलेल्या माहितीनुसार, जन्मल्यापासून 3 वर्षे वयापर्यंत जेवणात 1.2 मायक्रोग्रॅम्स इतक्या बी-12 जीवनसत्त्वाची गरज असते.

फोटो स्रोत, Getty Images
6 ते 18 या वयात या पोषकघटकाचं प्रमाण दररोज 2.2 मायक्रोग्रॅम्स इतकं असावं लागतं.
डॉ. मीनाक्षी बजाज सांगतात की, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना बी-12 जीवनसत्त्वाची जास्त गरज असते.
बी-12 जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका कोणाला?
बीबीसी तमिळशी बोलताना बी-12 जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा धोका कोणाला असतो हे डॉ. मीनाक्षी सांगत होत्या.
व्हिगन अन्न म्हणजे प्राणीजन्य पदार्थ, तसेच अगदी दूध आणि त्यापासून बनलेले पदार्थ टाळणाऱ्या व्यक्तींना बी-12 जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा सर्वाधिक धोका असतो.
ज्यांना लॅक्टोज इनटॉलरंस म्हणजे दुधात नैसर्गिकरित्या असलेली साखर पचवण्याची अक्षमता असते त्यांच्यातही बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता दिसून येते.

फोटो स्रोत, Getty Images
बी-12 हे पाण्यात विरघळणारं जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ते सहजरित्या शोषलं जातं. पण काही आजारांसाठीची औषधं जीवनसत्त्व शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात. त्यामुळेही शरीरात त्याची कमतरता येते.
एखाद्याला पोटाचा कर्करोग असेल किंवा शस्त्रक्रिया झाली असेल किंवा अल्सरसारख्या आजारांवर औषधं सुरू असतील तर शरीराची बी-12 शोषून घेण्याची क्षमता कमी होते.
तसंच, टाईप – 2 प्रकारचा मधुमेह असणाऱ्यांमध्येही बी12 जीवनसत्त्व कमी असू शकतं.
बी-12 जीवनसत्त्वाच्या कमतरेचे परिणाम
“मज्जासंस्थेच्या आणि लाल रक्त पेशींच्या विकासासाठी बी-12 जीवनसत्त्व महत्त्वाचं असल्याने त्याच्या कमतरतेचे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात,” असा इशारा डॉ. मीनाक्षी देतात.
“बी-12 जीवनसत्त्वाच्या कमतरतेचा 4 ते 19 वर्षे या वयोगटातल्या मुलांवर आणि गरोदर महिलांवर जास्त परिणाम होतो,” त्या म्हणतात.
याबाबतचा ‘गर्भधारणेदरम्यान आईच्या शरीरातील बी 12 जीवनसत्त्वाची पातळी आणि त्याचा गर्भधारणेचे परिणाम व बाळाच्या आरोग्याशी असलेला संबंध” हा एक अभ्यास फॉन्टिअर्स नावाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या अभ्यासात भारतातील उत्तरेकडच्या आणि पश्चिमेकडच्या भागात बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता 70 ते 74 टक्के गरोदर महिलांमध्ये आढळून आली. तर कर्नाटक राज्यात 51 टक्के गरोदर महिलांना बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता असल्याचं समोर आलं.
“बी-12 जीवनसत्त्वाच्या कमतरेतमुळे पर्निशियस ॲनिमिया होतो. मज्जासंस्थेत बिघाड होणं, शरीराचं संतुलन बिघडणं, चक्कर येणं, अशक्तपणा आणि श्वास घ्यायला त्रास होणं असे त्रास होण्याची शक्यता असते,” डॉ. मीनाक्षी सांगतात.
“कमतरता खूप जास्त प्रमाणात असेल तर रक्तातली होमोसिस्टीनची पातळी वाढते. होमोसिस्टीन खूप जास्त प्रमाणात वाढलं तर होमोसिस्टीमेमिया नावाची स्थिती शरीरात तयार होते. त्यामुळे हृदयाचे आजार होतात.”
बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी काही लोक औषधं घेतात. पण काही काळानंतर ती औषधं बंद करतात. असं करू नये. असा सल्ला डॉ. मीनाक्षी देतात.
बी-12 पुरवणारी औषधं सतत घेतल्यानेच असा आजारांपासून संरक्षण मिळतं, डॉ. मिनाक्षी म्हणाल्या.
बी-12 जीवनसत्त्व कोणत्या पदार्थांमधून मिळतं?
भाज्या, फळं आणि पालेभाज्या यात बी-12 जीवनसत्त्व नसतं. प्राण्याच्या मांसातच या जीवनसत्त्वाचं प्रमाण सर्वाधिक असतं.
व्हिटॅमिन बी-12 भरपूर प्रमाणात असलेल्या अन्नपदार्थांची माहिती देताना डॉ. मीनाक्षी यांनी पुढीलप्रमाणे यादी दिली.
काही लोक शाकाहारी असले तरी त्यांना दूध आणि दह्यासारखे डेअरी पदार्थ खायला आवडतात.
तसंच, औषध म्हणून निदान एक अंडं दररोज खाल्लं तरी बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता भरुन काढता येईल.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, आधी सांगितल्याप्रमाणे मटण, तसंच बांगडा, सॅलमन आणि कटला अशा माशांमध्ये बी-12 जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतं.
जे शाकाहारी आणि व्हिगनही आहेत, त्यांनी दररोज दोन ते तीन वेळा धान्य, प्राण्यांऐवजी बदाम, सोयाबीन अशा पदार्थांपासून बनवलेलं दूध आणि यीस्टपासून बनवलेले फ्लेक्स असे पोषक पदार्थ खाणं आवश्यक आहे, असं पोषणतज्ज्ञ लॉरा टिल्ट यांनी बीबीसीसाठी लिहिलेल्या लेखात सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC