Source :- BBC INDIA NEWS

फोटो स्रोत, Getty Images
हवाई हल्ले रोखणारी अत्याधुनिक यंत्रणा – एअर डिफेन्स सिस्टीम अमेरिका उभारणार असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलंय. या यंत्रणेचं नाव असेल – गोल्डन डोम. अध्यक्षपदाचा आपला कार्यकाळ संपेपर्यंत ही गोल्डन डोम यंत्रणा कार्यरत होईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेच्या दिशेने डागली जाण्याची शक्यता असणारी बॅलिस्टिक आणि क्रूझ मिसाईल्स थांबवण्याची क्षमता असणारी यंत्रणा उभारण्याचा आपला मानस असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदावर आल्यानंतरच जाहीर केलं होतं.
संभाव्य शत्रूंकडे असणारी शस्त्रं आधुनिक झाली असली, तरी अमेरिकेकडे सध्या असणारी यंत्रणा त्या तुलनेनं बदलली नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला होता.
गोल्डन डोमसाठी किती खर्च येईल?
ही यंत्रणा निर्माण करण्यासाठी सुरुवातीला 25 अब्ज अमेरिकन डॉलर्सची तरतूद करण्यात आलेली आहे. पण पुढच्या काही दशकांमध्ये यापेक्षा कैकपटींनी अधिक खर्च होणार असल्याचा अमेरिकन सरकारचा अंदाज आहे.
पुढच्या काही वर्षांमध्ये या गोल्डन डोमचा एकूण खर्च वाढून 175 अब्ज डॉलर्सवर जाण्याचा अंदाज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला करण्यात येणाऱ्या 25 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची तरतूद ही ‘वन बिग ब्युटिफुल बिल’मधून मिळणाऱ्या टॅक्समधून करण्यात येणार आहे. पण हे बिल अजूनही मंजूर झालेलं नाही.
काँग्रेशनल बजेट ऑफिसनं मांडलेल्या अंदाजानुसार पुढच्या 20 वर्षांमध्ये गोल्डन डोमचा खर्च 542 अब्ज डॉलर्सवर जाण्याची शक्यता आहे.
मायकल गुटलेन हे या गोल्डन डोम प्रोजेक्टचे प्रमुख असतील. जनरल गुटलेन हे सध्या स्पेस फोर्सचे स्पेस ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष आहेत.
गोल्डन डोम यंत्रणा काय आहे?
व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी या गोल्डन डोमविषयीची माहिती दिली. ‘नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीज’ म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारी ही हवाई हल्ले रोखणारी यंत्रणा असेल.
यामध्ये जमीन, समुद्र आणि अगदी अवकाशातही सेन्सर्स आणि इंटरसेप्टर्स असतील. जगाच्या दुसऱ्या टोकावरून किंवा अगदी अवकाशातून लाँच करण्यात आलेली क्षेपणास्त्रंही रोखण्याची क्षमता या सिस्टीममध्ये असेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
ही गोल्डन डोम यंत्रणा इस्रायलच्या आयर्न डोमवर आधारित आहे. इस्रायल 2011 पासून या यंत्रणेचा वापर रॉकेट्स आणि क्षेपणास्त्र हल्ले रोखण्यासाठी करतंय.

फोटो स्रोत, Getty Images
पण गोल्डन डोम यंत्रणा या आयर्न डोमपेक्षा अनेक पटींनी मोठी असेल आणि यामध्ये विविध प्रकारचे हल्ले रोखण्याची क्षमता असेल, असं सांगण्यात आलंय.
यामध्ये ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास करणारी सुपरसॉनिक शस्त्रं आणि फ्रॅक्शनल ऑर्बिटल बंबार्डमेंट सिस्टम्स (Fobs) म्हणजे पृथ्वीच्या खालच्या कक्षेतून प्रवास करणारी अण्वस्त्रं वाहून नेणारी यंत्रणा रोखण्याचीही क्षमता या गोल्डन डोममध्ये असेल.
या गोल्डन डोमविषयी बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “सगळ्या गोष्टी हवेतच उडवल्या जातील. याचा सक्सेस रेट 100 टक्क्यांच्या जवळपास असेल.”
गोल्डन डोमला क्षेपणास्त्रांचे हल्ले वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये थांबवता येतील, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी यापूर्वी म्हटलं होतं. यामध्ये ही क्षेपणास्त्रं लाँच होण्याच्या आधी आणि ती हवेत असतानाच निकामी करण्याचाही समावेश असेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC