Source :- ZEE NEWS

Viral Video of Indian Billionaire travelling in bus: भारतीय अब्जाधीश आणि लुलू ग्रुपचे अध्यक्ष एम.ए. युसुफ अली यांनी सार्वजनिक बसमधून प्रवास करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दुबईतील त्यांचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकरी त्यावर व्यक्त झाले आहेत. नेटकऱ्यांकडून त्यांच्या नम्र आणि साध्या स्वभावाबद्दल प्रशंसा होत आहे. व्हिडीओत युसूफ अली बसमध्ये चढताना आणि चालकाशी आपुलकीने हस्तांदोलन करताना दिसत आहेत. ते चालकाला हिंदीमध्ये, “कसे आहात? ठीक आहात ना?” असं विचारतानाही ऐकू येत आहेत. चालकाला अभिवादन केल्यानंतर, ते बसमधील इतर प्रवाशांशीही संवाद साधताना दिसले.

Add Zee News as a Preferred Source

हा व्हिडिओ सज्जाद फरदेसे (Sajjad Fardese) नावाच्या एका युजरने टिकटॉकवर पोस्ट केला आहे. यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. सोशल मीडियावर अनेकांनी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे. अनेकांना त्यांना “सर्वात साधे आणि जमिनीवर पाय असलेला माणूस” असं संबोधत कौतुक केलं आहे.

बसमधील हा व्हायरल व्हिडिओ एम.ए. युसुफ अली यांच्या आयुष्यातील आणखी एका अविस्मरणीय क्षणानंतर आला आहे, ज्याची माहिती त्यांनी इंस्टाग्रामवरुन दिली होती. त्यांना संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान तसेच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्याकडून ‘लेसन्स फ्रॉम लाईफ: भाग 1’ या पुस्तकाची स्वतःच्या स्वाक्षरीची प्रत मिळाली.

“संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान तसेच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांनी मला ‘लेसन्स फ्रॉम लाईफ: भाग-1’ या त्यांच्या नवीनतम पुस्तकाची स्वतःच्या स्वाक्षरीची प्रत पाठवल्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. एक दूरदृष्टीचे नेते आणि महान ज्ञान व बुद्धीने संपन्न असलेल्या महामहिम यांच्या जीवनातून सध्याची आणि भविष्यातील पिढी खूप काही शिकू शकते, याची मला खात्री आहे. हे पुस्तक मिळवण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल मी महामहिम यांचा आभारी आहे,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

पुस्तकाच्या आत, शेख मोहम्मद यांनी त्यांना उद्देशून लिहिलेला एक हस्तलिखित संदेश होता.

युसूफ अली कोण आहेत?

युसूफ अली हे लुलू ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्यांच्या मालकीची जगभरात लुलू हायपरमार्केट चेन आणि लुलू इंटरनॅशनल शॉपिंग मॉल आहे. ते आखाती देश आणि भारतातील 256 हायपरमार्केट आणि मॉल्सच्या विशाल किरकोळ व्यवसायाच्या साम्राज्याची देखरेख करतात. फोर्ब्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती 5.9 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. तथापि, त्यांच्या आयुष्यात दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत, ज्यात २००१ साली दुबईहून अबू धाबीला प्रवास करत असताना एका कार अपघातात त्यांच्या पालकांचा मृत्यू झाला, असं गल्फ न्यूजने वृत्त दिलं आहे.

आपल्या व्यस्त व्यावसायिक कामांव्यतिरिक्त, ते सामाजिक क्षेत्रातही तितकेच सक्रिय आहेत आणि विविध संस्थांशी संबंधित आहेत.

SOURCE : ZEE NEWS