Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे
तैवाननं सोमवारी (25 मे) स्टॉक मार्केट व्हॅल्यूएशन म्हणजे शेअर बाजाराच्या एकूण बाजार मूल्याच्या बाबतीत भारताला मागे टाकलं. म्हणजेच, तैवानच्या शेअर बाजाराचं एकूण मूल्य भारताच्या शेअर बाजारापेक्षा जास्त झालं आहे.
यामागचं सर्वात मोठं कारण ठरलं, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी (टीएसएमसी) या सर्वात मोठ्या चिप निर्मिती कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत झालेली तुफान वाढ.
स्टॉक मार्केट व्हॅल्युएशन (मार्केट कॅपिटलायझेशन) ज्याला शेअर बाजारातील एकूण भागभांडवल असं म्हणतात, ते म्हणजे कोणत्याही शेअर बाजारातील सर्व नोंदणीकृत कंपन्यांच्या एकूण बाजारमूल्याचं एकत्रित मूल्य असतं.
उदाहरणार्थ, भारतात एनएसई आणि बीएसई हे दोन स्टॉक एक्सचेंज आहेत. यात नोंदणी झालेल्या कंपन्यांचं एकूण बाजारमूल्य म्हणजे या सर्व कंपन्यांचं एकत्रित मूल्य सध्या 4.92 ट्रिलियन डॉलर (अंदाजे 471 ट्रिलियन रुपये) आहे.
अर्थात, स्टॉक मार्केट व्हॅल्यूएशन म्हणजे शेअर बाजाराच्या एकूण बाजार मूल्याच्या बाबतीत जरी तैवाननं भारताला मागे टाकलं असलं, तरीदेखील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था सध्या 4.15 ट्रिलियन डॉलरची (अंदाजे 397 ट्रिलियन रुपये) आहे.
तर तैवानची अर्थव्यवस्था 977 अब्ज डॉलरची (अंदाजे 93,47,936 कोटी रुपये) आहे. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था तैवानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा बरीच मोठी आहे. तसंच भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश जगातील सर्वाधिक वेगानं विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये होतो.
मात्र, याकडे असंही पाहिलं जाऊ शकतं की 977 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था असणाऱ्या तैवाननं 4.15 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताला मागे टाकलं आहे.
ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, सोमवारपर्यंत (25 मे) तैवानच्या शेअर बाजाराचं एकूण बाजारमूल्य वाढून 4.95 ट्रिलियन डॉलरवर (अंदाजे 474 ट्रिलियन रुपये) पोहोचलं. तर भारतीय शेअर बाजाराचं एकूण बाजारमूल्य मात्र घटून 4.92 ट्रिलियन डॉलर (अंदाजे 471 ट्रिलियन रुपये) इतकं झालं.
आता तैवानचा शेअर बाजार जगातील 5 व्या क्रमांकाचा शेअर बाजार बनला आहे.
अमेरिका, चीन, जपान आणि हाँगकाँगनंतर तैवानचा नंबर लागतो.
टॉप 5 देशांमध्ये चीन, हाँगकाँग आणि तैवान आहेत, ही सर्वात रंजक बाब आहे. हाँगकाँग हा चीनचाच स्वायत्त प्रदेश आहे. तर तैवानलादेखील चीन त्याचाच एक भाग मानतो.
तैवानच्या जागतिक इक्विटी रँकिंगमध्ये इतकी जोरदार वाढ होण्यामागचं कारण टीएसएमसी ही कंपनी आहे. ताइएक्स हा तैवानचा बेंचमार्क इंडेक्स आहे.
या इंडेक्स किंवा निर्देशांकात टीएसएमसीचं वेटेज किंवा वाटा जवळपास 42 टक्के आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे मोठी तेजी
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या क्षेत्रात आलेल्या मोठ्या तेजीचा फायदा होत टीएसएमसीच्या शेअर्सच्या किमतीत यावर्षी तब्बल 49 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे. कारण टीएसएमसी सेमी कंडक्टर बनवते आणि त्याचा संबंध एआयशी आहे. त्यामुळे सेमी कंडक्टरच्या बाजारातील कंपनीचं स्थान मजबूत आहे आणि या क्षेत्रात कंपनीचं जवळपास वर्चस्व आहे.
तैवानच्या शेअर बाजाराच्या मूल्यात झालेल्या जोरदार वाढीतून दिसतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत जागतिक पातळीवर किती सकारात्मक वातावरण आहे.
याच आशेनं जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. याचा सर्वात मोठा फायदा तैवान आणि दक्षिण कोरियाच्या मॅन्युफॅक्चरिंग हबला होतो आहे.
ब्लूमबर्गनं लिहिलं आहे की, दुसऱ्या बाजूला भारत, ऊर्जेवरील वाढता खर्च, कॉर्पोरेट नफ्यातील मंदावलेली वाढ आणि एआय क्षेत्रात प्रभाव, कौशल्य असणाऱ्या कंपन्यांच्या कमतरतेला तोंड देतो आहे.
फोटो स्रोत, Getty Images
फ्रँकलिन टेम्पलटन इन्व्हेस्टमेंटमधील फंड मॅनेजर यी पिंग लियाओ ब्लूमबर्गला म्हणाले, “तैवानच्या बाजार भांडवलात झालेली वाढ मूलत: टेक हार्डवेअरमधील त्याची मोठी भागीदारी दाखवतं. सध्या हे क्षेत्र एआयमधील गुंतवणूकीच्या केंद्रस्थानी आहे.”
“ज्या बाजारांमध्ये टेक हार्डवेअरची उपस्थिती मर्यादित आहे, ते आता तैवान आणि दक्षिण कोरियासारख्या टेक हार्डवेअरचं वर्चस्व असलेल्या बाजारांपेक्षा मागे पडत चालले आहेत,” असं ते म्हणाले.
नवीन वित्तीय नियमदेखील टीएसएमसीच्या फायद्याचे ठरले आहेत. गेल्या महिन्यात तैवानच्या वित्तीय नियामक संस्थेनं देशांतर्गत फंडांसाठी कोणत्याही एका शेअरमधील गुंतवणूकीची मर्यादा वाढवली होती.
नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फक्त तैवानच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे फंड आता त्यांच्या एकूण मालमत्तेचा 25 टक्क्यांपर्यतचा भाग अशा नोंदणीकृत शेअर्समध्ये गुंतवू शकतात, ज्याचा ताइएक्स इंडेक्समधील वाटा 10 टक्क्यांपेक्षा अधिक असेल. आधी ही मर्यादा फक्त 10 टक्क्यांची होती.
सध्या फक्त टीएसएमसी ही कंपनीच हा निकष पूर्ण करते. जे पी मॉर्गन चेसचं म्हणणं आहे की या बदलामुळे तैवानमध्ये 6 अब्ज डॉलरहून (अंदाजे 57,408 कोटी रुपये) अधिकची नवीन गुंतवणूक होऊ शकते.
परदेशी गुंतवणूकदार आणि भारत
या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून विक्रमी पातळीवर पैसे काढून घेतले आहेत.
भारतीय शेअर बाजारातील शेअर्सच्या महागड्या किमती, कमकुवत होत असलेला रुपया आणि ऊर्जेवरील वाढता खर्च यासारखी कारणं यामागे असल्याचं सांगितलं जात आहे.
या वर्षी आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून जवळपास 24 अब्ज डॉलर काढून घेतले आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांचा संपूर्ण भर एआय कंपन्यांच्या शेअर्सवर आहे. भारताकडे सध्या एआयच्या क्षेत्रात कोणताही मजबूत पर्याय नाही.
सेन्सेक्स हा भारतीय शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक यावर्षी जवळपास 10 टक्के घसरलेला आहे.
एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्समध्ये असलेली भारताची भागीदारी किंवा वाटा गेल्या वर्षीच्या 19 टक्क्यांवरून कमी होऊन जवळपास 12 टक्क्यांवर आला आहे.
फोटो स्रोत, Getty Images
फक्त 2 वर्षांआधी हाँगकाँगला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार झाला होता.
मात्र 2 वर्षांनी आता हाँगकाँग चौथ्या क्रमांकावर आहे आणि तैवाननंदेखील भारताला मागे टाकलं आहे.
दक्षिण कोरियादेखील लवकरच भारताला मागे टाकू शकतो, असं म्हटलं जात आहे. भारत एआयच्या स्पर्धेत मागे पडला असल्याचं आधीपासूनच म्हटलं जात होतं.
रुचिर शर्मा जागतिक पातळीवरील गुंतवणूकदार आणि आर्थिक बाबींचे तज्ज्ञ आहेत.
याच महिन्यात रुचिर शर्मा, इंडियन एक्सप्रेस या भारतातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राला म्हणाले होते, “आज जगाचं जवळपास संपूर्ण लक्ष एआयवर आहे, त्यामुळे आता भारतातून गुंतवणूक काढली घेतली जात आहे.”
ते पुढे म्हणाले होते, “गुंतवणूकदार एआयच्या जागतिक स्पर्धेनं झपाटले आहेत. या स्पर्धेत भारताकडे एक कमकुवत खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. सध्या जग एआयच्या ‘पिक्स अँड शॉवेल्स’ टप्प्यात आहे. म्हणजेच सेमीकंडक्टर, मेमरी आणि कॉम्प्युटिंग क्षमतेवर लक्ष केंद्रित आहे. या क्षेत्रांमध्ये भारत कमकुवत आहे.”
रुचिर शर्मा म्हणाले होते, “गेल्या काही वर्षांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 50 अब्ज डॉलर काढून घेतले आहेत. नेट एफडीआयदेखील जवळपास शून्यावर आहे. गुंतवणूकीबाबतच्या माझ्या 30 वर्षांच्या अनुभवात मी भारताबद्दल इतकी उदासीनता कधीही पाहिली नाही.”
“अगदी 2013 च्या ‘फ्रॅजाईल फाईव्ह’च्या काळात भारताबद्दल नकारात्मक वातावरण होतं, मात्र आजची स्थिती त्याहूनही वाईट आहे. गुंतवणूकदारांचं पूर्ण लक्ष एआयवर आहे. भारताच्या कमकुवत बाबी आता स्पष्टपणे दिसत आहेत.”
भारत मागे का पडतो आहे?
रुचिर शर्मा म्हणतात, “संशोधनाच्या क्षेत्रात भारत जीडीपीच्या फक्त 0.6 टक्के खर्च करतो. तर दक्षिण कोरिया आणि तैवान 4-5 टक्क्यांपर्यंत खर्च करतात. या बाबतीत इस्रायल जगात सर्वात पुढे आहे.”
“आपलं आयटी क्षेत्र दीर्घकाळ स्वस्त कर्मचारी आणि आउटसोर्सिंगवर आधारित मॉडेलवर अवलंबून राहिलं. इनोवेशन आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यावर नाही. आता हाच कमकुवतपणा आपल्यासमोर मोठं आव्हान बनून उभं राहत आहे.”
आरबीआयचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनीदेखील हिंदुस्तान टाइम्स या इंग्रजी वृत्तपत्रात 20 मे ला लिहिलं होतं की तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत मागे पडतो आहे.
फोटो स्रोत, Getty Images
सुब्बाराव यांनी लिहिलं होतं, “परदेशी गुंतवणूकदारांनी जगभरातील चांगल्या संधीच्या शोधात भारतातील पैसा काढून घेत इतर बाजारांकडे मोर्चा वळवला. जागतिक पातळीवरील भांडवल आता तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था, विशेषकरून एआय, बायोटेक आणि डेटा सेंटरकडे आकर्षित होत आहेत.”
“अजूनही भारत हा वेगानं विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे. मात्र या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमधील त्याची भूमिका मर्यादित असल्याचं दिसतं आहे. जसजसा पैसा इनोवेशन असणाऱ्या अर्थव्यवस्थांकडे जातो आहे, तसतसं रुपयावरील दबावात वाढ होणं जवळपास निश्चित आहे.”
सुब्बाराव यांनी पुढे लिहिलं होतं, “भारताचा परकीय चलनसाठा अजूनही 700 अब्ज डॉलरच्या जवळपास आहे. हा जगातील सर्वात मोठ्या चलनसाठ्यांपैकी एक आहे. मात्र यामुळे अती-आत्मविश्वास निर्माण होता कामा नये. सर्वसामान्य परिस्थितीत ही रक्कम मोठी वाटू शकते, मात्र संकटाच्या काळात याचं खरं महत्त्व त्याच्या विश्वासार्हतेत असतं.”
ब्लूमबर्गनं त्यांच्या एका लेखात लिहिलं आहे, “एआयवर आधारित तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये भारताची अनुपस्थिती त्याला महागात पडते आहे. दुसरीकडे इराण युद्धामुळे स्थानिक कंपन्यांवर नफ्यासाठी दबाव वाढल्यामुळे ही परिस्थिती आणखी बिघडू शकते.”
क्रिसिल रेटिंग्सच्या एका अहवालानुसार, “जर संघर्ष दीर्घकाळ चालला तर कॉर्पोरेट नफ्यामध्ये जवळपास 200 बेसिस पॉईंट्सची घसरण होऊ शकते. एअरलाइन्स, पॉलिस्टर टेक्सटाइल्स, स्पेशालिटी केमिकल्स, फ्लेक्सिबल पॅकेजिंग आणि ऑटोमोबाइल क्षेत्राला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो.”
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC







