Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे
देशातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट सुरू असतानाच, भारतीय हवामान विभागाने (IMD) 3 जून रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते की दक्षिण-पश्चिम मान्सून पुढील 24 तासांत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर मान्सून हळूहळू महाराष्ट्राकडे आगेकूच करेल. राज्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असली तरी काही भागांमध्ये उकाडा कायम आहे.
आयएमडीने इशारा दिला आहे की, या आठवड्यात उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या काळात ताशी 40 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 8 तासांत देशातील 17 राज्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, राज्याच्या काही भागांत पावसाने मान्सूनपूर्वीच धडक दिली आहे. काल (3 जून) मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसल्या आणि नागरिकांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळाला. काल राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला असून आजही काही भागांत ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी?
मुंबई येथील भारतीय हवामान विभागाच्या मते, 4 जून रोजी मान्सून सर्वप्रथम केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर तो हळूहळू महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीकडे सरकेल.
महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मान्सून पोहोचण्यासाठी सुमारे एक आठवडा लागण्याची शक्यता आहे, तर मुंबईत मान्सून दाखल होण्यासाठी सुमारे 10 दिवस लागू शकतात, मात्र त्यासाठी मान्सूनची गती सामान्य राहणे आवश्यक आहे.
त्यामुळे सर्व काही सुरळीत राहिल्यास, मुंबईत मान्सून सुमारे 12 जूनच्या आसपास दाखल होऊ शकतो. साधारणपणे मुंबईत मान्सून आगमनाची तारीख 10 जून मानली जाते.
फोटो स्रोत, Getty Images
‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढू लागला आहे. मात्र, महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये सध्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडत आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच दक्षिण आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांबरोबरच विदर्भातील अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मध्यम ते तीव्र वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
फोटो स्रोत, IMD
तसेच, मुंबई आणि आसपासच्या परिसरातही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या मते, विशेषतः सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पाऊस आणि वादळी वातावरणाची तीव्रता वाढू शकते.
ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई महानगर भागात 4 जूनपासून हवामानातील बदल स्पष्टपणे जाणवू लागतील. विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील, ज्यामुळे तापमानात आणि उकाड्यात काही अंशी घट जाणवेल. तर, 8 आणि 9 जूननंतर मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वाढेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सायंकाळच्या वेळेत विशेषतः 5 ते 7 दरम्यान पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे सध्या जाणवत असलेल्या उष्णता आणि दमट हवामानापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
जूनमध्ये असं असेल हवामान
जून महिन्यात देशात बहुतांश ठिकाणी कमाल आणि किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी यंदा जूनमध्येही नेहमीपेक्षा जास्त दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब, बिहार, ओडिसा, छत्तीसगड, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये जास्त दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता जास्त आहे.
जुलै महिन्यासाठीचा अंदाज हवामान विभाग जून महिन्याच्या अखेरीस वर्तवेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
SOURCE : BBC







