Home LATEST NEWS ताजी बातमी ‘कधी कधी वाटतं ती अचानक कुठूनतरी परत येईल’; अहमदाबाद विमान अपघातात मुलीला...

‘कधी कधी वाटतं ती अचानक कुठूनतरी परत येईल’; अहमदाबाद विमान अपघातात मुलीला गमावणारी आई वर्षभरानंतर काय म्हणाली?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

मैथिली पाटील

गेल्या वर्षी, म्हणजे 12 जून 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातल्या न्हावा गावची 22 वर्षीय एअर इंडियाची क्रू मेंबर मैथिली पाटील हिचाही समावेश होता.

अपघाताला आता वर्ष पूर्ण होत आलं आहे. मात्र, या दुर्घटनेमागे नेमकं कारण काय होतं, याचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं, अशी मागणी मैथिलीची आई प्रमिला पाटील यांनी केली आहे.

“माझी मुलगी मला परत मिळणार नाही. पण ही दुर्घटना नेमकी कशामुळे झाली, याचा शोध लावावा. त्यापलीकडे माझी कोणतीही अपेक्षा नाही,” असं त्या बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या.

कुटुंबातील मैथिली सर्वात मोठी मुलगी

मैथिली पाटील न्हावा गावची रहिवासी असून दोन वर्षांपूर्वी ती एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून नोकरीला लागली होती.

आई-वडील, एक बहीण आणि एक भाऊ अशा पंचकोनी कुटुंबातील मैथिली सर्वात मोठी मुलगी आहे.

मैथिली पाटील हिचे वडील पनवेलजवळ असणाऱ्या एका खासगी कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतात. अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी तीन मुलांना शिक्षण दिल आहे. या घटनेनंतर कुटुंब धक्क्यात आहेत.

नोकरीला लागल्यानंतर कुटुंबाची आणि भावंडांच्या शिक्षणाची जबाबदारी मैथिलीवर होती. अत्यंत हुशार आणि ध्येय केंद्रित मुलगी होती, असे तिचे शिक्षक आणि शेजारी सांगतात.

'मुलगी तर परत येणार नाही, पण अपघात कारणाचा शोध लावा', मैथिली पाटीलच्या आईची सखोल चौकशीची मागणी

फोटो स्रोत, Maithili Patil

न्हावा गावातील टी. एस. रहेमान शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या मैथिलीने अगदी लहानपणापासूनच हवाई सुंदरी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.

मैथिलीनं हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. दोन वर्षापूर्वी तीने एव्हिएशनचे शिक्षण पूर्ण करून एअर इंडियात कामाला लागली होती. दोन वर्षाच्या अनुभवात तिने अनेक डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये काम केलं होतं.

‘अजूनही कुठेतरी ती येईल, बोलेल असंच वाटतं’

मैथिलीच्या निधनानंतर गेलं वर्ष कसं गेलं, याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना मैथिली ची आई प्रमिला पाटील भावूक झाल्या.

“माझं विश्व संपूर्ण थांबलं आहे. त्यामुळे आयुष्यात नेमका काय बदल झाला, हे खरंच सांगता येत नाही. अजूनही कुठेतरी ती येईल, बोलेल असंच वाटतं,” असं त्या म्हणाल्या.

“मैथिली कुटुंबातील मोठी मुलगी होती. भावंडांचं शिक्षण पूर्ण करायचं आणि घराची जबाबदारी सांभाळायची, अशी तिची इच्छा होती. मी तिला लग्नाबद्दल विचारलं होतं. तेव्हा तिने मला पाच वर्षांची मुदत मागितली होती. कारण तिला तिच्या भावंडांचं शिक्षण पूर्ण करायचं होतं आणि घराची जबाबदारीही सांभाळायची होती,” असं प्रमिला पाटील सांगतात.

'मुलगी तर परत येणार नाही, पण अपघात कारणाचा शोध लावा', मैथिली पाटीलच्या आईची सखोल चौकशीची मागणी

फोटो स्रोत, Maithili Patil

मैथिली नोकरीला लागल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली होती. मात्र, तिच्या निधनानंतर पुन्हा संघर्षाचा काळ सुरू झाल्याचं त्या सांगतात.

“ती कामाला लागल्यानंतर मला कोणाकडूनही मदत मागण्याची गरज उरली नव्हती. आता ती सगळं सांभाळणार होती, त्यामुळे मीही निर्धास्त झाले होते. मात्र ती गेल्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. पुन्हा शून्यातून उभं राहायचं आहे.”

त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात कुटुंबाने मुख्यत्वे वडिलांच्या पगारावर आणि नातेवाईकांच्या मदतीवर घर चालवलं.

“आज आमची परिस्थिती अशी आहे की, आम्ही मुलीच्या मिळालेल्या मदतीवर जगत आहोत,” असंही त्या म्हणाल्या.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

‘नेमकी चूक कोणाची होती, हे तरी कळावं’

संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक संस्थेने (ICO) ठरवलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, प्राथमिक चौकशी अहवाल 30 दिवसांत जाहीर केला गेला पाहिजे, तर अंतिम अहवाल 12 महिन्यांत पूर्ण केला जाणं अपेक्षित असतं.

अपघातानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी पाठवण्यात आला. विविध यंत्रणांकडून चौकशीही सुरू झाली. मात्र, वर्ष उलटून गेलं तरी कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांना अपघाताचं निश्चित कारण समजलेलं नाही.

“आम्हाला अपेक्षा होती की काहीतरी माहिती मिळेल. नेमकी चूक कोणाची होती, हे तरी कळेल,” असं प्रमिला पाटील म्हणाल्या.

'मुलगी तर परत येणार नाही, पण अपघात कारणाचा शोध लावा', मैथिली पाटीलच्या आईची सखोल चौकशीची मागणी

त्या पुढे म्हणाल्या, “मला वाटत नाही की ही पायलटची चूक असू शकते. विमानात काही बिघाड असेल तर ते कोणालाही उड्डाणासाठी देत नाहीत. सर्व गोष्टींची अत्यंत काटेकोर तपासणी केली जाते. माझी मुलगीही मला या तपासण्यांबद्दल वारंवार सांगायची.”

“आम्हाला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. आम्ही अजूनही वाट पाहत आहोत. नेमकी चूक कोणाची होती, हे कधीतरी कळेल अशी अपेक्षा आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा कोणासोबतही घडणार नाहीत.” असे प्रमिला पाटील म्हणाल्या.

त्यांची मागणी केवळ त्यांच्या मुलीसाठी नसून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठीही असल्याचं त्या सांगतात.

“ही घटना नेमकी कशी घडली, याची माहिती आम्हाला मिळावी, एवढीच माफक अपेक्षा आहे. या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी व्हावी. निदान आम्हाला इतकं तरी कळावं की ही दुर्घटना कशामुळे झाली. माझ्या मुलीचा यात काय दोष होता?” असा प्रश्न त्या उपस्थित करतात.

'मुलगी तर परत येणार नाही, पण अपघात कारणाचा शोध लावा', मैथिली पाटीलच्या आईची सखोल चौकशीची मागणी

फोटो स्रोत, Maithili Patil

नऊ महिन्यांनी परत मिळालेली बॅग

या एका वर्षात कुटुंबाच्या हाती मुलीच्या आठवणी आणि अपघातातील काही वस्तू आल्या. प्रमिला पाटील सांगतात की 30 मार्च 2026 रोजी मैथिलीचं सामान त्यांना परत मिळालं.

“अनेकांची बॅग पूर्ण अवस्थेत मिळाली नव्हती, मात्र तिची बॅग पूर्ण मिळाली. तिच्या सोबत असलेले काही साहित्य देखील मिळाले. एक वर्षापूर्वी आम्ही दोघींनी मिळून ती बॅग घेतली होती. तेव्हा ती म्हणाली होती, ‘ही बॅग आगीत गेली तरी तिला काही होणार नाही.’

मी तिला विचारलं होतं की इतकी महाग बॅग कशाला घेतेस? त्यावर ती म्हणाली होती, ‘तिला काही होणार नाही.’ बॅग परत मिळाल्यानंतर तिचे ते शब्द मला आठवले.”

'मुलगी तर परत येणार नाही, पण अपघात कारणाचा शोध लावा', मैथिली पाटीलच्या आईची सखोल चौकशीची मागणी

फोटो स्रोत, Maithili Patil

एअर इंडियाकडून वेळोवेळी संपर्क होत असल्याचं त्या सांगतात.

“हो, एअर इंडियाकडून फोन येतात. ते चौकशी करतात. त्यांनी मदत देखील केली. काही वस्तू किंवा सामान मिळालं तर त्याबाबतही कळवतात,” असं त्या म्हणाल्या.

मात्र, राज्य प्रशासन किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांना काहीही मदत केली नाही. प्रीतम म्हात्रे यांच्या एका संस्थेने आमच्या दोन्ही मुलांची चालू वर्षाची शैक्षणिक फी भरली. मात्र या घटनेनंतर राजकीय लोकांनी हवे तसे लक्ष आमच्याकडे कोणी दिले नाही.

‘विमान उड्डाणासाठी योग्य नसेल तर उडवू नका’

अपघाताला वर्ष झाल्यानंतरही अद्याप ठोस माहिती तुम्हाला मिळू शकली नाही. त्यामुळे तुम्ही प्रशासनाकडे काय मागणी कराल याबद्दल बोलताना प्रमिला पाटील म्हणाल्या की, मैथिली परत येणार नाही, याची जाणीव आम्हाला आहे. मात्र, अपघाताचं खरं कारण समोर यावं आणि भविष्यात इतर कुटुंबांवर अशी वेळ येऊ नये, एवढीच आमची अपेक्षा आहे.

पुढे म्हणाल्या, “विमानाची तपासणी करताना ती अत्यंत व्यवस्थित केली पाहिजे. विमान उड्डाणासाठी योग्य स्थितीत नसेल, तर ते उडवूच नये. नाहक निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. माझी मुलगी मला परत मिळणार नाही. पण हे कशामुळे झालं याचा शोध लावावा. बाकी काहीच अपेक्षा नाही.”

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

Skip शॉर्ट व्हीडिओ and continue reading

शॉर्ट व्हीडिओ

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

  • Jolibee restaurant in Philippines

  • वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात समावेश झाल्यावर त्याचे वडील काय म्हणाले?

  • अभिजीत दिपके

  • विधान परिषद

  • रियाझुद्दीन मन्सुरी

  • किम जोंग उन

  • अभिजीत दिपके

  • ब्लू ओरिजिन

  • पूल कोसळला

  • तैवान

  • वैभव सूर्यवंशी

  • फेरारी लुचे

  • RFK यांनी हाताने उचलले साप

  • ड्रोन पाण्यात पडले तेव्हा

  • माकड

  • इराण युद्ध

SOURCE : BBC