Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, Getty Images
-
Published
-
वाचन वेळ: 6 मिनिटे
कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना एक पत्र लिहून यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कायदेशीर वैधतेबाबत स्पष्टीकरण देण्याची विनंती केली आहे.
या पत्रात त्यांनी संघाकडे प्रामुख्याने 8 मुद्द्यांची माहिती पुरवण्याची विनंती केली आहे.
यामध्ये, संघटनेचा कायदेशीर दर्जा, देणग्या आणि उत्पन्नाचा स्रोत, खर्च आणि मालमत्तेचा तपशील तसेच, कायद्यानुसार लागू असलेला कर भरला जातोय का आणि ज्या कायदेशीर आधारावर औपचारिक नोंदणीशिवाय संस्थेचे कामकाज चालवलं जात आहे तिची माहिती, अशा गोष्टींचा खुलासा करण्याची विनंती केली आहे.
“यावर मी उत्तर देण्याची काहीच गरज नसून हे राजकारण आहे आणि अशा सर्व युक्त्या लढवल्या जात असून आम्हाला याची सवय झाली आहे,” अशी प्रतिक्रिया दिली असल्याचा व्हीडिओ ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केला आहे.
मात्र, प्रतिक्रियेचा हा व्हीडिओ चुकीचा असल्याचा दावा प्रियांक खर्गे यांनी केला आहे.
सध्या त्यांच्या या पत्राची बरीच चर्चा सुरू आहे. नेमकं या पत्रात काय लिहिलंय आणि मोहन भागवतांनी काय म्हटलंय, हे सविस्तरपणे पाहूयात.
प्रियांक खर्गे यांनी मोहन भागवतांना लिहिलेल्या पत्रात नक्की म्हटलं आहे?
प्रियांक खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे चिरंजीव आहेत. ते कर्नाटक राज्य सरकारचे गृहमंत्री आहेत.
मात्र, आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर त्यांनी हे 15 तारखेला प्रसिद्ध केलं आहे.
खर्गे यांनी या पत्राच्या सुरूवातीलाच ‘100 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन आणि संस्थेच्या कायदेशीर दर्जाबाबत स्पष्टीकरणाची विनंती’ असा विषय नमूद केला आहे.
फोटो स्रोत, X/Priyank Kharge
सुरूवातीला त्यांनी संघाचं अभिनंदन करत म्हटलंय की, “भारत आणि परदेशात 60 हजारहून अधिक शाखा आणि कोट्यवधी स्वयंसेवक असल्याचा दावा करणाऱ्या संघटनेचे सार्वजनिक जीवनात आणि समाजात निःसंशयपणे महत्त्वपूर्ण अस्तित्व आहे.”
पुढे त्यांनी असंही म्हटलंय की, “आरएसएसची व्याप्ती, प्रभाव आणि पोहोच पाहता, त्यांच्याकडून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि घटनात्मक बाबींच्या सर्वोच्च मानकांचं पालन होणं अत्यंत आवश्यक आहे.”
पुढे त्यांनी संघाच्या दैनंदिन शाखा, साप्ताहिक शाखा आणि मासिक बैठकांचीही संघाने केलेले दाव्यांची आकडेवारी नमूद केली आहे.
थोडक्यात, संघानेच दावा केलेल्या आपल्या व्याप्तीचा उल्लेख करत पुढे ‘संघाचा कायदेशीर दर्जा, उत्तरदायित्व, आर्थिक पारदर्शकता, सार्वजनिक सुव्यवस्था, परवानग्या, निधीचे स्रोत आणि भारताचे संविधान व कायद्यांचे पालन यांबाबत रास्त प्रश्न उपस्थित होतात,’ असं म्हणत बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत.
‘स्वच्छता कामगाराचीही नोंद असते मग संघाची का नाही?’
या पत्रामध्ये, प्रियांक खर्गे यांनी संघटनेचा कायदेशीर दर्जा, पदाधिकाऱ्यांचा आणि अधिकृत प्रतिनिधींचा तपशील, देणग्या आणि उत्पन्नाचा स्रोत, खर्च आणि मालमत्तेचा तपशील तसेच, कायद्यानुसार लागू असलेला कर भरला जातोय का आणि ज्या कायदेशीर आधारावर औपचारिक नोंदणीशिवाय संस्थेचे कामकाज चालवलं जात आहे तिची माहिती अशा गोष्टींचा खुलासा करण्याची विनंती केली आहे.
प्रियांक खर्गे या पत्रात म्हटलंय की, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) विनंती करतो की, त्यांनी आपल्या अधिकृत पदाधिकाऱ्यांना पाठवून त्या कायदेशीर आधारांचे स्पष्टीकरण द्यावे, ज्यांच्या आधारे इतक्या मोठ्या प्रमाणावरील ही संघटना आपली कार्ये निनावीपणे आणि लागू असलेल्या कायद्यांनुसार ‘कायदेशीर संस्था’ किंवा ‘व्यक्तींचा समूह’ म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत न होता चालवत आहे.”
पुढे त्यांनी म्हटलंय की, “भारतात, सरकारी लाभ घेण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याचीही नोंदणी असणं आवश्यक असतं. प्रत्येक धार्मिक संस्था आणि धार्मिक ट्रस्टचं लेखापरीक्षण केलं जातं. धर्मादाय संस्था, स्वयंसेवी संस्था (NGOs), ट्रस्ट, सोसायट्या, कंपन्या आणि इतर संस्थांना त्यांची रचना, कामकाज, आर्थिक बाबी आणि उत्पन्नाचे स्रोत यांची माहिती उघड करणे बंधनकारक आहे.
फोटो स्रोत, X/Priyank Kharge
या संदर्भात, आरएसएसनेही (RSS) पुढे येऊन खालील माहिती सार्वजनिक करणे योग्य आणि आवश्यक आहे, असं म्हणत त्यांनी पुढील 8 मुद्दे उपस्थित केले आहेत.
- संघाचा कायदेशीर दर्जा आणि संघटनात्मक रचना
- संघा चे पदाधिकारी आणि अधिकृत प्रतिनिधी यांचा तपशील
- देणग्या, अंशदान आणि उत्पन्नाचे स्रोत
- खर्च आणि मालमत्तेचा तपशील
- कायद्यानुसार लागू असलेले कर भरले जात आहेत का?
- औपचारिक नोंदणीशिवाय संघटनेचे कामकाज चालवण्यामागील कायदेशीर आधार
- कोणत्या घटनात्मक आणि वैधानिक चौकटींतर्गत, सार्वजनिक उत्तरदायित्वाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर कामकाज करण्याचा अधिकार संघटना सांगते आहे?
- सार्वजनिक कार्यक्रम, पदयात्रा, जनसमुदायाचे मेळावे आणि इतर संघटित उपक्रमांसाठीच्या परवानग्या, अधिकृत मान्यता आणि नियमांचे पालन करण्याच्या यंत्रणांचा तपशील
शेवटी त्यांनी म्हटलंय की, “संघाला आवाहन करतो की, त्यांनी आपल्या शताब्दी वर्षाचा उपयोग केवळ उत्सवासाठी न करता घटनात्मक आत्मपरीक्षणासाठी करावा. आपल्या 100 व्या वर्षात भारताला अर्पण करता येणारी सर्वोत्तम आजरांजली म्हणजे स्वतःची अधिकृत नोंदणी करणे, आपल्या कारवाया व आर्थिक बाबींची माहिती उघड करणे, सर्व लागू कर भरणे आणि भारतीय कायद्यांच्या चौकटीत राहून एक पारदर्शक व उत्तरदायी संस्था म्हणून कार्य करणे.”
मोहन भागवत काय म्हणाले?
केरळमधील त्रिशूरमधील 14 जून रोजी एका कार्यक्रमात मोहन भागवत यांना संघाच्या नोंदणीबाबत प्रश्न विचारण्यात आला.
‘विश्व संवाद केंद्र, केरळ’ यांच्या कार्यक्रमातील हा व्हीडिओ ANI ने प्रियांक खर्गे यांच्या पत्रावरील मोहन भागवत यांचं प्रत्युत्तर असं म्हणत सार्वजनिक केला आहे.
या व्हीडिओत दिसतंय की, या पत्रावर उत्तर देताना सुरूवातीलाच ‘मला यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही,’ असं मोहन भागवत यांनी म्हटलंय.
पुढे ते म्हणाले की, “अशा अनेक गोष्टी घडत असतात ज्यांची अधिकृत नोंदणी नसते, आणि आम्ही काही गुपित बाळगत नाहीये. आम्ही उघडपणे काम करतो. आम्ही लोकांना बोलावतो आणि त्यांना संघाबद्दल माहिती देतो.”
फोटो स्रोत, Getty Images
पुढे त्यांनी या पत्राबद्दल बोलताना म्हटलंय की, “हे राजकारण आहे आणि अशा प्रकारच्या युक्त्या लढवल्या जात आहेत. आम्हाला याची सवय झाली आहे. संघाच्या स्थापनेनंतर 10-15 वर्षांतच आम्हाला अशा गोष्टींचा सामना करावा लागला होता. आम्हाला याची सवय आहे.”
“हिंदू धर्माची नोंदणी झालेली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची नोंदणी झालेली नाही. सरकारने आमच्यावर दोनदा बंदी घातली होती; त्यातील एक बंदी न्यायालयाच्या आदेशाने आणि दुसरी सत्याग्रहाद्वारे उठवण्यात आली. त्यामुळे सरकारला माहित आहे की आरएसएसचं अस्तित्व आहे. जर त्यांनी आरएसएसवर बंदी घातली, तर याचा अर्थ असा की त्यांनी त्याचं अस्तित्व मान्य केलं होतं. हे सर्व राजकारण आहे, यात काही गांभीर्य नाही.”
“त्यांना एका बाजूला संघाच्या कार्यात अडथळे आणायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूला लोकांच्या मनात शंका निर्माण करायच्या आहेत. पण आता ते शक्य नाही कारण लोक आम्हाला ओळखतात. ते म्हणतात की आम्ही गुपित बाळगतो. आमचे कार्यकर्ते सर्व वस्त्यांमध्ये राहतात. लोक त्यांना रोज पाहतात. आमच्या शाखा मोकळ्या मैदानांवर भरतात. लोक त्या रोज पाहतात. आमचे सार्वजनिक कार्यक्रम होतात,” असंही त्यांनी म्हटलंय.
‘प्रत्युत्तराचा हा व्हीडिओ चुकीचा’ – प्रियांक खर्गे
प्रियांक खर्गे यांनी 15 जून रोजी हा व्हीडिओ ट्विट करत लिहिलंय की, “माझ्या पत्राला प्रतिसाद म्हणून डॉ. मोहन भागवतजी यांचा जो व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर फिरवला जात आहे, तो चुकीचा आहे.
“मी माझे पत्र 15 जून रोजी पाठवण्यात आलं आणि सोशल मीडियावरही त्याच दिवशी प्रसिद्ध केलं आहे; तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचा तो संवाद 13 किंवा 14 जून रोजीचा होता.”
“मला वस्तुस्थिती स्पष्ट करू द्या,” असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतच्या प्रश्नांचा पुनरूच्चार केला आहे.
“कायद्यांतर्गत औपचारिक मान्यता मिळवल्यास हा विरोधाभास कायमचा दूर होईल,” असंही त्यांनी म्हटलंय.
” ‘एखाद्या धर्माची नोंदणी होऊ शकत नाही आणि त्यामुळेच आरएसएसची (RSS) नोंदणी करण्याची गरज नाही’ हा युक्तिवाद सदोष आणि हास्यास्पद आहे. आरएसएस कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करते असे मानले जाऊ शकत नाही; कारण स्वतः आरएसएसचे अस्तित्व केवळ 100 वर्षांचे आहे आणि कोणत्याही सरकारने कोणत्याही धर्माला नोंदणी करण्यास सांगितलेले नाही.”
पुढे त्यांनी म्हटलंय की, “अहंकार बाजूला ठेवा, कायद्याचे पालन करा आणि तुमच्या ‘पदाधिकाऱ्यां’ना किंवा ‘कायदेशीर प्रमुखां’ना माझ्याकडे येऊन स्पष्टीकरण द्यायला सांगा.”
शेवटी त्यांनी ‘जय संविधान, जय हिंदू’ असंही म्हटलंय.
‘नोंदणीसह संघाबाबत इतर काही प्रश्न’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत असे अनेक प्रश्न आजवर उपस्थित झाले आहेत.
फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत वेळोवेळी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशा 14 प्रश्नांवर आणि संघावरील आक्षेपांवर बीबीसीने याआधी एक लेख प्रसिद्ध केला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)
SOURCE : BBC






