Home LATEST NEWS ताजी बातमी राहुल गांधी यांच्या कोटा येथील कार्यक्रमाला भाजपने म्हटले ‘नौटंकी’; काँग्रेसने दिलं ‘हे’...

राहुल गांधी यांच्या कोटा येथील कार्यक्रमाला भाजपने म्हटले ‘नौटंकी’; काँग्रेसने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर

3
0

Source :- BBC INDIA NEWS

राहुल गांधी यांनी कोटा येथील कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर वाढणारा ताण आणि त्यांच्या कुटुंबांवर पडणारा आर्थिक बोजा यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

फोटो स्रोत, ANI

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बुधवारी (17 जून) कोटा येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. या कार्यक्रमाला ‘छात्रों की गूंज’ असं नाव देण्यात आलं होतं. यात त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली आणि देशातील सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले.

कोटानंतर काँग्रेस ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम लखनौ, पाटणा आणि दिल्ली येथेही आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमांमधून ते ‘शिक्षण व्यवस्था’ आणि ‘पेपरफुटी’चा मुद्दा उपस्थित करण्यात येणार आहे.

राहुल गांधी म्हणाले, “हा राजकीय कार्यक्रम नाही. विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न मांडण्यासाठीचे हे एक व्यासपीठ आहे. आज फक्त विद्यार्थी आणि तरुणांच्या मुद्द्यांवरच चर्चा होईल.”

“पाच मोठ्या परीक्षांच्या तयारीसाठी देशात कुटुंबांकडून सुमारे 5 लाख कोटी रुपये खर्च होतात. ही रक्कम केंद्रातील पाच मंत्रालयांच्या अर्थसंकल्पाइतकी आहे,” असा दावा त्यांनी आपल्या भाषणात केला.

हा कार्यक्रम तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठीची लढाई असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह म्हणाले.

दुसरीकडे, भाजपने काँग्रेसवर टीका करत या कार्यक्रमाला ‘नीटवरील नौटंकी’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ असं म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’मध्ये काय दिसलं?

या संवाद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हजारो विद्यार्थी दशहरा मैदानावर जमले होते. पण, त्यावेळी त्यांच्या हातात पुस्तकं नव्हती आणि खांद्यावर बॅगही नव्हती.

राहुल गांधी यांनी व्यासपीठीवर नीट, यूपीएससी आणि जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

त्यांनी विद्यार्थी तसेच त्यांच्या कुटुंबीयांशीही संवाद साधला.

राहुल गांधी यांनी व्यासपीठीवर नीट, यूपीएससी आणि जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

या संवादाच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांवरील वाढता ताणतणाव, कुटुंबांवर पडणारा आर्थिक भार, परीक्षेच्या तयारीचा खर्च, पेपरफुटी, बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांची पूर्ण न होणारी स्वप्नं यांसारखे मुद्दे मांडत शिक्षण व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी पाच प्रमुख परीक्षांच्या तयारीसाठी सुमारे पाच लाख कोटी रुपये खर्च होतात, असा दावा केला.

“ही व्यवस्था केवळ पैसे उकळण्याचे साधन बनली आहे. हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ 12 जणांनाच रोजगार मिळतो. भारतात दर 100 पैकी 80 अभियंते बेरोजगार आहेत,” असा राहुल गांधी यांनी आरोप केला.

परीक्षा घेण्याची व्यवस्था आता विद्यार्थ्यांकडून पैसे उकळण्याचे साधन बनली आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार करिअर आणि शिक्षणाची शाखा (स्ट्रीम) निवडावी, असंही ते म्हणाले.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महक यादवने बीबीसीला सांगितलं की, “नीट परीक्षेत मला 685 गुण मिळाले असते, परंतु पेपर फुटला. आता 21 तारखेला होणाऱ्या परीक्षेची तयारी करत आहे. राहुल गांधी यांनी पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित केल्याने आशा निर्माण झाली आहे.”

राजकीय व्यासपीठ नव्हे, विद्यार्थ्यांशी संवाद

या कार्यक्रमाला एनएसयूआयचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, पवन खेडा, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते टीकाराम जुली, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

परंतु, व्यासपीठावर एकाही नेत्याला स्थान देण्यात आलं नव्हतं.

या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. परंतु, व्यासपाठीवर यापैकी कोणीही नव्हतं.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

या कार्यक्रमानंतर राहुल गांधी यांचा भर प्रामुख्याने शिक्षण व्यवस्था, बेरोजगारी आणि महागाई या तीन मुद्द्यांवर असल्याचे दिसून आले.

हे तीनही मुद्दे अलीकडे दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या बैठकीतून समोर आले. या बैठकीला सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीसांना बोलवण्यात आलं होतं.

विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यामागे राहुल गांधींचा उद्देश काय?

राहुल गांधी यांची नजर 2029 च्या लोकसभा निवडणुकीवर आहे. नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देण्यासाठी ते तरुणांवर आपलं लक्ष केंद्रित करत आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी 2027 मध्ये 7 राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

राहुल गांधी

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

अनेक अंदाजांनुसार, अशा तरुणांची संख्या सध्या किमान 50 लाख इतकी असल्याचे मानले जाते.

या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचाही विचार केला, तर ही संख्या सुमारे 2 कोटींपर्यंत जाते.

विद्यार्थी संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच हे कार्यक्रम कोटा, पाटणा, लखनौ आणि दिल्लीसारख्या मोठ्या कोचिंग केंद्रांमध्ये (हब) आयोजित केले जात आहेत.

राहुल गांधी

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

या संवाद कार्यक्रमाबाबत वरिष्ठ पत्रकार योगेश शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “विद्यार्थ्यांशी होणारा संवाद राजकारणापासून दूर ठेवून प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांना आकर्षित करण्याचा राहुल गांधी यांचा प्रयत्न किंवा उद्देश दिसून येतो.”

“व्यासपीठावर राजकारण टाळलं असलं, तरी राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे या उपक्रमामागचा मूळ उद्देश हा राजकीयच असू शकतो.”

‘ही फक्त नौटंकी’- भाजपची प्रतिक्रिया

राहुल गांधी यांनी हा कार्यक्रम अराजकीय असून केवळ विद्यार्थ्यांसाठी असल्याचे म्हटलं आहे. परंतु, भाजपने यावर टीका करत या कार्यक्रमाला नीट परीक्षेवरील ‘नौटंकी’ आणि ‘कॉमेडी सर्कस’ असं म्हटलं आहे.

भाजप नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष अरुण चतुर्वेदी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “राहुल गांधी कोटा येथे नीटच्या नावाखाली नौटंकी करत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळून ते देशाला मागे नेण्याचं काम करत आहेत.”

तर दुसरीकडे, राजस्थान भाजपचे नेते राजेंद्र राठोड यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ‘कॉमेडी सर्कस’ म्हणत टीका केली. ते म्हणाले, “अशोक गेहलोत सरकारच्या काळात झालेल्या पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत गप्प राहणारे लोक आता मगरीचे अश्रू ढाळत आहेत.”

भाजपने काँग्रेसवर टीका करत या कार्यक्रमाला 'नीटवरील नौटंकी' आणि 'कॉमेडी सर्कस' असं म्हटलं आहे.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

राहुल गांधी कोटा येथे कार्यक्रमाला येण्यापूर्वी त्यांचे पोस्टर्स काढले जात असल्याचा एक व्हीडिओही समोर आला होता.

भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देताना राजस्थान काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते टीकाराम जुली म्हणाले, “भाजप अपयशी ठरत आहे. राहुल गांधींच्या विद्यार्थी संवाद कार्यक्रमामुळे ते अस्वस्थ झाले आहेत, त्यामुळेच ते अशा प्रकारची वक्तव्यं करत आहेत. भाजपने दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, पण आज बेरोजगारीचा दर गेल्या 45 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.”

टीकाराम जुली म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पेपरफुटी रोखण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यांच्या सरकारच्या काळातच 80 हून अधिक पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत.”

हा कार्यक्रम तरुणांचे भविष्य वाचवण्याची लढाई असल्याचे काँग्रेसने म्हटलं आहे.

“कोटाच्या भूमीतून तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठीची लढाई नव्या जोमाने सुरू झाली आहे,” असं गोविंद सिंह म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC