Home LATEST NEWS ताजी बातमी महिलेवर सामूहिक बलात्कार, डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला लाकडाचा तुकडा; बेगूसराय प्रकरणात आतापर्यंत...

महिलेवर सामूहिक बलात्कार, डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला लाकडाचा तुकडा; बेगूसराय प्रकरणात आतापर्यंत काय समोर आले?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

महिलेवर अमानुष अत्याचार, डॉक्टरांनी प्रायव्हेट पार्टमधून काढला लाकडाचा तुकडा; बेगूसराय प्रकरणात आतापर्यंत काय समोर आले?

फोटो स्रोत, Shahnawaz Ahmad/BBC

(महत्त्वाची सूचनाः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतील)

सोमा (नाव बदललेलं आहे) रुग्णालयातील बेडवर पडून आहे आणि अधूनमधून दचकून ती उठते. पत्रकार, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सतत भेटायला येत असल्याने तिची झोपही वारंवार मोडते.

शेजारच्या बेडवर उपचार घेत असलेल्या महिला रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सोमाकडे कधी कुतूहलाने तर कधी सहानुभूतीने पाहताना दिसतात.

सोमाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेली महिला पोलीस कर्मचारी सोमाला विश्रांती मिळत नसल्याने त्रस्त आहे. परंतु, सोमाला आपल्या मुलांचीच जास्त काळजी वाटते. तिची मुलं अनेक किलोमीटर दूर गावात नातेवाईकांकडे राहत आहेत.

डॉक्टरांनी सोमाच्या प्रायव्हेट पार्ट (गुप्तांग) मधून सुमारे चार इंच लांबीचा लाकडाचा तुकडा काढला आहे. सामूहिक बलात्कारानंतर हा तुकडा तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला होता, असा आरोप आहे.

सोमाने बंदुकीची रिकामी गोळी (स्थानिक भाषेत त्याला खोखा म्हणतात. गोळीचे रिकामे काडतूस) दाखवली. तिच्या म्हणण्यानुसार तेही तिच्या प्रायव्हेट पार्टमधून बाहेर काढण्यात आले होते.

बेगूसरायचे पोलीस अधीक्षक (एसपी) मनीष यांनी बीबीसीला सांगितलं की, “वैद्यकीय अहवालातून लैंगिक अत्याचार (सेक्सुअल असॉल्ट) झाल्याची पुष्टी मिळते. या प्रकरणात बीएनएस कलम 70(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तीन जणांची नावे समोर आली आहेत, तर दोन आरोपींची ओळख अद्याप पटलेली नाही. या सर्वांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.”

“या प्रकरणातील नितीश महतो आणि अमर निषाद या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली असून या पथकाकडून छापेमारी सुरू आहे. तसेच, पोलिसांना मिळालेल्या पुराव्यांची तपासणीही सुरू आहे.”

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सोमानं सांगितलं की ही घटना 11 जून ला रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. महिला आणि तिचे पती जिथे राहतात ते एक खोलीचं घर आहे. त्या घराला कुंपण नाहीये. खोलीबाहेर टॉयलेट आहे आणि त्या टॉयलेटला दरवाजा नाहीये.

19 जून रोजी बीबीसी हिंदीने वृत्त प्रकाशित केले त्यानुसार महिलेचा नवरा ज्या खोलीत झोपला होता ती बाहेरून बंद करण्यात आली. सदर महिला टॉयलेटमधून बाहेर आल्यावर त्याच ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.

सोमाने बीबीसीला सांगितलं की, “गावातीलच रामू महतो, सूरज महतो आणि नितीश महतो घरात आले आणि त्यांनी माझी साडी काढून माझं तोंड बंद केलं. माझा ब्लाऊज फाडून त्यांनी माझे हात बांधले. त्यांनी माझ्यावर अत्याचार करण्यास सुरूवात केली. माझ्या छातीवर त्यांनी ब्लेडने वार केले आणि माझ्यावर बलात्कार केला.”

“मी वेदनेने कळवळत असल्याचा आवाज ऐकून सुरुवातीला माझ्या पतीला तो मांजराचा आवाज वाटला. त्यांनी दोनदा आवाज देऊन हटकण्याचा प्रयत्न केला, पण नंतर त्यांना संशय आला.”

“त्यांनी बाहर येण्यासाठी खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो बाहेरून बंद असल्याचे दिसलं. त्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडल्यावर माझे पती बाहेर आले. जेव्हा या सर्वांनी माझी स्थिती पाहिली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.”

Caption- सोमा आणि तिचे कुटुंब एका खोलीच्या घरात राहतात. घराभोवती कुंपण नाही आणि शौचालयाला दरवाजाऐवजी फक्त पडदा लावलेला आहे.

फोटो स्रोत, Shahnawaz Ahmad/BBC

सर्व संशयित आरोपी सोमाच्या घरापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर राहतात.

सोमाचा पती ई-रिक्षा चालवतो. पत्नीची गंभीर अवस्था पाहिल्यानंतर त्याने सोमाला ई-रिक्षातून जवळच्या पोलीस ठाण्यात नेले. हे पोलीस ठाणे त्यांच्या घरापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे.

सोमाचा आरोप आहे की, “पोलीस ठाण्यातून आम्हाला हकलण्यात आलं. आधी मला उपचार करून घे असं त्यांनी सांगितलं.”

आपल्या पतीकडे पोलीस ठाण्यातील व्हीडिओ असल्याचा दावा तिने केला आहे.

या प्रकरणात निष्काळजीपणा, उदासीनता आणि असंवेदनशील वागणूक दिल्याचा ठपका ठेवत बेगूसराय पोलिसांनी ठाणे प्रमुख (एसएचओ-स्टेशन हाऊस ऑफिसर) राजीव कुमार यांना निलंबित केलं आहे.

उपचारासाठी तीन ठिकाणी जावं लागलं

सोमाच्या पतीने सांगितलं की, पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सोमाला ई-रिक्षातून जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेलं. त्यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील काही सदस्यही होते. परंतु, त्या रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला.

याबाबत बीबीसीने रुग्णालयातील कर्मचाऱ्याला विचारलं असता त्यांनी सांगितलं की, “महिला टोटोमधून (ई-रिक्षा) आली होती आणि तिची प्रकृती गंभीर होती. आमच्या रुग्णालयात आपत्कालीन रुग्णांवर उपचार केले जात नाहीत. त्यावेळी डॉक्टरही उपस्थित नव्हते, त्यामुळे आम्ही उपचार तिच्यावर करण्यास नकार दिला.”

यानंतर कुटुंबीयांनी महिलेला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं. 11 जूनच्या रात्री तेथे आयुष वैद्यकीय अधिकारी कविता कुमारी या कामावर होत्या.

कविता कुमारी यांनी बीबीसीला सांगितलं की, “महिला बेशुद्धावस्थेत होती. ती बोलण्याच्याही स्थितीत नव्हती आणि तिच्यासोबत आलेल्या महिलांनीही काही माहिती दिली नाही. त्यांनी तिची छाती आणि पाय दाखवले. त्यावर ओरखड्यांच्या खुणा दिसत होत्या. त्यामुळे पुढील उपचारांसाठी मी तिला सदर रुग्णालयात पाठवलं.”

त्यानंतर सोमावर सदर रुग्णालयात उपचार करण्यात आले. सोमाच्या म्हणण्यानुसार, 12 जून रोजी सकाळी सुमारे 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान ती शुद्धीवर आली. त्यानंतर तिने आपल्या पतीला तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती दिली.

डॉक्टरांनी पोलिसांना माहिती का दिली नाही?

ज्या सामुदायिक आरोग्य केंद्रात सोमावर सर्वप्रथम उपचार झाले, तेथील नोंदीमध्ये तिच्या प्रकरणाचा उल्लेख ‘फिजिकल असॉल्ट’ म्हणजेच शारीरिक हल्ला असा करण्यात आला आहे.

 बेगूसरायचे सिव्हिल सर्जन अशोक कुमार यांनी बीबीसीला सांगितलं  की, ती महिला पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात आली होती. 13 जून रोजी तिने आपल्यासोबत झालेल्या हिंसाचाराची माहिती दिली.

फोटो स्रोत, Shahnawaz Ahmad/BBC

याची माहिती पोलिसांना दिली होती का?

या प्रश्नावर कविता कुमारी म्हणाल्या की, “महिलेला रक्तस्राव होत नव्हता आणि वरवर पाहता हे बलात्कार किंवा दुष्कर्माचं प्रकरण वाटत नव्हतं. त्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली नाही.”

सदर रुग्णालयाने याची माहिती पोलिसांना दिली होती का?

यावर बेगूसरायचे सिव्हिल सर्जन अशोक कुमार बीबीसीला म्हणाले की, “महिला रुग्णालयात आली तेव्हा तिने पोटदुखीची तक्रार केली होती. त्या वेळी तिने त्या घटनेबद्दल (सामूहिक बलात्कार) काहीही सांगितलं नव्हते. 13 जून रोजी तिने या सामूहिक बलात्काराची माहिती दिल्यानंतर डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली.”

या प्रकरणात एफआयआर 13 जून रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. परंतु, सोमाचं कुटुंबीय घटनेनंतर लगेचच पोलीस ठाण्यात गेलं होतं.

मात्र, सोमाने बीबीसीला सांगितलं की, ’12 जून रोजी उपचारादरम्यान डॉक्टरांनी इंजेक्शन देताना तिच्यावर बलात्कार झाला का, असं विचारलं होतं. त्यावर मी होय, मॅडम माझ्यावर बलात्कार झाला आहे, असं सांगत होते.’

अशा प्रकरणांमध्ये रुग्णालयांची जबाबदारी काय असते?

यावर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बिहार शाखेचे अध्यक्ष आशुतोष शरण यांनी बीबीसीला सांगितलं की, “शारीरिक हल्ला किती गंभीर आहे यावर हे अवलंबून असतं. प्रत्येक घटनेची पोलिसांना माहिती दिली जात नाही.”

“परंतु, परिस्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांना वाटल्यास पोलिसांना कळवणं आवश्यक असते. विशेषतः महिला रुग्णांच्या बाबतीत ही जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरते.”

वारंवार बेशुद्ध पडणारी सोमा, पोटातील जळजळीने त्रस्त

सदर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर 13 जूनच्या रात्री सोमा आपल्या घरी परतली.

सोमाच्या पतीने बीबीसीला सांगितलं की, “घरी परतल्यानंतर 14 जूनच्या सकाळी सोमा बेशुद्ध पडली. ती सतत खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगत होती, पण पोलिसांनी सदर रुग्णालयात जाण्यास सांगितलं.”

“तेथे उपचार घेतल्यानंतर 15 जून रोजी तिला पुन्हा घरी आणलं. पण, त्यानंतरही ती वारंवार बेशुद्ध पडत होती आणि दिवसभर झोपून राहत असत. तसेच पोटात कालवल्यासारखं होतं आणि जळजळ होत असल्याची तक्रार करत होती.”

“गावातील सुईणीने (बाळंतपण करणारी महिला) तिच्या पोटाला स्पर्श करून तपासलं आणि पोटात काहीतरी असल्याचं सांगितलं. त्यानंतर 18 जूनच्या सकाळी सोमा एक गोळी घेऊन आली आणि ते आपल्या प्रायव्हेट पार्टमधून बाहेर पडल्याचे तिने सांगितले. आम्ही पाहिलं असता ती एक गोळी होती.”

सोमा आणि तिचा पती ही गोळी घेऊन पुन्हा सदर रूग्णालयात गेले.

सिव्हिल सर्जन अशोक कुमार यांनी सांगितलं की, “ती एका रिकाम्या गोळीची पुंगळी होती. त्यानंतर आम्ही महिलेची पुन्हा तपासणी केली. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमधून सुमारे 3 ते 4 इंच लांबीचा लाकडाचा तुकडा काढला. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून ती हळूहळू बरी होत आहे.”

मार्चमध्येही झाला होता लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

11 जूनच्या रात्री घडलेल्या या प्रकरणात रामू महतो, सूरज महतो आणि नितीश महतो या तिघांची आरोपी म्हणून नावे समोर आली आहेत.

रामू महतो हा सोमाच्या घरासमोरच राहतो. सोमाचा आरोप आहे की, 12 मार्च 2026 रोजी रामू महतो आणि त्याचा भाऊ प्रदीप महतो यांनीही तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी 3 मे रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल नोंदवण्यात आला होता.

एफआयआरमध्ये म्हटल्याप्रमाणे, “रामू आणि प्रदीप महतो यांनी मारहाण व लुटमार केली तसेच तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही”.”

या प्रकरणात इतर कलमांसह बीएनएसच्या कलम 76 अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीएनएसचे कलम 76 हे एखाद्या महिलेला कपडे काढण्यास किंवा नग्न होण्यास भाग पाडण्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्याशी संबंधित आहे. या प्रकरणात रामू आणि प्रदीप महतो यांना पोलीस ठाण्यातच जामीन मिळाला होता.

Caption- बेगूसराय परिक्षेत्राचे डीआयजी शैलेश कुमार सिन्हा यांनी मार्च महिन्यातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचे आरोप फेटाळले आहेत.

फोटो स्रोत, Shahnawaz Ahmad/BBC

या प्रकरणाचे तपास अधिकारी अभिराम कुमार झा यांनी बीबीसीला सांगितलं की, “या गुन्ह्यासाठी कमाल 3 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याने रामू आणि प्रदीप यांना जामीन मिळाला होता.”

पण, सोमाने बीबीसीशी बोलताना आरोप केला की, “यापूर्वीही या लोकांनी माझ्यावर बलात्कार केला होता. आम्ही वारंवार बलात्काराची नोंद करण्याची मागणी केली, पण लुटमारीचा उल्लेख करण्यात आला.”

“आम्ही अशिक्षित असल्याने हे लक्षात आलं नाही. नंतर आम्ही दुसऱ्याकडून अर्ज वाचून घेतल्यानंतर आम्हाला समजलं की त्यात लूटमार असा उल्लेख होता. आरोपींना पोलीस ठाण्यातूनच जामीन मिळाल्याने त्यांचे धाडस वाढले. पोलिसांनी आधीच योग्य कारवाई केली असती, तर ही घटना घडली नसती.”

बीबीसीशी बोलताना बेगूसराय परिक्षेत्राचे डीआयजी शैलेश कुमार सिन्हा यांनी मार्च महिन्यात घडलेल्या त्या प्रकरणात पोलिसांकडून कोणताही निष्काळजीपणा झाल्याचे नाकारले.

ते म्हणाले की, “मार्चमध्ये घडलेल्या घटनेबाबत दाखल अर्जानुसारच कलमे लावण्यात आली होती आणि त्याच आधारे ठाणे प्रमुखांनी कारवाई केली. परंतु, 11 जूनच्या प्रकरणात ठाणे प्रमुखांनी निष्काळजीपणा केला, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.”

आधीपासूनच काही वाद होता का?

सोमाच्या गावात बहुतांश लोक एकाच समाजातील आहेत. या गावात दहावी पास झालेले लोकही खूपच कमी आहेत आणि कोणालाही सरकारी नोकरी नाही. येथील लोक मजुरी करून किंवा इतर छोटी-मोठी कामं करून आपला उदरनिर्वाह करतात.

सोमा आणि तिची बहीण एकाच गावात राहतात. सोमाच्या बहिणीने बीबीसीला सांगितलं की, “त्यांच्या कुटुंबाचा कोणाशीही वाद नाही. ना जमिनीचा वाद ना कोणाचं कर्ज. कधी भांडणही झालेलं नाही. तरीही असं का घडले, हे फक्त ते लोकच सांगू शकतात.”

परंतु, गावातील एका माजी लोकप्रतिनिधीने बीबीसीला सांगितलं की, “सोमा कोणालाही घाबरत नाही. तिला एखादी गोष्ट चुकीची वाटली तर ती स्पष्टपणे विरोध करायची. या वादाचं कारण हेच असू शकतं.”

त्यांचा दावा आहे की, “आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, तर सोमाचं कुटुंब प्रामाणिकपणे काम करून उदरनिर्वाह करणारं आहे.”

बेगूसराय पोलिसांनी रविवारी अटक केलेल्या नितीश महतो आणि अमर निषाद या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, हे दोघेही गावात ‘आपला दबदबा राहावा यासाठी देशी कट्टा आणि गोळ्या बाळगत होते’.

सोमाच्या कुटुंबाचा कोणाशीही, कोणताही वाद नाही आणि त्यांचं कधी भांडणही झालेलं नाही.

फोटो स्रोत, Shahnawaz Ahmad/BBC

या घटनेनंतर सोमाच्या गावात दहशतीचे वातावरण आहे.

“आम्ही आता कोयता घेऊनच झोपतो,” असं गावातील एका महिलेनं बीबीसीला सांगितलं.

प्रायव्हेट पार्टमध्ये बंदुकीची गोळी

या संपूर्ण घटनेतील महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात बुलेट किंवा बाहेरची वस्तू इतके दिवस राहू शकते का? याबाबत डॉक्टरांमध्ये मतभेद आहेत.

बेगूसरायचे सिव्हिल सर्जन अशोक कुमार म्हणतात की, “कोणतीही परकीय वस्तू शरीरात इतके दिवस राहू शकत नाही. व्यक्ती चालत-फिरत असेल तर ती बाहेर पडण्याची शक्यता असते. जर ती इतके दिवस आत राहिली, तर शरीरात संसर्ग होऊन सेप्टिसीमियासारखी जीवघेणी स्थिती निर्माण होऊ शकते.”

बुलेट म्हणजे बंदुकीच्या गोळीबाबतच्या प्रश्नावर आयएमएचे आशुतोष शरण म्हणतात की, “बुलेट हा सर्वांत सुरक्षित धातू आहे. सोन्याची तस्करी करणारे लोक सोनं प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणतात आणि त्यांना त्याची कोणतीही अडचण जाणवत नाही. त्यामुळे शरीरात बुलेट असल्याने जीवाला धोका निर्माण होत नाही.”

एप्रिलमध्ये सत्ता स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी विविध व्यासपीठांवर महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका सांगत आले आहेत.

मात्र सोमाबरोबर घडलेल्या या घटनेमुळे पोलीस व्यवस्थेतील सर्वात प्राथमिक स्तरावरील म्हणजेच पोलीस ठाण्याच्या कामकाजावर आणि महिला हिंसाचाराबाबत त्यांच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे बिहारचा अशा राज्यांमध्ये समावेश आहे ज्या राज्यात पोलीस दलात महिलांचे प्रतिनिधित्व सर्वांत अधिक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

SOURCE : BBC