Home LATEST NEWS ताजी बातमी अँडी बर्नहॅम : ‘किंग ऑफ द नॉर्थ’, ज्यांना बनायचंय युकेचे पुढचे पंतप्रधान

अँडी बर्नहॅम : ‘किंग ऑफ द नॉर्थ’, ज्यांना बनायचंय युकेचे पुढचे पंतप्रधान

3
0

Source :- BBC INDIA NEWS

बर्नहॅम यांनी मेकरफील्ड पोटनिवडणुकीत उजव्या विचारसरणीच्या रिफॉर्म यूके पक्षाचा पराभव केला होता.

फोटो स्रोत, Darren Staples / AFP via Getty Images

अँडी बर्नहॅम यांची लेबर पार्टीचे नेते होण्याची इच्छा नवीन नव्हती. 10 वर्षांपूर्वी त्यांनी दोनदा पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांना यश मिळालेलं नव्हतं.

आता अनेक लेबर खासदार त्यांना पक्षाला पुन्हा मजबूत करण्यासाठीचे सर्वात योग्य पर्याय मानत आहेत.

हा पक्ष अनेक महिन्यांपासून जनमत चाचण्यांमध्ये मागे पडत होता. मे महिन्यात झालेल्या निवडणुकांमध्येही पक्षाला मोठा फटका बसला होता.

मेकरफील्ड पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी उजव्या विचारसरणीच्या ‘रिफॉर्म यूके’ पक्षाचा पराभव केला. रिफॉर्म यूके दुसऱ्या स्थानावर राहिला.

या विजयाबरोबरच ग्रेटर मँचेस्टरचे माजी महापौर असलेल्या या नेत्याने लेबर पक्षाचा मतांचा वाटा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील 45 टक्क्यांवरून सुमारे 55 टक्क्यांपर्यंत वाढवला.

आकडेवारीचा विचार न करता पुढे पाहिल्यास, बर्नहॅम यांच्या विजयामुळे नेतृत्वाच्या संभाव्य शर्यतीतील त्यांच्यासमोरील एक मोठा अडथळाही दूर झाला आहे, कारण पक्षाच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खासदार असणे आवश्यक आहे.

मतदानापूर्वी बर्नहॅम यांनी म्हटलं होतं की, जर ते मेकरफील्डमध्ये विजयी झाले तर पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांना आव्हान देण्यासाठी ते कोणत्याही संभाव्य नेतृत्व निवडणुकीत ते उतरतील.

फुटबॉल आणि संगीताचे चाहते

1970 मध्ये लिव्हरपूलमध्ये जन्मलेले बर्नहम यांचं बालपण वॉरिंग्टनजवळील एका गावात गेलं.

त्यांचे वडील ब्रिटिश टेलिकॉममध्ये इंजिनिअर होते आणि आई रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. ते दोघेही लेबर पार्टीचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे बर्नहॅम यांनाही लहान वयातच राजकारणात रस निर्माण झाला होता.

यापूर्वी बर्नहॅम यांनी सांगितलं की, वयाच्या 14 व्या वर्षी बीबीसीचा ‘बॉयज फ्रॉम द ब्लॅकस्टफ’ पाहून त्यांना लेबर पार्टीमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. हा कार्यक्रम लिव्हरपूलमध्ये बेरोजगारी भत्ता घेणाऱ्या लोकांच्या जीवनावर आधारित होता.

27 सप्टेंबर 2009 रोजी इंग्लंडच्या ब्राइटन येथे लेबर पार्टीच्या खासदारांमध्ये आणि प्रेस लॉबीमध्ये झालेल्या वार्षिक फुटबॉल सामन्यादरम्यान अँडी बर्नहॅम.

फोटो स्रोत, The FA via Getty Images

एव्हर्टन क्लबचे आजीवन समर्थक असलेले बर्नहॅम यांची ओळख मित्रमंडळींमध्ये खेळाची प्रचंड आवड असलेल्या आणि स्पर्धात्मक वृत्तीच्या मुलाच्या रूपात होती. ते लँकशायर स्कूलबॉय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाजही होते.

रोमन कॅथलिक शाळेतील त्यांच्या इंग्रजी शिक्षकांना आजही आठवतं की, बर्नहॅम यांनी मॉक निवडणुकीत लेबर पक्षाचे उमेदवार म्हणून भाग घेतला होता आणि मोठ्या फरकाने त्यांनी विजय मिळवला होता.

बर्नहॅम आणि त्यांचे दोन भाऊ त्यांच्या कुटुंबातील कॉलेजमध्ये जाणारे पहिले सदस्य होते. अँडी यांनी केम्ब्रिज विद्यापीठात इंग्रजी विषयाचं शिक्षण घेतलं.

आपल्या ‘हेड नॉर्थ’ या पुस्तकात बर्नहॅम यांनी लिहिलं आहे की, विद्यापीठात त्यांना तिथे स्वतःला सामावून घेणं कठीण जात होतं. त्यांना स्वतःला ‘बाहेरचा माणूस’ असल्यासारखं वाटत होतं.

संगीतप्रेमी बर्नहॅम हे ‘द स्मिथ्स’ आणि ‘द स्टोन रोजेस’ यांसारख्या इंडी बँडचे चाहते आहेत. त्यांनी एकदा सांगितले होतं की, “मॅँचेस्टरच्या संगीतावरील वाढत्या आवडीमुळे त्यांना स्वतःची एक ओळख मिळाली.”

खासदार ते ग्रेटर मँचेस्टरचे महापौर

पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांनी टँक वर्ल्ड आणि पॅसेंजर वर्ल्ड मॅनेजमेंट यांसारख्या व्यापारी मासिकांसाठी काम केलं.

वयाच्या विशीतच त्यांना राजकारणात पहिली संधी मिळाली. त्यांनी दिवंगत टेसा जोवेल यांच्यासाठी संशोधक म्हणून काम केलं. त्यावेळी त्या डुलविच आणि वेस्ट नॉर्वूडच्या खासदार होत्या. नंतर जोवेल या टोनी ब्लेअर आणि गॉर्डन ब्राउन यांच्या सरकारमध्येही मंत्री होत्या.

नंतरच्या काळात वेस्टमिन्स्टरमधील राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त करूनही बर्नहॅम यांनी वेगाने राजकीय प्रगती केली. ते संस्कृती सचिव ख्रिस स्मिथ यांचे विशेष सल्लागार झाले. नंतर 2001 मध्ये आपल्या मूळ ग्रेटर मॅँचेस्टरमधील ली मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले.

त्यांनी सर्वात आधी ब्लेअर सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केलं, त्यानंतर ब्राउन सरकारमध्ये ते संस्कृती आणि आरोग्य मंत्री झाले.

सांस्कृतिक, माध्यम आणि क्रीडा मंत्री म्हणून काम करत असताना, हिल्सबरो दुर्घटनेच्या 20व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बर्नहॅम यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली होती.

1989 मध्ये स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत लिव्हरपूलचे 97 चाहते मृत्युमुखी पडले होते.

पदवी पूर्ण केल्यानंतर बर्नहॅम यांनी पत्रकारितेतून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

फोटो स्रोत, Getty Images

या घटनेनंतर बर्नहॅम यांनी हा मुद्दा मंत्रिमंडळात उपस्थित केला. ज्यामुळे या दुर्घटनेची दुसरी चौकशी सुरू होण्यास मदत झाली.

2010 च्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबरचा पराभव झाल्यानंतर गॉर्डन ब्राउन यांनी राजीनामा दिला आणि बर्नहॅम पक्षाच्या नेतेपदाच्या शर्यतीत उतरले.

ते पाच उमेदवारांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिले आणि एड मिलिबँड यांच्याकडून पराभूत झाले. परंतु, पुढील पाच वर्षे त्यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आपली पकड मजबूत केली.

2015 मध्ये त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण या वेळी जेरेमी कॉर्बिन यांनी त्यांचा पराभव केला.

बर्नहॅम यांच्या टीकाकारांचं म्हणणं आहे की, ते परिस्थितीनुसार आपली भूमिका बदलतात, जेणेकरून त्यांना राजकारणात यश मिळावं.

ब्रेक्झिट जनमत संग्रहाच्या वेळी ते युरोपियन युनियनमध्ये राहण्याच्या बाजूने होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ब्रिटन पुन्हा युरोपियन युनियनमध्ये सामील झालेला पाहायला त्यांना आवडेल, असंही म्हटलं होतं.

त्यांना पक्षातील ब्लेअर समर्थक मध्य-उजव्या विचारसरणीच्या गटाशी संबंधित मानलं जात होतं. काळानुसार बर्नहॅम यांचे विचार अधिक डाव्या बाजूकडे झुकले. त्यांनी पाणी आणि ऊर्जा सेवांचे राष्ट्रीयीकरण करण्याचं समर्थन केलं.

2016 मध्ये कॉर्बिन यांच्या नेतृत्वाविरोधात राजीनामा देणाऱ्यांमध्ये ते नव्हते. त्याऐवजी 2017 मध्ये त्यांनी ग्रेटर मॅँचेस्टरचे पहिले महापौर होण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

बर्नहॅम यांनी 60 टक्क्यांहून अधिक मते मिळवून निवडणूक जिंकली आणि 2021 मध्ये त्याहूनही मोठ्या फरकाने त्यांची फेरनिवड झाली.

‘बी नेटवर्क’ आणि लॉकडाऊनवरील वाद

महापौर म्हणून त्यांनी त्यांच्या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल केल्याबद्दल त्यांचं मोठं कौतुक झालं होतं.

त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रेटर मॅँचेस्टर लंडनबाहेरील पहिला असा भाग बनला, जिथे बस सेवा पुन्हा सार्वजनिक नियंत्रणाखाली आणली गेली आणि ‘बी नेटवर्क’ या ब्रँडखाली इतर वाहतूक सेवांशी जोडली गेली.

त्यांच्या इतर प्रमुख आश्वासनांपैकी एक म्हणजे 2020 पर्यंत ग्रेटर मँचेस्टरमधील बेघर लोकांची समस्या संपवणं. परंतु, त्यांचं हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलं नाही.

कोरोना महामारीच्या काळात त्यांची ख्याती आणखी वाढली. प्रादेशिक लॉकडाऊन निर्बंधांबाबत त्यांनी कन्झर्व्हेटिव्ह सरकारवर उत्तर इंग्लंडमधील लोकांशी ‘तिरस्कारपूर्ण वागणूक’ दिल्याचा आरोप केला होता.

या संघर्षानंतर त्यांना ‘किंग ऑफ द नॉर्थ’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

महापौर म्हणून बर्नहॅम यांनी आपल्या यशांपैकी एक म्हणून 'बी नेटवर्क'चं कौतुक केलं आहे.

फोटो स्रोत, PA Media

2025 मधील लेबर पार्टीच्या अधिवेशनापर्यंत बर्नहॅम हे सर्वोच्च पदासाठी सक्रिय असल्याचे दिसत होते. त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाच्या शर्यतीत उतरण्याची शक्यताही नाकारली नव्हती.

जानेवारीमध्ये बर्नहॅम यांना पुन्हा संसदेत परतण्याची एक संधी मिळाली. ग्रेटर मॅँचेस्टरचे खासदार अँड्र्यू ग्विन यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. परंतु, पंतप्रधानांच्या मंजुरीनंतर लेबर पक्षाच्या निर्णय घेणाऱ्या समितीने बर्नहॅम यांना ही निवडणूक लढवण्यापासून रोखलं.

मात्र, मे महिन्यापर्यंत परिस्थिती बदलली होती. इंग्लंड, स्कॉटलंड आणि वेल्समधील निवडणुकांमध्ये लेबर पक्षाची कामगिरी कमकुवत राहिली, तर रिफॉर्म यूकेला जनमत चाचण्यांमध्ये आघाडी मिळत होती. बर्नहॅम यांच्या भागातही या पक्षाला यश मिळालं होतं.

सर कीअर स्टार्मर यांच्या भवितव्याबाबत दबाव वाढू लागला होता. काही खासदार नेतृत्व बदलाची मागणी करत होते, तर काही मंत्र्यांनी राजीनामेही दिले. त्यानंतर जोश सिमन्स यांनी बर्नहॅम यांना पुन्हा संसदेत परतण्याची संधी मिळावी म्हणून मेकरफिल्ड मतदारसंघातील लेबर खासदारपद सोडण्याची घोषणा केली.

यानंतर बर्नहॅम यांची त्या मतदारसंघातून लेबर पक्षाचे उमेदवार म्हणून निवड झाली आणि पुढच्याच महिन्यात त्यांनी पुन्हा वेस्टमिन्स्टरमध्ये (संसदेत) पुनरागमन केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC