Home LATEST NEWS ताजी बातमी प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला संपवल्याचा आरोप, लोहगड प्रकरणावर पोलिसांनी काय सांगितलं?

प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला संपवल्याचा आरोप, लोहगड प्रकरणावर पोलिसांनी काय सांगितलं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, लोहगड किल्ल्यावर घडला असा थरार

फोटो स्रोत, UGC

ज्याच्याशी लग्न ठरले त्याच मुलाची लोहगड किल्ल्यावरुन ढकलून देऊन हत्या करण्याच्या आरोपात तरुणीला अटक झाली आहे. त्याच बरोबर तिचा प्रियकर देखील अटकेत असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली.

होणाऱ्या नवऱ्याला प्रियकराच्या मदतीने किल्ल्यावरुन ढकलून अपघाताचा बनाव करण्या प्रकरणी संबंधित तरुण आणि तरुणीला अटक झाल्याचे पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मृत तरुणाचे नाव केतन अग्रवाल आहे. तर त्याच्या हत्येच्या आरोपात त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

होणारा नवरा आणि आपण फिरायला लोहगडला गेलो. त्या ठिकाणी त्याचा घसरून पडून मृत्यू झाला असे या तरुणीने पोलिसांना सांगितले होते. पण तपासात संबंधित तरुणीच्या प्रियकराबद्दलची माहिती समोर आली. त्यातून जुने प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना कळले आणि त्यांनी नंतर या प्रकरणाची नोंद हत्या म्हणून केली.

या प्रकरणात पोलिसांनी नेमके काय सांगितले हे आपण पाहू.

संशय निर्माण झाल्यावर पोलिसांनी चौकशी केली, त्यात दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आरोपी, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या वकिलांची बाजू घेण्याचा बीबीसी मराठीने प्रयत्न केला. अद्याप त्यांची बाजू मिळू शकली नाही. ती मिळाल्यावर अपडेट करण्यात येईल.

तरुणीला मान्य नव्हते लग्न?

पुण्यातील मावळ तालुक्यातील गहुंजे येथील केतन अगरवाल याचं पुण्याच्या मार्केट यार्डमधील सिया गोयल नावाच्या तरुणीबरोबर काही महिन्यांपूर्वी लग्न ठरलं होतं.

तिन्ही कुटुंबीयांचे मार्केट यार्ड परिसरात वेगवेगळे व्यवसाय असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

केतन आणि सिया यांची फेब्रुवारीमध्येच एंगेजमेंटही झाली होती. तर एक-दोन महिन्यांत लग्न होणार होते.

पण सियाचे कोंढवामधील चेतन चौधरी नावाच्या तरुणाबरोबर लग्न ठरण्याच्या आधीपासून प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे.

प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, लोहगड किल्ल्यावर घडला असा थरार

चेतनबरोबर प्रेमसंबंध असल्यानं सियाला केतनबरोबर ठरलेला विवाह मान्य नव्हता. त्यामुळं लग्न करायला लागू नये म्हणून सिया आणि चेतन यांनी दोघांनी मिळून केतनची हत्या करायचं ठरवलं, असा आरोप आहे.

ही हत्या अपघात वाटावी, यासाठी या दोघांनी कट रचून केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली, असा आरोप आहे.

अशी घडवून आणली हत्या?

केतन आणि सिया यांचं लग्न ठरलेलं होतं. त्यामुळं चेतनच्या साथीनं कट रचत सियानं फिरण्यासाठी म्हणून केतनला 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर नेलं होतं.

पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि केतन सुरुवातीला लोहगड किल्ल्यावर गेले होते.

त्यानंतर काहीवेळाने सियाचा प्रियकर चेतन त्यांच्या मागून त्याठिकाणी गेला. त्यानं मागून जात त्याला कड्यावरून खाली ढकललं त्यामुळं किल्ल्याच्या पश्चिम बाजूला तो खाली पडला आणि जखमी झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, लोहगड किल्ल्यावर घडला असा थरार

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर सियानं आरडा ओरडा केला आणि त्यामुळं त्याठिकाणी असलेल्या सुरक्षारक्षकांनी तिथं येत मदत केली. त्यावेळी किल्ल्याच्या पश्चिम बाजुला असलेल्या झुडपांमध्ये केतनचा मृतदेह आढळून आला होता.

घटनेनंतर सिया गोयलनं पोलिसांना, “किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरला आणि तो खोल दरीत पडला”, असं सांगितलं होतं.

त्यामुळं सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची अकस्मिक मृत्यू अशी नोंद केली होती.

तपासातून पोलिसांना आला संशय

पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्यानंतर जेव्हा तपास म्हणून जबाब घ्यायला सुरुवात केली तेव्हा पोलिसांना या तपासात काही संशयाचे धागे-दोरे आढळले.

तपासात जबाबामध्ये काही नातेवाईकांना पोलिसांना गेल्या काही दिवसांत केतन आणि सिया यांच्यात एक दोन वेळा वाद झाल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गोपनीय पद्धतीनं तपास केला.

या तपासात सियाचे काही काळापासून चेतनबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी दोन विशेष तपास पथके नियुक्त करण्यात आली.

सिया गोयल हिचे चेतन चौधरी या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली. त्यादरम्यान केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी संगनमत करून केतनचा खून केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली.

प्रियकराच्या मदतीनं तरुणीनं होणाऱ्या नवऱ्याला संपवलं, लोहगड किल्ल्यावर घडला असा थरार

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणात तांत्रिक तपास केला. त्यावेळी ही घटना घडली त्यादिवशी लोहगड किल्ल्याच्या परिसरात चेतन चौधरी उपस्थित असल्याचं समोर आलं.

त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं चेतन चौधरीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं आणि नंतर चौकशीत हत्येची धक्कादायक माहिती समोर आली.

खून केल्यानंतर सियाने अपघात असल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, असं पोलिसांनी सांगितलंय. केतन पाय घसरून तो दरीत पडल्याची माहिती तिने पोलिसांना दिली होती.

मात्र, तपासातील तांत्रिक पुरावे, घटनास्थळावरील परिस्थिती आणि आरोपींच्या हालचालींची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण कट उघडकीस आणला.

सियाला केतनबरोबर लग्न मान्य नव्हते. सिया आणि चेतन यांना केतन हा प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याचे वाटत होते, त्यामुळं त्याची हत्या करण्यात आली.

या प्रकरणी आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याचंही पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC