Source :- BBC INDIA NEWS

“माझा मुलगा कामाला गेला, तो परत आलाच नाही. आम्ही आता काय करायचं? सगळंच उद्ध्वस्त झालं आहे.”
“माझ्या मुलाचा जीव असा का घेतला? त्याने कोणाचं काय वाईट केलं होतं? आमच्या मुलाला न्याय द्या.”
हा आक्रोश ट्रेनमधील हल्ल्यात मृत्यू झालेल्या 22 वर्षीय मयंक लोहारच्या आई-वडिलांचा आहे.
मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये 23 जूनला झालेल्या एका चाकू हल्ल्यात मयंक रमेश लोहार या तरुणाचा मृत्यू झाला. एका क्षणात संपूर्ण लोहार कुटुंबाचा आधार हिरावला गेला.
मयंकच्या निधनानंतर विरार येथील त्यांच्या घरात शोककळा पसरली आहे. घरातील प्रत्येकजण अजूनही या धक्क्यातून सावरू शकलेला नाही.
आई अजूनही मुलगा कामावरून घरी येईल, या आशेने दरवाज्याकडे पाहत बसते, असं नातेवाईक सांगतात. वडिलांसह संपूर्ण कुटुंब मयंकला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहे.
ग्रॅज्युएट शिक्षण, नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी
मयंक लोहार हा 22 वर्षांचा होता. त्याने पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं होतं. अंधेरी येथील एका खासगी मॉलमध्ये तो सेल्स पर्सन म्हणून काम करत होता.
लोहार कुटुंब पूर्वी अंधेरीत रहायचं आणि आता नालासोपारा येथे वास्तव्यास आहे. दोन्ही ठिकाणी मिळून ते 30 वर्षांपासून येथे राहतात.
मयंकचं शिक्षण नालासोपारा येथेच झालं होतं. कुटुंबातील ते दुसरं अपत्य होतं. त्याच्या कुटुंबात आई-वडील, 2 भाऊ आणि 1 बहीण आहे.
फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
शिक्षणानंतर पुढील करिअरसाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी तो नियमित नोकरी करत होता. नोकरी करून तो कुटुंबाला हातभार लावत होता. मात्र, त्याच्या अचानक झालेल्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मयंकचे वडील 52 वर्षांचे असून ते ड्रायव्हरचं काम करतात. तर लहान भाऊ आणि बहीण शिक्षण घेत आहेत आणि मोठा भाऊ नोकरी करतो. एकत्रित कुटुंबात मयंक हा घराचा मोठा आधार होता, असं कुटुंबीय सांगतात.
‘आरोपीला फाशीची शिक्षा द्या’, कुटुंबाची मागणी
मयंकचे वडील रमेश लोहार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, “आरोपीला फाशीची शिक्षा द्या. मारणारा गंभीर आरोपी आहे.”
“आमच्या मुलाला मारून टाकलं आणि आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी आमची मागणी आहे.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.
पुढे रमेश लोहार म्हणाले, “लोकलचा दरवाजा सहप्रवाशांनी बंद करायला सांगितला, एवढ्याशा कारणावरून माझ्या मुलाचा जीव घेतला.”
“माझ्या मुलाने कोणाचं असं काय केलं होतं? त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी.”
सुरक्षा नसल्यामुळे माझा भाऊ वाचला नाही
मयंकची बहीण मेघा लोहार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाली, “सुरक्षा नसल्यामुळे माझा भाऊ वाचला नाही. इतके लोक होते, तरीही कोणी मदतीला आलं नाही. मोठ्या चाकूने त्याच्यावर हल्ला झाला. यात आम्ही आमचा एक जीव गमावला.”
“आरोपीला फाशीची शिक्षा किंवा आणखी कठोर शिक्षा करावी. कारण आज त्याला शिक्षा झाली नाही, तर उद्या आणखी लोकांचे मृत्यू होतील,” असंही मेघानं नमूद केलं.

लोकलमधील किरकोळ वाद जीवघेणा कसा ठरला?
23 जूनच्या रात्री काम संपवून मयंक चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यातून घरी निघाला होता.
त्या दिवशी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. डब्याचा दरवाजा उघडा असल्याने पाऊस आणि वारा आत येत होता. त्यामुळे मयंकने एका सहप्रवाशाला दरवाजा बंद करण्याची विनंती केली.

याच कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि आरोपीने धारदार चाकूने मयंकच्या पोटावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
गंभीर जखमी झालेल्या मयंकला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांचं म्हणणं काय?
धावत्या लोकल ट्रेनमध्ये मयंक लोहारची हत्या केल्यानंतर आरोपी रोशन सुवर्ण (वय 30 वर्षे) जवळपास 15 तास फरार होता.
तो बोरिवलीहून मीरा रोड आणि त्यानंतर पनवेलला गेला. बुधवारी (24 जून 2026) दुपारी त्याला पनवेलमधून अटक करण्यात आली.
रोशन हा मीरा रोडचा रहिवासी असून अंधेरी विमानतळाजवळील एका मालवाहतूक हाताळणी केंद्रात काम करत होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, त्याच कंपनीत त्याचे वडील आणि मोठा भाऊदेखील काम करतात.

प्राथमिक तपासात आरोपीने दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात चाकूने हल्ला केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास बोरिवली जीआरपी आणि इतर तपास पथकांकडून विविध बाजूंनी सुरू असल्याची माहिती बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एम. खुपेकर यांनी दिली.
एक मृत्यू आणि अनेक प्रश्न
मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. मात्र, किरकोळ कारणावरून घडलेली ही जीवघेणी घटना पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत असल्याचं लोकलने प्रवास करणारे सांगतात.

लोकलमध्ये वाद वाढू नयेत, शस्त्र घेऊन प्रवास करणाऱ्यांवर नियंत्रण कसं ठेवायचं, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत कशी मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं यानिमित्ताने पुन्हा शोधावी लागणार आहेत.
मयंक लोहारच्या कुटुंबाला आता एकच अपेक्षा आहे, त्यांच्या मुलाला न्याय मिळावा आणि पुन्हा कोणत्याही कुटुंबावर अशी वेळ येऊ नये.
पश्चिम रेल्वे प्रशासनाची प्रतिक्रिया काय?
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले, “रेल्वेमधील ही घटना दुर्दैवी आणि दुःखद आहे. आम्ही प्रवाशांच्या सुरक्षेवर कायम अधिक भर देतो. मात्र, ही दुर्दैवी घटना घडली.”
“त्यावेळी आमचे पोलीस, रेल्वे कर्मचारी आणि इमर्जन्सी स्टाफ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं. या प्रकरणाची पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अधिक तपास सुरू आहे.”
“या घटनेनंतर प्रवाशांनी घाबरण्याचं कारण नाही. रेल्वे प्रवास आणि व्यवस्था पूर्णपणे सुरक्षित आहे. प्रवासी आणि रेल्वे व्यवस्था अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं.
आरोपीचे वकील काय म्हणाले?
या प्रकरणातील आरोपी रोशन सुवर्णचे वकील सुरेंद्र लांडगे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “रोशनने सांगितल्याप्रमाणे त्यावेळी पाऊस सुरू होता आणि लोकलचं दार लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला.”
“दरम्यान, मयंकने रोशनवर हात उगारला, यात रोशनचा चष्मा खाली पडला आणि त्याच्या डोळ्याला दुखापत झाली. रोशनला चष्म्याविना धुसर दिसतं. दरम्यान, याच झटापटीतील रागातून त्याच्या हातून गुन्हा घडला.”
रोशन काय काम करतो आणि त्याने चाकू का बाळगला होता, या प्रश्नाला उत्तर देताना वकील म्हणाले की, रोशनच्या स्वत:चा व्यवसाय आहे. तो बारकोड बनविण्याचं काम करतो. मात्र, तो बॅगेत चाकू का बाळगायचा याबाबत आम्हाला अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




