Home LATEST NEWS ताजी बातमी शुक्राणू वाढवण्यासाठी अंडकोषांवर बर्फ आणि सोना बाथ? सोशल मीडिया ट्रेंडवर डॉक्टरांचा इशारा

शुक्राणू वाढवण्यासाठी अंडकोषांवर बर्फ आणि सोना बाथ? सोशल मीडिया ट्रेंडवर डॉक्टरांचा इशारा

3
0

Source :- BBC INDIA NEWS

सायमन

सायमन दररोज सकाळी लवकर उठतात. मग ते सोना बाथ म्हणजे वाफ घ्यायच्या खोलीत जातात. त्या खोलीतील उष्णतेमुळे, वाफेमुळे त्यांना घाम येतो. त्यांच्या म्हणण्यानुसार अशाप्रकारे वाफ घेतल्यामुळे त्यांना शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.

त्यामुळे त्यांच्या शुक्राणूंची कार्यक्षमता सुधारते. मात्र सायमन यांना उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त खबरदारीदेखील घ्यावी लागते.

“मी आइस पॅक वापरतो, त्याला ‘चिल नट्स’ म्हणतात. शुक्राणूंची संख्या टिकवण्यासाठी मी हा पॅक माझ्या अंडकोषांवर ठेवतो,” असं सायमन यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं.

हे सर्व शुक्राणूंची संख्या, आरोग्य सुधारण्यासाठीच्या त्यांच्या दिनचर्येचाच भाग आहे. या गोष्टीचा फायदा होतो याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नुसला तरीदेखील ते असं करतात.

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी सायमन काय करतात?

सायमन हे फ्लोरिडातील मियामी येथील 28 वर्षांचे व्हेनेझुएलन-अमेरिकन आहेत. ते दररोज उन्हात बसतात. तसंच नियमितपणे व्यायाम करतात. विषारी घटकांना टाळण्यासाठी ते मायक्रोप्लास्टिक्स काढून टाकण्यासाठी फिल्टर केलेलं पाणी पितात आणि सुती बॉक्सर शॉर्ट्स घालतात.

मात्र नजीकच्या भविष्यात मूल होऊ देण्याचा सायमन यांचा कोणताही विचार नाही. तसंच त्यांना एखादा जोडीदारदेखील नाही. त्याऐवजी शुक्राणूंची संख्या कमी असल्यास त्याचा त्यांच्या आरोग्यावर कसा विपरित परिणाम होऊ शकतो, याची त्यांना अधिक चिंता वाटते.

सायमन

“प्रजनन क्षमता कमी असल्यास त्याचा परिणाम अंत:स्त्रावी ग्रंथींच्या (एन्डोक्राईन) कार्यावर, टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर किंवा इतर हार्मोन्सवर होऊ शकतो. मला याचीच मोठी भीती वाटते,” असं ते म्हणाले.

अंत:स्त्रावी ग्रंथींच्या कार्यक्षमतेचा शुक्राणूंच्या संख्येवर परिणाम होतो. मात्र तरीदेखील प्रजनन क्षमता कमी असल्यास त्याचा अंत:स्त्रावी ग्रंथींच्या कार्यावर किंवा टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर थेट परिणाम होत नाही.

प्रजनन क्षमता वाढवण्यासंदर्भातील जगभरातील ऑनलाइन ट्रेंड

सायमनला त्यांच्या शुक्राणुंची संख्या वाढवण्यात विशेष रस आहे. जगभरात #malefertility, #semenanalysis आणि #sperm असे पुरुषांच्या प्रजननक्षमतेशी संबंधित हॅशटॅग्सना टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. तर पुरुषांच्या प्रजननक्षमतेवर लक्ष केंद्रित असलेल्या सर्वात मोठ्या सबरेडिट्सची (रेडिट या व्यासपीठावरील एका विशिष्ट विषयावर केंद्रित असलेला ऑनलाइन समुदाय) संख्या जानेवारीपासून तिप्पट झाली आहे.

जगभरातील पुरुष प्रजननक्षमता तज्ज्ञ म्हणतात की, ज्या पुरुषांना त्यांच्या वीर्याची तपासणी करून घ्यायची आहे आणि ज्यांना भविष्यातील त्यांच्या प्रजननक्षमतेबद्दल चिंता आहे, अशा पुरुषांच्या संख्येत वाढ झाली आहे.

तज्ज्ञांना वाटतं की, यामागचं एक कारण म्हणजे टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेट थेरपी (टीआरटी) आणि स्टिरॉइड्सचा वाढता वापर, तसंच पर्यावरणातील विषारी घटकांबाबतची वाढत असणारी चिंता, या सर्व गोष्टींचा प्रजननक्षमतेशी संबंधित हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो.

प्राध्यापक सुक्स मिन्हास युकेतील प्रजननक्षमता तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात की, या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचे काही फायदे आहेत तसंच काही तोटेही आहे. “पुरुषांच्या वंध्यत्वाच्या प्रश्नावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे. मात्र आपण विनाकारण याची अधिक चिंता करत आहोत का?” असं ते म्हणाले.

प्रजनन क्षमतेवर सल्ला देणारे इन्फ्लुएन्सर्स आणि औषधांचा उद्योग

प्राध्यापक पुढे म्हणाले की दरम्यान, या चिंतेचा फायदा घेण्यासाठी इन्फ्लुएन्सर्स आणि वेगवेगळ्या उत्पादनांचा एक उद्योगदेखील उदयाला आला आहे.

इतर अनेक लोकांप्रमाणेच सायमन यांनादेखील या विषयाबद्दल सर्वात आधी सोशल मीडियावरूनच माहित झालं. मात्र त्यांनी अद्याप त्यांच्या शुक्राणूंची तपासणी केलेली नाही. तसंच त्यांच्या आरोग्याबाबत चिंता वाटण्यासारखं त्यांच्याकडे कोणतंही विशेष कारण नाही.

“या गोष्टीची मला सहसा भीती वाटते. त्यामुळे मी माझी प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो,” असं ते म्हणतात.

इन्फ्लुएन्सर ब्रायन जॉन्सन यांच्या कॉन्टेंटमुळेच सायमन यांना त्यांच्या प्रजनन क्षमतेबद्दल चिंता वाटू लागली.

ब्रायन जॉन्सन

फोटो स्रोत, Getty Images

जगभरात शुक्राणूंची संख्या कमी असल्याची प्रकरणं समोर येत असतानाच, ब्रायन जॉन्सन या सिलिकॉन व्हॅलीतील एका माजी अब्जाधीशानं दावा केला आहे की त्यांच्या शुक्राणूंची संख्या सरासरीपेक्षा चार पट अधिक आहे.

ते टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी सोना आणि आइस पॅक प्रोटोकॉलसारख्या हेल्थ स्टेप्सचा पुरस्कार करतात.

जॉन्सन यांच्या कॉन्टेंटचे 60 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांचं कॉन्टेंट संभाव्य ग्राहकांना त्यांच्या ब्लूप्रिंट या वेबसाईटकडे वळवतं. या वेबसाईटवर ते सप्लिमेंट्सची विक्री करतात.

ते एकटे नाहीत. वैद्यकीय पुरावे नसताना इन्फ्लुएन्सर्सकडून प्रचारित केल्या जाणाऱ्या इतर पद्धतींमध्ये काही विशिष्ट सप्लिमेंट्स, रेड लाईट थेरपी आणि मायक्रोप्लास्टिक्स ‘शरीराबाहेर काढण्यासाठी’ रक्तदान करणं या गोष्टींचा समावेश आहे.

जगभरात जन्मदरात घट होत असल्याबाबतच्या व्यापक चर्चेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य इन्फ्लुएन्सर्सकडून हे कॉन्टेंट उदयाला आलं आहे.

शुक्राणूंच्या संख्येत घट होण्याचं जागतिक संकट

अमेरिकेचे आरोग्य सचिव आर एफ के ज्युनियर अलीकडेच ‘प्रजननक्षमतेच्या संकटा’बद्दल बोलले. त्यावेळेस त्यांनी युक्तिवाद केला की “आज किशोरवयीन मुलांमध्ये शुक्राणूंची जी संख्या आहे त्याच्या तुलनेत 1970 च्या दशकात पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या दुप्पट होती.”

किशोरवयीन मुलांमधील शुक्राणूंची संख्या 1970 च्या दशकातील पुरुषांपेक्षा कमी असल्याचं दाखवणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. मात्र पूर्वीच्या अभ्यासांच्या मोठ्या स्वरुपात करण्यात आलेल्या विश्लेषणातून असं दिसून आलं आहे की 1970 च्या दशकपासून जगभरात शुक्राणूंची संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र या विषयात आणखी संशोधनाची आवश्यकता आहे.

याचा अर्थ शुक्राणूंच्या संख्येत घट होण्यामागची कारणं आणि त्याचा एकूणच जन्मदरावरील परिणाम अद्याप स्पष्ट झालेला नाही.

ल्युक्स

दरम्यान अँड्र्यू ह्युबरमनसारख्या ‘मॅनास्फिअर’ या ऑनलाइन समुदायाशी जोडलेले किंवा त्या विचारसरणीशी काही प्रमाणात जोडलेल्या इन्फ्लुएन्सर्सनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये पुरुषांच्या शुक्राणूंच्या संख्येत घट होत असल्याच्या मुद्द्यावर चर्चा केली आहे. जो रोगन यांनी ‘लोकसंख्येच्या येऊ घातलेल्या तीव्र घसरणी’बद्दल इशारा दिला आहे.

जन्मदरात घट होण्यामागे जैविक क्षमतेव्यतिरिक्त अनेक कारणं आहेत. याचा जगभरातील दर सातपैकी एका जोडप्यावर परिणाम होतो. लोक मूल जन्माला न घालण्यामागे अनेकदा आर्थिक आणि सामाजिक कारणं असल्याचं सांगितलं जातं.

प्राध्यापक चन्ना जयसेना इम्पीरियल कॉलेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह एन्डोक्रिनोलॉजिस्ट आहेत. त्यांना वाटतं की यासंदर्भात चिंतेचं कारण असलं तरी सोशल मीडियावर जे दावे केले जात आहेत त्यात अतिशयोक्ती आहे.

“यासंदर्भात निश्चितच काही आव्हानं आहेत. मात्र यामागे नेमकी कोणती कारणं आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही,” असं ते म्हणाले.

पुढील 33 वर्षांत पुरुष त्यांची प्रजनन क्षमता गमावतील

नॅचरोपथी किंवा निसर्गोपचार तज्ज्ञ ल्युक्स हे प्रजनन दरांबद्दल इशारा देणारं कॉन्टेंट तयार करणाऱ्या हेल्थ इन्फ्लुएन्सर्सपैकी एक आहेत.

“जगभरात सर्वत्र प्रजनन क्षमता घटत असल्यामुळे आपल्याला एक महामारीसारखं संकट दिसतं आहे,” असं ते बीबीसीला म्हणाले.

त्यांनी युट्युबवरील त्यांच्या प्रेक्षकांसमोर एक दिशाभूल करणारा दावादेखील केला आहे. त्यांनी दावा केला आहे की पुढील 33 वर्षांत पुरुष त्यांची प्रजनन क्षमता गमावतील.

ते ऑनलाइन कोर्सेस विकतात, वैयक्तिक स्वरुपाचं मार्गदर्शन करतात आणि जे पुरुष टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि प्रजनन क्षमता वाढवू इच्छितात अशांना ते सप्लिमेंट्सदेखील विकतात.

त्यांचं सोशल मीडियावरील कॉन्टेंट व्हायरल झालं आहे. त्यामध्ये प्रजनन क्षमता वाढवण्याच्या काही अप्रमाणित पद्धतींचा प्रचार केला जातो.

“पुरुषांनी दिवसातून 2-3 वेळा जवळपास 10-15 मिनिटांसाठी त्यांच्या अंडरवेअरवर आइस पॅक ठेवावा, असं सल्ला मी त्यांना देतो,” असं ते म्हणाले.

प्रजनन क्षमतेसंदर्भातील इन्फ्लुएन्सर्सचे दावे

ते दावा करतात की ग्राहकांनी त्यांना सांगितलं आहे की असं केल्यानंतर त्यांच्या महिला जोडीदारांना गर्भधारणा झाली.

त्यांचे काही फॉलोअर्स तर अंडकोषांवर किंवा अगदी त्यांच्या समोर रेड लाईट म्हणजे लाल प्रकाश देणाऱ्या उपकरणांचाही वापर करतात.

“ही पद्धत अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मला वाटतं की ही एक चांगली पद्धत असून तिचा वापर केला पाहिजे. अर्थात जर त्यामुळे त्या व्यक्तीला हानी पोहोचणार नसेल तर,” असा दावा ते करतात.

या उपकरणाबाबत अद्याप कोणताही वैज्ञानिक पुरावा नसल्याबाबत विचारलं असता लुक्स म्हणाले की अंडकोषांवर बर्फ लावणं ही एक ‘आशादायक पद्धत’ आहे. मात्र ते असंही म्हणाले की त्यावर अधिक संशोधन व्हावं असं त्यांना वाटतं.

ल्युक्स याशिवाय चांगला आहार, पुरेशी झोप आणि व्यायाम करण्याचाही सल्ला देतात. या उपायांच्या बाजूनं भक्कम वैज्ञानिक पुरावे आहेत.

स्टिरॉईड्स आणि टेस्टोस्टेरॉनचे डोस घेतल्याचे विपरित परिणाम

बॉडीबिल्डिंग किंवा शरीरसौष्ठव आणि ‘लुक्समॅक्सिंग’ (दिसणं, रूप सुधारण्याचा एक ऑनलाइन ट्रेंड) यासाठी टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवणारी औषधं घेणाऱ्या पुरुषांच्या संख्येत वाढ होत असतानाच प्रजनन क्षमतेबद्दलचा हा सल्ला दिला जातो आहे.

मात्र स्टिरॉईड्स आणि टेस्टोस्टेरॉन घेतल्यामुळे प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होतो.

या हानीवरील उपाय म्हणून इन्फ्लुएन्सर्स वेगवेगळ्या औषधांच्या ‘स्टॅक्स’ (अनेक औषधाचं मिश्रण)चा प्रचार करतात. ही औषधं ते अनेकदा त्यांच्या वेबसाईटवर विकतात.

यामध्ये एचसीजी आणि एचएमजी सारख्या प्रजननक्षमतेसाठीच्या औषधांचा समावेश असतो. या औषधांचा वापर सामान्यपणे पुरुष आणि महिलांमधील प्रजननासाठीचे हार्मोन्स ‘सक्रिय’ करण्यासाठी केला जातो. मात्र वैद्यकीय सल्ल्याशिवाय ही औषधं घेतल्यास त्याचे धोकादायक दुष्परिणाम होऊ शकतात आणि कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं.

प्राध्यापक जयसेना

“हे अत्यंत धोकादायक आहे. काही औषधांमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात. तसंच यामुळे स्तनांचा आकार वाढू शकतो. जर यावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्यामुळे शारीरिक विद्रुपपणा निर्माण होऊ शकतो,” असं प्राध्यापक जयसेना म्हणतात.

टीआरटी घेतल्यानंतर प्रजनन क्षमता पुन्हा वाढवण्यासाठी फर्टिलिटी ‘स्टॅक्स’ म्हणजे विविध औषधांचं मिश्रण घेत असलेल्या जगभरातील 7 वेगवेगळ्या पुरुषांशी आम्ही बोललो. स्टिरॉईड्ससारखी औषधं ऑनलाइन विकत घेणं बेकायदेशीर असल्यामुळे त्यांनी त्यांची नावं गुप्त ठेवण्याची विनंती केली.

एका पुरुषानं मला सांगितलं की ‘एचएमजी आणि एचसीजी घेतल्यानंतर’ आपल्याला ‘अनेक मुलं’ होतील असं त्याला वाटलं होतं.

जमाल यांना काय अनुभव आला

जमाल (नाव बदलण्यात आलं आहे) यांनी बॉडीबिल्डिंगसाठी टेस्टोस्टेरॉन आणि स्टिरॉईड्सचे मोठे डोस घेतले होते. त्यामुळे त्यांची प्रजननक्षमता घटली होती. मग त्यांनी आणि त्यांच्या जोडीदारानं जेव्हा अपत्याबद्दल विचार सुरू केला, तेव्हा जमाल यांनी गेल्या वर्षाच्या अखेरीस ती औषधं घेणं थांबवलं.

त्यांना ऑनलाइन व्यासपीठं आणि युटु्युबवर, जमालप्रमाणेच तीच औषधं घेतलेल्या लोकांकडून प्रजनन क्षमतेबाबत सल्ला मिळाला. या लोकांनी त्यांना नक्कीच फायदा होणारं ‘प्रजनन क्षमता वाढवणारं औषधांचं मिश्रण’ (फर्टिलिटी स्टॅक) घेण्यास सुचवलं.

जमाल म्हणतात, “ऑनलाइन लोक म्हणायचे, ‘हे औषध अशाप्रकारे घ्यायचं असतं, त्याची अशी पद्धत असते’. मला माहित आहे की एन्डोक्रिनोलॉजिस्टकडे (हार्मोन्सचा तज्ज्ञ असलेला डॉक्टर) जाणं हा कदाचित योग्य मार्ग होता. मात्र तरीदेखील मी काही वेबसाईट्सवरून ती औषधं विकत घेतली.”

जमाल (नाव बदललं आहे)

या औषधांचा जेव्हा उपयोग झाला नाही, तेव्हा त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायचं ठरवलं आणि ते प्राध्यापक जयसेना यांना भेटले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय या प्रजनन क्षमता वाढवणाऱ्या ‘औषधांचं मिश्रण’ घेणं धोकादायक ठरू शकतं, याची त्यांना कल्पनाही नव्हती.

प्राध्यापक जयसेना यांच्या सल्ल्यानुसार जमाल यांनी सर्व औषधं घेणं थांबवलं. यात प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधांच्या मिश्रणाचाही (फर्टिलिटी स्टॅक) समावेश होता.

सहा महिन्यांनी त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची नैसर्गिक पातळी सुधारते आहे. अर्थात त्यांच्या शरीरातील शुक्राणूंच्या निर्मितीला चालना देणारे हार्मोन किंवा स्पर्म स्टिम्युलेटिंग हार्मोनची पातळी अजूनही कमी आहे. ते आणि प्राध्यापक जयसेना यांना आशा आहे की त्यामध्ये सुधारणा होईल.

प्राध्यापक जयसेना इशारा देतात की पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल जागरुकता वाढली आहे, ही चांगली गोष्ट आहे. मात्र त्यातून माहितीचा अभावदेखील समोर आला आहे. म्हणजे जमाल यांच्यासारखे पुरुष इन्फ्लुएन्सर्सकडून सल्ला घेतात. कारण यासंदर्भातील तज्ज्ञ त्यांना नेहमीच उपलब्ध नसतात.

ते पुढे म्हणाले, “यात जास्तीत जात काय होऊ शकतं तर अशा अनधिकृत किंवा अस्सल नसलेल्या कॉन्टेंटमुळे लोकांचं लक्ष त्यांना खरोखरंच उपयुक्त ठरू शकणाऱ्या गोष्टींपासून विचलित होऊ शकतं. यात घडू शकणारी वाईट गोष्ट म्हणजे ते अशी पावलं उचलू शकतात ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी होण्याची शक्यता असते.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

SOURCE : BBC