Source :- BBC INDIA NEWS
फोटो स्रोत, ANI
महाराष्ट्रात यंदा जूनमध्ये आधीच्या सरासरीच्या तुलनेत 50%च पाऊस पडला असून जुलैमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाचाच अंदाज असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे.
हवामान विभागानं आज 30 जून रोजी जुलै महिन्यासाठीचा विस्तारीत अंदाज जारी केला आहे. त्यानुसार या महिन्यात विदर्भाच्या पूर्व भागात सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल.
कोकण आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल तर मराठवाड्याच्या काही भागांत आणखी कमी पाऊस पडेल.
जुलैमध्ये लडाख आणि सिक्कीम वगळता देशभरात जवळपास सर्वच राज्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
ईशान्य भारतातील काही भाग, छत्तीसगड, विदर्भ, तेलंगणालगतचा प्रदेश आणि पूर्व किनाऱ्यावरील काही भागात सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
फोटो स्रोत, ANI
1971 ते 2020 या कालावधीतील पावसाच्या आकडेवारीच्या सरासरीनुसार भारतात जुलैमध्ये सरासरी 280.4 मिलीमीटर पाऊस पडतो. पण यावेळी या सरासरीच्या 94 टक्क्यांहून कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा वर राहील.
जूनमध्ये संपूर्ण देशात मिळून 99.5 मिलीमीटर पाऊस पडला. गेल्या सव्वाशे वर्षांत म्हणजे (1901 पासूनचा) पाऊस पाहता, 2026 चा जून महिना पाचव्या स्थानावर आहे.
गेल्या पाच वर्षांतील जूनमधला पाऊस :
- 2009 – 87.6
- 1905 – 91.9
- 2014 – 92.8
- 1926 – 96.7
- 2026 – 99.5
देशात यंदा कमी पाऊस पडण्यामागे जागतिक हवामानाशी संबंधित घटक कारणीभूत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
पॅसिफिक महासागरातील एल निनो स्थिती जुलैतही कायम राहील. तसंच मान्सून संपेपर्यंत एल निनो कायम राहण्याची शक्यता आहे.
एल निनोच्या काळात इंडियन ओशन डायपोल तयार झाल्यास भारताचं पर्जन्य सुधारतं आणि थोडासा दिलासा मिळतो.
सध्या IOD न्यूट्रल स्थितीत असून, मान्सूनच्या उत्तरार्धापर्यंत त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
त्यामुळे सकारात्मक IOD मुळे मान्सूनला मिळणारा अतिरिक्त आधार यंदा मिळण्याची शक्यता कमी आहे.
फोटो स्रोत, ANI
यंदा कमी पावसाच्या शक्यतेमुळे हवामान विभागाने सरकारी यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि शेतकऱ्यांना तातडीने योग्य पावले उचलण्याचे आवाहन केले आहे .
उपलब्ध पाण्याचे काळजीपूर्वक व्यवस्थापन, पाणी संवर्धन आणि शेतीसाठीच्या आपत्कालीन योजना (Agricultural contingency measures) तातडीने राबवणे आवश्यक आहे .
संभाव्य धोके कमी करण्यासाठी IMD कडून नियमितपणे जिल्हास्तरीय हवामान अंदाज आणि कृषी सल्ले दिले जात आहेत .
एका बाजूला जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असला तरी कमी कालावधीत प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता मात्र टाळता येणार नसल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
SOURCE : BBC




