Home LATEST NEWS ताजी बातमी महाराष्ट्रातील 9 पोलिसांना जन्मठेप; तुरुंगातील मारहाणीचं ते प्रकरण काय होतं?

महाराष्ट्रातील 9 पोलिसांना जन्मठेप; तुरुंगातील मारहाणीचं ते प्रकरण काय होतं?

3
0

Source :- BBC INDIA NEWS

पोलीसांच्या मारहाणीत 15 वर्षांपूर्वी कस्टडीत मृत्यू, वाशिमच्या 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा

पोलीस कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमध्ये संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी 9 पोलिसांना आज( 2 जुलै) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

ज्या प्रकरणात पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय, ती घटना वाशिम जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणामधील आहे.

बैग्या नैनू पवार असं या संशयित आरोपीचं नाव होतं. बैग्या हा पारधी समाजातील होता आणि चोरीच्या संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.

त्यानंतर, त्याचा रिसोड पोलिसांच्या मारहाणीत 10 मे 2011 रोजी मृत्यू झाला होता.

तब्बल 15 वर्षांनंतर या खटल्याचा निकाल लागला असून वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयानं 9 पोलीस कर्मचाऱ्यांना गुरुवारी (2 जुलै) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक माधव धांडे, पोलीस कर्मचारी मदन पवार, रमेश पवार, हिरालाल ताराम, शिवाजी खिल्लारी, अशोक वैद्य, वसंत जाधव, नागोराव खांडके, पंजाब पाटकर यांचा समावेश आहे.

या प्रकरणात कलम 302 अन्वये नऊ जणांना जन्मठेप, पुरावा नष्ट करण्यासाठी 7 वर्षे तर ‘अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यां’न्वये पाच वर्ष शिक्षा झाली आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

2011 साली मयत बैग्यासोबत नेमकं काय घडलं होतं, याबाबतची माहिती जिल्हा सरकारी वकील श्रीराम काळू, मनीष साकळे आणि प्रताप नायक यांनी बीबीसी मराठीला दिली आहे.

त्यांनी सांगितलं की, “सेनगाव तालुक्यातील वाढोणामधील बैग्या नैनू पवार आणि राजू शेषराव पवार या दोघांना रिसोड पोलिसांच्या पथकाने 10 मे 2011 रोजी पहाटे साडेतीन वाजता संशयित म्हणून ताब्यात घेतले होतं.

“त्या दोघांना चौकशीसाठी रिसोड पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. या मारहाणीत आरोपी बैग्या याचा मृत्यू झाला होता, तर राजू गंभीर जखमी झाला होता.”

“राजूला तातडीनं उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आलं तर, आरोपी बैग्याचं यवतमाळ दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात आलं.”

“या प्रकरणी मयत बैग्या याच्या कुटुंबियांनी रिसोड पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल केली. बैग्याविरोधात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसताना पोलिसांनी त्याला एकाएकी उचलून नेलं आणि त्याला गंभीर मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता.”

“त्यांनतर सदर प्रकरणाचा तपास वाशिम सीआयडीकडे सोपावण्यात आला होता. सीआयडीचे तत्कालीन उपाधिक्षक अन्वर शेख यांनी रिसोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून जून 2011 मध्ये खून तसेच ‘अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या’न्वये पोलिसांवर गुन्हा दाखल केला होता.”

पोलीसांच्या मारहाणीत 15 वर्षांपूर्वी कस्टडीत मृत्यू, वाशिमच्या 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा

या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडीच्या पथकाने केला होता. सीआयडीच्या पथकाने तपास करून वाशिमच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं.

या प्रकरणात सीआयडीने 34 दिवस तपास करून खुनाच्या गुन्ह्यासह स्पेशल ऍट्रॉसिटीचाही गुन्हा पोलिसांवर दाखल केला होता.

“दोषी पोलिसांना ही शिक्षा झाल्यामुळे समाजात एक चांगला संदेश गेलेला आहे की, समाजातील जे अंतिम घटक आहेत, त्यांना देखील न्याय मिळू शकतो,” अशी भावना सरकारी वकील श्रीराम काळू यांनी व्यक्त केली आहे.

‘रात्री पोलीस अचानक आले आणि त्याला मारू लागले’

मयत बैग्या पवारचे वडील नयणु फैसल्या पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना या निकालाबाबत समाधान व्यक्त केलं. तसेच, त्या दिवशीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

ते म्हणाले की, “हा निकाल ऐकून मला समाधान वाटतंय. त्या दिवशी माझा मुलगा सात वाजता शेतता गेला होता आणि रात्री बारा वाजता घरी आला होता. आम्ही सगळे झोपी गेलो असता रात्री पोलीस अचानक आले आणि त्याला मारू लागले.”

“का मारत आहात? असं विचारल्यावर पोलीस म्हणाले की आम्हाला तपासणी करायची आहे. कशाचा तपास करायचा आहे असं विचारल्यावर त्यांनी तुम्हाला काय करायचं आहे, असं विचारून बैग्याला रात्री साडेतीन वाजता नेलं. सहा वाजता त्याचा जीव घेतला. आम्हाला पोलीस स्टेशनला गेल्यावर कळलं की तो पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलाय.”

पोलीसांच्या मारहाणीत 15 वर्षांपूर्वी कस्टडीत मृत्यू, वाशिमच्या 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा

47 साक्षीदारांची तपासणी, 9 पोलिसांना जन्मठेप

या प्रकरणात एकूण 47 साक्षीदार तपासण्यात आले.

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आज गुरुवारी 2 जुलै रोजी रिसोड पोलीस ठाण्यातील तत्कालीन 9 पोलीस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निर्णय दिला आहे.

या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी सहाय्यक वकील ॲड. श्रीराम काळू यांनी काम पाहिले, तर मयत बैग्या पवार याच्या वतीने हिंगोलीचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. मनिष साकळे यांनी काम पाहिले.

पोलीसांच्या मारहाणीत 15 वर्षांपूर्वी कस्टडीत मृत्यू, वाशिमच्या 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा

त्यांना ॲड.प्रताप नायक भगवतीकर यांनी सहकार्य केले.

तब्बल 15 वर्षानंतर, हा निकाल लागला असल्याने मयत बैग्या नैनू पवारची आई कलाबाई, वडील नैनू, पत्नी संजीवींनी पवार कुटूंबाला न्याय मिळाला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

SOURCE : BBC